आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
बॉलीवूड सिनेमा ने भारताला काय दिलं ? असा जर का कुठे प्रश्न उपस्थित झाला तर ‘प्रेम करण्याची भावना’ हे एक उत्तर असू शकतं.
आपल्याकडचे गाणे, प्रेम कथा, व्हिलन, शेवटी एकत्र येणारे हिरो हिरोईन या फॉर्म्युला वर आपण एक काळ जगलो आहोत.
पडद्यावर घडणाऱ्या घटनांना प्रत्यक्ष मानणारी किती तरी लोक भारतात आहेत म्हणून बॉलीवूड जगातील एक मोठी इंडस्ट्री आहे.
एक गोष्ट मात्र साम्य आहे की, जश्या अडचणी बॉलीवूड च्या नायक आणि नायिकांना त्यांचं प्रेम मिळवण्यात पडद्यावर येतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
तश्याच अडचणींना त्यांना पत्यक्ष आयुष्यात सुद्धा तोंड द्यावं लागलं आहे असा आपला इतिहास सांगतो.
असा पण एक अनुभव आहे की पडद्यावर प्रचंड लोकप्रिय आणि लोकांनी पसंत केलेल्या जोडींना प्रत्यक्ष आयुष्यात मात्र इच्छा असूनही कोणत्या न कोणत्या कारणामुळे लग्न करता आलेलं नाहीये.
बॉलीवूड च्या अश्या दहा जोड्यांबद्दल आम्ही घेतलेला हा एक आढावा:
१. देव आनंद – सुरैय्या :
सर्वात पहिली आणि तितकीच ग्रेट लव्हस्टोरी आहे देव आनंद आणि सुरैय्या यांची. देव आनंद यांनी जेव्हा सिनेमात काम करणं सुरू केलं तेव्हा सुरैय्या ह्या ऑलरेडी स्टार होत्या.
देव आनंद ह्यांना सुरैय्या यांचं काम आवडत होतं आणि म्हणून ते त्यांना नेहमी कॉम्प्लिमेंट देत असत. काही दिवसांनी सुरैय्या सुद्धा देव आनंद यांना कॉम्प्लिमेंट देऊ लागल्या.
काही दिवसातच ही जोडी पडद्यावर एकत्र आली आणि त्यांनी सोबत हे ७ सिनेमे केले : विद्या (१९४८), जीत (१९४९), शायर (१९४९), अफसर (१९५०), निली (१९५०), दो सितारे (१९५१) आणि सनम (१९५१).
पहिले तीन सिनेमे होईपर्यंत कोणालाही या दोघांच्या लव्हस्टोरी बद्दल शंका आली नाही. पण, १९५१ नंतर सुरैय्या यांचा परिवार त्यांच्या करिअर ची दिशा ठरवू लागला.
अफसर या सिनेमाच्या शुटींग च्या दरम्यान त्यांची लव्हस्टोरी सर्वांना कळली आणि त्यांना सुरैय्या यांच्या घरून होणारा विरोध अधिकच तीव्र होत गेला.
या लव्हस्टोरी ला व्हिलन सुरैय्या यांच्या आजी होत्या. त्या प्रत्येक वेळी शुटींग च्या ठिकाणी जात असत आणि व्यत्यय आणत असत.
एकदा तर त्यांनी एक साधा सीन होता ज्यात देव आनंद यांना सुरैय्या ह्यांच्या भुवयावर किस करायचं होतं. तो सुद्धा सुरैय्या यांच्या आजीने रद्द करायला लावला.
प्रत्येक वेळी सुरैय्या यांना देव आनंद भेटायला आले की कोणीतरी तिथे असेलच याची खात्री घेतल्या जायची. हा विरोध फक्त दोन कारणांमुळे होता.
