आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
कोरोना संकटामुळे कित्येक देश लॉकडाऊन मध्ये आहेत भारतात सुद्धा पहिला लॉकडाऊन १४ एप्रिल पर्यंत होता, नंतर तो वाढवून आता ३ मे पर्यंत केला! देश लॉकडाऊन होऊन महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे!
तरीही आज सुद्धा मुंबई पुणे ठाणे नाशिक अशा मोक्याच्या ठिकाणी कोरोना रुग्णांची सतत वाढ होताना दिसत आहे! देशभरात २६००० पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे!
आणि या लॉकडाऊन मध्ये घरबसल्या लोकांचे मनोरंजन म्हणून आणि त्यांनी घराबाहेर पडू नये म्हणून दूरदर्शन चॅनलनी एक खूप मोठा निर्णय घेतला आणि लोकांना दूरदर्शन कडे वळवले!
या लॉकडाऊन मध्ये रामायण, महाभारत या दोन लोकप्रिय सिरियल्स पुन्हा दाखवण्याचा निर्णय दूरदर्शननी घेतला, आणि लोकांना प्रचंड आनंद झाला!
रामायण या सिरियल ने तर या लॉकडाऊन मध्ये इतका टीआरपी मिळवला जो इतर कुठल्याच चॅनलला मिळाला नव्हता!
आता रामायण संपून उत्तर रामायण सुद्धा चालू झाले असून त्याला सुद्धा लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे!
फक्त रामायण महाभारातच नव्हे तर सर्कस, चाणक्य, शक्तिमान अशा जुन्या मालिका सुद्धा दाखवायला दूरदर्शनने सुरुवात केली असून त्यांना सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळत आहे!
याच पार्श्वभूमीवर रामायणात प्रभू श्रीराम यांचं काम करणारे अभिनेते अरुण गोविल हे सध्या सोशल मीडिया च्या माध्यमातून त्यांच्या फॅन्स शी संवाद साधतान दिसत आहे!
ज्या काळात फेसबुक, ट्विटर अशी माध्यमं नव्हती त्या काळातले हे कलाकार आज सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधतायत आणि जुन्या आठवणी शेयर करतायत!
तर ट्विटरच्या माध्यमातून ‘फिल्मफेअरचे’ चीफ असिस्टंट एडिटर रघुवेंद्र सिंह यांनी अरुण गोविल यांची ट्विटरवर मुलाखत घेतली.
आणि अरुण गोविल यांनी सुद्धा अगदी मनमोकळी उत्तरं देत लोकांची मनं जिंकली!
या मुलाखतीतून अरुण गोविल यांनी विविध प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली, शिवाय ही मुलाखत हिंदीतून झाली असून, यातून नेमका काय संवाद साधला गेला ते आपण जाणून घेऊया!
या लेखात आपण त्या मुलाखतीतले मूळ प्रश्न-उत्तरं आणि त्यांचं मराठीत सार मांडत आहोत!
===
रघुवेंद्र यांनी सुरुवातीलाच अरुण गोविल यांना ट्विटर वर येण्याबाबत प्रश्न केला कारण सध्या सेलिब्रिटीज याच माध्यमातून त्यांच्या फॅन्सशी संवाद साधतात!
१. प्रश्न : तुम्ही ट्विटर वापरताय हे पाहून कित्येक फॅन्स खूप खुश आहेत, पण या प्लॅटफॉर्मपासून इतके दिवस तुम्ही वंचित का होता?
उत्तर : माझ्या मुलीने २०११ मध्येच माझे ट्विटर अकाऊंट ओपन करून दिले होते, पण मी ते वापरत नव्हतो, सध्या रामायण पुनःप्रसारित होणार म्हणून मी अकाऊंट पुन्हा चालू केले!
२. प्रश्न : रामयणा आधीचे अरुण गोविल आणि रामायणा नंतरचे अरुण गोविल यांच्यात काय फरक आहे?
उत्तर : जास्त नाही, खरंतर असं म्हणायला नाही पाहिजे, प्रभू रामचंद्रांचे काही गुण माझ्या अंगी आधीपासूनच होते म्हणून ती भूमिका मी इतका समरस होऊन करू शकलो!
