दृश्यम २ वर उगाच टीका करणाऱ्या लोकांनी या सिनेमाची खरी बाजू पाहिलीच नाही!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर
===
२ ऑक्टोबरला काय होतं? गांधी जयंती होती आणि त्यानिमित्त विजय साळगावकर आणि त्याची फॅमिली पणजीला सत्संग अटेंड करायला गेले होते. २०१५ साली रिलीज झालेल्या अजय देवगणच्या दृश्यम या सिनमातल्या या डायलॉगने सगळ्यांना भंडावून सोडलं होतं!
अगदी बाहुबलीच्या वेळेस “कटप्पा ने बाहुबलीला का मारलं” हा प्रश्न जितका व्हायरल झाला तितकीच विजय साळगावकरने सांगितलेली ही गोष्टसुद्धा खूप व्हायरल झाली!
दृश्यम हा सिनेमा ज्यांनी ज्यांनी पाहिला आहे त्यांना नेमकं माहिती आहे की पोलिस स्टेशनच्या खाली काय आहे? याच कथेला आणखीन एक पाऊल पुढे नेऊन जितू जोसेफ याने दृश्यम २ हा सिनेमा भेटीला आणला आहे!
त्यांनी २०१३ साली साऊथचा स्टार मोहनलाल याने मल्याळम मध्ये पहिला दृश्यम केला, त्यानंतर कमल हसन आणि अजय देवगण या दोघांनी या सिनेमाचा ऑफिशियल रिमेक केला!
हिंदी रिमेकच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निशिकांत कामत या गुणी अभिनेत्याने घेतली होती, त्याच्या दिग्दर्शनामुळेच हिंदीत निघालेला दृश्यम हिट झाला, आणि लोकांनी तो पाहिल्यावर मल्याळम सिनेमासुद्धा आवडीने पाहिला.
===
हे ही वाचा – “पानिपत” चित्रपट नक्की कसा आहे? कुणी पहावा, कुणी पाहू नये? वाचा..!
===
आता त्याचाच दूसरा म्हणजेच दृश्यम २ भाग १९ फेब्रुवारी रोजी एमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा दृश्यम आणि त्यातला सुन्न करणारा सस्पेन्स सगळ्यांना आठवू लागला!
सिनेमा रिलीज होऊन तसे बरेच दिवस उलटून गेले आहेत, दृश्यम फॅन्स किंवा मोहनलाल यांचे फॅन्स यांनी या सिनेमालासुद्धा नेहमीप्रमाणेच डोक्यावर घेतलं, पण तरीही बरीचशी लोकं या सिनेमाच्या पहिल्या भागाशी जास्त तुलना करत आहेत!
सोशल मीडियावर काही लोकं या सिनेमाचं तोंडभरून कौतुक करतायत तर काही लोकं हा दूसरा भाग का काढला? असे प्रश्न विचारून या सिनेमावर सडकून टीकादेखील करतायत!
पण मुळात खरंच तसं आहे का? दृश्यम २ हा खरंच सिनेमा तितका जमलेला नाहीये का? याविषयी आणि एकंदरच या सिनेमाच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू समजून घ्यायचा प्रयत्न करूया.
काळजी नसावी या लेखात सिनेमाच्या सस्पेन्स बद्दल काहीही वाच्यता न करता आपण या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत त्यामुळे ज्यांना ज्यांना याचा दूसरा भाग बघायचा आहे त्यांचा सिनेमा बघायचा एक्सपिरियंस नक्कीच खराब होणार नाही!
दृश्यम २ मध्ये नेमकं असं काय दाखवणार? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल ज्यांनी त्याचा पहिला भाग पाहिला आहे, कारण पहिल्या भागात कथा ऑल्मोस्ट संपली आहे आणि त्यापुढे नेमकं कथानक काय दाखवणार हे देखील सांगणं कठीण आहे!
पण इथेच खरी मेख आहे लेखक दिग्दर्शक जीतू जोसेफ याची, ज्या पद्धतीने त्यांनी या सिनेमाचा पहिला भाग लिहिला होता त्यावरून तुम्ही अंदाजसुद्धा लावू शकत नाही की दुसऱ्या भागात नेमका कोणता ट्विस्ट येणार आहे!
