घोड्यांच्या देखभालीपासून ऑस्करपर्यंत – वाचा या भारतीय दिग्दर्शकाचा अफाट प्रेरणादायी प्रवास
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारतीय चित्रपटसृष्टी ही एक फार मोठी कलासृष्टी आहे. हॉलिवुडच्या खालोखाल भारतीय बॉलिवूडचं नाव जगभर घेतलं जातं. इथं विविध प्रकारचे चित्रपट बनतात, हीट होतात.
भारतीय चित्रपटसृष्टीने अनेक महान कलाकार दिले आहेत. अनेक ग्रेट दिग्दर्शक, संगीतकार, गायक आणि अभिनेते-अभिनेत्री या चित्रपटसृष्टीने दिले आहेत.
आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीतीलअनेक ग्रेट कलाकारांनी भारताचे नाव जगाच्या नकाशावर नेऊन ठेवले आहे.
आता तर हे फार सोपे झाले आहे. कारण जग जवळ आलेले आहे. डिजिटल क्रांतीने पूर्ण जग हे ग्लोबल व्हिलेज बनले आहे. ऐश्वर्या राय, प्रियंका चोप्रासारख्या अभिनेत्री कान्स सारख्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलमध्ये चमकत्या तारका म्हणून सहजपणे वावरत असतात.
परंतु एक व्यक्ती अशी होती जिने पन्नासच्या दशकातच भारतीय चित्रपटसृष्टीचे नाव आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑस्कर अॅवॉर्डमध्ये नेऊन ठेवले होते.
सन १९६७ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘मदर इंडीया’ –
‘मदर इंडीया’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतला माइल्डस्टोन सिनेमा. भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास लिहिताना या सिनेमाचे नाव टाळताच येणार नाही.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ज्या भारतीय चित्रपटांनी विदेशात नाव कमावले त्या मोजक्या चित्रपटांत ‘मदर इंडीया’चा समावेश होता.
या चित्रपटाला बेस्ट फॉरेन लॅंग्वेज फिल्म कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं, परंतु केवळ एका वोटमुळे या चित्रपटाचा पुरस्कार हुकला. आणि तो पुरस्कार ‘नाईट्स ऑफ काबीरिया’ या इटालियन चित्रपटाला मिळाला.
आणि ती व्यक्ती होती – सुप्रसिद्ध द ग्रेट दिग्दर्शक मेहबूब खान. मात्र ऑस्करपर्यंत भारतीय सिनेमाला नेऊन ठेवणाऱ्या मेहबूब खानचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता.
घोड्यांची नाल ठोकणारा मुलगा ते ऑस्कर पर्यंत पोचणारा दिग्दर्शक –
मेहबूब खान यांचा जन्म गुजरातमधील बडोदाजवळील बिलिमोरा इथे ९ सप्टेंबर १९०७ रोजी झाला होता. त्यांचं खरं नाव रमजान खान होतं.
मेहबूब खान कधीच शाळेत गेले नाहीत. मात्र जीवनाच्या शाळेत ते भरपूर अनुभव घेत लहानाचे मोठे होत होते. त्यांचे वडील पोलिस खात्यात पोलिस होते.
मेहबूब खान यांना लहानपणापासूनच चित्रपटांचा शौक होता. ऍक्टर बनण्याचे स्वप्न घेऊन ते आपल्या घरून पळून मुंबईला निघून आले होते. तेव्हा त्यांचं वय होतं १७ वर्षे.
परंतु त्यांचे वडील पोलिस खात्यात असल्याने त्यांनी आपल्या या मुलाचा बरोबर छडा लावला आणि त्याच्यामागोमाग मुंबईत येऊन त्याला पुन्हा आपल्या गावी घेऊन गेले.
मात्र मेहबूब खान यांच्या डोक्यातलं चित्रपटांचं भूत गेलं नव्हतं. काही वर्षांनी ते आपल्या गावातील एका व्यक्तीबरोबर, मोहम्मद नूर मोहम्मद यांच्याबरोबर वयाच्या २३ व्या वर्षी पुन्हा मुंबईत आले.
या नूर मोहम्मदचा व्यवसाय होता, शुटींगसाठी घोडे पुरवण्याचा. मुंबईत आल्यावर मेहबूब खान यांनी नूर मोहम्मदच्या घोड्यांच्या तबेल्यात घोड्यांना नाल ठोकायचे काम देखील सुरुवातीला केले.
