”बाबासाहेब त्या मोजक्या लोकांपैकी एक, ज्यांना बाळासाहेब चरणस्पर्श करायचे”
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
नोव्हेंबर महिन्यातील ते दोन दिवस, ज्यांनी महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींना महाराष्ट्रापासून, आपल्या सर्वांपासून हिरावलं. वयोमानानुसार त्यांचं शरीर थकलं होती, कधी ना कधी त्यांचा हा प्रवास थांबणार होता, याची आपल्यापैकी प्रत्येकाला जाणीव होती मात्र बुद्धीने दिलेला हा कौल स्विकारण्यास मनाला वेळ लागत होता.
१५ नोव्हेंबर रोजी पहाटे पुण्यातील खाजगी रुग्णालयात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत मावळली. ९९ वर्षांचं शरीर मृत्युशी झुंज देत असलं तरी जगण्याची,शिवरायांचं चरित्र्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जिद्द अखेरच्या क्षणापर्यंत कायम होती.
याचंच प्रतिक म्हणजे शंभरीत पदार्पण करताना बाबासाहेबांचं अभिनंदन करणाऱ्या सोहळ्यात,”माझं कार्य अविरत सुरु ठेवण्यासाठी १०० नव्हे तर दिडशे वर्षांचं आयुष्य लाभावे” हे त्यांचे शब्द जगण्याची, शिकण्याची, कार्य करण्याची उर्जा म्हणजे काय हे शिकवतात.
तर १५ नोव्हेंबर रोजी बाबासाहेब पंचतत्वात विलीन झाले, शिवशाहीरीचे एक ज्वलंत पर्व संपले, महाराष्ट्रातील नव्हे जगभरातील मराठी माणसाचे डोळे पाणावले. या धक्क्यातून आपण अजूनही सावरलो नसतानाच आज १७ नोव्हेंबर रोजी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी येऊन ठेपली.
आज दिवसभर बाळासाहेब ठाकरेंच्या अनेक स्मृतींना उजाळा देत असताना एक योगायोग लक्षात आला तो म्हणजे अवघ्या दोन दिवासांच्या अंतराने शिवरायांचे दोन शिलेदार काळाने हिरावले.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
शिवरायांचा एक असा भक्त ज्याने आयुष्यभर आपल्या लेखणीतून शिवरायांचा ध्या्स घेतला, देशाला जे शिवराय कळले, उमगले, अनेक नव्या पिढ्यांपर्यंत शिवरायांचे कार्य पोहोचले ते याच लेखणीमुळे! तर दुसरा शिवभक्त ज्याने शिवाजी महाराजांच्या स्वराज्याप्रमाणे महाराष्ट्रातही ‘सुराज्य’ उभे रहावे यासाठी चंग बांधला. शिवरायांचा बाणेदारपणा, त्यांची लढाऊवृत्ती, निडरता असं बालकडू घेतलेल्या या शिष्य़ाने केवळ त्यांची आदर्श जपली नाहीत तर त्यांच्याच नावाने पक्षबांधणी करत मराठी माणसाला स्वाभीमानाने मान उंच करत जगायची संधी दिली,
तर अशा दोन्ही शिवभक्तांनी नोव्हेंबर महिन्यात, अवघ्या एका दिवसाच्या फरकाने जगाचा निरोप घ्यावा, हा योगायोगच म्हणावा लागेल. अर्थात बाळासाहेब ठाकरेंनी १७ नोव्हेंबर २०१२ रोजी अखेरचा श्वास घेतला, तर बाबासाहेब पुरंदरे यांनी २०२१ साली शंभरीत पदार्पण केल्यानंतर आपली जीवनयात्रा संपवली, मात्र तारीख आणि हा महिना यांचा विचार केला तर एका दिवसाच्या अंतराने शिवरायांच्या दोन्ही कर्तबगार मराठमोळ्या मावळ्यांचे जाणे आजही मनाला चटका लावून जाणारे आहे.
बाळासाहेब त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायचे
बाळासाहेब आणि बाबासाहेब यांनी ऋणानुबंध जपले होते. खरंतर दोघांचेही कार्य वेगळ्या वाटांचे, मात्र तरिही मराठी माणूस आणि शिवरायांचे कार्य, विचार हा दुवा त्यांनी आयुष्यभर जपला.