पहिलं म्हणजे दोघांचे धर्म वेगवेगळे होते. आणि दुसरं म्हणजे सुरैय्या ह्या त्यांच्या मोठया परिवारातील एकमेव कमावणाऱ्या व्यक्ती होत्या आणि त्यांचं लग्न होऊ नये अशी त्यांच्या आजीची इच्छा होती.
या दोघांनी शेवटचं काम केलं ते ‘दो सितारे’ (१९५१) या सिनेमा मध्ये.
या सिनेमा च्या शुटिंग च्या नंतर देव आनंद आणि सुरैय्या हे शेवटचं भेटले ते सुद्धा देव आनंद यांचे भाऊ चेतन आनंद यांच्या उपस्थितीत. या घटनेने दोघेही खूप व्यथित झाले होते.
सुरैय्या यांनी देव आनंद यांनी दिलेली अंगठी समुद्रात टाकून दिली. देव आनंद यांनी काही वर्षांनी लग्न केलं पण सुरैय्या यांनी शेवटपर्यंत लग्न केलं नाही.
२. मधुबाला – दिलीपकुमार :
मधुबाला आणि दिलीपकुमार ह्यांनी ४ सिनेमे एकत्र केले. १९५१ मधील तराना ह्या त्यांचा पहिला सिनेमा होता.
ज्वार भाटा या सिनेमाच्या शूटिंग च्या वेळी मधुबाला यांची नजर पहिल्यांदा दिलीपकुमार यांच्यावर पडली. सात वर्षांनी तराना च्या सेट वर दोघे पहिल्यांदा एकमेकांच्या समोर आले.
तेव्हा मधुबाला ह्या अठरा वर्षांच्या होत्या. या सिनेमाच्या शुटिंग च्या दरम्यान मधुबाला यांनी एक नोट लिहिली.
आणि त्यांच्या हेअरड्रेसर ला ती नोट आणि एक लाल गुलाबाचं फुल घेऊन दिलीपकुमार ला देण्यासाठी पाठवलं.
दिलीपकुमार यांना ही नोट बघून खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांनी ते फुल आणि पर्यायाने मधुबाला ह्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला.
१९५२ मध्ये या दोघांनी संगदिल ह्या सिनेमात एकत्र काम केलं आणि तोपर्यंत दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते.
मुघल-ए-आजम ची शुटिंग सुरू असताना हे दोघं प्रेमात होते पण त्या शुटिंग च्या दरम्यान त्यांचं ब्रेकअप सुद्धा झालं. ह्या सिनेमाच शुटिंग दहा वर्ष सुरू होती.
या प्रेमकहाणी चे व्हिलन हे मधुबालाचे वडील अताउल्लाह खान हे होते. दिलीपकुमार ह्यांनी नुकत्याच लिहिलेल्या त्यांच्या आत्मचरित्रात हे लिहिलं आहे की,
अताउल्लाह खान यांना दिलीपकुमार यांना घेऊन एक सिनेमा तयार करायचा होता. पण, दिलीपकुमार यांनी कोणत्या तरी कारणामुळे नकार कळवला होता.
या गोष्टीमुळे मधुबाला यांचे वडील या दोघांच्या लग्नाच्या विरोधात होते. मधुबाला या अतिशय आज्ञाधारक होत्या आणि त्यांना वडिलांच्या विरोधात जाऊन काहीही करायची इच्छा नव्हती.
काही वर्ष त्यांचं प्रेमप्रकरण हे या संघर्षात सुद्धा सुरू होतं. १९५७ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं जेव्हा मधुबाला यांनी नया दौर या सिनेमातून वडिलांच्या सांगण्यावरून काढता पाय घेतला.
३. राज कपूर आणि नर्गिस :
राज कपूर हे त्या काळात शो मॅन या नावाने बॉलीवूड मध्ये प्रसिद्ध होते. नर्गिस आणि राज कपूर यांनी १६ सिनेमात एकत्र काम केलं. ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली.
