तमाम पुणेकरांचा दोस्तीचा कट्टा ‘वैशाली’त रंगेल, पण आता शेट्टी काकांशिवाय…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
”संध्याकाळी ५ ला कट्ट्यावर मसालाडोसा”, ”आज सगळेच अड्ड्यावर भेटतील तेव्हा चर्चा करू”, ”दोन फिल्टर, एक साधा”…पुणेकरांच्या तोंडी असलेली ही कोड लॅंग्वेज पुणेकर नसलेल्यांना पटकन डीकोड करता येत नाही. पुणेकरांच्या या वरच्या संवादात सगळं गुपित वाटत असलं तरी अस्सल पुणेकरांना मात्र ही भाषा, त्यातील ठिकाण लगेच कळतं, आणि ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी पुणेकर तिथे पटकन पोहोचतातही.
तर या सगळ्या संवादातील एक महत्वाचा धागा म्हणजे संध्याकाळी भेटण्याचा अड्डा! आता हा अड्डा कोणता? असं केवळ पुणेकर नसलेली मंडळीच विचारू शकतील, कारण अड्डा, कट्टा आणि सोबत साऊथ इंडियन पदार्थांचा घमघमाट म्हणजे एफ,सी. रोडवरचे वैशाली हे समीकरण ठरलेलं.
या वैशालीने अनेक पिढ्यांना मोठं होताना पाहिलंय, कुणाची मैत्री अनुभवलीय, अनेक दिग्गजांच्या कलात्मक चर्चा पाहिल्यात. काहींची भांडणं, रुसणं, रागवणं बघितलंय तर लाखो मित्रांची धमाल अनुभवलीय. मित्रांसोबत वैशाली हे नावही मोठं झालं, पदार्थांचा दर्जा आणि मुख्यतः पुणेकरांचं हक्काचं ठिकाण म्हणताना पुणेकर नसलेलेही वैशालीवर प्रेम करू लागले यात वैशालीचं खरं यश दडलंय.
तर या वैशालीला जन्म देणारे, पुणेकरांसाठीच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी भेटीचं ठिकाण निर्माण करणारे जगन्नाथ शेट्टी यांचं नुकतंच पुण्यात निधन झालं, आणि वेशालीसह पुणेकर खव्वैयांनाही पोरकं झाल्याची भावना झाली.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
कोण आहेत जगन्नाथ शेट्टी ?
वैशालीचे सर्वेसर्वा, कॅफे मद्रासचे प्रणेते, अनेक पुरस्कारांचे मानकरी आणि अस्सल पुणेकर अशी ओळख असलेले शेट्टी हे मुळचे पुण्याचे नाहीत हे कुणाला सांगूनही खरं वाटत नाही.
कर्नाटकातील उडपी येथील बैलूर या गावी एका गरीब घरात १९३२ मध्ये जगन्नाथ शेट्टी यांचा जन्म झाला. १३ व्या वर्षी घर सोडून काकांसह मुंबईतील हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून, फरशी पुसण्यापर्यंत पडेल ती कामे केली. १७ व्या वर्षी ते पुण्यात आले तेंव्हा ७० वर्ष ही आपली कर्मभुमी ठरेल याचा त्यांनी विचारही केला नव्हता.
हॉटेल व्यवसायातच काम करण्याचे निश्चित असल्याने हातातील तुटपुंज्या जागेत त्यांनी १९५१ मध्ये कॅफे मद्रास सुरू केले. जे आता रूपाली या नावाने ओळखले जाते. त्यानंतर मद्रास हेल्थ होम सुरू केले. जे आता हॉटेल वैशाली या नावाने जगभर प्रसिद्ध आहे. मात्र यावेळी हे वैशाली केवळ शेट्टी यांचीच नव्हे तर पुण्याची शान ठरेल याची त्यांना कल्पनाही नव्हती. त्यानंतर शेट्टी यांनी हॉटेल आम्रपाली सुरू केले.
