Site icon InMarathi

राज ठाकरेंच्या भाषणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ! : राजसाहेबांचं भाषण अन् माझी वणवण-भाग १

raaj-thakray-dr-babasaheb-ambedkar-marathipizza01

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

२००६ मध्ये मा. राज ठाकरेंनी शिवसेनेला अखेरचा “जय महाराष्ट्र” केला, आता पुढे काय करावे म्हणून जनतेशी संवाद साधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत होते. त्याच दरम्यान मराठवाड्यात प्रचंड दुष्काळ पडलेला होता. या दुष्काळाचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यासाठी “दुष्काळ हटवू, माणूस जगवू” ही थीम घेऊन पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते “श्री. अनिल शिदोरे” यांनी बीड ते वर्धा अशी जवळपास एक हजार किलोमीटरची अन दोन महिन्यांची पदयात्रा काढली होती.

 

स्रोत

शिदोरेसरांची पदयात्रा व मा. राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा दोन्ही एकाच वेळी सुरू होते. मराठवाड्यात हिंगोलीतून पदयात्री जात असताना मा. राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा व “पदयात्री” एकमेकांसमोरून गेले. मा. राज ठाकरेंनी गाड्या थांबवून, कुतुहलाने पदयात्रींची चौकशी केली व ते पुढे निघून गेले. पदयात्राही अशीच पुढे गेली. वर्ध्याच्या सेवाग्राम येथे संपन्न झाली.

राज साहेबांनी स्वत:चा नवा पक्ष स्थापन केला. मात्र ते हिंगोलीत भेटलेल्या पदयात्रींना अजिबात विसरले नव्हते. त्यांनी स्वत:हून दुष्काळ हटवू माणूस जगवू पदयात्रेतील प्रमुख पदयात्री श्री. अनिल शिदोरेंना मुंबईला बोलावून घेतले. पदयात्रेच्या अनुभवाविषयी, दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील जनतेच्या समस्यांविषयी जाणून घेतले.

पुढच्या पाच सहा महिन्यात श्री. अनिल शिदोरे व मा. राजसाहेबांच्या अनेकवेळा भेटी झाल्या. दोघांची मने, विचार जुळले. मा. राज साहेबांशी गप्पा मारता मारता श्री. अनिल शिदोरेंनी इंग्लंड मधील लेबर पार्टीच्या बॅक ऑफिस, थिंक टॅंकबद्दल सांगितले.

लेबर पार्टीचे सर्व पुढारी या बॅक ऑफिसमधून माहिती घेऊन जनतेपुढे जात, त्यामुळे लेबर पार्टीचे सर्व पुढारी माहितीच्या बाबतीत नेहमी अपडेट असत. लेबर पार्टीच्या बॅक ऑफीसची कल्पना मा.राजसाहेबांना खूप आवडली व त्यांनी आपल्या नव्या पक्षासाठी अशाच बॅक ऑफिसची स्थापना करायची कल्पना शिदोरेंना बोलून दाखवली व त्या बॅक ऑफिसची जबाबदारी घेण्याची श्री. अनिल शिदोरेंना विनंती केली. शिदोरेंसरांनी मा. राजसाहेबांकडून विचार करण्यासाठी वेळ मागून घेतला.

तोपर्यंत शिदोरेसरांचा प्रत्यक्ष राजकाराणाशी फारसा संबंध आला नव्हता. ते समाजकार्यात होते, पण त्यांनाही जाणवत होते की, समाजकारणापेक्षा, प्रत्यक्ष राजकारणात उतरल्यानेच आपल्याला लोकांची कामे जलद गतीने करता येतील. राजकारणाला नावं ठेवण्यापेक्षा चांगल्या माणसांनी राजकारणात उतरलं पाहिजे. अखेर त्यांनी मा. राजसाहेबांना आपला होकार कळवला. विविध विषयांवरचे विचारवंत, पत्रकार, राजकीय व्यक्तींसोबत मा. राजसाहेबांच्या अनेक बैठका झाल्या व मनसेच्या बॅक ऑफिसचे प्रारूप ठरले.