या १६ सिनेमांपैकी ६ सिनेमे हे RK बॅनर खाली तयार झाले होते. नर्गिस या राज कपूर यांना भेटल्या तेव्हा त्या १९ वर्षांच्या होत्या.
त्यांची पहिली भेट ही अंदाज सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी १९४९ मध्ये झाली. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा राज कपूर हे आधीच विवाहित होते आणि त्यांना तीन मुलं होते.
नर्गिस यांनी राज कपूर यांच्याशी लग्न करण्यासाठी कायदेशीर चौकशी केली होती.
पण, धर्म वेगळा असल्याने आणि नर्गिस यांच्या भाऊ आणि आई यांच्या विरोधामुळे ही लव्हस्टोरी पुढे सरकलीच नाही. १९५६ मध्ये या दोघांनी चोरी चोरी हा शेवटचा सिनेमा मध्ये एकत्र काम केलं.
त्यानंतर नर्गिस काही काळ डिप्रेशन मध्ये गेल्या होत्या. १९५८ मध्ये मदर इंडिया च्या शुटिंग च्या दरम्यान नर्गिस या सुनील दत्त यांच्या प्रेमात पडल्या आणि त्या दोघांनी लग्न केलं.
या दोघांच्या लग्नाचा राज कपूर यांना इतका धक्का बसला होता की त्यांनी काही काळ स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलं होतं आणि त्यांचे अश्रू थांबतच नव्हते.
४. गुरू दत्त – वहिदा रहमान :
गुरू दत्त हे यशस्वी दिग्दर्शक, निर्माता आणि कलाकार सुद्धा होते. वहिदा रहेमान यांना गुरुदत्त यांनी C. I. D. या १९५६ मध्ये रिलीज झालेल्या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करण्याचा चान्स दिला.
वहिदा रहमान यांच्यासोबत भेट झाली तेव्हा गुरुदत्त यांचं गायिका गीता रॉय यांच्यासोबत लग्न झालेलं होतं. प्यासा या सिनेमाच्या शुटिंग च्या दरम्यान या दोघांमधील जवळीक वाढली.
काही लोकांच्या म्हणण्यानुसार वहिदा रहमान यांनी गुरुदत्त यांना लग्नासाठी मागणी घातली. तर काहींच्या मते, गीता रॉय यांच्या संशयी वृत्तीमुळे गुरुदत्त हे वहिदा रहेमान यांच्या प्रेमात पडले.
गुरुदत्त आणि वहिदा रहेमान ही जोडी प्रेक्षकांना ६ सिनेमात दिसली. काहींच्या मते १९५९ मध्ये रिलीज झालेला सिनेमा कागज के फुल हा गुरुदत्त यांची स्वतःची स्टोरी होती.
१९६२ मध्ये रिलीज झालेला साहेब बिवी और गुलाम हा या दोघांचा शेवटचा सिनेमा ठरला.
अब्रार अलवि यांच्या ‘Memories of Guru Dutt’ या पुस्तकानुसार वहिदा रहमान यांना या प्रेमप्रकरणामुळे बॉलीवूड चा कुटील चेहरा बघावा लागला.
गुरुदत्त हे त्यांची पत्नी आणि वहिदा रहेमान यांच्यामध्ये शेवटपर्यंत कोणती एक निवड करू शकलेच नाही.
वहिदा रहेमान यांचा एक नातेवाईक रौफ यांच्या सांगण्यानुसार गुरुदत्त हे वहिदा जी सोबत लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म सुद्धा स्वीकारायला तयार झाले होते.
पण, ऐनवेळी त्यांनी घुमजाव केला आणि वहिदा रहेमान यांना फसवलं. या दरम्यान त्यांची पत्नी गीता दत्त या सुद्धा त्यांना सोडून निघून गेल्या.
