तरुणाईचा जीव की प्राण असलेल्या, जबरदस्त पॉवरफुल KTM च्या नावामागची गोष्ट!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जगभरातल्या बाईक लव्हर्सची लाडकी अशी केटीएम बाईक. २०१६ साली केटीएमनं बीएमडब्ल्यू, ॲप्रिला आणि डूकाटीहून जास्त बाईकची विक्री करून या क्षेत्रात खळबळ माजवली.
जगभरातल्या १३० हून अधिक चॅम्पियनशिपची विजेती असणारी ही बाईक या क्षेत्रातील तिचा दबदबा राखून आहे. स्पोर्टस बाईक म्हटलं, की जी पहिली दोन तीन नावं डोळ्यासमोर येतात त्यात अग्रणी असणारं असं हे नाव.
केटीएम मोटरसायकल आणि कार मॅन्युफॅक्चर कंपनीची ही बाईक जगातल्या स्पोर्टस बाईक प्रेमींची पहिली निवड असते .केटीएम बाईक भारतात येऊनही आता बराच काळ लोटला आहे. केटीएम इंडस्ट्रीज एजी आणि बजाज ऑटो हे संयुक्तपणे याचं संचलन करतात.
जगभरातल्या बाईक प्रेमींची आवडती अशी ही बाईक मुळची ऑस्ट्रीयन आहे. केटीएम इंडस्ट्रीजची स्थापना १९९२ साली झाली असली तरीही कंपनीची मुहूर्तमेढ त्याही अनेक वर्षांपूर्वी १९३४ सालीच रोवली गेली होती.
असं पडलं नाव…
आज जगप्रसिध्द असलेल्या या बाईकची गोष्ट सुरू होते ऑस्ट्रियातील एका लहानशा गावातून. हॅन्स ट्रुकेन्पोल्झ या व्यवसायानं इंजिनिअर असणार्या व्यक्तीने १९३४ साली मेटायोफेन येथे एक गॅरेज सुरु केलं.
आपल्या दुकानाचं नाव त्यानं, Kraftfahrzeuge (जर्मनमधे मोटारसायकलचं संबोधन) Trunkenpolz (संस्थापकाचं नाव) Mattighofen (ज्या गावात हे दुकान होतं त्या गावाचं नाव) – क्राफ्टफॅर्जु टुर्केन्पोल्झ मेटायोफेन असं ठेवलं. दुकान थाटताना त्यानं विचारही केला नव्हता, की अल्पावधीतच हे जगप्रसिध्द असं ब्रॅण्डनेम बनणार आहे.
===
हे ही वाचा – “मेक इन इंडिया” चा नारा सर्वप्रथम दिला होता नेहरूंनी, भारतीय आर्मीसाठी, वाचा!
===
महायुद्धामुळे व्यवसायावर प्रश्नचिन्ह
दुसर्या महायुध्दादरम्यान हॅन्स त्याकाळच्या नियमानुसार सैन्यात भरती झाला आणि व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी त्याच्या पत्नीवर आली. या कठीण काळात कंपनीने डिझेल इंजिन रिपेअरिंगचा व्यवसाय करत आर्थिक मंदीच्या तडाख्यात आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं.
युध्द संपलं आणि हॅन्स घरी परतला. मात्र युध्द संपता संपता या इंजिन दुरूस्तीच्या व्यवसायाला ताबडतोब उतरती कळा लागली. आता पुढे काय? हा जगातल्या अनेक व्यावसायिकांप्रमाणेच हॅन्ससमोरही प्रश्न पडला होता.
पुन्हा उभारीला सुरुवात…
स्थापनेनंतर तीनच वर्षात म्हणजे १९३७ साली कंपनेनं डीकेडब्ल्यू बाईक आणि ओपेल कंपनीच्या वाहनांचा वितरणाचा व्यवसाय सुरू केला. यासोबतच आजूबाजूच्या परिसरात त्याच्या दुकानाची ख्याती पसरत चालली होती. कार आणि बाईक्स दुरुस्तीमध्ये त्याला कोणी स्पर्धक उरणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली.
