भारतीय लोकांचा प्रचंड आवडता खेळ म्हणजे क्रिकेट! पूर्वी क्रिकेट सामना म्हणजे पर्वणी असायची. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असला, तरी सर्वाधिक लोकप्रिय खेळ क्रिकेटच आहे.
आबालवृद्ध, काॅलेजला जाणारी मुलं, मुली, क्रिकेटचे शौकीन.. शौकीन कसले अगदी भक्तच म्हणा.. मॅच आहे म्हटलं की शाळा, काॅलेज, ऑफिसला दांडी मारायची नी मॅच बघायची..
पूर्वी मॅच बघायची सोय नव्हती, तेव्हा रेडिओ असायचा, ट्रान्झिस्टर गळ्यात अडकवून हे शौकीन लोक बाॅल टू बाॅल मॅचचा आनंद लुटत. जाता जाता एखादा रेडिओधारक दिसला तर स्कोअर काय झाला? विचारत.
निकालावरून पैजा लागत.. भांडणं होत. हे सारं जुनं झालं. पण आजही भारतीय क्रिकेटच्या इतिहासात १९८३ साली भारतानं पहिला वर्ल्ड कप जिंकला होता तो दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे.
कपिलदेव भारतीय टीमचा कॅप्टन होता. त्यानं जिंकलेला विश्वचषक आजही भारतीयांसाठी शान की बात आहे.
नुकताच या विषयावर आधारीत ८३ नावाचा चित्रपट येणार असून त्याचा ट्रेलर रिलीज झाला असून, रणवीर सिंग, दीपिका पदूकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कप्तान कपिल देवची भूमिका रणवीर सिंग साकारणार असून, आणखीन ११ तगडे कलाकार आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहेत!
हा विश्वचषक जिंकून आणि असं या खेळाडूंना तरी वाटलं होतं का? नाही…!!! कारण भारतीय संघ त्यावेळी अंतिम फेरीत पोचेल याचीही कुणाला खात्री नव्हती.
भारतीय संघाचा खेळ फारसा लक्षणीय नव्हता. प्रेक्षणीय सुध्दा वाटायचा नाही. अगदी लंगडं घोडंच वाटायची ती टीम…
२५ जून हा क्रिकेट संघातील विलक्षण दिवस! या मंगलदिनी भारतीय क्रिकेट संघाने जगप्रसिद्ध असा क्रिकेट विश्वचषक लॉर्डस् मैदानावर जिंकला होता.
लाॅर्डस्… ही क्रिकेटची पंढरी!!! साहेबांच्या देशात जाऊन त्यांचाच खेळ जिंकून, त्यांना चारी मुंड्या चीत करुन जगज्जेता ठरला होता भारतीय संघ!!!
livemint.com
विश्वचषक स्पर्धा जिंकण्यापूर्वी ५१ वर्षं आधी याच तारखेला एक अभूतपूर्व घटना येथे घडली होती. २५ जून १९३२ मध्ये भारतीय संघाने आपली पहिली कसोटी याच लाॅर्डस् मैदानावर खेळली होती.
याच दिवशी भारताने पहिला विश्वचषक जिंकल्यामुळे हा दिवस आपल्या इतक्या वर्षांनंतरही स्मरणात राहतो. हा महाअंतिम सामना जिंकण्यापूर्वी भारतीय संघ, अंडरडॉग टीम मानली गेली होती. अंडरडाॅग म्हणजे आपल्या साध्या सोप्या भाषेत आंडूपांडू टीम!
ज्या संघाकडून कुणालाच कसल्याही आशा, अपेक्षा नव्हत्या. अगदी भगवान भरोसे असलेली ही टीम आहे असं बहुतेक जणांचं मत होतं. पण विश्वचषक स्पर्धा जिंकून हेच कमकुवत समजले गेलेले खेळाडू जागतिक क्रिकेटचे प्रमुख खेळाडू ठरले होते.
आपण हा दिवस हर्षोल्हासाने साजरा केला होता. या गोष्टीला ३७ वर्षे पूर्ण झाली.
आपण हा प्रसंग ऐकला,वाचला, त्यावर उलटसुलट चर्चा केल्या. आता तर या घटनेवर एक सिनेमा पण निघतोय. पण या प्रसंगातील काही गोष्टी अजून लोकांपर्यंत पोहोचायच्या आहेत.
