आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
इमेज. किती महत्वाची गोष्ट आहे ना ही. आपल्याबद्दल दुसऱ्या व्यक्तीचं काय मत असेल याचं मनाला दिलेलं एक उत्तर म्हणजे इमेज असं म्हणता येईल.
आपल्या विचारातून, वागण्यातून, देहबोली मधून लोकांच्या मनामध्ये एक प्रतिमा तयार होत असते. आपला स्वभाव, बोलण्याची पद्धत यावरून सुद्धा आपली इमेज तयार होत असते.
ही इमेज बदलणं हे सुद्धा आपल्या हातात असतं; पण, ते साध्य करायला खूप मेहनत घ्यावी लागते. आपल्याला असं वाटू शकतं, की इमेज ही गोष्ट फक्त व्यक्तिगत आयुष्यात महत्वाची आहे. पण, तसं नाहीये.
व्यावसायिक आयुष्यात सुद्धा आपल्या इमेजनुसार आपल्याला विविध जवाबदारी दिल्या जातात. बॉलीवूड मध्ये सुद्धा इमेज या गोष्टीचा खूपदा प्रत्यय येतो.
विनोदी कलाकार विनोदीच भूमिका करतात, व्हिलन हे कायम वाईट कामच करत असतात. हिरो कायम चांगलीच कामं करणार रील लाईफ मध्ये सुद्धा आणि रिअल लाईफ मध्ये सुद्धा.
निगेटिव्ह भूमिकांना फारसं महत्व दिलं जातं नाही. कारण एकदा तुम्हाला त्या भूमिकांचा टॅग चिकटला की तो काढणं कठीण असतं. तरीही यश मिळवायचं असेल तर भीती न बाळगता रिस्क घ्यायला हवीच.
याचं टेलिव्हिजन इंडस्ट्री मधील उदाहरण द्यायचं तर अरुण गोविल. लोकांनी त्यांना ‘राम’ म्हणून मान्य केलं आणि प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा. एका फॅनने त्यांना सिगरेट ओढताना बघून नाराजी व्यक्त केली होती. त्या दिवसानंतर अरुण गोविल यांनी सिगरेट सोडून दिली.
प्रत्येक कलाकार हा इमेज मध्ये अडकलाच असं नाहीये. अनुपम खेर, ओम पुरी यांच्यासारखे कलाकार आहेत ज्यांनी कायम त्यांची इमेज बदलत नवीन प्रयोग केले.
काही हिरो सुद्धा असे आहेत ज्यांनी, की त्यांच्या इमेज ची काळजी न करता रोलच्या गरजेनुसार निगेटिव्ह भूमिका सुद्धा केल्या आणि लोकांची दाद मिळवली. अशा दहा हिरो बद्दल आपण जाणून घेऊया:
१. शाहरुख खान :
आजच्या वाचकाला पहिलं उदाहरण हेच लक्षात येईल. डर मधील ‘क्ककक्क किरन’ हे कोणीच कधी विसरू शकणार नाही. हिरो म्हणून मान्यता मिळालेली असताना शाहरुख ने हा रोल स्वीकारला आणि त्या संधीचं सोनं केलं.
1993 मध्येच रिलीज झालेल्या बाजीगर मध्ये सुद्धा शाहरुख खान ने एक निगेटिव्ह रोल केला होता. या सिनेमासाठी बेस्ट actor चा फिल्मफेअर अवॉर्ड प्रदान करण्यात आला होता.
शाहरुख खान ने 1994 मध्ये रिलीज झालेल्या ‘अंजाम’ मध्ये निगेटिव्ह रोल करणं मान्य केलं आणि तो रोल सुद्धा अभिनयाचा कस लावून सादर केला. या सिनेमासाठी शाहरुख खान ला बेस्ट actor फॉर निगेटिव्ह रोल या फिल्मफेअर अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आलं.
एकतर्फी प्रेमकहाणी मधील हा व्हिलन आपलं प्रेम मिळवण्यासाठी हिरोईन च्या नवऱ्याला मारायला सुद्धा मागे पुढे बघत नाही. हीच क्रूरता त्याने डॉन च्या रिमेक मध्ये सुद्धा दाखवली तेव्हा, जेव्हा की तो एक रोमँटिक हिरो म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होता.
२. अजय देवगण:
1996 मध्ये रिलीज झालेल्या ‘दिलजले’ या सिनेमा मध्ये अजय देवगण ने एका अतिरेक्याचा रोल केला आहे जो की आधी एक देशभक्त होता. पण, काही घटनांमुळे तो देशद्रोही होतो.
2002 मध्ये रिलीज झालेल्या ‘कंपनी’ या सिनेमा मध्ये राम गोपाल वर्मा ने दाऊद इब्राहिम या डॉन चा रोल अजय देवगण ला ऑफर केला आणि ‘मलिक’ हा एक कायम लक्षात राहणारा व्हिलन प्रेक्षकांसमोर आला.