 

स्रोत

मनसे बॅक ऑफिसचे नाव ठरले- ”महाराष्ट्र सामाजिक नवनिर्माण अकादमी”! अकादमीची पूर्ण जबाबदारी मा.राजसाहेबांनी श्री.अनिल शिदोरेंच्या खांद्यावर टाकली होती. अकादमीत विविध विषयांवर अभ्यास करण्यासाठी माणसे निवडण्याचे सर्व अधिकार शिदोरेसरांना दिले. त्यांच्या निर्णयामध्ये अजिबात ढवळाढवळ करणार नाही याची खात्री दिली. शिदोरेसरांनी विविध विषयानुसार माणसांची निवड केली.

मी गेल्या दोन तीन वर्षांपासून शिदोरेसरांच्या “मैत्री” व “मेळघाट मित्र” या दोन सामाजिक संस्थांशी जोडलेला होतो. शिदोरेसरांच्या पदयात्रेतही दोन तीन दिवस सहभागी झालेलो होतो. एकदा असच कमला नेहरू पार्कातल्या बैठकीला गेलो असता शिदोरेसरांनी मनसे पक्षाच्या अकादमीविषयी मला व माझ्या मित्राला सांगितले.

मी राज्यशास्त्राचा, इतिहासाचा विद्यार्थी होतो, राजकीय माहिती संकलनासाठी मला, तर मित्राला अकादमीच्या प्रशासनात मदत करावी अशी इच्छा शिदोरेसरांनी व्यक्त केली. आम्हा दोघांनीही ताबडतोब होकार दिला. एकतर राजसाहेबांबद्दल प्रचंड आकर्षण होते आणि शिदोरेसरांचा शब्दही आम्ही टाळू शकत नव्हतो. सर्वात महत्वाचं “मानधन”ही चांगले मिळणार होते.

स्रोत

१९ मार्च २००७ रोजीगुढी पाडव्याच्या सुमुहुर्तावर पुण्यात शिवाजीनगर आरटीओ जवळ मनसेचे बॅक ऑफिस -“महाराष्ट्र सामाजिक नवनिर्माण अकादमीची” स्थापना झाली. मा. राजसाहेब व शर्मिलाताई दोघंही जोडीने अकादमीच्या उद्घाटनाला आले होते. शिदोरेसरांनी आमची सर्वांची ओळख करून दिली. मा.राजसाहेबांनी अकादमीच्या कार्यालयातच पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या अकादमी स्थापनेचा निर्णय व उद्देश जाहीर केला.

अकादमीचा मुख्य उद्देश “महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यु प्रिंट तयार करणे, राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयांच्या माहितीचे संकलन करणे व वेळोवेळी पक्षाच्या पदाधिकार्यांना आणि स्वत: राजसाहेबांना संकलीत माहिती उपलब्ध करून देणे.”

शिदोरेसरांनी अकादमीत आरोग्य, शिक्षण, आदिवासी- दलित, शेती, पाणी, ऊर्जा, मराठी भाषा, पर्यटन , पर्यावरण अशा विविध विषय़ांवर अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांची नियुक्ती केली होती. त्या सुमारास परप्रांतीय, मराठी वाद टोकाला गेला होता. मा. राजसाहेब आग्रहाने मराठी माणसाच्या हक्कांविषयी, रोजगाराविषयी बोलत होते. माझं काम मुख्यत: राजकीय माहिती संकलनाचे होते.

मी प्रामुख्याने याच विषयी माहिती गोळा करत असे. त्याकरिता पुणे मुंबईतल्या अनेक संस्थांना भेटी देत असे. सोबतच परप्रांतीयांविषयी अभ्यास केलेले अहवाल मिळवायचे, मुंबईच्या देवनार भागातल्या “टिस”, व “पीआयबी” सारख्या संस्थांत जाऊन तासनतास वाचन करायचे, नोट्स काढायच्या, माहितीचा अधिकार वापरून माहिती मिळवायची अशी कामे मी करायचो.

एकदा असाच मुंबईच्या “जनगणना” (सेंसस) कार्यालयात गेलो असता “महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, देशातील प्रत्येक राज्यातून आलेल्या नागरिकांची आकडेवारी” मिळाली. ही माहिती म्ह्णजे पक्षाच्या दृष्टीने “खजानाच” होता.

राजसाहेब जे परप्रांतीयांविषयी म्हणत होते ते आता आकडेवारीसह, शासकीय कागदपत्रासह बोलता येणार होते. मी मिळवलेल्या या माहितीचा पुढे मा. राजसाहेबांनी अनेक भाषणांत, मुलाखतींत, पत्रकार परिषदांत उपयोग केला.

