' हे भारतीय विद्यार्थी युद्धापासून वाचले, पण भविष्यातील या भीषण समस्या सुन्न करणाऱ्या आहेत – InMarathi

हे भारतीय विद्यार्थी युद्धापासून वाचले, पण भविष्यातील या भीषण समस्या सुन्न करणाऱ्या आहेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

युक्रेन-रशिया युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये मेडिकलचं शिक्षण घ्यायला गेलेले जवळपास १८ ते २० हजार भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्यामुळे आता त्यांचं काय होणार? ते सुरक्षित राहतील ना? अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. या विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्यासाठी सरकार ठोस पावलं उचलत आहे. ‘ऑपरेशन गंगा’ द्वारे विमानांद्वारे आतापर्यंत हजारो भारतीय विद्यार्थी भारतात परतलेत.

 

students im

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

इतक्या धोकादायक परिस्थितीतून आपलं मूल सुखरूप घरी परतलंय हे पाहून त्या प्रत्येकाच्याच कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला असेल. “आपल्या लेकराचा जीव वाचला हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं” अशी भावना सहाजिकच त्यांच्या मनात आली असेल. पण अजूनही युक्रेनमध्ये अडकलेले हजारो भारतीय विद्यार्थी भारतात परत यायचे बाकी आहेत.

सरकारच्या प्रयत्नांचं चीज व्हावं आणि ते सगळे सुखरूप मायदेशी परतावेत हे त्या सगळ्यांच्या कुटुंबियांना आणि या सगळ्या बिकट परिस्थितीचा सुदैवाने भाग नसलेल्या आपल्यालाही वाटतंच आहे. पण एकदा ते परतले की त्यांच्या भवितव्याचं काय हा खूप मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहणार आहे.

आधीच पालकांचे ५०- ५० लाख खर्च करून हे विद्यार्थी मेडिकलचं शिक्षण घ्यायला युक्रेनला गेले होते. पुढे असं काही होईल याची त्यावेळी कुणालाच कल्पना नव्हती. या विद्यार्थ्यांपैकी बऱ्याच जणांना डिग्र्या मिळायच्या बाकी आहेत. त्यांना त्यांची डिग्री पूर्ण करता येईल का की पुन्हा पाहिल्यापासून सगळी सुरुवात करावी लागेल? हा एक खूप मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. यात त्यांच्या पालकांचा चिक्कार पैसा तर गेला आहेच. पण पैशाबरोबरीनेच मुलांची इतकी वर्षंही वाया जाणार का हेदेखील कळेनासं झालंय.

 

tension inmarathi

 

वय तर वाढत चाललंय आणि आता नोकरी करायची वेळ आलेली असताना पुन्हा शिक्षणातच अजून किती वर्षं घालवावी लागतील? आपलं डॉक्टर बनायचं स्वप्न पूर्ण होईल की नाही? अशी भीती विद्यार्थी आणि पालकांच्या मनात निर्माण झाली आहे.

भविष्याची अनिश्चितता

युक्रेनच्या मेडिकल युनिव्हर्सिटीजमध्ये ऑफलाईन लेक्चर्स बंद झाले होतेच. पण आता १२ मार्चपर्यंत ऑनलाईन लेक्चर्सही होऊ शकणार नाहीत. सगळी परिस्थिती हळूहळू ठीक होईल आणि पुन्हा लेक्चर्स सुरू होतील असं तिथल्या युनिव्हर्सिटीजकडून सांगितलं जातंय. जून २०२२ मध्ये ज्याचं एमबीबीएसचं शेवटचं वर्ष पूण होणार आहे त्यांना डिग्री दिली जाईल असं सांगण्यात आलंय पण बाकी विद्यार्थ्यांचं काय होणार याविषयी अद्याप काहीच बोललं गेलेलं नाही.

 

medical im

 

युक्रेनमधल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या सेमिस्टरनंतर ‘क्रॉक’ नावाची एक परीक्षा देणं अनिवार्य असतं. या परीक्षेत उत्तीर्ण होता आलं तरच पुढल्या वर्षाचं शिक्षण घेता येतं. नाहीतर एक वर्षाचा ड्रॉप लागतो. आताची परिस्थिती पाहता या वर्षी ही परीक्षा होऊ शकणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी पुढे नेमकी कशी परिस्थिती असेल याविषयी अनिश्चितता आहे.

युक्रेनमधल्या ‘बुकोविनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी’ मध्ये तिसऱ्या वर्षाला असलेली तितली बिस्वास ही विद्यार्थिनी म्हणाली, “शैक्षणिकदृष्ट्या आमचं भवितव्य काय आहे याची आम्हाला खरोखरच कल्पना नाही आणि हे भीतीदायक आहे. जर आम्ही ‘क्रॉक’ परीक्षा पास झालो नाही तर आम्हाला आमच्या युनिव्हर्सिटीतून काढून टाकलं जाईल. आमच्या चौथ्या वर्षाच्या कोर्समध्ये बरीच प्रॅक्टिकल आव्हानं असतात. त्यामुळे ‘क्रॉक’ परीक्षा द्यायला पात्र होण्यापूर्वी आम्हाला ‘रेक्टर क्रॉक’ ही परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा देणं आणि पास होणं अत्यावश्यक असतं. पण या युद्धजन्य परिस्थितीने आमच्यासाठी आमची परिस्थिती अनिश्चित करून ठेवली आहे.” तितलीला NEXT ची तयारी करायची होती आणि भारतात येऊन मेडिकल प्रॅक्टिस करायची होती पण एमबीबीएसच्या डिग्रीशिवाय हे शक्य होताना तिला दिसत नाहीये.