तरी या प्रश्नाचं अचूक उत्तर माझ्या जवळची मंडळी देऊ शकतील!
३. प्रश्न : कोरोना महामारीमुळे दूरदर्शनवर पुन्हा रामायण दाखवणार यावर तुमची प्रतिक्रिया काय होती?
उत्तर : देश सध्या मोठ्या संकटातून जातोय! तर नक्कीच ही बातमी ऐकून आनंद झाला, त्या काळात शूटिंग मध्ये व्यस्त असल्याने आम्ही कधीच ही सिरीयल पूर्ण बघू शकलो नाही!
तसेच नवीन पिढी ही सिरियल त्यांच्या कुटुंबासोबत बघत आहे याचा जास्त आनंद आहे!
४. प्रश्न : आज काळ बदलला आहे, प्रेक्षक बदलला आहे, सध्याच्या प्रतिक्रिया आणि ३३ वर्षांपूर्वीच्या प्रतिक्रिया यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो?
उत्तर : काळ आणि प्रेक्षक बदलला तरी भावना तीच असते, मला लोकं त्यावेळेस सुद्धा प्रभू श्रीराम मानायचे आजही मानतात, उलट प्रेक्षकांची संख्या वाढलीच आहे!
५. प्रश्न : त्या वेळेस लोकं तुम्हाला राम मानत असत..कलाकारासाठी ही उत्तम पावती आहे, पण याची कधी तुम्हाला अडचण झाली का?
उत्तर : रामायण नंतर मला कमर्शियल सिनेमाची ऑफर येणं बंद झालं, काही फायदे असतात काही तोटे सुद्धा असतात! प्रभू रामचंद्रा बरोबर माझं नाव जोडलं गेलं आणखीन काय हवं?
रामायणामुळे मला जे मिळालं ते बहुदा कित्येक फिल्म्स करून सुद्धा मला मिळालं नसतं! देव आणखीन काय देणार? मी माणूस म्हणूनच खुश आहे आणि तेच योग्य आहे!
६. प्रश्न : प्रभू श्रीराम यांची भूमिका करताना विशेष काय तयारी करावी लागली?
उत्तर : माणसाच्या रूपात असलेल्या देवांसारखे आम्ही दिसत तर होतो पण, देवांच्या चेहऱ्यावरचे निर्मळ आणि सौम्य भाव काही केल्या येत नव्हते!
यावर सूरज बरजात्या यांनी सांगितले की तुमचा हसरा चेहरा खूप काही सांगून जातो, तो एकदा वापरा, आणि खरच ते हास्य उपयोगी पडलं!
७. प्रश्न : अयोध्येचा प्रश्न सुटला आहे, आणि अशातच पुन्हा टीव्हीवर रामायण….आता आपण राम-राज्याची कल्पना करू शकतो का?
उत्तर : आपण सुरुवात तर केली आहे, पण सगळ्यांनीच रामाचे संकल्प, संयम आणि मर्यादा हे तीन गुण अंगिकारले तर आपण आपल्या देशासाठी काहीही करू शकतो!
८ प्रश्न : अभिनय क्षेत्रातल तुमचं योगदान अमूल्य आहे, रामायणात इतकं प्रभावी काम असून सुद्धा तुम्हाला कोणत्याच सन्मानाने गौरविण्यात का आले नाही?
उत्तर : कोणत्याही राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने मला कोणताही पुरस्कार दिला नाही, मी उत्तर प्रदेशचा आहे तरी तिथल्या सरकारने सुद्धा मला पुरस्कार दिलेला नाही!
मी गेली ५० वर्षे मुंबईत राहतोय पण महाराष्ट्र सरकार कडूनही कोणताही पुरस्कार अथवा सन्मान मला मिळालेला नाही!
===
ही अशी सडेतोड उत्तरं अरुण गोविल यांनी दिली आणि कित्येक रसिकांची मनं जिंकून घेतली! आज इतक्या वर्षांनी सुद्धा ही सिरियल प्रेक्षकांना आजही भुरळ घालते!
यावरून समजतं की त्या काळी किती उत्तम दर्जाचं काम या कलाकारांनी करून ठेवलं आहे! खरंच ही सिरियल बनवणाऱ्या लोकांचे आभार मानावे तितके कमीच!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.