कोरोना: भारतीयांनी चीन व भारत, दोन्ही देशांबाबत “ह्या” मोठ्या प्रश्नांवर उत्तरं शोधणं आवश्यक आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक: प्रसाद पवार
—
कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे फक्त भारत नव्हे तर जगातल्या बलाढ्य अशाअर्थव्यवस्थांनीसुद्धा गुडघे टेकले आहेत.
या महामारीवर नियंत्रण मिळवणे अवघड होत असतानाच अर्थव्यवस्था कोलमडण्याचे संकट सुद्धा उभे ठाकले आहे.
याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संपूर्णहाहाकारासाठी चीन ला दोषी ठरवले असून चीनच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा वारंवार पुनरुच्चार केला आहे.
फक्त अमेरिकाच नव्हे तर जगभरातून चीनने हे जाणूनबुजून केल्याच्या चर्चा झडत आहेत!
कोविड-१९ हे जैविक हत्यार आहे आणि वूहान येथील विषाणू प्रयोगशाळेतून याचे ठरवून संक्रमण करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
अर्थात अजून हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले नसले तरी चीनची एकंदर वागणूक आणि जागतिकआरोग्य संस्थेला हा धोका ओळखण्यात आलेले अपयश यावरून अनेक शंका उपस्थित होण्याला वाव आहे.
वरकरणी चीनने लपवलेल्या माहितीवरून तर चीन दोषी आहेच याच दिशेने अनेक घटना घडलेल्या आहेत.
सर्वसामान्य भारतीय मानसिकता आणि विचारधारा जी ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्वावर आधारलेली आहे.
त्यात आपल्याच देशातील नागरिकांवर कोण अत्याचार कसा करेल असा भाव असणे साहजिक आहे पण हा विचार जागतिक वस्तुस्थितीचे भान नसल्याचे लक्षण आहे.
चीनने हे मुद्दाम घडवून आणले नसल्याचे सांगणारे हा मुद्दा मोठ्या हिरिरीने उचलताना दिसतात पण १९४९ साली कम्युनिस्ट क्रांती झाल्यावर माओच्या चीनने किती लोकांना चिरडले?
सांस्कृतिक क्रांतीच्या वेळी किती लोकांना आपला जीव गमवावा लागला याचे उत्तर देताना दिसत नाहीत.
मुळात ऐतिहासिक चिनी विचार आणि मिडल किंगडम कॉम्प्लेक्स सिद्धांतानुसार जगाच्या मध्यभागी चीन आणि त्यादृष्टीने पावले हेच चिनी सामाजिक रचनेच्या केंद्रस्थानी पक्के बसले आहे.
चीन ने मागील काही वर्षात टाकलेली पावले, बेल्ट आणि रोड उपक्रम, भारताला चहुबाजूने घेरण्यासाठीआखलेली स्ट्रिंग ऑफ पर्ल व्यूहरचना, पाकिस्तानला चुचकारणे असो.
किंवा व्यापारी दृष्टिकोनातून इतर देशातील उद्योगधंदे बंद पाडण्यासाठी खेळलेले डाव असोत.
चीन हे सर्वसमावेशक प्रगतीसारख्या भ्रामक कल्पनांवर विश्वास ठेवणारे राष्ट्र नसून स्वतःचे वर्चस्वसिद्ध करण्यासाठी साम,दाम आणि वेळप्रसंगी दंड वापरणारे राष्ट्र आहे हे त्यांनी वेळच्या वेळी दाखवून दिले आहे.
आणि कोविड-१९ च्या हाताळणीवरून तर संशय अजून गडद होताना दिसतोय.
जर वूहान येथे हा विषाणू आढळून आला तर जसा चीनने तो इतर प्रांतांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश मिळवले तसेच तो देशांतर्गत रोखता आला नसता का?
जागतिक आरोग्य संघटनेने या धोक्याला वेळीच ओळखून तपास न करता चीनसारख्या देशाच्या अधिकृत माहितीवर विश्वास का ठेवला?
जर चीनने नियंत्रण मिळवून मृतसंख्या ही साधारणतः ५००० पेक्षा कमी राखण्यात यश मिळवले.
तर चीनमधील मोबाईल कंपन्यांनी कोरोना संक्रमण काळात १.५ कोटी ग्राहक गमावलेल्या आकड्यांचा अर्थ काय घ्यायचा?
यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे ही चीनकडून येणे अपेक्षित होते जे चीनने सोयीस्कररित्या टाळले आहे. अर्थात चीनने लपवाछपवी केली हे तर उघड आहेच.
या सर्व आरोपांना पुष्टी देणाऱ्या अनेक घटना दरम्यानच्या काळात घडल्या आहेत.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपिंग यांच्या वूहान येथे दिलेल्या भेटीचे अनेक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. त्यावरून चीनने कसे रोगावर नियंत्रण मिळवले याचे कौतुकही झाले.
पण रुग्णालयात फिरणाऱ्या जिंगपिंग यांनी एक साधा मास्क लावला होता. बाकी कोणतीही खबरदारी घेतली नव्हती याबाबत कोणीही प्रश्न उपस्थित केले नाहीत.
त्यादरम्यान तर विषाणू नेमका कसा पसरतो याची लक्षणेसुद्धा बाहेरील जगाला नीट माहितीसुद्धा नव्हती.
सुरुवातीला पसरवलेल्या बातम्यांवर हा विषाणू वटवाघूळ पसरवतात असे सांगण्यात आले.
पण मग परिस्थिती आटोक्यात आल्यावर चीनने प्राणी आणि पक्षांच्या मांस विक्री करणाऱ्या बाजारांवर बंधने का लादली नाहीत?
कोरोना रुग्णांवर करण्यात आलेल्या उपचार पद्धतीलासुद्धा पेटंट करण्याचा प्रयत्न जानेवारी महिन्यात चीनने केला होता.
