' १५ वर्षाच्या या चिमूरड्या गायकाच्या मृत्यूमागचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही! – InMarathi

१५ वर्षाच्या या चिमूरड्या गायकाच्या मृत्यूमागचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पंजाब येथील जालंधर जिल्ह्यातील खानखाना गावात २८ डिसेंबर १९२७ रोजी अमरसिंह आणि पूरनदेवी यांच्या कुटुंबात मास्टर मदन यांचा जन्म झाला. याच जालंधरमधे त्याकाळातील ख्यातनाम गायक स्व. कुंदनलाल सेहेगल यांचाही जन्म झाला होता.

मदन यांचे वडील अमरसिंह शिक्षण विभागात चाकरी करत होते तर आई पूरनदेवी त्या काळातील प्रथेनुसार कुटुंबाची काळजी घेणारी धार्मिक गृहिणी होती.

 

master madan inmarathi

 

घरात यानिमितानं भजन अर्चन होत असे. बालपणापासूनच कानावर संगीत पडणार्‍या मदन यांना निसर्गानं दैवी आवाज बहाल केला होता. आईसोबत घरी भजन म्हणून तो कौतुकाची थाप मिळवत असे.

हे ही वाचा लहानपणी शिकलेले ‘कुस्तीचे डाव’ पंडित हरिप्रसाद यांना असे उपयोगी ठरतायत…!!

इतक्या लहान वयात सुरांचा इतका पक्का असणार्‍या आपल्या मुलाविषयी अमरसिंह आणि पूरनदेवी यांना खूप कौतुक होतं. वयाच्या अवघ्या तिसर्‍या वर्षी त्यांनी धरमपूर येथील हॉस्पीटलनं आयोजित केलेल्या एका गायन स्पर्धेत भाग घेतला.

जाहिररित्या गायन करण्याचा हा त्याचा पहिलाच अनुभव असला तरीही त्यात कुठेही संकोचलेपणा नव्हता. या स्पर्धेतील त्यांच्या गाण्यानं उपस्थित श्रोतृवर्गाला अगदी मंत्रमुग्ध केलं. त्यांना या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं सुवर्ण पदक मिळालं.

अल्पावधीतच त्यांचं नाव चोहीकडे गाजू लागलं. एक चिमुरडा मुलगा इतकं सुंदर कसं गातो हे बघायला लोक कौतुकानं गर्दी करू लागले. लोकांना आता मास्टर मदन यांना ऐकायचं होतं.

चिमुरडा मदन लोकांनी कौतुकानं मास्टर मदन केला. अल्पावधीतच मास्टर मदननी संपूर्ण भारताचा दौरा केला.

 

master madan inmarathi 2

 

अनेक राज्यकर्त्यांनी, शासकीय अधिकार्‍यांनी त्यांना सुवर्ण पदकं बहाल केली. त्याचा सन्मान केला. दिग्गज गायकांच्या बरोबरीनं एकाच मंचावर आता मास्टर मदन हा चिमुरडा आत्मविश्वासानं गाऊ लागला.

जालंधरमधील त्याकाळी प्रसिध्द असणार्‍या हरवल्लभ सांगितिक मेळ्यात आणि त्यानंतर लगेचच शिमल्यातील मेळ्यात अनेक दिग्गज गायक असतानाही हजारो लोक केवळ मास्टर मदनचं गाणं ऐकायला जमले होते.

१९३० च्या दशकात वयाच्या अवघ्या तिसर्‍या वर्षी मास्टर मदननी शास्त्रीय रागावर आधारीत रचना गायला सुरवात केली. हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळातील एक मोठं नाव म्हणजे स्व. मुहम्मद रफ़ी.

असं म्हणतात की जर मास्टर मदन यांना दीर्घायुष्य लाभलं असतं तर रफ़ीजींना त्यांच्या रुपानं एक तगडी स्पर्धा करावी लागली असती. रफ़ीजी आणि मास्टर मदन यांच्या वयात केवळ तीन वर्षांचं अंतर होतं. त्यामुळेच हे समकालीन स्पर्धक बनले असते.

 

mohd rafi inmarathi

 

 

त्या काळातील प्रथेनुसार मास्टर मदन यांना राजा महाराजांच्या खाजगी मेहफीलींसोबतच आकाशवाणीवरही गाण्यासाठी आमंत्रित केलं गेलं. त्यांच्यावर बक्षिसांचा अक्षरश: पाऊस पडला. असं म्हणतात की आकाशवाणीनेही मास्टर मदन यांना भरभक्कम मानधन दिलं होतं.

आकाशवाणीमुळे आता त्यांचा आवाज घराघरात जाउन पोहोचला आणि जास्तच लोकप्रिय बनला. जितक्या जलद गतीनं त्यांना यश मिळत होतं तितक्याच गतीनं त्यांचे स्पर्धक शत्रूही बनू लागले होते.

