महाभारताच्या युद्धात सगळ्या योद्ध्यांना भरपेट जेऊ घालणाऱ्या राजाविषयी जाणून घ्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
हॉटेल, त्यातही उडपी हॉटेल असेल तर तेथील खास वातावरण, त्यांचा कामाचा वेग , कितीही ग्राहक असले तरी त्यांना हाताळण्याचे कौशल्य, ग्राहकांना हवा असेल तो पदार्थ त्यांना देणे ही उडपी लोकांची खास वैशिष्ट्ये आपल्या डोळ्यांसमोर येतात.
त्यांच्याकडे असणाऱ्या इडली-सांबार, मेदूवडा, डोसा अशा टिपिकल पण भन्नाट चवीच्या पदार्थांमुळे उडपी, लोकांची भूक भागवण्यात एक्स्पर्ट असतात.
मित्रांनो त्यांच्याच पूर्वजांपैकी एकाने महाभारतातील युद्धाच्या वेळी दोन्ही बाजूकडील सैन्याची जेवणाची व्यवस्था पाहिली होती असे जर तुम्हाला कोणी संगितले तर? तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल हो ना?
अनेक दंतकथा आणि ‘उडपी’ गावातील ‘कृष्णमठाच्या’ सूत्रांनुसार समजते की एका उडपी राजाने महाभारतातील युद्धाच्या वेळी दोन्ही बाजूच्या संपूर्ण सैन्याची जेवणाची व्यवस्था सांभाळली होती ते ही अन्नाची कोणतीही नासाडी न होऊ देता!
चला तर मग , या लेखातून जाणून घेऊ त्या ‘उडपी’ राजाबद्दल आणि त्याच्या नियोजन कौशल्याबद्दल.
महाभारतीय युद्ध हे जगातील पहिले आदिम असे विश्वयुद्ध होते असे आपण म्हणू शकतो ,कारण त्यात सैन्यवर्णन केल्याप्रमाणे जवळपास संपूर्ण जगातील राजे आणि त्यांचे सैन्य या युद्धात सामील झाले असावे असे मानले जाते.
–
हे ही वाचा – या १० शापांमुळे महाभारताच्या युद्धावर झालेले परिणाम तुम्ही वाचायलाच हवेत!
–
प्राचीन आर्यावर्तातील ‘बलराम आणि रुकमी’ हे दोन राजे सोडले तर जवळपास सर्व राजे या युद्धात कौरव किंवा पांडवांच्या बाजूने लढण्यासाठी सामील झाले होते.
यात आणखी एक राज्य असे होते की जे युद्धात लढण्यासाठी म्हणून सामील झाले नव्हते. ते राज्य होते दक्षिणेतील ‘उडपी’ राज्य. जेव्हा उडुपीचे राजा आपल्या सैन्यासह युद्धाच्या ठिकाणी पोचले तेव्हा त्यांनी आपल्या बाजूला यावे यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न झाले.
उडुपीचे राजा दूरदर्शी होते. त्यांनी सरळ सल्ला घेण्यासाठी श्रीकृष्णाला गाठले आणि त्याला म्हणाले,” माधवा, जो दिसतोय तो केवळ युद्धाची भाषा करतोय पण एवढ्या मोठ्या सैन्याच्या भोजनाचा विचार कोणीच केलेला नाही. आणि भावाभावांमध्ये होणार्या या युद्धात सहभागी होण्यात मला स्वारस्य नाही पण या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था मी आणि माझे सैन्य करू शकतो.”
उडुपी राजाच्या या प्रस्तावाला श्रीकृष्णांनी सहमती दर्शवली व पुढे म्हणाले ,” महाराज हा विचार उत्तम आहे. रोज जवळपास ५० लाख योद्धा या युद्धात भाग घेतील असा अंदाज आहे. तेव्हा आपल्यासारखा कुशल नियोजक ही व्यवस्था पाहणार असेल तर आम्ही निश्चिंत होऊ. या परिस्थितीत केवळ तुम्ही आणि भीमसेनच भोजनाची व्यवस्था करू शकता पण भीमसेन युद्धात गुंतलेले असल्याने तुम्ही भोजनाची व्यवस्था पहावी हे उत्तम.”
अशाप्रकारे दोन्ही सैन्याच्या भोजनाची व्यवस्था युद्ध संपेपर्यंत उडुपी यांनीच पाहिली. आश्चर्याची गोष्ट अशी की या संपूर्ण कालावधीत कधीच भोजन कमीही पडले नाही की वाया देखील गेले नाही.
याबाबतची एक कथा अशीही सांगितली जाते की जसजसे युद्धाचे दिवस पुढे पुढे जावू लागले तसतशी सैनिक आणि योद्ध्यांची संख्या कमी होवू लागली. तरीही भोजन व्यवस्थेतील उडुपी राजाचा अंदाज काही चुकला नाही. सर्वजण याचे आश्चर्य करत राहिले.