साधा, मसाला आणि बरंच काही…
वैशाली, रुपालीची खासियत म्हणजे अप्रतिम दर्जाचे साऊथ इंडियन पदार्थ. साधा डोसा, उत्तप्पा, अप्पम, रवा, म्हैसुर, इडली यांपासून असंख्य प्रकाराचे ऑथेन्टिक पदार्थ चाखायचे असतील तर वैशालीला जायलाच हवं असा आग्रह पुणेकर करतात.
पुण्यात खाद्यपदार्थांचे हजारो पर्याय उपलब्ध असताना नेमकं वैशालीलाच प्रसिद्धी का मिळाली? यामागेही गंमत आहे. मुळात एफ सी रोडहा पुण्यातील तरुणाईचा आवडता रस्ता. खरेदी, खाबुगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या या रस्त्यावर अनेक मोठी कॉलेजेस, शिक्षणसंस्था आहेत. त्यामुळे या रस्त्यावर पुण्यातील तसेच पुण्याबाहेरील विद्यार्थ्यांचाही या रस्त्यावर राबता असतो.
अशापद्धतीने विद्यार्थी, नोकरदार यांच्यासह कलाविश्वातील मंडळींनाही चर्चा करायला वैशालीचाच आधार घ्यावा लागतो. या हॉटेलमध्ये टेबल मिळवण्यासाठी कितीही खटपट करावी लागली तरी खव्वैये थकत नाहीत, त्यामुळे टेबल मिळवण्यासाठी रांग असली तरीही पुणेकरांना ती रांग मान्य असते.
सुरुवातीला जगन्नाथ शेट्टी स्वतः ह़ॉटेलमध्ये वावरायचे. प्रत्येकाला हवं,नको ते पहायचे, पदार्थांची तव स्वतः चाखायचे. उत्तम दर्जाचे दाणिक्षात्य पदार्थ पुणेकरांना देणं या विचाराने वैशालीचा प्रवास सुरु होता. त्यात कालांतराने नव्या पदार्थांची भर पडली असली तरी येणारा माणूस फिल्टर कॉफी, उत्तप्पा, म्हैसूर मसाला खाल्ल्याशिवाय गेले तरच नवल!
–
आईवर रागावून त्यांनी घर सोडून पुणे गाठलं…आणि काही वर्षात तुळशीबाग उभी केली…!
पुणेकरांच्या या विचित्र तऱ्हा वाचून गंमत वाटेल, पण हा माज नाही, तर…
–
पुरस्कारांचे मानकरी
वैशाली, रुपाली आणि आम्रपाली या तिन्ही हॉटेल्सना पुणे महापालिकेने क्लीन किचन पुरस्काराने सन्मानित केले आहे. स्वच्छता आणि उत्तम दर्जा या एकाच ध्येयाने शेट्टींनी केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. याशिवाय पुण्यभुषण सारख्या अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचेही ते मानकरी असून पुण्यातील सामाजिक क्षेत्रातही त्यांचे बरीव योगदान होते.
सत्तर वर्ष पुण्यात वास्तव्य केल्याने त्यांचे अनेक पिढ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. अस्खलित मराठीत संवाद साधत हॉटेलमधील प्रत्येकाची जातीने विचारपूस करणारे शेट्टी हे काही ग्राहकांचे मित्र, काहींचे काका-मामा तर काहींचे आजोबा म्हणूनही ओळखले जायचे.
विद्यार्थी, कलाकार, व्यावसायिक या सर्वांचेच त्यांच्याशी ह्रणानुबंध होते. वैशाली ही केवळ आपली नव्हे तर पुण्याची ओळख बनावी यासाठी त्यांनी सात दशकं प्रयत्न केले,
वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी कर्मभुमीतच अखेरचा श्वास घेतला, यापुढेही वैशालीत असाच कट्टा रंगेल, गरमागरम सांबाराचा सुवास दरवळेल, मित्रांच्या गप्पा, कलाकारांच्या चर्चा ऐकू येतील, खुसखुशीत डोसा, इडलीवर ताव मारला जाईल मात्र या सगळ्यात जगन्नाथ शेट्टी यांच्या आपलेपणाची उणीव कायमच भासेल हे नक्की!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.