या फसवणुकीतून बाहेर पडण्यासाठी सतत काम करत राहण्याचा पर्याय वहिदा रहमान यांनी निवडला. गुरुदत्त आणि गीता दत्त मात्र दोघेही दारू पिण्याच्या आहारी गेले आणि १९६४ मध्ये गुरूदत्त यांचा मृत्यू झाला.
५. राजेश खन्ना – अंजू महेंद्रु :
ही लव्हस्टोरी राजेश खन्ना सुपरस्टार होण्याच्या आधीची आहे. अंजू महेंद्रु हे राजेश खन्ना यांचं पहिलं प्रेम होतं. दोघांनीही त्यांचा बॉलीवूड चा संघर्ष सोबत सुरू केला.
आणि दोघेही ६० च्या दशकात सिनेजगतात त्यांचे पाय रोवताना एकमेकांना भेटले. अंजू महेंद्रु या मॉडेल आणि कलाकार म्हणून नावारूपास येत होत्या.
राजेश खन्ना हे युनायटेड फिल्म्स प्रोड्युसर असोसिएशन कडून हिरो म्हणून निवडले गेले होते. करिअर च्या सुरुवातीच्या दिवसात अंजू महेंद्रु यांनी राजेश खन्ना यांना खूप साथ दिली.
राजेश खन्ना सुद्धा आपली पूर्ण कमाई त्यांच्यासोबत शेयर करत होते.
एकदा का राजेश खन्ना हे सुपरस्टार झाले की, मग त्यांनी अंजू यांना त्यांच्या वाटेतून बाजूला करायचा प्रयत्न सुरू केला होता.
पण, तरीही हे दोघे मुंबई मध्ये लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये सात वर्ष सोबत राहत होते. १९६९ मध्ये रिलीज झालेल्या आराधना सिनेमा नंतर राजेश खन्ना यांनी मागे बघितलंच नाही.
या अपार यशानंतर दोघांमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली. एका मुलाखतीत अंजू महेंद्रु यांनी हे सांगितलं होतं की,
“राजेश खन्ना हे फार जुन्या विचारांचे होते. तरीही ते कायम मॉडर्न मुलींकडे आकर्षित व्हायचे. एकमेकांना समजण्यात होणारा गोंधळ हा दोघांचं नातं न टिकण्यासाठी कारणीभुत होता.
मी जर का स्कर्ट घातला तर ते मला थोबाडीत मारून विचारायचे की साडी का नाही नेसलीस? आणि साडी नेसल्यावर म्हणायचे की तू का एक टिपिकल भारतीय नारीचं रूप धारण करायचा प्रयत्न करत आहेस ?”
या अश्याच वादांमुळे त्या दोघांनी त्यांचं हे नातं संपवण्याचं ठरवलं. असं ही बोललं जातं की, या गोष्टीचा बदला घेण्यासाठी राजेश खन्ना यांनी अंजू महेंद्रु यांचं पूर्ण करिअर खराब केलं.
पूर्ण इंडस्ट्री ने या ब्रेकअप साठी राजेश खन्ना यांना दोष दिला आणि अंजू महेंद्रु यांची साथ दिली.
एक घटना अशी सुद्धा घडली होती की जेव्हा राजेश खन्ना यांनी डिंपल कापडिया यांच्यासोबत लग्न केलं.
तेव्हा त्यांनी त्यांच्या लग्नाची वरात मुद्दाम अंजू महेंद्रु यांच्या घरासमोरून नेऊन लग्नाच्या ठिकाणी नेली होती. एका मासिकात असं ही लिहून आलं होतं की, राजेश खन्ना हे पडद्यावर परफेक्ट प्रेमी होते.
पण, प्रत्यक्ष आयुष्यात त्यांनी त्या व्यक्तीची साथ दिली नाही जिच्यावर त्यांनी प्रेम केलं (डिंपल कापडिया) आणि त्या व्यक्तीची सुद्धा साथ सोडली जिने त्यांच्यावर प्रेम केलं (अंजू महेंद्रु).