उडुपी नरेश स्वत: दिवस संपेपर्यंत या व्यवस्थेत जातीने लक्ष ठेवून असत. आणि तेवढ्याच लोकांचे अन्न शिजवले जाई, जेवढे प्रत्यक्ष हजर असतील. सर्वांना त्यांच्या या अंदाजाचे कौतुक आणि आश्चर्यही वाटे. पण कुणालाच हे कळत नव्हते की रोज किती योद्धा मरण पावतात हे राजाला कसे कळते. ज्यामुळे त्या अंदाजाप्रमाणे ते भोजनाची व्यवस्था करू शकतील.
एवढ्या मोठ्या सैन्याच्या भोजनाची व्यवस्था करणे ते ही अन्नाचा कणही वाया जाऊ न देता , ही गोष्ट एका चमत्कारपेक्षा कमी नक्कीच नव्हती.
जेव्हा युद्ध संपले आणि पांडवांचा युद्धात विजय झाला तेव्हा राज्याभिषेकाच्या दिवशी न राहवून महाराज युधिष्ठिर यांनी उडुपी नरेशाना यामागचे रहस्य विचारले. तेव्हा उडुपी नरेशानी याचे सारे श्रेय श्रीकृष्णाना देऊन युद्धाआधी घडलेला प्रसंग सांगितला.
या नियोजनमागचे गुपित सांगताना त्यांनी श्रीकृष्ण आणि भुईमुगाच्या शेंगा यांची गोष्ट सांगितली. उडुपी नरेश युधिष्ठिर यांना म्हणाले,” महाराज, युद्धाच्या विजयाचे श्रेय तुम्ही जसे श्रीकृष्णाला देता तसेच भोजनाच्या नियोजनामागचे श्रेय मी श्रीकृष्णाला देतो.
युद्धाच्या काळात श्रीकृष्ण रोज रात्री भुईमुगाच्या उकडलेल्या शेंगा खात असत. मी रोज त्यांच्या शिबिरात या शेंगा मोजून ठेवत असे आणि नंतर थोड्या वेळाने त्यांनी किती शेंगा खाल्या ते पहात असे. ते जेवढ्या शेंगा खात असत त्या संख्येच्या हजारपट सैनिक दुसर्या दिवशीच्या युद्धात मरण पावतील असा मी अंदाज लावत असे.
म्हणजे समजा त्यांनी ५० शेंगा खाल्या तर दुसर्या दिवशी ५०००० सैनिक मृत्यू पावतील असे गृहीत धरून मी, त्या अंदाजाने भोजन बनवत असे. हेच कारण होते की जेवणाचा अंदाज कधीच चुकला नाही. की अन्न उरले नाही की वाया गेले नाही.”
श्रीकृष्णाच्या आणि उडुपी नरेशांच्या तर्कशास्त्राने सारेच आश्चर्यचकित झाले व त्यांनी श्रीकृष्णाना मनोमन वंदन केले.
मित्रांनो ही कथा महाभारतातील अनेक दुर्लभ कथांपैकी एक जरी असली तरी आजही एका पिढीकडून दुसर्या पिढीला सांगितली जाते. अशा अनेक मिथक कथा आपल्या संस्कृतीत गोष्टरूपात जिवंत आहेत.
कर्नाटकातील ‘उडुपी’ येथील कृष्ण मठात ही कथा आवर्जून सांगितली जाते. अशी मान्यता आहे की या मठाची स्थापना स्वत: उडुपी नरेशांनी केली होती. त्यानंतर श्री माधवाचार्य यांनी ही कृष्ण भक्तीची परंपरा पुढे चालू ठेवली.
हेच कारण असावे की उडुपी लोक आपल्या हॉटेल व्यवसायात इतके एक्स्पर्ट आहेत. आणि सगळ्यांना चवदार पदार्थ पुरवतात.
आपल्या भारतीय संस्कृतीचा इतिहास हा जवळपास ५००० वर्षे इतका जुना आहे. जर पुरातत्व खात्याच्या अभ्यासानुसार पहिले तर हा इतिहास १२००० वर्षे जुना असावा हे समजते.
काही असो जितका आपला सांस्कृतिक इतिहास जुना, तेवढाच आपल्या खाद्यसंस्कृतीचा इतिहास आणि उडुपी लोकांचा खाद्य व्यवसाय देखील! हा भारत आहे मित्रांनो ! इथे सारे ‘ऐकावे ते नवलच’ या प्रकारातले आहे ते उगाच नाही.
लेख कसं वाटला ते जरूर कळवा आणि सांबरच्या भन्नाट चवीसाठी उडुपी लोकांना मनोमन धन्यवाद द्या.
===
हे ही वाचा – महाभारतात अनेक चमत्कार झालेत, पण मग चमत्कारांनी धृतराष्ट्रचं अंधत्व का नाही गेलं?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.