आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपल्यातल्या बऱ्याच जणांना बॉलिवूडचं, बॉलिवूडच्या फिल्मसचं आणि त्यातल्या कलाकारांचं आकर्षण असतं, कौतुक असतं, खूप हवेहवेसे वाटतात हे लोक आणि फिल्म.
काही काही कलाकार तर इतके ताकदीचे असतात की त्यांच्या अभिनयाला पैकीच्या पैकी मार्क्स् द्यावेसे वाटतात, त्यांचं जेव्हढं कौतुक करावं तेव्हढं कमीच वाटतं.
मग अशा वेळी त्याचं दिसणं, त्यांचं वय ह्या गोष्टी अगदीच दुय्यम गोष्टी असतात. त्यांना प्रेक्षकांकडून उदंड प्रेम मिळतं!
आज आपण अशाच कलाकारांची माहिती घेऊया ज्यांनी अभिनयाची इतकी ऊंची गाठली की त्यांच्यासाठी वय ही बाब खूपच दुय्यम आहे.
वयाच्या तिशीनंतर त्यांनी अभिनयाला सुरुवात केली आणि तरीही वय हा महत्त्वाचा मुद्दा बाजूला सारून त्यांनी आपल्या अभिनयानी प्रेक्षकांची मने जिंकली.
अभिनयाची परिपक्वता आणि अनुभवाने त्यांनी अल्पावधीतच बॉलिवूड वर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. चला तर मग जाणून घेऊया ह्या कलाकारांबद्दल आणि त्यांच्या करियरबद्दल!
१) बोमन इराणी :
बोमन इराणी ह्यांच्या अभिनायामुळे त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. पहिल्यांदा त्यांना एका बिस्किटाच्या जाहिरातीत बघितले गेले.
आणि त्यांचे हिंदी चित्रपट सृष्टीमधे पदार्पण केले ते ‘डरना मना है’ ह्या भयपटातून सैफ अली खान बरोबर आणि त्यावेळी त्यांचे वय होते ४३ वर्षे!
पण, त्यानंतर त्यांनी आपली यशस्वी घोडदौड सुरूच ठेवली. मुन्नाभाई एम्.बी.बी. एस्. मधला डीन असो किंवा थ्री इडियटस् मधला व्हायरस.
बोमन इराणी यांनी निगेटिव्ह शेडस् असलेल्या भूमिका देखील ताकदीने निभावल्या आणि विनोदी भूमिका देखील आपल्या अभिनयाच्या सामर्थ्याने जिवंत केल्या (हाऊसफ़ुल सिरिज्).
बोमन इराणी ह्यांनी काही दाक्षिणात्य चित्रपटातही काम करून अभिनयाचा एक वेगळा पैलू दाखवला आहे (बेंगाल टायगर, अत्तारिन्तिकी दरेदी)
२) लिलेट दुबे :
लिलेट दुबे ह्यांनी एका टि.व्ही. मालिकेतून पदार्पण केले. त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले तेव्हा त्या ४४ वर्षांच्या होत्या.
१९९९ साली त्यांचा पहिला चित्रपट ‘लव्ह यु हमेशा’ आला. त्यानंतर त्यांनी सुमारे ५२, ५३ चित्रपटांमध्ये काम केले.
त्यातील पिंजर, द मान्सून वेडिंग, द लंचबॉक्स, बागबान हे विशेष उल्लेखनीय चित्रपट आहेत.
लिलेट दुबे ह्यांनी केवळ भारतीयच चित्रपट नाही केले तर एक साऊथ आफ्रिकन, एक ब्रिटिश आणि एक कॅनेडियन चित्रपट देखील केले.
३) किरण खेर :
किरण खेर ह्यांनी त्यांच्या वयाच्या ३३ व्या वर्षी हिंदी चित्रपट सृष्टीमधे पदार्पण केले. १९८८ मधे आलेला पेस्तनजी हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता.
त्यानंतर १९९६ साली आलेला ‘सरदारी बेगम’ ह्या चित्रपटात त्यांनी टायटल रोल केला होता ज्यासाठी त्यांना नॅशनल फिल्म स्पेशल ज्युरी ऍवॉर्ड मिळालं होतं.
हिंदी बरोबरच पंजाबी, उर्दू, मल्याळम् अशा चित्रपटांमध्येही काम करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली त्याचबरोबर त्यांनी रंगभूमी आणि छोटा पडदा देखील गाजवला आहे.
४) संजय मिश्रा :
संजय मिश्रा ह्यांनी त्यांच्या वयाच्या ३२ व्या वर्षी १९९५ साली ‘ओह् डार्लिंग! ये है इंडिया’ ह्या हिंदी चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांतून काम केले आणि अनेक ऍवॉर्डस् पण जिंकले.
बेस्ट ऍक्टर कॉमिक रोल २०१० ‘फंस गये रे ओबामा’, बेस्ट ऍक्टर फिल्मफ़ेअर ऍवॉर्ड (क्रिटिक्स्) २०१४ ‘आंखों देखीं’, इंडियन फ्लिम फ़ेस्टिवल लॉस एंजेलिस २०१६ बेस्ट ऍक्टर ‘मसान’
असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. सत्या, गोलमाल, ब्लफ मास्टर, धमाल, जॉली एल्.एल्.बी. ह्यासरखे अनेक हिट चित्रपट संजय मिश्रा ह्यांनी केले आहे.