भारत आणि वेस्ट इंडिज विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत पोचले होते. अर्थातच वेस्ट इंडिज हा जबरदस्त प्रतिस्पर्धी होता आणि भारतीय संघ त्यांच्यासमोर किरकोळच होता.
hindustantimes.com
म्हणजे बहुतेक सर्वांना भारत हरणार आणि वेस्ट इंडिज विश्वविजेता संघ ठरणार याचीच खात्री होती. त्या दिवशी विंडीजने नाणेफेक जिंकली, पण विंडीजचे खेळाडू सामना खेळण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
क्लाईव्ह लॉईडने गोलंदाजी करायचे ठरवले. भारतीय संघ ठीकठाकच खेळत होता. भारतीय संघ नशिबावर अवलंबून राहतो, असे लोकांना वाटत होते. एवढंच नाही तर, प्रतिस्पर्धी असलेल्या विंडीज संघातील खेळाडूंना सुद्धा हेच वाटत होतं.
आपण विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंतचे सर्व सामने जिंकूनही आपल्याला योग्य तो सन्मान मिळत नाही अशी भारतीय संघाची समजूत झाली होती.
नाणेफेक जिंकून लॉईडने विचार केला, की प्रथम गोलंदाजी करावी. भारतीय संघाला थोड्या वेळात आपण गुंडाळून टाकू. मग आपली फलंदाजी आली, की धुंवाधार फलंदाजी करुन सामना घालू खिशात.. म्हणजे सामना लवकर संपेल… असा विचार लॉइड यांनी केला होता.
त्याचा विचार चुकीचा नव्हता. त्याच्या विचारातील पहिला भाग अगदी बरोबर होता. भारतीय संघाने १८३ धावा केल्या. भारताचा फलंदाज के.श्रीकांतने सर्वात अधिक म्हणजे ३८ धावा केल्या.
विंडीज संघातील अँडी रॉबर्टने ३, माल्कम मार्शल, मायकेल होल्डींग व लॅरी गोम्सने प्रत्येकी २/२विकेट घेतल्या. भारताला वेस्ट इंडिज संघानं ५४ षटकांत १८३ धावांवर रोखलं.
उत्तरादाखल भारतीय संघाने गोलंदाजी केली. पण भारतीय संघाच्या धावा खूपच कमी झाल्या होत्या. त्यामुळे विंडीजचं पारडं विजयाकडं झुकू लागलं. खेळातील जिंकण्याची होती नव्हती ती आशाही संपू लागली.
पण त्यादिवशीची खेळपट्टी गोलंदाजीला अनुकूल होती. वेस्ट इंडीजला भारतानं खूप कमी धावा दिल्या. विव्हियन रिचर्ड्ससारखा कसलेला खेळाडू ३३ चेंडूत केवळ २८ धावा करु शकला होता.
timesofindia.com
लाला अमरनाथची गोलंदाजी विंडीजसाठी कठीण गेली. सात षटकांत त्यांनी विंडीजला केवळ १२ धावा दिल्या होत्या.
५२ षटकांत विंडीजचा डाव १४० धावांवर गुंडाळला गेला. आजवरच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, हा सर्वात लहान धावफलक ठरला आहे.
फारुख इंजिनिअर हे भारतीय संघातील माजी यष्टीरक्षक होते. १९८३च्या अंतिम सामन्यात ते समालोचन करत होते. खेळ संपत आला होता तेव्हा त्यांना काही मित्रांनी विचारले,
“भारतीय संघ जिंकला तर आपल्या पंतप्रधान, माननीय इंदिरा गांधी सुट्टी जाहीर करतील का?” फारूखनी लगेच उत्तर दिले “हो,नक्की”.
आता गंमत अशी झाली, ज्यादिवशी फायनल मॅच झाली तो दिवस होता शनिवार!!! रविवारी तर सुट्टी असतेच. अनपेक्षितपणे भारताने विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकला.
भारताने ४३ धावांनी वेस्ट इंडिज संघावर मात करत विश्वचषकावर भारतीय संघाचं नांव कोरलं. क्रिकेट इतका बेभरवशाचा खेळ दुसरा नसेल!!!
caughtatpoint.com
पाऊस आणि क्रिकेट कसे पोपट करतील काही सांगता येत नाही. जिंकेल असं वाटणारा बलाढ्य वेस्ट इंडिज संघ अंडरडाॅग समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाकडून किती मोठ्या धावसंखेनं पराभूत झाला!!!
अशाप्रकारे खेळ शनिवारी झाला, भारत जिंकला व रविवारी सुट्टी मिळाली.