खुद्द शाहरुखने काउंटरवर उभं राहून त्याच्या या सिनेमाची तिकिटं विकली होती!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
एखादी व्यक्ती किंवा कलाकृती ही कशामुळे यशस्वी होते याचं नेमकं कारण सांगणं कोणालाही कठीण जाईल. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य कृती करणे हे यश मिळवण्याचं सूत्र म्हणता येईल. संघर्ष करावा लागला तरीही तुमची जिद्द आणि आवश्यक ती प्रत्येक गोष्ट करणे हीच तुम्हाला गर्दीपेक्षा वेगळं ठरवत असते.
शाहरुख खान ही एक अशीच व्यक्ती आहे ज्याचे खूप फॅन्स आहेत त्यासोबतच खूप विरोधक सुद्धा आहेत. सुरुवातीच्या काळात जो शाहरुख खान आम्हाला पडद्यावर बघायला मिळाला तो नंतर कधी दिसलाच नाही अशी खूप जणांची तक्रार ऐकायला मिळते.
चोप्रा, जोहर या बॅनरकडे गेल्यावर तो एका इमेज मध्ये अडकून राहिला हे अगदी खरं आणि त्यामुळेच अभिनय क्षमता असूनही त्याचं यश एका उच्च ठिकाणावर जाऊन मर्यादीत राहिलं असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.
कोणताही वारसा नसतांना आणि कित्येक सिनेमांमध्ये अपयशाचा सामना करूनही एक अभिनेता, निर्माता म्हणून शाहरुख खान आज आपलं एक स्थान टिकवून आहे याचं संघर्ष करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कौतुक आहे हे मात्र नक्की.
आजच्या प्रेक्षकांच्या अपेक्षांचा विचार केला तर एक लक्षात येईल की, आज प्रेक्षकांना रील लाईफ इमेज आणि प्रत्यक्ष जीवनातील इमेज ही सुद्धा सध्या खूप महत्वाची वाटते.
जो कलाकार कोणत्याही सामाजिक मुद्द्यांवर कोणता तरी स्टँड घेतो तो सध्या लोकांना ‘परिपूर्ण’ व्यक्ती वाटतो आणि लोक त्याला अभिनेता म्हणून सुद्धा पसंती देतात हे निदान वरिष्ठ कलाकारांसाठी तरी लागू पडतं.
९० च्या दशकात असं नव्हतं. आजसारखे प्रमोशन कार्यक्रम, सोशल मीडिया नसलेल्या ९० च्या दशकात कोणताही सिनेमा प्रदर्शित करणं आणि तो बॉक्स ऑफिसवर यशस्वी करणे ही सर्वस्वीपणे त्या दिगदर्शक आणि हिरोची जबाबदारी असायची.
===
हे ही वाचा – “श्रीमंत होण्याआधी तत्वज्ञानी होऊ नका” किंग खानच्या जगण्याचा मंत्र ११ वाक्यांमध्ये!
===
तेव्हा पडद्यावरच्या हिरोला फक्त एक हिरो म्हणून बघितलं जायचं. निर्मात्यांकडे तेव्हा आजसारखे डिजिटल मार्केटिंगचे माध्यम उपलब्ध नव्हते.
आधी सिनेमा मिळवण्यासाठी संघर्ष आणि मग तो बॉक्स ऑफिसवर चालण्यासाठी प्रचंड मेहनत प्रत्येक कलाकाराला घ्यावी लागायची.
आपल्या सर्वांच्या आवडत्या ‘कभी हा कभी ना’ हा सिनेमा रिलीज करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली होती या प्रवासातील काही रंजक गोष्टी २७ वर्षपूर्तीच्या निमित्ताने सांगत आहोत!
१९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला वितरक मिळत नव्हते हे वाचून प्रत्येक सिनेप्रेमीला आश्चर्य वाटेल. शाहरुख खान आवडत नाही, पण ‘कभी हा कभी ना’ हा सिनेमा आवडतो असा एक मोठा वर्ग आहे हे नेहमीच बघायला मिळतं.
