कुवत नसतानाही(?) परीक्षकाची खुर्ची: रीऍलिटी शोजच्या थिल्लरपणावरील खरमरीत उत्तर
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर
===
सध्याचा टेलिव्हिजन बघणारा प्रेक्षक हा स्मार्ट झालाय हे चॅनलवाले मान्य करायलाच तयार नाहीत. पहिले सासू सूनांची भांडणं आणि आता एक्स्ट्रा मॅरीटल लफडी याशिवाय कोणत्याची चॅनलच्या सिरियल्स पूर्ण होत नाहीत.
खासकरून सध्याच्या मराठी टेलिव्हिजन सिरियल्स या वास्तवाला अजिबात धरून नसतात, त्यामुळे एकेकाळी थोरामोठ्यांपासून टीव्हीसमोर बसून दर्जेदार मालिका बघणारा प्रेक्षक आज टीव्हीवर लागलेल्या मालिकांपासून दूर पळतोय.
यात आणखीन भर टाकली ती म्हणजे रिअॅलिटी शोजनी. चला हवा येऊ द्या हा शो लोकांनी खूप डोक्यावर घेतला पण एकंदरच गेल्या काही महिन्यांपासून त्याचा घसरलेला दर्जा यांनो तोचतोचपणा यामुळे आता लोकांच्या मनातून त्या कार्यक्रमाची क्रेझ कमी होताना दिसत आहे.
यातच आता नवीन येऊ घातलेल्या सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या सीझनने एक वेगळीच चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.
इंडियन आयडॉल, हिंदी सारगेमप, सुर नवा ध्यास नवा, संगीत सम्राट अशा वेगवेगळ्या रिअॅलिटी शोजची कित्येक दिग्गज कलाकारांनी लाईव्ह येऊन पोलखोल केलेली आहे, तरीही हे रिअॅलिटी शोज काही, सुधारायचं नाव घेत नाहीत.
एखाद्या स्पर्धकाच्या आर्थिक परिस्थितीचा टीआरपीसाठी वापर करायचा, खोटं खोटं रडायचं, उदार होऊन पैसे उधळायचे आणि ते पुन्हा घ्यायचे हे सगळे प्रकार उघडकीस आले तरी या शोजची लोकप्रियता आजही तितकीच आहे.
पण नुकत्याच सुरू झालेल्या झी टीव्हीवरच्या सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या नवीन सीझनला परीक्षक म्हणून बसवलेले महाराष्ट्राचे आधीचे लाडके लिटिल चॅम्प्स यावरून सध्या प्रचंड उलटसुलट चर्चा होताना दिसत आहेत.
लिटिल चॅम्प्सच्या पहिल्या सीझनमधली ही पंचरत्न लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. आर्या आंबेकर, रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैषंपायन आणि प्रथमेश लघाटे या पाचही जणांनी त्या वेळेस साऱ्या महाराष्ट्राला त्यांच्या गायकीने मंत्रमुग्ध केलं होतं.
निश्चितच त्यावेळेस त्यांना परीक्षक म्हणून देवकी पंडित, अवधूत गुप्ते यांनी चांगलंच मार्गदर्शन केलं आणि त्यामुळेच ते आज या यशाच्या शिखरावर विराजमान आहेत.
पण आज याच लिटिल चॅम्प्सना लहान मुलांच्या नव्या शोमध्ये जज म्हणून बसवणं हे कितपत योग्य आहे यावरून सध्या बऱ्याच चर्चा रंगत आहेत. काहींना हा उपक्रम स्तुत्य वाटतोय तर काहींनी यावर सडकून टीका केली आहे.
माझ्यामते हे पाचही कलाकार आता स्वतंत्रपणे आपली कला सादर करत असले तरी एक परीक्षक म्हणून ते अजून तितके परिपक्व झालेले नाहीत, आणि त्यामुळेच लहान मुलांची गाणी का असेना त्यांच्या परीक्षणासाठी यांची निवड करणं हे मलादेखील खटकलं आहेच.
याचा अर्थ असा अजिबात नाही की ते उत्तम गायक नाहीत, त्यांची कला आणि त्यांच्यात असलेलं टॅलेंट हे उत्तमच आहे पण अनेक दिग्गज इंडस्ट्रीमध्ये असताना या लहान पोरांना त्या परीक्षकाच्या खुर्चीत बसवणं हा त्या खुर्चीचा अपमान आहे असं मला वाटतं!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हे ही वाचा – ‘रिअॅलिटी शो’मागील रिअॅलिटी, जी अतिशय धक्कादायक आहे!
–
टिव्ही चॅनल्सना जर त्या मुलांना पुढे आणायचं आहे हे गृहीत जरी धरलं तरी आधी त्या पाच जणांना त्या लहान स्पर्धकांचा मेंटॉर बनवलं असतं तरी ते चांगलं दिसलं असतं. त्यांचे अनुभव त्यांनी त्या मुलांशी शेअर केले असते आणि एक छान वातावरण तयार झालं असतं तसंच काही दिग्गजांनी त्यांचं परीक्षण केलं असतं.