 

स्रोत

मा. राजसाहेब जेव्हा मी मिळवलेली माहिती स्टेजवरून सभेत मांडायचे, टाळ्या घ्यायचे तेव्हा त्या टाळ्यांनी मला खूप “आनंद” व्हायचा, कामाचं “समाधान” मिळायचं.

महाराष्ट्रात खास करून मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर शहारांमध्ये मराठी मुलांच्या रोजगाराच्या प्रश्नाची आणि परप्रांतीयांच्या प्रश्नाची धार चांगलीच “तेज” झाली होती. अनेक पत्रकार, राजकीय विरोधक राजसाहेबांवर टीका करत होते. राज ठाकरे घटनाविरोधी आहेत, देश तोडायला निघाले आहे, देशात सर्वांना कुठेही रहायचा अधिकार आहे…वगेरे वगेरे बोलत होते.

वर्तमानपत्रातून, हिंदी चॅनेल्समधून राजसाहेबांच्या विरोधात बातम्यांचा “पूर” आला होता. या सर्वांना उत्तर देण्यासाठी राजसाहेबांनी, आयुष्यातील सर्वात मोठी सभा मे महिन्यात “शिवतीर्थावर” आयोजली होती.

ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर हे राज साहेबांचे जवळचे मित्र व आमच्या अकादमीचे विश्वस्त होते. वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत. राजू परुळेकरांचा राजकारणाचा व्यासंग दांडगा होता. वाचन अफाट होतं.

एकदा असंच आमच्याशी बोलताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “भाषिक राज्यपुनर्रचना मिमांसा” या पुस्तकाबद्दल सांगितले. पुस्तकात डॉ. बाबासाहेबांनी “भाषावार प्रांतरचना कशी “सदोष” होती, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा केवळ एका मताने कशी झाली?” याबाबत सखोल विवेचन केले आहे.

 

स्रोत

परुळेकरसर म्ह्णाले की जर आपल्याला हे पुस्तक मिळाले तर राजसाहेबांवर होणाऱ्या  टीकेला आपण चांगलं उत्तर देऊ शकू. हे पुस्तक मिळवण्याची जबाबदारी शिदोरे सरांनी माझ्यावर टाकली. शिवतीर्थावरील सभेला चार-पाच दिवस शिल्लक होते आणि जे पुस्तक राजू परुळेकरांसारख्या ज्येष्ठ पत्रकाराला मिळाले नाही ते पुस्तक शोधायची, काहीशी अवघड कामगिरी माझ्यावर येऊन पडली होती. मी व माझा सहकारी पुस्तक शोध मोहिमेला लागलो.

सर्वप्रथम पुण्याच्या शासकीय ग्रंथालयात गेलो. तिथे ते पुस्तक मिळाले नाही, पण डॉ. बाबासाहेबांच्या “समग्र साहित्याबद्दल” माहिती मिळाली. कदाचित त्या समग्र साहित्यात “भाषिक पुनर्रचना मिमांसा” मिळेल असे शासकीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल म्हणाले. बाबासाहेबांच्या समग्र साहित्याचे दहा खंड होते. ते शासकीय प्रकाशन (फोटो झिंको) कार्यालयातून विकत आणले.

मी व माझ्या सहकाऱ्याने सलग दहा तास अकादमीत बसून ते दहा खंड चाळले, पण त्यामध्ये आम्हाला “भाषिक राज्यपुनर्रचना मिमांसा” पुस्तक काही मिळाले नाही. अत्यंत निराश होऊन रात्री तीन वाजता घरी गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी प्रथम पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात गेलो. ग्रंथपाल दोन तीन तास ते पुस्तक शोधत होते, पण शेवटी अत्यंत खेदाने त्यांनी नाही मिळत म्हणून सांगितले. मग फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथपालांना भेटलो. त्यांनीही खूप मदत केली, पण तिथेही पुस्तक मिळालं नाही. मग त्यांनी आम्हाला मुंबईला “सिद्धार्थ महाविद्यालयात” नक्की मिळेल सांगितले.

सभा दोन दिवसावर आली होती. शिदोरे सर सारखे पुस्तक मिळालं का विचारत होते. पुस्तक मिळवण्याचा खूपच दबाव आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी व माझा सहकारी मुंबईला जाण्यासाठी निघालो. अकरा वाजता फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयात पोचलो.