हे ही वाचा –
६. अमिताभ बच्चन – रेखा :
हे आर्टिकल या जोडीचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.
हे प्रकरण सर्वात जास्त चर्चिलं गेलं होतं तेव्हा जेव्हा की अमिताभ किंवा रेखा यांच्यापैकी कोणीही त्यांच्या प्रेमाची कबुली कधीच दिली नव्हती.
१९७६ मध्ये रिलीज झालेल्या दो अंजाने या सिनेमा पासून ही लव्हस्टोरी सुरू झाली असे बोललं जातं. त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या सुरुवातीच्या काळात हे दोघं रेखा च्या मित्राच्या एका बंगलो मध्ये भेटायचे.
यावेळी अमिताभ यांचं लग्न आधीच झालेलं होतं. हे प्रकरण अगदी शांततेत आणि व्यवस्थित सुरू होतं.
१९७८ मध्ये रिलीज झालेल्या गंगा की सौगंध या सिनेमाच्या शुटिंग च्या दरम्यान यांनी पहिल्यांदा एका सह कलाकारावर खूप संताप व्यक्त केला कारण की तो रेखा ला व्यवस्थित वागणूक देत नव्हता.
तेव्हा हे प्रकरण लोकांच्या लक्षात आलं. सिलसिला च्या शुटिंग च्या वेळी अमिताभ आणि रेखा हे दोघंही एकमेकांशी बोलत नव्हते.
रेखा ला अमिताभ यांच्या आयुष्यात पत्नी म्हणून स्थान हवं होतं आणि अमिताभ हे रेखा साठी जया बच्चन यांना सोडायला कदापि तयार नव्हते.
त्यामुळे हा प्रेमाचा सिलसिला सुद्धा ‘सिलसिला’ सिनेमाच्या शुटिंग नंतर समाप्त झाला.
७. सलमान खान – ऐश्वर्या रॉय :
१९९४ मध्ये मिस वर्ल्ड झाल्यानंतर ऐश्वर्या रॉय ने तिच्या बॉलीवूड करिअर ला सुरुवात तर केली पण तिला सुरुवातीला खूप यश मिळालं नव्हतं.
१९९९ मध्ये रिलीज झालेला हम दिल दे चुके सनम हा तिच्या करिअर मधील सर्वात महत्वाचा सिनेमा ठरला आणि याच दरम्यान तिचं आणि सलमान खान यांचं प्रेमप्रकरण जगासमोर आलं.
त्या आधी दोन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होती. एका मुलाखतीत सलमान ने म्हंटलं होतं की,
“ऐश्वर्या रॉय मध्ये असलेल्या पारंपारिक विचारसरणी मुळेच ती इतका मोठा किताब जिंकू शकली आणि माझ्या मनात एक स्थान निर्माण करू शकली.
माझं तिच्यावर प्रेम आहे या कारणाने सुद्धा की ती तिच्या पालकांचा खूप आदर करते. ती एक पक्की आदर्श भारतीय मुलगी आहे “.
ऐश्वर्या रॉय च्या आई वडिलांनी हे नातं कधीच मान्य केलं नाही. पण, त्यांच्या ब्रेकअप चं कारण हे सलमान खान तिच्याशी एकनिष्ठ नव्हता हे दिलं जातं.
त्या आधी सलमान खान चं संगीता बीजलानी आणि सोमी अली यांच्याशी ब्रेकअप झालेलं होतं. ऐश्वर्या रॉय सोबतचं ब्रेकअप सलमान खान ला काही केल्या मान्य होत नव्हतं.
ह्याच कारणामुळे सलमान खान ने चलते चलते या सिनेमा च्या शुटिंग च्या सेट वर गोंधळ केला होता. अखेर २००२ मध्ये या दोघांचं ब्रेकअप झालं आणि ते आपापल्या आयुष्यात पुढे सरकले.