एका गावातून सुरू झालेला हा व्यवसाय आता अप्पर ऑस्ट्रीयामध्ये चांगलाच विस्तारला होता. दुसर्या महायुध्दाच फटका बसलेला असताना हॅन्स आता व्यवसाय टिकविण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करत होता. मोटरसायकल रिपेअर करता करता हॅन्सला आता नवीन स्वप्नांचा वेध लागला होता.
स्पोर्ट्स बाईक आता त्याच्या हातचं खेळणं बनल्या होत्या. अत्यंत कुशलतेने बाईकमधला बिघाड शोधून तो दुरुस्त करत असे. हे करता करता त्याला बाईकच्या निर्मितीत रस निर्माण झाला आणि नुसत्या विचारांवर तो थांबला नाही तर १९५१ च्या सुमारास त्याने त्याची स्वतःची निर्मिती असणारी पहिली ९८ सीसीची लाईटवेट मोटरसायकल R100 बनविली.
या मोटरसायकलमध्ये रोटेक्स कंपनीचे इंजिन बसवलं होतं आणि त्याशिवाय जे इतर भाग लागतात त्यातले बहुतेक पार्ट हॅन्सच्या वर्कशॉपमध्येच बनवले गेले होते. दोन वर्ष त्याचं हे काम चाललं होतं. बाईकच्या अनेक चाचण्या घेऊन मनाजोगी आणि परिपुर्ण बाईक बनल्यावर त्यानं त्याची ही निर्मिती व्यवसायात आणण्याचं स्वप्न बघायला सुरवात केली.
===
हे ही वाचा – ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती घडवून कॉमन मॅनचं ‘स्कूटर’चं स्वप्न पूर्ण करणारा भारतीय…!
===
दोनच वर्षात म्हणजे १९५३ साली केटीएम मोटरसायकलची पहिली बॅच बाहेर पडली. वीस जणांचा चमु दिवसाला तीन मोटारबाईक्स बनवत होता हे आणखी एक आश्चर्य.
अद्याप त्याची कंपनी रजिस्टरही नव्हती. बाईकचं व्यावसायिक उत्पादन करायचं, तर हे सगळे सोपस्कार पार पाडणं आवश्यक होतं आणि त्यासाठी बरंच भांडवलही लागणार होतं. हा प्रयोग पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाल्यानंतर त्याने गुंतवणूकदार शोधायला सुरुवात केली.
अशातच त्याला अर्न्स्ट क्रोनर्फ हा व्यावसायिक भेटला, ज्याने हॅन्सच्या नव्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचं ठरवलं आणि तोदेखील मुख्य भागीदार बनला. नवीन भागीदार आल्याने आता हॅन्सनम आपल्या व्यवसायाचं नाव दोन भागीदारांच्या नावावरून केटीएम असं ठेवलं.
१९५४ साली केटीएमने अधिकृतरित्या मोटरबाईक स्पर्धेत पदार्पण केलं. पदार्पणातच पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावत त्यांनी या क्षेत्रात आता सहस्पर्धकांना तगडी स्पर्धा करावी लागणार असल्याचे संकेत दिले. याच वर्षीच्या ऑस्ट्रीयन १२५ सीसी नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये केटीएम पहिल्या स्थानावर विराजमान झाली.
१९५६ साली जागतिक सहा दिवसीय चाचणीत त्यांनी भाग घेतला. या चाचणीत जगातील सर्वात कठीण, ओबडधोबड अशा रस्त्यांवरून बाईकची क्षमता चाचणी घेण्यात आली. जगातली सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित अशी ही चाचणी सुवर्णपदकासहित त्यांनी उत्तीर्ण केली.
या चाचणीनं आत्मविश्र्वास इतका वाढला, की पुढच्याच वर्षी म्हणजे १९५४ मधे त्यांनी आपली पहिली पूर्णपणे रेसिंग बाईक ट्रॉफी १२५ सीसी बाजारपेठेत आणली. त्याचबरोबर १९५७ मधे R १२५ टुरिस्ट बाईक, ग्रॅण्ड टुरिस्ट आणि मेकी मोपेडचीही निर्मिती केली.