हे ही वाचा फकिराचा आशिर्वाद अन अविश्रांत मेहनत : मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग १)

अवघ्या दहा बारा वर्षांचा चिमुरडा कानामागून येऊन तिखट बनला होता. आकाशवाणीसाठी अनेक गाणी गाणार्‍या मास्टर मदन यांच्या गाण्यांच्या ध्वनीमुद्रीका दुर्दैवानं आकाशवाणीने जतन केल्या नाहीत.

त्यामुळे त्यांची एकाहून एक सरस अशी गाणी आज आपल्याला ऐकायला मिळणं अशक्य आहेत मात्र त्यांच्या कुटुंबियांनी आणि संगीतप्रेमींनी जतन केलेल्या ग्रामोफोनवरची आठ ध्वनीमुद्रीत गाणी उपलब्ध आहेत.

संगीत प्रेमी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ग्रामोफोनच्या तबकड्यांवर मास्टर मदन यांचा आवाज आजही जिवंत ठेवला आहे.

 

master madan voice inmarathi

 

मास्टर मदन यांचा अखेरचा जाहीर कार्यक्रम कोलकत्ता येथे झाला. या कार्यक्रमात त्यांनी दीड तास राग बागेश्री गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. उपस्थितांनी त्यांना मनापासून दाद दिली आणि एका श्रोत्यानं आनंदानं भारावून जात मास्टर मदन यांना तिथल्या तिथे पाचशे रूपये रोख रकमेची भेट दिली.

लक्षात घ्या, १९४२ सालातले पाचशे रूपये आहेत. त्याकाळात ही रक्कम खूपच मोठी होती. मास्टर मदन यांच्या आवाजाची ख्याती आता मुंबापुरीलाही येऊन थडकली होती.

चित्रपट निर्मात्यांनी मदन यांच्या पालकांशी संपर्क साधत त्यांना मदन यांच्यासाठी सिनेमाची ऑफर दिली. मात्र त्या काळात सिनेमामध्ये काम करणं फारसं चांगलं समजलं जात नसे.

मुंबईत जाऊन आपला मुलगा बिघडला तर? त्याला सिनेमाची हवा लागून तो वाईट वळणाला लागला तर? या भितीपायी त्याच्या पालकांनी सरळ नकार दिला.

 

films inmarathi

 

मात्र मास्टर मदन यांचं अकाली निधन झाल्यानंतर मात्र पालकांना चित्रपटात काम करण्याला नकार देऊन एक चांगली संधी नाकारल्याची हळहळ वाटली.

लहानगा मदन आता सतत गाण्यांच्या दौर्‍यांवर असे. त्याच्या कुटुंबियांनाही याचं कौतुक वाटत असे कारण मदनवर केवळ त्याच्या चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव होत नसे तर पैशांचा, बक्षिसांचाही पाऊस पडत असे.

या दौर्‍यावर त्याच्यासोबत त्याचा मोठा भाऊ जात असे. अशाच एका दौर्‍यानंतर मास्टर मदन यांची तब्येत बिघडली. सततच्या दगदगीनं त्यांच्या तब्येतीवर गंभीर परिणाम दिसू लागला होता. तो सतत थकवा वाटत असल्याची तक्रार करू लागला.

त्यावर उपचारही चालू झाले मात्र आता बारीक बारीक आणि सतत तापही येऊ लागला. दिल्लीत अंगात ताप असूनही त्यानं आकाशवाणीचा कार्यक्रम चालूच ठेवला. हा ताप एरवीसारखा औषधानं उतरला नाही उलट वाढतच चालला.

अशातच उन्हाळा चालू झाला आणि मास्टर मदन त्यांच्या उन्हाळी निवासस्थानाकडे म्हणजे शिमल्याला गेले. तिथल्या आल्हाददायक थंड वातावरणाचाही तब्येत सुधारण्यासाठी फारसा उपयोग झाला नाही. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावतच चालली होती.

अखेर ५ जून १९४२ साली वयाच्या चौदाव्या वर्षी या महान गायकाचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण मात्र कधीच समजू शकलं नाही.

 

master madan featured inmarathi

 

काहीजणांचा असा दावा आहे की, त्यांच्या प्रतिस्पर्धकांपैकी कोणीतरी त्यांना पारा खाऊ घातला, काहीजणांच्या मते अंबाला येथे ते कार्यक्रमाला गेले असता तिथल्या स्थानिक कोठ्यावरील गायक मुलीनं विड्यातून काही खाऊ घातलं जेणेकरून त्यांना हळूहळू मरण येईल.

आणखीन एक अफवा अशी आहे की दिल्लीतल्या त्यांच्या शेवटच्या आकाशवाणी कार्यक्रमाच्यावेळेस कोणीतरी पेयातून पारा पाजला. अर्थात यापैकी काहीच सिध्द झालं नाही मात्र लहान वयात अकाली मृत्यू झाल्यानं हा देश मात्र एका स्वर्गिय आवाजाला कायमचा मुकला.

===

हे ही वाचा बॉलिवूडमधील गटबाजीचा बळी ठरलेला बहारदार संगीतकार!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?