या सिनेमात अजय देवगण हा डायलॉग सोबतच त्याच्या नजरेने सुद्धा खूप काही बोलताना आपल्याला दिसतो.
2002 मध्येच रिलीज झालेल्या ‘दिवानगी’ या सिनेमात अजय देवगण ने एका स्प्लिट पर्सनॅलिटी असलेल्या व्यक्तीचा रोल केला आणि तोसुद्धा लोकांना खूप आवडला होता.
या सिनेमासाठी अजय देवगण ला निगेटिव्ह रोल साठी बेस्ट actor चा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला ही एक विशेष उल्लेखनीय बाब.
३. इरफान खान:
या अत्यंत प्रतिभावान कलाकाराने काही दिवसांपूर्वी जगाचा निरोप घेतला. इरफान खान ला त्याचा पहिला अवॉर्ड मिळाला तो निगेटिव्ह रोल साठी.
‘हासिल’ सिनेमात त्याने साकारलेल्या ‘रणविजय’ या व्यक्तिरेखेसाठी. हे पात्र इतकं क्रूर होतं की प्रेक्षक त्याचा तिरस्कार करतात.
2003 मध्ये रिलीज झालेल्या ‘मकबूल’ मध्ये सुद्धा इरफान खान ने आपल्या निगेटिव्ह रोल ने अंडरवर्ल्ड मध्ये काम करणारी माणसं कशी वागतात हे खूप योग्य पद्धतीने दाखवून दिलं आहे.
४. सैफ अली खान:
‘लंगडा त्यागी’ हे पात्र सैफ अली खान ने पडद्यावर अक्षरशः जिवंत केलं आहे. त्याची हसण्याची विशिष्ट पद्धत, त्याच्या बोलण्यात त्याने वापरलेला उत्तर प्रदेशातील लोकांचा accent आणि या रोल साठी सैफ अली खान ने रंगवलेले त्याचे पिवळे दात.
हे सगळं इतकं उठून दिसलं आहे, की हा व्हिलन सुद्धा आपल्याला ‘ओंकारा’ या अजय देवगण ने साकारलेल्या पात्रा इतकंच लक्षात राहतं.
या सिनेमासाठी सैफ अली खान चं प्रेक्षकांनी, समीक्षकांनी सर्वांनी कौतुक केलं आणि फिल्मफेअर च्या बेस्ट actor फॉर निगेटिव्ह रोल चा पुरस्कार देण्यात आला.
सैफ अली खान ने या वर्षी रिलीज झालेल्या ‘तान्हाजी’ मध्ये सुद्धा उदयभान चा रोल करून प्रेक्षकांच्या मनात त्या पात्राबद्दल आपल्या अभिनयाने चीड निर्माण केली होती.
५. सुनील शेट्टी:
2000 मध्ये रिलीज झालेल्या ‘धडकन’ या सिनेमात सुनील शेट्टीने एक निगेटिव्ह रोल केला होता. हा सिनेमा प्रामुख्याने गाण्यांमुळे लोकांच्या लक्षात राहिला.
आपलं प्रेम न मिळाल्याने सुनील शेट्टी चं बदललेलं रूप लोकांच्या चांगलंच भावलं होतं. “मै तुम्हे भुल जाओ ये हो नही सकता और मै तुम मुझे भुल जाओ ये मै होने नही दून्गा” हा डायलॉग आजही लोकांच्या लक्षात आहे.
या सिनेमासाठी सुनील शेट्टी ला बेस्ट actor फॉर निगेटिव्ह रोल हा फिल्मफेअर चा अवॉर्ड देण्यात आला होता.
2004 मध्ये रिलीज झालेल्या ‘मै हूं ना’ मदगये सुद्धा सुनील शेट्टी ने त्याच्या निगेटिव्ह भूमिकेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
६. संजय दत्त:
हिरो म्हणून प्रस्थापित असताना ‘खलनायक’ हा 1993 मधील सिनेमात शीर्षक पात्राची भूमिका केली. ‘बल्लू’ हे पात्र साकारताना संजय दत्त ने घेतलेली मेहनत सर्वांनीच पसंत केली.
माधुरी दिक्षीत आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा गाण्यांमुळे सुद्धा खूप हिट झाला होता. 2012 मध्ये रिलीज झालेल्या जुन्या ‘अग्निपथ’ च्या रिमेक मध्ये ‘कांचा चिना’ हे पात्र संजय दत्त ने खूप ताकदिने सादर केलं आहे.
७. सुनील दत्त:
1957 मध्ये रिलीज झालेला ‘मदर इंडिया’ हा भारतीय सिनेमातील एक सुवर्ण पान आहे. या सिनेमा मध्ये सुनील दत्त यांनी निगेटिव्ह भूमिका केली होती. ‘बैजू’ हे पात्र लोकांच्या खूप पसंतीस पडलं.
सुखीलाला हा एक सावकार असतो जो की, बैजू च्या परिवाराला लहानपणापासून फसवत आलेला असतो. बैजू च्या आईला सुखीलालाने दिलेली वागणूक ही त्याला कायम डाचत असते.