५) अमरिश पुरी :
भारदस्त आवाज, दमदार अभिनय ह्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं असा अभिनेता म्हणजे अमरिश पुरी!
वयाच्या ३८ व्या वर्षी ह्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश केला. इ.स. १९७० मध्ये आलेला प्रेम पुजारी हा त्यांचा पहिला चित्रपट होता.
मिस्टर इंडिया मधला त्यांचा मोगॅम्बो विसताच येणार नाही. दिल्वाले दुल्हनिया ले जायेंगे मधले त्यांचे वरून कठोर पण आतून कोमल हृदयी वडील पण लक्षात राहतात.
अनेक पुरस्कार प्राप्त हा अभिनेता इ.स. २००५ मध्ये मृत्यु पावला पण, त्याच्या भूमिकांनी तो अजून जिवंत आहे.
६) आदिल हुसेन :
वयाच्या ४६ व्या वर्षी २००९ मधे ‘कमिने’ ह्या हिंदी चित्रपटातून आदिल हुसेन ह्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
अनेक इंग्रजी चित्रपट, आसामी, तसेच बंगाली चित्रपट, शॉर्ट फिल्मस् आणि मालिकांमधून ह्यांनी काम केले.
इश्किया, इंग्लिश विंग्लिश, लाइफ ऑफ पाय मधून ह्या अभिनेत्याने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मने जिंकली. नॅशनल ऍवॉर्ड जिंकले.
अंग ली, मीरा नायर ह्यांच्या सारख्या अनेक नव्या जुन्या दिग्दर्शकांचा हा आवडता अभिनेता आहे.
७) रोनित रॉय :
१९९२ मध्ये आलेला ‘जान तेरे नाम’ ह्या हिंदी चित्रपटातून अभिनेता रोनित रॉय ह्याने वयाच्या २७ व्या वर्षी पदार्पण केले.
त्यांनी कमल, कसौटी जिंदगी की, क्योंकी सांस भी कभी बहू थी अशा अनेक प्रसिद्ध मालिकांमधून काम केले.
२ स्टेट्स, सरकार ३, काबिल ह्यासारख्या हिंदी, जय लव कुश ह्यासाखे तेलुगु चित्रपट, बंसोधर आणि अग्नीशिखा ह्यासारखे बंगाली चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.
रोनित रॉयच्या अभिनयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ह्याने वेब सिरीज, डबिंग रोल देखील केले आहेत. २०१० मध्ये आलेल्या ‘उडान’ ह्या चित्रपटासाठी रोनितला बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरचे ऍवॉर्ड मिळाले.
२०१५ मध्ये आलेल्या ‘गुड्डू रंगीला” ह्या चित्रपटासाठी बेस्ट निगेटिव्ह रोल साठी स्टार स्क्रीन ऍवॉर्ड मिळाले.
८) चित्रांगदा सिंग :
हजारों ख्वाहिशे ऐसी ह्या २००३ मध्ये आलेल्या चित्रपटातून ह्या अभिनेत्रीने पदार्पण केले तेव्हा ती २७ वर्षांची होती आणि तेव्हा तिचे लग्न झाले होते.
तिच्या ह्या पहिल्याच चित्रपटासाठी तिला बेस्ट फिमेल डेब्यु झी सिने ऍवॉर्ड आणि बेस्ट लिडींग फिमेल रोल साठी अप्सरा ऍवॉर्ड चे नॉमिनेशन मिळाले होते.
देसी बॉइज्, गब्बर इज बॅक (आओ राजा गाण्यात स्पेशल अपीअरन्स्), ये है ज़िंदगी, जोकर ह्यासार्ख्या चित्रपटातल्या तिच्या भूमिका गाजल्या.
२०१८ मधे आलेला सूरमा ह्या चित्रपटाची ती निर्माती होती.
९) पियुष मिश्रा :
वयाच्या ३५ व्या वर्षी पियुष मिश्रा ह्याने पहिला चित्रपट केला. अभिनेत्या बरोबरच दिग्दर्शक, कवी, गायक अशीही ह्याची ओळख आहे.
त्यासाठी त्याला अनेक ऍवॉर्डस् देखील मिळाले आहेत. २००३ मधे आलेला द लिजंड ऑफ भगतसिंग साठी झी सिने बेस्ट डायलॉग ऍवॉर्ड मिळाले.
२०१० मध्ये आलेल्या गुलाल चित्रपटासाठी बेस्ट स्टॅंडआऊट परफॉर्मंस बाय द म्युजिक डायरेक्टरचे स्टार डस्ट ऍवॉर्ड मिळाले.
गुलाल, गॅंग्ज् ऑफ वासेपूर, रिवॉल्वर रानी, रॉकस्टार, तमाशा, हॅप्पी भाग जायेगी, हॅप्पी फिर भाग जायेगी ह्यासारख्या चित्रपटांमधील त्याच्या अभिनयाची सगळ्यांनीच दखल घेतली.
१०) पंकज त्रिपाठी :
२००४ साली आलेल्या ‘रन’ चित्रपटातून ह्याने एका छोट्याश्या भूमिकेतून पदार्पण केले. तेलुगु, तमिळ आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही ह्याने काम केले आहे.
प्रेक्षक आणि समीक्षकांनीही ह्याच्या अभिनयाला दाद दिली आहे. मसान, दिलवाले, स्त्री, सिंघम रिटर्नस्, गुंडे ह्यासारख्या चित्रपटात त्याने अभिनयाची उंची गाठली आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.