एक दिवस दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक चंद्रशेखर यांच्या सेटवर जाण्याची संधी त्यांना मिळाली. तिथे थांबून त्यांनी चित्रपटाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतली.
त्यानंतर आपल्यालाही सिनेमात काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी दिग्दर्शकाला भेटून सांगितले. तेव्हा चंद्रशेखरनी त्यांची इच्छा बघून त्यांना त्या सिनेमात एक्स्ट्रा कलाकार म्हणून छोटीशी भूमिका दिली.
या एक्स्ट्रा कलाकारांना कोणतेही संवाद वगैरे नसतात. कोणत्या तरी गर्दीच्या सीनमध्ये उभे राहायचे एवढंच काम. मेहबूब खान यांचं चित्रपटातलं करीअर येथून अशा रितीने सुरू झालं.
बोलके चित्रपट बनण्याचे युग अजून सुरू झाले नव्हते. फक्त मूक चित्रपट बनवायचे. अर्देशिर इराणी हे त्या काळातील प्रमुख दिग्दर्शकांमध्ये गणले जात होते.
त्यांचे एक नाटक पाहून करीमुद्दीन आसिफ यांना ‘मुगल-ए-आजम’ बनवण्याची कल्पना सुचली होती. अर्देशिरने मेहबूबला पाहिले आणि त्याच्या चित्रपटांमध्ये एक सहायक भूमिका दिली.
यावेळीपर्यंत, सुमारे सहा-सात चित्रपटांमध्ये मेहबूबने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका केली होती.
आर्देशिर भारताच्या इतिहासामध्ये प्रथम बोलणार्या चित्रपटाची योजना आखत होते. ‘आलम आरा’ असे या चित्रपटाचे नाव होते.
यात त्यांनी प्रमुख पात्र म्हणून मेहबूब खानला कास्ट केले. परंतु चित्रपटसृष्टीतील काही लोकांनी अर्देशिरला सांगितले की आपण आधीच असा मोठा प्रयोग करणार आहात, वरुन एक नवीन नायक. लोकांना माहित असलेल्या अभिनेत्याला घ्या.
या भूमिकेसाठी हा नवीन मुलगा चांगला नाही. याप्रमाणे आघाडीचा ऐतिहासिक असलेला चित्रपट मिळण्यापूर्वीच निसटला. नंतर या चित्रपटासाठी त्या काळातील प्रसिद्ध स्टंटमॅन मास्टर विठ्ठलला साइन केले होते.
यानंतर मेहबूब खान यांनी चित्रपटात अभिनेता बनण्याचा नाद सोडून दिला. त्यांचा कल सिनेनिर्मितीकडे झुकू लागला.
त्यांच्याजवळ सिनेमा बनवण्याच्या वेगवेगळ्या कल्पना होत्या. त्या कल्पना घेऊन ते निर्मात्याकडे जात. सन १९३५ मध्ये दिग्दर्शक म्हणून त्यांना पहिला चित्रपट मिळाला. चित्रपटाचे नाव होते, ‘अल हिलाल’ म्हणजे ‘खुदा का इन्साफ’.
हा चित्रपट चांगला चालला आणि मेहबूब यांना अजून चित्रपट मिळत गेले.
पुढील पाच वर्षात त्यांनी आठ चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. ‘मनमोहन’, ‘डेक्कन-क्वीन’, ‘जागीरदार’, ‘वतन’, ‘हम तुम और वो’, ‘एक ही रास्ता’, ‘औरत’, आणि ‘अलीबाबा’ असे ते आठ चित्रपट होते.
१९४० मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘औरत’ या सिनेमाचे खूप कौतुक झाले. या सिनेमापर्यंत मेहबूब खान यांचे नाव एका यशस्वी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांमध्ये गणले जाऊ लागले होते.
आता त्यांना महत्त्वाकांक्षी चित्रपट बनवण्याचे मनात घेतले. आपल्याच औरत या सिनेमाचा एक भव्य रिमेक बनवण्याची त्यांची मनीषा होती. त्या चित्रपटाचे नावही नक्की झाले, ‘मदर इंडीया’.
‘मदर इंडीया’ बनवेपर्यंत मेहबूब खान यांनी आपल्या तीस वर्षाच्या कारकिर्दीत दिग्दर्शक म्हणून २४ चित्रपट बनवले होते. त्या काळात सिनेमे तयार होण्याची प्रक्रिया धिम्या गतीची होती.