कोणताही कार्यक्रम असो, बाळासाहेब आणि बाबासाहेब यांची भेट झाली की मग चर्चेला उधाण यायचं, हास्यविनोद व्हायचे आणि शिवचरित्र्याचा खजिना उलगडला जायचा.
एरव्ही लाखोंची सभा गाजवणारे बाळासाहेब बाबासाहेब पुरंदरे यांच्यापुढे शांत बसण्याला प्राधान्य द्यायचे, कारण बाबासाहेबांचा प्रत्येक शब्द, त्यांनी सांगितलेली इतिहासातील प्रत्येक गोष्ट ते डोळे मिटून ऐकायचे.
बाबासाहेबांच्या मृत्युनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत त्यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना बाळासाहेब आणि बाबासाहेब या जोडीतील एक विशेष पैलू उलगडला. राऊत म्हणाले, ”बाळासाहेब फार कमी लोकांना चरणस्पर्श करायचे, मात्र त्या मोजक्या लोकांच्या यादीत बाबासाहेब पुरंदरे हे अग्रस्थानी होते. एकूणच वयाने, मानाने आणि ज्ञानाने श्रेष्ठ अशा बाबासाहेबांचा आदर करणारे बाळासाहेब आजही आठवतात”.
अन् बाबासाहेब गहीवरले
आजच्याच दिवशी म्हणजे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेबांना अखेरचा निरोप देताना मुंबईच नव्हे तर महाराष्ट्र गहिवरला होता. शिवाजी पार्काच्या दिशेने निघालेल्या अंतयात्रेत लाखो शिवभक्त सामील झाले होते.
ज्यांना रस्त्यावर जागा मिळत नव्हती त्यांनी परिसरातील इमारतींच्या गच्ची, मजले, दुकानं इथे शिरून बाळासाहेबांची अखेरची झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती, मात्र या गर्दीत एका इमारतीच्या गच्चीवर उभे राहून साश्रू नयनांसह निरोप देणारे बाबासाहेब पाहिल्यावर शिवसैनिकांचा बांध फुटला.
आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या या सुह्रदाला निरोप देताना खचलेले बाबासाहेब हे त्यांच्या नात्यातील प्रेम, वय कमी असूनही बाळासाहेबांबद्दल त्यांना वाटणारा आदर प्रतित करतो ही आठवण देखील राऊत यांनी व्यक्त केली.
त्यांच्यामुळे इतिहास पाहता आला
शिवचरित्र अनेकदा वाचली, मात्र त्यातील प्रत्येक प्रसंग कळला, डोळ्यांपुढे उभा राहिला, तो केवळ बाबासाहेबांमुळेच! या शब्दात बाळासाहेब बाबासाहेबांचं कौतुक करायचे.
अफजलखानाचा वध असो, आग्र्यातून केलेली सुटका किंवा बाजीप्रभुंची झुंज…बाबासाहेबांच्या शब्दातून हे प्रसंग ऐकले की आपणच त्या प्रसंगांचे साक्षीदार असल्याचा भास होतो.
महाराजांचा सेवक छत्रपतींच्या सेवेसाठी निघाला
राजकारणात सक्रीय नसूनही प्रत्येक राजकीय नेत्याशी जिव्हाळ्याचे संबंध असणारे बाबासाहेब यांचा राज ठाकरे यांच्याशी विशेष स्नेह होता. कौटुंबिक जिव्हाळा, वैयक्तीक आयुष्यातील मार्गदर्शक, गुरु अशा अनेक भुमिका निभावणाऱ्या बाबासाहेबांना निरोप देताना राजही गहिवरले.
आपल्या खास शैलीत राज ठाकरे यांनी आठवण सांगितली.” बाबासाहेब मला म्हणायचे, महाराजांचे चरणस्पर्श जिथे जिथे झाले, ती प्रत्येक जागा मी पाहिलीय, मात्र अखेर महाराज जिथे गेले तिथे आता जायचंय, आज मात्र त्यांचे हे शब्द खरे ठरले. आयुष्यभर शिवचरित्रावर प्रेम करणारा महाराजांचा हा सेवक आता कायमस्वरुपी शिवरायांची सेवा करण्यासाठी निघाला”.
एकूणच या दोन्ही रत्नांनी वेगवेगळ्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आपला निरोप घेतला असला तरी दोघांचे कार्य, विचार यांच्यामार्फत मराठी माणसाच्या मनावर त्यांचे अधिराज्य कायम असेल यात शंका नाही.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.