‘कभी हा कभी ना’ या सिनेमाचा निर्मिती, जाहिरात खर्च वसूल करण्यासाठी निर्मात्याला तब्बल १२ वर्ष वाट बघवी लागली होती.
मुंबई आणि गोवा या दोन ठिकाणी शुटिंग करण्याचं ठरवूनही सिनेमाच्या युनिटला केवळ पैश्यांमुळे सिनेमाचं शुटिंग मुंबईत पूर्ण करावं लागलं होतं. मुंबईहून गोव्याला जातांना पूर्ण युनिट हे ‘इकॉनॉमी क्लास’ मध्ये प्रवास करून गेले होते.
त्याच विमानात ‘देवेन वर्मा’ हे वरिष्ठ अभिनेते हे ‘बिजनेस क्लास’ प्रवास करत होते. त्यांनी शाहरुख खानसोबत आधी काम केलं होतं. त्यांनी आपल्या जागेवरून येऊन शाहरुख खानला ‘इकॉनॉमी’ मध्ये का प्रवास करतोय? असं विचारलं होतं.
शाहरुख खान तेव्हा एकच वाक्य बोलला होता, “… कारण, माझं तिकीट इकॉनॉमी क्लास चं आहे.”
करिअरच्या उत्तरार्धात ‘बादशाह’, ‘किंग खान’ सारख्या बिरुदाने मिरवणाऱ्या शाहरुख खान हा ‘कभी हा कभी ना’च्या शुटिंग च्या वेळी गोव्यातील १६० रुपये प्रति दिवसाच्या हॉटेल मध्ये विना संकोच राहिला होता हे दिगदर्शक कुंदन शाह यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
आपल्या मुलाखतीत कुंदन शाह यांनी पुढे हे सांगितलं की,
“मी शाहरुख चं काम फ़ौजी, सर्कस सिरीयल मध्ये बघितलं होतं. अजीज मिर्झा यांचा ‘राजू बन गया जेंटलमन’ हा पहिला सिनेमा त्याने साईन केला होता. ‘कभी हा कभी ना’ ची स्क्रिप्ट पूर्ण होईपर्यंत शाहरुख खान ने पाच अजून सिनेमांमध्ये काम करणं सुरू केलं होतं. माझ्या सिनेमाची त्याने फक्त स्क्रिप्ट वाचून तो ‘हो’ म्हणाला होता. निर्माते विकास गिलानी यांना हा होकार लेखी असावा अशी इच्छा होती.
एका संमती पत्रावर सही घेण्यासाठी मी ‘दिवाना’ सिनेमाच्या मुहूर्ताच्या सेट वर जुहू मधील ट्युलिप स्टार या हॉटेल मध्ये गेलो होतो. तिथे खूप गर्दी होती. तेव्हा मुहूर्ताच्या शॉट साठी जातांना हॉटेल च्या कॉरिडोर मध्ये मी ‘कभी हा कभी ना’ च्या संमती पत्रावर सही घेतली होती. तिथे बसायला काहीच नव्हतं तेव्हा शाहरुख खानने जमिनीवर बसून मांडीवर कागद ठेवून त्या पत्रावर सही केलेली माझ्या नेहमीच लक्षात राहील. २५,००० रुपये या ठरलेल्या मानधनापैकी ५,००० रुपये मी तेव्हा शाहरुख खान ला दिले होते.”
शाहरुख खान ने तेव्हा दिगदर्शक कुंदन शाहला हे सांगितलं होतं की, “मला ही स्क्रिप्ट खूप आवडली आहे. मी या सिनेमाचा वितरक सुद्धा होईन.”
