' या दिवाळीत भेसळयुक्त उटण्याला करा रामराम! घरगुती उटण्याने मिळवा सतेज कांती – InMarathi

या दिवाळीत भेसळयुक्त उटण्याला करा रामराम! घरगुती उटण्याने मिळवा सतेज कांती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

दसरा झाला, की सगळ्यांना दिवाळीची चाहूल लागते. ह्या सणाची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो.

दिवाळीची वाट बघण्याची प्रत्येकाची कारणेही वेगळी असतात बरं का! लहान मुलं फराळ आणि फटाके फोडण्यासाठी, आई मुलांच्या परतीच्या ओढीने, नवीन लग्न झालेली मंडळी पहिली दिवाळी आणि पहिला पाडवा म्हणून, आजी आजोबा ‘आता पूर्ण कुटुंब एकत्र येणार’ या ओढीने दिवाळीची वाट बघत असतात.

शेतकऱ्याच्या घरात पीक विकून पैसे आलेले असतात, ऑफिस मध्ये कोणाला बोनस मिळालेले असतात, धंदे जोमाने चालत असतात त्यामुळे नवीन कपडे, दागिने, वस्तू घेण्यासाठीच्या मुहूर्तांपैकी एक असते दिवाळी.

याच बरोबर शिक्षणाला, नोकरी धंद्यानिमित्त गावाला गेलेली मंडळी घरी परततात, सगळेजण सोबत बसून फराळाचे पदार्थ बनवतात, आवरा सावर करतात, घराची रंगरंगोटी केली जाते. जिव्हाळ्याच्या नात्यांमधील ओलावा कायम ठेवण्याचा हा सण म्हणजे दिवाळी! या सणाची कितीही स्तुती केली तरी कमीच.

 

diwali-inmarathi

 

वर्षभर न केलेल्या अनेक गोष्टी फक्त दिवाळीत केल्या जातात जसे, नरकचतुर्दशी उजाडण्याआधी, गुलाबी थंडीत केलेले अभ्यंग स्नान. हिवाळा असतो म्हणून अभ्यंगस्नानात अंगाला तेल लावून आधी मालिश केली जाते, मग सुगंधित उटण्याने अंघोळ केली जाते.

पूर्वी हे उटणं घरीच तयार केल्या जात असे. तेव्हा कस्तुरी, केशर ह्या सामग्री सहज उपलब्ध असायच्या कारण, दैनंदिन जीवनात सुद्धा साबण नसल्याने उटण्यानेच अंघोळ केली जायची.

उटण्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. तो एक औषधी लेप असतो. या कारणाने सुद्धा उटण्याचा वापर जास्त होता. उटण्यामुळे कांती उजळते, ब्लिच करण्याची गरज भासत नाही, त्वचा मऊ होते.

उटण्यातील रवाळ कणांमुळे रक्ताभिसरण सुरळीत होते म्हणजेच, हल्ली स्क्रब जे काम करतं, तेच पूर्वीच्या काळी उटणं करायचं. उटण्याने अंघोळ करण्याचे असे अनेक फायदे आहेत.

या वेगवान जगात जिथे फळं- भाज्या सुद्धा केमिकल्सने पिकवल्या जातात, तेलापासून डाळींपर्यंत सगळ्यात भेसळ असते, तिथे उटणे एकदम शुद्ध असेल हे कशावरून?

 

utane inmarathi1

 

बाजारातील केमीकलयुक्त उटणे लावून आपल्या त्वचेची वाट लावून घेण्यापेक्षा घरच्याघरी उटणे बनवणे जास्त फायदेशीर ठरेल. तुम्ही सुद्धा खाली दिलेल्या, सहज उपलब्ध असलेल्या सामग्रीपासून शुद्ध उटणे घरीच बनवू शकता.

उटणे बनवण्याकरता लागणारे साहित्य –

केशर
गुलाब पावडर, चंदन
मुलतानी माती
आंबे हळद किंवा साधी हळद
आवळकाठी
नागरमोथा
वाळा
ज्येष्ठमध
बावची
सुगंधी काचोरा
तुळशी पावडर
मंजीस्ट

या गोष्टी योग्य प्रमाणात एकजीव करून घ्या आणि घरीच शुद्ध उटणे तयार होईल. हे उटणे आपण बेसन किंवा मसूर डाळीच्या पिठात घालून अंगाला लावू शकता.

उटणे बनवताना ध्यानात ठेवण्याच्या काही टिप्स –

 

utane inmarathi2

 

हळद ही २-३ ग्रॅमच्या वर नको कारण, त्याने उटण्याचा रंग भरपूर गडद होईल.

तुम्हाला उटणे किती सुगंधित हवे आहे यानुसार, वाळा, गुलाब पावडर आणि चंदनाचा वापर करा.

८-९ वयवर्षांच्या मुलांची त्वचा नाजूक असते, त्यामुळे त्यांच्यासाठी फार जाड उटणे वापरू नका.

काही लोकांना मसुरीच्या डाळीच्या पिठाची किंवा बेसनाची अॅलर्जी असू शकते. त्यामुळे त्यांनी उटणे हे दूध आणि मलईत भिजवून किंवा गुलाब पाण्यात भिजवून वापरणे उत्तम.

आपल्या त्वचेनुसार मुलतानी मातीची मात्रा ठरवा.

उटणे वापरतानाही आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते जशी, उटणे चेहऱ्याला लावल्यावर जोर लावून घासू नका. चेहऱ्याची त्वचा नाजूक असते त्यामुळे ती फाटण्याची भीती असते.

फक्त दिवाळीतच नाही, तर घरी तयार केलेल्या शुद्ध उटण्याने तुम्ही वर्षभरही अंघोळ करू शकता. याने त्वचेतील तेलाचे प्रमाण संतुलित राहील आणि साबणाने होणारा त्रास वाचेल. 

त्यामुळे घरीच शुद्ध उटणं बनवा आणि कसलीही चिंता न करता दिवाळीचा मनसोक्त आनंद लुटा. कोरोनामुळे आलेल्या अंधारावर मात करून आपल्या सगळ्यांच्या जीवनात ही दिवाळी समृद्धी आणि आरोग्याचा प्रकाश नक्की पुन्हा परत आणेल. शुभ दिवाळी!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?