त्याबरोबरच कोरोना विषाणू चाचणीसाठी म्हणून वापरण्यात आलेले किटसुद्धा हलक्या दर्ज्याचे असल्याचे समोर आले असून भारतासकट जगभरातील इतर अनेक देशांनी ते चीनला परत पाठवले आहेत.
जर असे सगळे असेल तर इतरांसारखेच आम्ही ह्या चीनच्या विधानावर कोण विश्वास ठेवेल?
यासोबतच वूहान मध्ये कोरोना विषाणू सापडला असे जाहीर करणाऱ्या डॉक्टरचा कोरोनामुळे होणारा मृत्यू त्यानंतर मूळ शोध लावणाऱ्या महिलेचे एकाएकी गायब होणे.
यासारख्या अनेक बाबी चीनच्या कथित भूमिकांबाबत संशय निर्माण करतात. चीनबरोबरच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला वैश्विक महामारी घोषित करायला इतका अवधी का घेतला?
प्रसार प्रामुख्याने कोणत्या भागात आणि कसा होतो आहे हे वेळीच का ओळखले नाही?
तसेच चीनसारख्या एकाधिकारशाही आणि माध्यमस्वातंत्र्य नसलेल्या देशाच्या अधिकृत माहितीवर विश्वास का ठेवला यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे अपेक्षित आहे.
अर्थात आपण अमेरिकेचा गुप्तचर विभाग काय सांगतो यावर नुसते अवलंबून न राहता कोरोनानंतर काय करायचे याची आखणी करायला सुरुवात करायला हवी.
बऱ्याच जणांनी चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
अर्थात लोकांनी यावेळी ही गोष्ट खूप गांभीर्याने घेतलेली दिसते कारण समाज माध्यमांवर चिनी भाग भांडवल असणाऱ्या अनेक कंपन्यांची यादी जाहीर होताना आपल्याला दिसत आहे!
शाओमी नको तर सॅमसंग अशा अनेक चर्चासुदधा होताना दिसत आहेत. चर्चा म्हणून योग्य आहे पण चीन विरुद्ध आर्थिक युद्ध छेडायला सर्वसमावेशक जागतिक उपायांची गरज आहे.
एकट्या भारताने राष्ट्रीयत्व जागवून आणि स्वदेशीचा नारा देऊन उपयोग नाही तर कोरोनाच्या प्रादुर्भावापूर्वी आपणच आपले शत्रू होतो हे विसरून चालणार नाही.
जगाचा चीनवरील उडालेला विश्वास आणि उद्योग जगताला भारताकडून असलेली आशा यांचा योग्य ताळमेळ साधता आला पाहिजे.
नुसत्या चिनीमधील उद्योगधंदे भारतात येणार म्हणून खूश न होता भारत आणि परिणामी वैयक्तिकरित्या आपण त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करू शकतो का?
असा प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे. नाहीतर उद्योगधंदे लाख येतील, मेक इन इंडिया सारखे कार्यक्रम होतील.
पण नियामगिरी हिल्स होणार असेल, चेन्नईमधला कॉपर प्लांट बंद पाडण्यासाठी झालेल्या घडामोडी असतील आणि नाणारसारखे यूटर्न घेतले जाणार असतील तर सर्व मुसळ केरात एवढे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
नुसते परदेशी पैशांवर अवलंबून असलेल्या आणि विधायक कामात आडकाठी करणाऱ्या ‘ऍक्टिव्हिस्ट’ वर्गाचा धोका आपल्याला नाही.
तर समाज म्हणून भ्रष्टाचाराची लागलेली कीड आपल्याला इतके दिवस पोखरत आहे आणि या रोगावर इलाज करताना सुध्दा कोरोना लढाईत दाखवलेल्या एकजुटीची गरज भासणार आहे.
सबंध देशात अनेक उद्योगधंदे हे होरपळलेल्या अवस्थेत आहेत हे सत्य नाकारून चालणार नाही.
पण आगामी काळात झेप घ्यायची की उलटा प्रवास सुरु करायचा हे आपल्या टेबलाखालून होणाऱ्या व्यवहारांवरही तितकेच अवलंबून आहे जितके वरच्या पातळीवरील धोरण निश्चितीवर.
त्यामुळे आपल्या गरजा कमी करण्याची कोरोनाच्या काळात लागलेली सवय वाममार्गाने पैसा न मिळवण्यात जरी उपयोगात आणली तरी बराच फरक पडू शकतो.
अर्थात आजही मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून अशी लोकसंख्या भारतात आहे.
भविष्यकाळात जर ती संख्या कमी करून उत्पादन वाढीवर विशेष भर दिला तर कोरोनापश्चात उद्भवणाऱ्या स्थितीत आपण पुढे जाऊ शकतो.
बळीराजाला साथ देण्याची गरज आहे पण कागदोपत्री आयकर टाळता यावा म्हणून शेतकरी असणाऱ्यांना नाही.
या वैश्विक महामारीमुळे संपूर्ण जागतिक व्यवहार, सामाजिक देवाणघेवाण, सांस्कृतिक व्यवहार, सत्ताकेंद्रे, भूराजकीय परिस्थिती आणि इतर अनेक अनेक बाबी एक ‘रिस्टार्ट’ बटण दाबल्यासारख्या बदलल्या आहेत.
यातून ‘जैसे थे’ परिस्थिती हा उपाय असू शकत नाही.
एकतर गगनभेदी भरारी किंवा मंदी हेच दोन उपाय समोर असणार आहेत. आणि देशपातळीवरील निर्णयांबरोबरचआपले वैयक्तिक निर्णय आणि कृतीसुद्धा तितकीच महत्वाची ठरणार आहे.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.