८. अभिषेक बच्चन – करिश्मा कपूर :
अभिषेक बच्चन ने सिनेसृष्टी मध्ये पदार्पण करायच्या आधीपासून हे प्रेमप्रकरण सुरू होतं. हे प्रकरण सुरू झालं तेव्हा करिश्मा कपूर ही स्टार झालेली होती.
१९९१ मध्ये करिश्मा कपूर ने पहिला सिनेमा केला होता; तर अभिषेक बच्चन ने २००० मध्ये करीना कपूर सोबत Refugee या सिनेमाने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.
१९९७ मध्ये झालेल्या श्वेता बच्चन हिच्या लग्न समारंभात हे दोघेही त्यांच्या नात्याबद्दल पहिल्यांदा सिरीयस झाले होते.
११ ऑक्टोबर २००२ या अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच पार्टीत या दोघांचा साखरपुडा झाला होता. पण काही महिन्यातच ही एंगेजमेंट रद्द झाल्याचं घोषित करण्यात आलं.
ही पहिली अशी लव्हस्टोरी आहे ज्याचं कोणतंही ठोस कारण कधीच जनतेच्या समोर येऊ दिलं गेलं नाही.
९. शाहीद कपूर – करीना कपूर :
करीना कपूर ही नेहमीच शाहीद कपूर बद्दल तिच्या मनात असलेल्या भावना जाहीर करत असायची. करीना कपूर ने या प्रेम प्रकरणात पुढाकार घेतला होता.
२००४ मध्ये हे प्रकरण प्रत्येक मासिकात चर्चिलं गेलं होतं. त्यावेळी हे दोघंही त्यांच्या प्रेमाची कबुली जाहीरपणे देत होती. शाहीद कपूर ने त्याचा पहिला सिनेमा २००४ मध्ये इश्क विश्क हा केला होता.
त्यामध्ये त्याची हिरोईन अमृता राव ही होती. २००४ मध्ये शुटिंग ची सुरुवात झालेल्या फिदा या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं आणि तेव्हाच त्यांचं प्रेमप्रकरण खूप गाजलं होतं.
२००७ मध्ये रिलीज झालेल्या जब वी मेट च्या शुटिंग च्या दरम्यान दोघांमध्ये फुट पडली.
तो सिनेमा लोकांना खूप आवडला होता पण तोपर्यंत करीना कपूर ही लडाख मध्ये टशन सिनेमाच्या शुटिंग च्या दरम्यान सैफ अली खान च्या प्रेमात पडली होती.
त्याच दरम्यान शाहीद कपूर आणि विद्या बालन यांचं सुदधा नाव जोडलं गेलं होतं पण ती फक्त एक अफवा होती.
१०. हृतिक रोशन – कंगना राणावत :
हे प्रेम प्रकरण फुलण्या अगोदरच त्यांच्यात ब्रेकअप झालं. ह्याची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा २०११ मध्ये कंगना राणावत ला हृतिक रोशन च्या बहिणीच्या वाढदिवसाच्या पार्टी मध्ये बोलावण्यात आलं होतं.
त्या भेटी नंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. हृतिक रोशन त्यावेळी सुजान खान सोबत विवाहित होता पण त्यांच्या लग्नात काहीतरी कुरबुरी सुरू झालेल्या होत्या.
काही दिवसातच हृतिक आणि सुजान यांनी घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं. या घोषणे नंतर कंगना आणि हृतिक दोघेही सोबत होते.
त्यांनी २०१३ मध्ये रिलीज झालेल्या क्रिश ३ मध्ये सोबत काम केलं होतं. ह्रिथिक रोशन ने कंगना राणावत ला लग्नाची मागणी सुद्धा घातली होती.
ते दोघंही २०४ च्या शेवटपर्यंत सोबत होते. पण, काहीतरी गडबड झाली आणि त्यांच्या या प्रेम प्रकरणाचं रूपांतर एका कायदेशीर लढाई मध्ये रूपांतर झालं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.