सध्या सोशल मीडियावर दृश्यमच्या दुसऱ्या भागाबद्दल एक गोष्ट खूप चर्चेत आहे की “पहिला बराचसा सिनेमा रटाळ आहे पण शेवटच्या पाऊण तासात खूप वेगळं केलं आहे!” ज्यांनी ज्यांनी दृश्यम २ पाहिला आहे त्यांनी सोशल मीडियावर काहीशा अशाच अंदाजात त्यांचे मत मांडले आहे.
ज्यांना हा सिनेमा काही खास वाटला नाही त्यांनी याच गोष्टीवरून लोकांना ट्रोल करायलासुद्धा सुरुवात केली आहे.
पण खरंच या अडीच तासाच्या सिनेमातला अर्ध्याहून जास्त भाग इतका संथ ठेवण्यामागे लेखक दिग्दर्शकाने काहीतरी विचार केला असेलच, त्यामुळे पुढचा मागचा कसलाही विचार न करता आपलं मत ठोकून देणाऱ्या लोकांनी हा सिनेमा पुन्हा एकदा बघावा तेंव्हा समजेल, की दृश्यम २ चा बहुतांश भाग इतका संथ का आहे ते?
मुळात दृश्यमचा पुढचा भाग लिहिणं आणि त्या नवीन भागाला जुन्या भगाप्रमाणेच कधीही विचार करू शकणार नाही असा क्लायमॅक्स देणं हे काही सोपं काम नव्हतं!
कारण पहिल्या भागात मुख्य पात्राच्या हातून घडलेला गुन्हा आणि त्यातून तो कशाप्रकारे स्वतःच्या कुटुंबाला घेऊन निसटला ही कथा होती, पण दुसऱ्या भागात लोकांच्या मनात कथेचा एक ठराविक शेवट असतानासुद्धा लोकांना सुन्न करणारा शेवट देणं हे फक्त आणि फक्त जितू जोसेफसारखे फिल्ममेकर्सच करू शकतात!
दृश्यम मधल्या जॉर्जकुट्टीचं आणि त्याच्या कुटुंबांचं आयुष्य एका भयानक घटनेनंतर ढवळून निघतं आणि या संकटातून स्वतःच्या कुटुंबाला वाचणाऱ्या जॉर्जकुट्टीच्या आयुष्यात ६ वर्षानंतर नेमका काय बदल झाला आहे हे सगळं विस्तृतपणे दाखवण्यासाठी नवीन कथेच्या अनुषंगाने सस्पेन्स डेवलप करण्यासाठी या सिनेमाचा दूसरा भाग इतका संथ असणंच अपेक्षित होतं.
जॉर्जच्या मोठ्या मुलीच्या मनावर झालेला परिणाम, समाजातल्या लोकांचा जॉर्जकुट्टीकडे बघायचा तिरकस दृष्टिकोन, पोलिसांना इतकी वर्ष गुंगारा देऊन मोकाट फिरणारा जॉर्जला पाहून हतबल झालेली आपली सिस्टिम, आणि हे इतकं सगळं होऊनसुद्धा शांत डोक्याने आपलं काम करत राहणारा आणि मनात एक भलंमोठं गुपित दडवून बसलेल्या जॉर्जकुट्टीचा हा सगळा प्रवास दाखवणंही तितकच गरजेचं होतं!
सिनेमाच्या शेवटला जे काही होतं ते पाहून आपल्याला कदाचित त्यावर विश्वास ठेवणं कठीण होऊ शकतं पण बॉस ये फिल्म है, इथे काहीही होऊ शकतं आणि सस्पेन्स थ्रिलर सिनेमात तर ‘काहीही’ होणंच अपेक्षित असतं!
आपण अंदाज लावलाय त्याप्रमाणे सस्पेन्स सिनेमे लिहिले गेले आणि सादर केले गेले तर त्यात काहीच थ्रिल राहणार नाही, आणि कदाचित या गोष्टीमुळेच दृश्यम आणि त्याच्या दुसऱ्या भागाची कथा एक उत्कृष्ट लिहिलेला सस्पेन्स थ्रिलर म्हणून गणली जाते!