कागदपत्रांचे काय?

यापुढची या विद्यार्थ्यांसमोरची दुसरी मोठी समस्या आहे ती आपले डॉक्युमेंट्स परत कसे मिळवायचे?

युक्रेनच्या ‘इवानो फ्रेंकविस्क नॅशनल युनिव्हर्सिटी’मध्ये मेडिकलचं शिक्षण घेणारा हरिद्वारचा विद्यार्थी कन्हैय्या १ मार्चला भारतात परतला. फार कठीण परिस्थितीतून तिथून निघून इथे येऊ शकलेला कन्हैय्या म्हणाला की, युक्रेनमध्ये परिस्थिती फारच वाईट आहे. अजूनही जे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत ते फार घाबरलेले आणि अडचणीत आहेत.

 

 

एमबीबीएसच्या दुसऱ्या सेमिस्टरला शिकणाऱ्या कन्हैयाला १२ मार्चपर्यंत युनिव्हर्सिटीज बंद असतील, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे शिक्षण ठप्प झालंय इतकीच कल्पना आहे. पुढे काय होईल हे येणारा काळच ठरवेल असं म्हणताना तो विद्यार्थ्यांना आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स परत कसे मिळतील याचीही चिंता असल्याचं सांगतो.

सगळे विद्यार्थी या युनिव्हर्सिटीजमध्ये आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स जमा करतात. जर रशियाच्या निशाण्यावर युक्रेनच्या युनिव्हर्सिटीज, युनिव्हर्सिटीजची मुख्य ऑफिसेस असतील तर विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स वाचतील की नाही अशी भीती निर्माण झाली आहे.

२०१४ साली युक्रेनवर जे संकट आलं होतं ते आताच्या मानाने बरंच सौम्य होतं. त्यावेळी अवघ्या ५०० विद्यार्थ्यांची व्यवस्था करावी लागली होती.

सरकारच्या मदतीची अपेक्षा

भारत सरकारला या विद्यार्थ्यांचं स्थलांतर करायला ‘स्टडी ऍब्रॉड कन्सल्टन्ट’ म्हणून कार्य करावं लागेल कारण मर्यादित पायाभूत सुविधांमुळे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना भारतातल्या मेडिकल कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीमध्ये सामावून घेता येणं शक्य होणार नाही.

‘द फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स एग्झामिनेशन’ FMGE अधिक प्रगत करता येऊ शकते. शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना कामावर रुजू करता येऊ शकतं. मात्र आधीच्या वर्षांत शिणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या युनिव्हर्सिटीजमध्ये प्रवेश घ्यावा लागेल.”

अर्थात या सगळ्यासाठी विद्यार्थ्यांचे लक्ष हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच लागले आहे.

 

modi cabinet inmarathi

 

‘नॅशनल मेडिकल कमिशन’ अंतर्गत असलेल्या ‘अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड’च्या अध्यक्षा डॉ. अरुणा वाणीकर यांनी ‘मेडिकल जर्नल ऑफ इंडिया’ मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या लेखात म्हटलंय की, परदेशातून शिक्षण घेऊन आलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांकडे भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी सध्या एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे ‘फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट’ ही परीक्षा पास होणे. पण त्यासाठी परदेशातून एमबीबीएसची डिग्री पूर्ण झालेली असणं गरजेचं आहे.

ज्यांचं तिथलं मेडिकलचं शिक्षण अर्धवट राहिलंय त्यांच्यासाठी भारतातल्या मेडिकल कॉलेजेसमधून डिग्री पूर्ण करण्याचा पर्याय सध्यातरी नाहीये. मात्र एनएमसी या सगळ्यावर विचार करत असून भविष्यात काही पर्याय समोर येऊ शकतील अशी आशा आहे.

 

student im

 

‘इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’शी संबंधित एक प्रसिद्ध चिकित्सक सगळं काही युद्ध होणार की नाही यावर अवलंबून असल्याचं म्हणाले. ते म्हणाले की, रशियाने जरी युक्रेनवर कब्जा केला तरी रशिया सगळी शिक्षण व्यवस्था आपल्या हातात घेईल आणि ती पुन्हा नीट करेल. युनिव्हर्सिटीज जश्या उघडतील तसं भारतीय विद्यार्थ्यांना तिथे पुन्हा जाऊन शिक्षण घेता येईल. पण जर आणखी काही दिवस युद्धाची परिस्थिती अशीच राहिली तर विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ शकतो. पण परिस्थिती जशी सुधारेल तसं शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू होतील.

कोविडच्या काळातही पूर्ण जग फार कठीण परिस्थितीतून गेलं. क्लासेस बंद होऊन सगळी व्यवस्था ऑनलाईन झाली. पण त्यानंतर परिस्थिती पुन्हा ठीक झाली. अशाच प्रकारे युद्धानंतर परिस्थिती सुधारेल अशी आशा करता येईल.

काहीही चूक नसताना या इतक्या कठीण,अनिश्चित परिस्थितीला सामोरं जावं लागणं हे खरंच या विद्यार्थ्यांचं दुर्दैव आहे. या भयानक परिस्थितीतून सहीसलामत वाचल्यानंतरही हजारोंची आयुष्यं अशी टांगणीला लागणं दोन देशांमधल्या आपसातल्या वैराचे किती मोठ्या प्रमाणावर आणि खोलवर परिणाम होऊ शकतात हेच अधोरेखित करतं.

 

stop the war im

 

अजून कितीजण या सगळ्यात असे नाहक भरडले जाणार आहेत हे देवच जाणे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?