लता दीदी, मुंबई दर्शन आणि मी…कधीच विसरू शकणार नाही असा दिवस!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर
===
आजचा बाईकवरून मुंबई दर्शनचा प्लॅन २ दिवस आधीपासूनच ठरलेला, पण काल संध्याकाळपासून हा प्लॅन किती वर्क होईल याची शंका वाटत होती. कारण कालपासूनच लता मंगेशकर यांची तब्येत खालावली, न्यूज चॅनल्स आणि सगळीकडेच या बातम्या दिसू लागल्या.
काहीतरी घडणार आहे असं वाटत होतं पण मध्येच सकारात्मक आणि नकारात्मक बातम्या येत होत्या आणि हायसं वाटत होतं, अगदी काल रात्रीपर्यंत काही बातमी नाही ना याची खात्री करूनच झोपलो, प्लॅन कॅन्सल करायचं मनही नव्हतं आणि लता दिदींची अशी बातमी काही कानावर पडू नये असंही वाटत होतं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
शेवटी आज सकाळी ८ च्या दरम्यान निघालो आणि ठाणे क्रॉस करताच बातमी कानावर पडली की लतादिदी गेल्या, क्षणभर काही सुचत नव्हतं, बाईक थांबून बाजूला घेऊन २ मिनिटं शांत बसायचं होतं पण ते शक्य नाही झालं, कारण अश्रू अनावर झाले असते.
काही माणसं असतात ना ज्यांच्याशी आपलं रक्ताचं नातं नसतं तरी ते आपल्याला अगदी जवळचे वाटतात. मोहम्मद रफीची गाणी ऐकताना आजही माझ्या डोळ्यात कैक वेळा पाणी येतं, रफीला तर मी बघितलंही नाही तरी!
इरफान गेला किंवा सुशांत गेला तेव्हा आपल्या घरातली व्यक्ती गेल्याप्रमाणे मी हमसून हमसून रडलेलो.
लता दीदी तर याहून श्रेष्ठच शिवाय जेव्हा आम्हाला संगीतातला ‘सा’ सुद्धा कळत नव्हता तेव्हापासून आजवर लता दीदी यांचीच गाणी ऐकून आमच्यासारख्या कित्येक पिढ्या घडल्या त्यातली शेवटची पिढी माझी.
या अशा व्यक्ती आहेत ज्यांच्याशी आपला थेट काहीच संबंध नाही पण त्यांच्या कलेतून त्या व्यक्ती आपल्यातल्या होतात आणि त्या व्यक्तीच्या जाण्याने खरंच एक पोकळी निर्माण होते.
माझी आई म्युझिक इंडस्ट्रीतलीच, मरीन लाईन्सला पोचल्यावर तिला कॉल केला तेव्हा तिला फोनवर रडू आवरत नव्हतं, खरंतर माझीही अशीच काहीशी परिस्थिती होती, पण तरी लतादीदी गेल्याचं दुःख मनात कुठेतरी ठेवून मुंबई फिरत होतो.
मुंबईतल्या गिरगाव चौपाटीपासून नरीमन पॉईंटपर्यंत बाईकवरून फिरताना लतादीदी यांच्या असंख्य गाण्यांचं मनात काहूर उठलं होतं. लतादीदी यांच्या अंत्ययात्रेला जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचा विचार आला होता पण ते काही झेपलं नसतं, त्यामुळे तो विचार लगेच बाजूला ठेवला.
–
- २० दिवस फोनवर दीदींनी ऐकवलं गाणं, मृत्युशय्येवरील दिग्दर्शकासाठी आवाज ठरला संजीवनी
- रेहमानसोबत तब्बल ८ तास उभं राहून केलं रेकॉर्डिंग आणि अजरामर झालं हे दीदींचं गाणं!
–
मुंबईची मस्त बाईक राईड एन्जॉय करून घरी आलो, टीव्ही लावला त्यांची अंत्ययात्रा सुरू होती आणि मागे ‘मेरी आवाज ही पहचान है’ हे गाणं सुरू होतं, रडू आवरलं नाही म्हणून मी तिथून उठून दुसऱ्या खोलीत गेलो!
खरंच लतादीदी यांनी काय कमावलं हे मुंबईतल्या रिकाम्या रस्त्यांकडे बघून आणि माझ्यासारख्या कित्येक तरुणांचे पाणावलेले डोळे बघून जाणवलं. ‘सरणार कधी रण’ ते ‘लुका छुपी’ अशी बेफाम, अफाट रेंज असणाऱ्या गानसम्राज्ञी लतादीदी आपल्यात नाही ही गोष्टच न पचण्यासारखी आहे.
लोकं म्हणतात की कलाकार म्हणून जितक्या लता दीदी चांगल्या होत्या तितक्या माणूस म्हणून नव्हत्या, कित्येकांना त्यांनी किंवा तेव्हाच्या कंपूशाहीने पुढे येऊन दिलं नाही वगैरे वगैरे..
या सगळ्यांना मला एकच सवाल विचारायचा आहे की गेली कित्येक वर्षं लतादीदी गात नाहीयेत, तर या इतके दिवसात एकतरी गायिका त्यांच्या तोडीस तोड तयार झाली का? या उत्तर आपल्या कोणाकडेच नाही कारण लता मंगेशकर या एकच आहेत.
कोणताही कलाकार माणूसच असतो, आणि इतर माणसांप्रमाणे तेसुद्धा कधीतरी चुकतात, लोकं सरळ टीका करतात माणूस म्हणून अमुक अमुक व्यक्ती चांगली नाही, अहो पण कलाकार म्हणून ती व्यक्ती जितकी श्रेष्ठ आहे त्याच्या नखाचीदेखील सर आपल्याला येणार आहे का?
असो आता शांतपणे संध्याकाळी लता दीदींच्या गाण्याची पारायणं करायची आणि त्यांच्या आठवणींना उजाळा द्यायचा इतकंच आपण करू शकतो.
बाकी पु.ल म्हणालेत ते अगदी खरंय “आकाशात देव आहे का ते माहीत नाही पण आकाशात सूर्य, चंद्र आणि लता दीदींचे स्वर आहेत आणि सदैव राहतील!”
मुंबई सफरीची ही आठवण मी शेवटपर्यंत विसरणार नाही, माझ्यासारख्या तमाम संगीतप्रेमींकडून लता मंगेशकर यांना भावपूर्ण आदरांजली!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.