एकेक चित्रपट बनायला अनेक वर्षेही लागत अनेकदा. परंतु अशा रीतीने मनापासून बनवले गेलेले अनेक चित्रपट हे दर्जेदार आणि अजूनही विस्मृतीत राहिलेले असे चित्रपट आहेत.
मेहबूब खान यांच्या प्रत्येक चित्रपटात नायिकेचा रोल हा सशक्त असायचा. त्यांच्या चित्रपटातून स्त्रियांचा नेहमी गौरव केलेला असायचा. हे त्यांच्या चित्रपटाचे वैशिष्ट्य होते.
आणि म्हणूनच त्यांनी केवळ या कारणासाठी मदर इंडियामध्ये दिलीपकुमार यांना घेतले नव्हते.
दिलीप कुमार आणि मदर इंडिया-
असं म्हणतात की दिलीप कुमार यांना मदर इंडीयात काम करण्याची इच्छा होती. त्यांना कथानक आवडले होते आणि मेहबूब खानसारखा दिग्दर्शक.
एवढंच नव्हे तर या चित्रपटातली बाप आणि मुलगा या दोन्ही भूमिका करण्याची इच्छा त्यांनी मेहबूब खान यांना बोलून दाखवली होती.
मात्र मेहबूब खान यांना या चित्रपटातल्या नायिकेलाच महत्त्व द्यायचे होते. आणि त्यासाठी त्यांना कोणी मोठा प्रसिद्ध कलाकार नको होता. नवखे कलाकारच हवे होते.
जर दिलीपकुमारसारख्या प्रसिद्ध नावाजलेल्या कलाकाराला घेतले असते, तर लोकांचे सारे लक्ष त्याच्याकडेच लागले असते आणि चित्रपटातली मुख्य स्त्री-भूमिका झाकोळून गेली असती. म्हणून त्यांनी दिलीपकुमारला चक्क नकार दिला.
मात्र आपल्या आत्मवृत्तात, ‘द सब्सटॅन्स ऍन्ड दी शॅडो – ऍन ऑटोबायोग्राफी’ या पुस्तकात दिलीप कुमार यांनी लिहिलं होतं, की त्यांनी तोपर्यंत ‘मेला’, ‘बाबूल’ इत्यादी सारख्या सिनेमातून नर्गीस यांच्या प्रेमीची भूमिका केली असल्याने मदर इंडियात तिचा मुलगा म्हणून काम करणं शोभलं नसतं या कारणांनी त्यांनीच मेहबूब खान यांचा हा सिनेमा नाकारला.
मात्र नंतर मेहबूब खान यांनी दिलीपकुमारला घेऊन, आन, अमर, अंदाज सारखे एकाहून एक हीट सिनेमे निर्माण केले. या सर्वात दिलीपकुमारच्या भूमिका वैविध्यपूर्ण होत्या.
अमर मध्ये तर चक्क निगेटीव्ह रोल त्याला दिला होता.
मेहबूब यांच्या नावाचा डंका –
मदर इंडिया नंतर मेहबूब यांच्या नावाचा डंका विदेशातही गाजू लागला होता. एकदा त्यांना अमेरिकेतील हॉलिवूडचे आमंत्रण आले. तिथले फिल्मनिर्माते त्यांना भेटू इच्छित होते. त्यांच्यासोबत सिनेमा बनवू इच्छित होते.
परंतु शालेय शिक्षण न झालेल्या मेहबूब खान यांचे इंग्लिश यथातथाच होते. त्यामुळे ते अमेरिकेला जायला घाबरत होते. म्हणून त्यांनी दिलीपकुमार यांना आपल्या सोबत यायची विनंती केली. त्याप्रमाणे दिलीप कुमार त्यांच्यासोबत गेलेही.
मात्र तिथल्या मुलाखतीत तिथले निर्माते त्यांना प्रश्न विचारत आणि त्याची उत्तरे मात्र दिलीपकुमार देत असत. काही वेळांनी मेहबूब यांना वाटले की हे लोक आपल्याला गांभीर्याने घेत नाहीत आणि आपली चेष्टा करतायत असा त्यांचा समज झाला.
म्हणून ते तिथून रागवून बाहेर निघून गेले. आणि हॉलीवूडसाठी कधीही काम करायचं नाही हे त्यांनी तिथेच ठरवून टाकलं.
अशा या ग्रेट दिग्दर्शकाचा मृत्यू सन १९६४ मध्ये पं. जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्युच्या बरोबर एक दिवस आधी झाला. या ग्रेट दिग्दर्शकाला इन मराठीचा सलाम!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.