युट्युब चॅनल शेअर करा
–
- विजय गिलानी (व्हीनस कॅसेट्स चे प्रमुख) यांच्यासोबत भागीदारी करून शाहरुख खान ने ‘कभी हा कभी ना’ चे मुंबई चे वितरण हक्क विकत घेतले आणि तेव्हा हा सिनेमा मुंबईत प्रदर्शित झाला.
‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ च्या वेळी शाहरुख खान स्वतः तिकीट खिडकी समोर उभा राहून तिकीट विकत होता. २५ फेब्रुवारी १९९४ रोजी घडलेला हा प्रसंग काही प्रत्यक्षदर्शींच्या आजही लक्षात आहे.
यश मिळवण्यासाठी कोणत्याही गोष्टीची लाज वाटू देऊ नये हे एका प्रकारे शाहरुख खान त्या दिवशी लोकांना सांगत होता.
‘डर’ ‘बाझीगर’ हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले असतांना एखाद्या सिनेमासाठी अशी मेहनत घेणं यातून खूप काही शिकण्यासारखं आहे.
===
हे ही वाचा – “मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण म्हणून मी धर्मांतर करणार नाही!”
===
कभी हाँ कभी ना हा सिनेमा का वेगळा आहे?
हिरो हा नेहमी छान स्वभावाचा असतो आणि तो काहीच चूक करत नाही ही हिरोची इमेज ‘कभी हाँ…’ मधील ‘सुनील’ ने बदलली होती. तो चूका करतो, तो स्वार्थी असतो, तो स्वप्न बघणारा असतो.
सुनीलला इतकंच माहीत असतं की, त्याचं प्रेम खरं आहे आणि ते मिळवण्यासाठी केलेला कोणताही प्रयत्न चुकीचा नसतो. लोकांच्या मनाला हे पात्र खूप भिडलं आणि आपल्यातील वाटलं. कारण, प्रत्यक्ष आयुष्यात कोणीच नेहमी इतका सरळ वागत नसतो.
सुनीलला शेवटपर्यंत हिरोईन “हो” म्हणत नाही आणि तरीही सिनेमा लोकांना आवडला हे त्याचं वेगळेपण होतं. तोपर्यंत लोकांना केवळ गोड शेवटाचीच सवय होती.
सुनील नाराज असतो. पण, तरीही लोकांना हसवायचा प्रयत्न करत असतो. तो परीक्षेत नापास होतो जे की त्या आधी कोणत्या नायकाने मोठ्या पडद्यावर साकारणं मान्य केलं नव्हतं.
तुम्हाला जर कभी हाँ कभी ना चा शेवटचा सीन आठवत असेल तर लग्नासाठी चर्च मध्ये गेलेल्या ऍना (सुचित्रा कृष्णमूर्ती) आणि क्रिस (दीपक तिजोरी) यांच्या हातातून अंगठी खाली पडते. ती अंगठी घरंगळत बरीच लांब जाते. ती अंगठी सुनीलला सापडते आणि तेव्हा सुद्धा सुनील ला वाटतं की ऍना माझ्याशी लग्न करेल.
‘शेवटी काहीतरी वेगळं होईल’ हा आशावाद हा सर्वसामान्य व्यक्तींमध्ये नेहमीच असतो आणि म्हणूनच सुनील लोकांना आपल्यातला वाटतो.
आज आपल्या अभिनयापेक्षा व्यवसायिकतेकडे जास्त झुकलेल्या शाहरुख खान साठी पुन्हा ‘कभी हाँ कभी ना’ सारखा रोल लिहिला जावो असे त्याचे चाहते नक्कीच आशा करत असतील.
शाहरुख खान हे नाव बघूनच त्याच्याबद्दलच्या कोणत्याही महितीला ट्रोल करणारे आज असंख्य लोक असतील. प्रत्येकाला आपलं मत आहे.
पण, दिल्लीच्या एका मुलाने मुंबईत येऊन यशस्वी होण्यासाठी केलेली ही मेहनत ही बहुतांश लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल यावर सर्वांचं एकमत असेल हे नक्की.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.