 

स्रोत

सिद्धार्थ महाविद्यालय म्हणजे पूर्वीचे बाबासाहेबांचे घरच होते. त्यांची ग्रंथ संपदा प्रचंड होती. आम्ही महाविद्यालयात गेलो तर ग्रंथपाल अजून आले नव्हते. तासाभराने या म्हणाले. उद्या सभा आहे आणि अजून आपल्याला पुस्तक मिळाले नाही याची मनाला खंत होती. गेल्या तीन चार दिवसांपासून आम्ही तहान भूक विसरून या पुस्तकामागे फिरत होतो. त्या कष्टाचे चीज व्हावे एवढी एकच अपेक्षा होती.

टॅक्सीने गेटवे वर जाऊन थोड्यावेळाने परत महाविद्यालयात आलो. ग्रंथपाल आले होते. त्यादिवशी ग्रंथपाल जरा वैतागलेलेच वाटले. मी त्यांना बाबासाहेबांच्या “भाषिक राज्यपुनर्रचना मिमांसा” या पुस्तकाबद्दल विचारलं, तर वैतागून त्यांनी मला विचारलं,

कशाला पाहिजे पुस्तक?

मी ही गेल्या तीन चार दिवसाच्या दगदगीने वैतागलो होतो. म्हणलं,

जेवायला पाहिजे पुस्तक! हा काही प्रश्न आहे का तुमचा? अहो पुस्तक कशाला लागतं? वाचायलाच ना..?

ग्रंथपालाचा दुसरा प्रश्न,

काय करणार वाचून?

मी म्हणलं,

बाबासाहेबांनी सांगितले आहे ना वाचा, शिका, संघटीत व्हा. संघर्ष करा, तर आम्हाला संघटन बांधायचं आहे. त्यासाठी प्रथम वाचलं पाहिजे म्हणून पुस्तक हवंय.

माझ्या उत्तरावरून मी ही वैतागलो आहे हे त्या ग्रंथपालाला जाणवले. मग जरा शांत होत म्हणाला,

पुस्तकाचे नाव ऐकताच जरा मी गोंधळात पडलो. खूपच दुर्मीळ पुस्तक आहे. आजपर्यंतच्या माझ्या नोकरीच्या कालखंडात हे पुस्तक कुणीच मागितले नाही. मागणं सोडा, कुणालाही या पुस्तकाचे नावही माहिती नसेल, म्ह्णून जरा चौकशी केली. थांबा इथेच, पाहतो.

असं म्हणून गेला तो जवळपास एक तासाने हातात पुस्तक घेऊन आला. पुस्तक पाहून आम्ही जाम खुश झालो होतो, पण चेहऱ्यावर आनंद न दाखवता पुस्तक हातात घेतले. आम्हाला जे हवे तेच पुस्तक होते. ग्रंथपाल म्हणाला

तुम्ही महाविद्यालयाचे विद्यार्थी नाहीत, तेव्हा हे पुस्तक इथेच वाचावे लागेल सोबत नेता येणार नाही.

आता मात्र मोठा प्रश्न होता. जुनं एक गाणं आठवलं होतं “सागर इतना मेरे पास है फिर भी मन मे एक प्यास है” आता काय करायचं? मी म्हणलं,

ठीक आहे. द्या ते पुस्तक वाचायला, आम्ही इथेच तुमच्या समोर वाचतो.

पुस्तक घेतले. वाचायला लागलो. नोट्स काढल्या, तर परुळेकरसरांनी सांगितल्याप्रमाणे खरंच या पुस्तकातील संदर्भ राजसाहेबांना खूप उपयूक्त होणार होते. काही करून या पुस्तकाची फोटोकॉपी काढली पाहिजे. माझ्या सहकाऱ्याला म्हणलं की,

तू बाहेर जा व सर्वात जवळचे झेरॉक्स दुकान पाहून ये आणि त्याला सांग की दोन पुस्तकांच्या फोटोकॉपी अर्जंट हव्या आहेत. तिप्पट पैसे देतो.

मी सांगितल्याप्रमाणे माझा सहकारी बाहेर जाऊन “रेकी” करून आला. झेरॉक्सचे दुकान अगदीच बाजूला आहे म्हणाला. मग त्या ग्रंथपालाकडे जाऊन आर्जव, विनंती केली की, आम्हाला या पुस्तकाची झेरॉक्स काढायची परवानगी द्या. अपेक्षेप्रमाणे तसं करता येणार नाही म्हणाला. आता काय करावे?