यानंतर तीनच वर्षात आलेल्या पोनी १ आणि पोनी २ या दोन वाहनांनी शहरी ट्रान्सपोर्टमध्ये स्थान मिळविलं. केटीएमनं त्यांची पहिली FIM मोटरक्रॉस जीपी चॅम्पियनशिप १९७४ साली जिंकली.
चढ-उतारांची मालिका…
सगळं काही अगदी दृष्ट लागण्यासारखं चाललेलं असतानाच कंपनीला पहिला धक्का बसला. १९६० साली त्यांचा मुख्य भागीदार अर्न्स्टचा मृत्यू झाला. यानंतर दोनच वर्षात या कंपनीचा संस्थापक जोहान्सचाही हार्ट अटॅकनं आकस्मात मृत्यू झाला.
कंपनीला आता उतरती कळा लागली होती. जोहान्सचा मुलगा एरिशनं कंपनीची सूत्रं हातात घेतली. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचा काळ खूपच खडतर होता. मात्र त्यावर मात करत एरिशनं कंपनीला पुन्हा एकदा चांगले दिवस दाखवत उत्कर्ष केला.
===
हे ही वाचा – काळाच्या ओघात विस्मरणात गेलेल्या रॉयल एनफील्ड च्या ‘ह्या’ बाईक्स एकेकाळी खूप लोकप्रिय होत्या!
===
कंपनीचा व्याप वाढून, चारशेहून अधिक कर्मचारी काम करु लागले होते. कंपनी आता मोटरसायकलसोबतच रेडिएटर्सचिही निर्मिती करू लागली होती. संपूर्ण युरोपमधे केटीएमचेच रेडिएटर्स कारमध्ये लावले जाऊ लागले इतकी विश्वासार्हता या कंपनीने निर्माण केली.
मागणी अभावी ऐंशीच्या दशकात कंपनीने मोपेडचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान कंपनीला सुवर्णकाळ दाखविणार्या एरिश यांचाही मृत्यू झाला. पुन्हा एकदा कंपनीला उतरती कळा लागली.
आर्थिक स्थिती इतकी ढेपाळली, की अखेर १९९१ या कर्जबाजारी कंपनीचा ताबा बँकांनी घेतला. १९९२ मध्ये कंपनीचे, केटीएम स्पोर्ट्समोटारसायकल GmbH (मोटरसायकल विभाग), केटीएम फराद GmbH (सायकल विभाग), केटीएम कुल्हेर GmbH (रेडिएटर्स), केटीएम वेर्कझुग्बु GmbH (टुल्स) असे चार तुकडे करण्यात आले.
यानंतर मोटरसायकल विभागाने स्पोर्ट्स बाईकचं उत्पादन चालूच ठेवलं. १९९४ साली कंपनीच्या सर्वात लोकप्रिय अशा ड्युकचं उत्पादन चालू झालं. १९९७ पासून ॲडव्हेन्चर बाईक्सच्या निर्मितीला सुरुवात झाली.
२००७ साली भारतीय मोटारसायकल उत्पादन कंपनी बजाज ऑटोनं केटीएमचे १४.५ टक्के शेअर्स खरेदी केले. केटीएमच्या आणि मोटारबाईक जगताच्या इतिहासातील ही महत्वाची घटना ठरली.
२०१३ च्या अखेरीपर्यंत बजाजकडे केटीएमचे ४७.९७ टक्के शेअर्स आले आणि ती मुख्य भागीदार बनली. २०१२ मध्ये या बाईकचं नवं नाव जे आज आपल्या सर्वांच्याच परिचयाचं आहे ते, केटीएम एजी असं करण्यात आलं. कंपनीने पुन्हा एकदा मुसंडी मारत स्पोर्ट्स बाईकमध्ये आपलं जबरदस्त स्थान निर्माण केलेलं आहे.
—
- जिलेबी आणि दूध या भन्नाट कॉम्बिनेशनचे हे फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?
- ‘फूड’ नुसार बनतो तुमचा ‘मूड’! हे पदार्थ खा आणि आनंदी राहा…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.