या सुखीलाला ला मारण्यासाठी सुनील दत्त हे गुंडांच्या टोळीत सामील होतात आणि सुखीलाला चा खून करतात आणि त्याच्या मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करतात.
हे बघून बैजू ची आई राधा (नर्गिस) या सुनील दत्त ला गोळी मारतात. चांगल्या कामासाठी शस्त्र हातात घेतलेला हा व्हिलन सुद्धा लोकांना फारच आवडला होता.
या नंतर सुनील दत्त यांनी स्वतः निर्माता असलेल्या ‘मुझे जीने दो’ या सिनेमात सुद्धा एका गुंडाची भूमिका करून त्यांच्या फॅन्स ला एक सुखद धक्का दिला होता.
८. दिलीपकुमार:
1961 मध्ये रिलीज झालेल्या ‘गंगा जमुना सरस्वती’ मधील गंगा हे पात्र दिलीपकुमार यांनी निगेटिव्ह रोल मध्ये काम करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती.
या आधी 1949 मध्ये रिलीज झालेल्या ‘अंदाज’ या सिनेमात सुद्धा इंटरवल नंतर निगेटिव्ह रोल केला होता.
1954 मध्ये रिलीज झालेल्या ‘अमर’ या सिनेमात दिलीपकुमार यांनी एका वकिलाचा रोल केला होता, जो की एका गावातल्या मुलीला लग्नाचं वचन देऊन धोक्याने शहरात जाऊन दुसऱ्या मुलीशी लग्न करतो.
गावातील ही मुलगी दिलीपकुमार यांना शोधत शहरात येते आणि तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी दिलीपकुमार सगळे प्रयत्न करतो आणि तिला जीवे मारण्याचा सुद्धा प्रयत्न करतो.
प्रेक्षकांच्या मनातील दिलीपकुमार च्या अगदीच विरोधी रोल असल्याने या सिनेमाला बॉक्स ऑफिस वर खूप थंड प्रतिसाद मिळाला होता.
९. धर्मेंद्र:
बॉलीवूड चा एक दणकट आणि रांगडा अभिनेता. 1964 मध्ये रिलीज झालेल्या ‘आयी मिलन की बेला’ या सिनेमात पहिल्यांदा निगेटिव्ह रोल केला होता. हो रोल लोकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता.
1966 मध्ये रिलीज झालेल्या फूल और पत्थर या सिनेमात सुद्धा धर्मेंद्र ने निगेटिव्ह रोल केला होता. हा सिनेमा त्या काळात गोल्डन ज्युबिली झाला होता आणि खऱ्या अर्थाने धर्मेंद्र ला स्टारडमच्या जवळ पोहोचवणारा होता.
या सिनेमात साकारलेलं ‘शाका’ हे पात्र सुरुवातीला चांगल्या वाटेवर चालणारं असतं. पण, काही घटना घडतात आणि त्यामुळे शाका एक गुन्हेगार होतो.
१०. अमिताभ बच्चन:
Last but not the least या उक्तीप्रमाणे या महानायकाने सुद्धा काही निगेटिव्ह रोल केले आहेत हे काही लोकांना कदाचित माहीत असेल. 1971 मध्ये रिलीज झालेल्या ‘परवाना’ या सिनेमात अमिताभ यांनी पहिल्यांदा निगेटिव्ह रोल केला होता.
ओम प्रकाश, योगिता बाली, नवीन निश्चल आणि शत्रूघन सिन्हा अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात योगिता बाली यांच्याशी लग्न करण्यासाठी त्यांच्या वडिलांचा (ओम प्रकाश) अमिताभ हे खून करतात.
1975 मधील दिवार हा सिनेमा मधील विजय हे पात्र अमिताभ यांनी एक परिस्थतीने तयार केलेल्या एका स्मग्लर ची भूमिका केली आहे जो की श्रीमंत होण्याच्या इर्षेत किती तरी जणांचा जीव घेतो.
1978 मध्ये रिलीज झालेला ‘डॉन’ हा बॉलीवूड च्या इतिहासातील सर्वोत्तम सिनेमांपैकी एक आहे. डॉन मध्ये अमिताभ यांनी दुहेरी भूमिका केली होती. त्यातील एक ‘डॉन’ हे पात्र होतं आणि दुसरा रोल हा गावातील तरुणाचा होता.
डॉन च्या साथीदारांना पकडण्यासाठी पोलीस इन्स्पेक्टर विजय ची त्याच्या डॉन सारख्या दिसण्यामुळे मदत घेतात आणि त्यांचा हेतू साध्य करतात. या सिनेमातील “डॉन को पकडना मुश्किल ही नही नामुमकीन है.” हा डायलॉग लोकांच्या मनावर कोरला गेलेला आहे.
आपली इमेज बदलूनही आपल्या कामाचा दर्जा तोच ठेवणं किंबहुना तो अधिक वाढवणं हा एक संदेश या सिनेस्टार्स ने नकळत आपल्या सर्वांना दिला आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.