विचार येत होता, बाबासाहेब म्हणतात शिका…वाचा…संघटीत व्हा…संघर्ष करा…! अन हा ग्रंथपाल तर आम्हाला पुस्तकाची झेरॉक्स काढायची परवानगी देत नव्हता. राज साहेब मराठी मुलांच्या रोजगारासाठी एवढा आटापीटा करताहेत. त्यांचे मुद्दे जनतेला पटवून देण्यासाठी या पुस्तकाची आवश्यकता आहे.

शेवटी मी ग्रंथपालाच्या नकळत ते पुस्तक सहकाऱ्याला दिले व पटकन झेरॉक्स काढून आणायला पाठवलं. मी ग्रंथपालासमोर वेगळेच पुस्तक घेऊन वाचत बसलो. छातीत “धडधड” होत होती. अंगाला “घाम” फुटायला लागला होता. पकडले गेलो तर काही खरं नाही हा सारखा विचार येत होता. अर्धातास झाला तरी माझा सहकारी आला नव्हता. ग्रंथपालाने एकदा मला विचारलेही,

तुमचा मित्र कुठे गेला?

मी म्हणालो,

इथे जवळच त्याचे नातेवाईक काम करतात त्यांना भेटायला गेला आहे.

तेवढ्यात धापा टाकत टाकत मित्र आला. डोळ्यानेच खूण केली- “मोहीम फत्ते”! परत त्या ग्रंथपालाची नजर चुकवत मूळ पुस्तक समोर ठेवले. पाच दहा मिनिटे नोट्स काढल्याचं नाटक केलं आणि निघालो. मूळ पुस्तक ग्रंथपालाला परत केले. महाविद्यालयाबाहेर अक्षरश: नाचतच आलो.

कामगिरी पार पाडली होती. उद्याच्या सभेत राजसाहेबांना, बाबासाहेबांचे भाषावार प्रांतरचना कशी झाली? त्यासंबंधीचे विचार महाराष्ट्रासमोर मांडता येणार होते…!

शिदोरेसरांना फोन करून पुस्तक मिळाल्याची बातमी दिली. सरांनी दोघांचे अभिनंदन केले, दादरला राजसाहेबांच्या घरी पुस्तक देऊन या म्हणाले. मग आम्ही दादरला गेलो. साहेबांच्या घरी जाणार तोच शिदोरे सरांचा फोन आला की

“पुस्तक घरी देण्यापेक्षा पुण्यालाच घेऊन या, मी उद्या सकाळी साहेबांच्या घरी जाणारच आहे तेव्हा मीच माझ्या हाताने देतो”.

चालेल म्हणालो व पुण्याला यायला शिवनेरीत बसलो.

३ मे २००८- शिवतीर्थावरील राजसाहेबांची सभा जोरदार झाली. राजसाहेबांनी आम्ही मिळवलेल्या बाबासाहेबांच्या “भाषिक पुनर्रचना मिमांसा” पुस्तकातील उतारेच्या उतारे वाचून दखवले. वाचल्यानंतर जनतेच्या टाळ्या ऐकून, आमच्या गेल्या पाच दिवसांच्या वणवणीचं चीज झाल्याचं समाधान होते.

राजसाहेबांच्या अमोघ वक्तृत्वाला, अकादमीच्या माहितीची जोड मिळाली होती, त्यातून ही टाळ्यांची निर्मिती होत होती.

 

स्रोत

मा. राजसाहेबांना पडलेल्या टाळ्यांची “नशा” मलाच चढायला लागली होती. ही “नशाच” अजून चांगलं काम करण्याची “उर्मी” देत होती.

{ ह्या लेखाचा पुढील भाग नक्की वाचा: “राज ठाकरे देश तोडायला निघालेत”: आरोपाला त्यांच्याच ‘भाषेत’ उत्तर (राजसाहेबांचं भाषण अन् माझी वणवण भाग २) }

राज साहेबांचे शिवतीर्थावरील 3 मे 2008 भाषणाची ही लिंक आहे.

या भाषणात राजसाहेब (36 मिनीटापासून पुढे पाहावे.) बाबासाहेबांच्या पुस्तकातील उतारे वाचताना दिसतील.

 

 

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version