पण थेट त्या परीक्षकाच्या खुर्चीत बसल्यावर या ५ जणांनी जग जिंकल्याचा खोटा आव आणलाय तो प्रचंड खटकणारा आहे. अर्थात आता यामध्ये शोच्या दिग्दर्शकाचा किंवा निर्मात्याचा हात असणारच.
पण एकंदर अवधूत गुप्तेसारख्या कॉम्प्लिमेंट देणं, किंवा हिंदी शो मधल्या नेहा कक्करप्रमाणे एखाद्या स्पर्धकाचं गाणं ऐकून आनंदाश्रू येणं हे सगळं यांच्याकडून बघताना ते फार बेगडी, नाटकी वाटतं.
संगीत ही एक साधना आहे, तपश्चर्या आहे. असा एखादा शो जिंकून त्यात परीक्षक बनल्याने ती साधना पूर्ण होत नसते, त्यासाठी कित्येक वर्षं मेहनत करावी लागते.
पंडित जसराज, पंडित भीमसेन जोशी, लतादीदी, आशाताई यांनी तर कित्येक वर्षं या संगीतक्षेत्रात मेहनत घेतली तेव्हादेखील कधीच त्यांनी स्वतःला एक परिपूर्ण परीक्षक म्हणवून घेतलं नाही.
याच सारेगमप मधून स्टार बनलेले सोनू निगम, अवधूत गुप्ते यांनी १५ ते २० वर्षं घासल्यावरच त्यांना त्या खुर्चीत बसायचा मान मिळाला.
सारेगमपच्या जुन्या सीझनला हृदयनाथ मंगेशकर, देवकी पंडित, अवधूत गुप्ते, सुरेश वाडकार अशा कित्येक दिग्गजांनी एका उंचीवर नेऊन ठेवलं होतं, आज त्यांच्याकडे ज्या पद्धतीने भावी गायक घडवायची ताकद आहे ती या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या बारक्या पोरांमध्ये आहे का?
परीक्षक हा फक्त वयानेच नाही तर अनुभवानेदेखील तितकाच मॅच्युअर लागतो. मंगेशकर कुटुंबाला स्वतःचे घर चालवण्यासाठी, घरातील भावंडांची पोटं भरण्यासाठी या क्षेत्रात येऊन काम करावं लागलं पण त्यांनी कधीच त्याचं भांडवल केलेलं तुम्ही पाहिलंय का?
पण आजकालच्या या रिअॅलिटी शोजमध्ये खुशाल आपल्या गरिबीची जाहिरात होते आणि त्या दृष्टिकोनातूनच त्या स्पर्धकाचे परीक्षण होते. म्हणजे त्या स्पर्धकाची गायकी अगदी सुमार असली तरी चालेल पण त्याच्या आयुष्यात असलेला ड्रामा यांना एनकॅश करायचा असतो म्हणून ही सगळी थेरं.
जुन्या सारेगमपचे एपिसोड तुम्ही आजही बघा त्यातल्या कलाकारांची पोहोच, संगीताकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोन हे सगळं सध्याच्या एकातरी स्पर्धकात शोधून तरी सापडेल का??
सध्या या लिटिल चॅम्प्समधले छोटे स्पर्धक फार उत्तम गातात यात काहीच वाद नाही, पण यातले कीती जण या इंडस्ट्रीत टिकू शकतील? डोक्यात हवा जाऊ न देता कीती जण खरोखर संगीतात करियर घडवतील? हे नुकतेच अंड्यातून बाहेर पडलेले कलाकार त्यांना कितपत योग्य मार्गदर्शन करू शकतील?
या आणि अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं मलातरी यांच्याकडे बघून सापडत नाहीयेत. माझा या स्पर्धकांना, परीक्षकांना, किंवा या शोच्या कॉन्सेप्टला विरोध नाहीये पण संगीतातले दिग्गज असतानाही या कोवळ्या मुलांना परीक्षक म्हणून बसवणं हा त्या परीक्षकाच्या खुर्चीचा अपमान आहे असं मला वाटतं!
टीव्हीचॅनेल्सनी हा शो सुरू केला आहे त्यामुळे आता मुळासकट सगळी कॉन्सेप्ट बदलणं कठीण आहे. पण यापुढे असा काही प्रयोग करताना शोच्या निर्मात्यांनी, PR टीम आणि टीव्ही चॅनल्सनी हजारवेळा विचार करावा.
हे शोज प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुतून बसले आहेत त्यामुळे हा थिल्लरपणा किमान मराठी शोजमध्ये तरी नको असं मला प्रकर्षाने वाटतं नाहीतर तसंही आज टीव्ही बघणारा बराचसा प्रेक्षक ओटीटीकडे वळला आहे, हे असंच सुरू राहिलं तर एक दिवस टेलिव्हिजन चॅनल्सला कोणच वाली उरणार नाही.
===
हे ही वाचा – ‘ते’ मूर्ख बनवणार आणि आपण बनत राहणार! ‘सो कॉल्ड नवी मालिका’ही त्याच वळणावर
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.