पहिला भाग बघून झाल्यावरसुद्धा त्यातल्या शेवटच्या ट्विस्टने तुम्हाला हैराण केलं होतं, तसाच काहीसा अनुभव दृश्यम २ बघताना येतो, पण त्या शेवटापर्यंत पोहोचायला तुमच्याकडे संयम पाहिजे.
===
हे ही वाचा – उपद्रवी बाबांची पोलखोल का आणखीन काही – ह्या “आश्रम” मध्ये नेमकं आहे तरी काय?
===
कारण सुरुवातीला डेव्हलप केलेले प्लॉटस अगदी पद्धतशीरपणे शेवटी उलगडत जातात, एकामागोमाग एक गोष्टी क्लियर होतात आणि दृश्यम २ चा क्लायमॅक्ससुद्धा तुम्हाला थक्क करतो हे मात्र नक्की!
सिनेमाच्या टेक्निकल गोष्टी जसं की बॅकग्राऊंड म्युझिक, कॅमेरावर्क, एडिटिंग सगळं लाजवाब आहेच. मोहनलाल, मिना, मुरली गोपी सारख्या तगड्या अभिनेत्यांची कामं तर लाजवाबच आहेत.
पण या सिनेमाच्या कथेला जी लोकं नावं ठेवतायत त्यांना एकतर सस्पेन्स कसा डेवलप करायचा हे माहीत नाहीये किंवा ते माहीत असूनही सोशल मीडियावर ट्रेंड होतय म्हणून एका गोष्टीला नावं ठेवायची आहेत म्हणून ठेवतायत. अशा २ कॅटेगरीमधली लोकं तुम्हाला दृश्यम बाबतीत बोलताना बघायला मिळतील!
या सिनेमाचा पहिला भाग आलेला तेंव्हा या सिनेमाच्या कथेला नैतिक पातळीवर चुकीचंसुद्धा ठरवलं गेलं. कारण गुन्हेगाराची मानसिकता कशीही असो, त्याच्या बाबतीत काहीही घडलेलं असो, त्याचा भूतकाळ कितीही विचित्र असो, त्याने केलेल्या गुन्ह्याचं उदात्तीकरण या सिनेमाने केलं असेही आरोप काहींनी लावले.
पण या चष्म्यातून न बघता त्याकडे एक स्वतंत्र कलाकृती म्हणून पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट जाणवेल की ह्या अशा गोष्टीसुद्धा लोकांना आवडतात, दरवेळेस सकारात्मक शेवटच होतोच असं नाही.
दृश्यम १ असो किंवा २, दोन्ही भागात कथानकाचं केंद्रबिंदू एकच आहे ते म्हणजे “कुटुंब”! आणि कोणत्याही कुटुंबाचा प्रमुख त्याच्या फॅमिलीसाठी काहीही करू शकतो, आणि त्यावेळेस चूक काय आणि बरोबर काय यापेक्षा त्याच्या कुटुंबाची सुरक्षा त्याला जास्त महत्वाची असते!
दोन्ही भागांमधून साधारपणे असाच मेसेज दिला गेला आहे, पण दुसऱ्या भागात ज्या प्रकारे तो मेजेस दाखवला गेलाय ते अनुभवायचं असेल तर हा सिनेमा एकदातरी आवर्जून बघाच.
जीतू जोसेफच्या क्लासिक स्टोरीटेलिंग साठी, मोहनलालच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि शेवटपर्यंत खुर्चीला खिवळून ठेवणाऱ्या क्लायमॅक्ससाठी हा सिनेमा तुम्ही बघायलाच हवा!
मल्याळममध्ये याचा दुसरा भाग आला, त्यामुळे यांचा हिंदी रिमेक होईल अशी शक्यता नाकारता येणार नाही, पण जेव्हा केव्हा हिंदी रिमेक येईल तेव्हा निशिकांत कामत या हरहुन्नरी दिग्दर्शकाची आठवण आल्यावाचून राहणार नाही हे मात्र नक्की, याच्या रिमेकला न्याय देऊ शकणारा आणखीन कोणता दिग्दर्शक माझ्यातरी नजरेत नाही!
===
हे ही वाचा – शेअर मार्केटचा “बच्चन” की लुटारू ब्रोकर? भारतात सर्वाधिक गाजलेल्या स्कॅमची कहाणी
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.