आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
हॉटेलचे चमचमीत पदार्थ , वेगवेगळ्या डिशेस आपण लॉकडाऊनच्या काळात आपले लाडके फूड जॉईन्ट्स मिस करतोय. सध्या काही प्रमाणात हॉटेल्सची पासर्ल सेवा उपलब्ध झाली असली तरी कोरोनाच्या भितीने आपण त्याला नकार देतोय.
पण एकंदरच लॉकडाऊनमुळे हॉटेल इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यातसुद्धा होम डिलिव्हरीला परवानगी असली तरी मर्यादित मनुष्यबळ असल्याने डिलिव्हरी सगळ्यांना शक्य होतेच असं नाही, शिवाय सुरक्षेचाही प्रश्न आहे.
याचबरोबर घरबसल्या खाण्यासाठी आपल्यासमोर असलेला पर्याय म्हणजे स्विगी किंवा झोमॅटो. मात्र या कोरोनाच्या संकटामुळे त्यांचेही मोठे नुकसान होत आहे.
त्यांनाही प्रचंड अडचणी येत आहेत. ऑर्डर्सच्या संख्येतसुद्धा मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर एकंदरच या क्षेत्राचे भवितव्य अंधारात आहे.
जुन अखेरपर्यंत अशीच परिस्थिती राहिल्यास येत्या काळात ५० % हॉटेल्सना कायमच कुलूप लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोनाच्या संकटामुळे हॉटेल इंडस्ट्रीचे जवळपास ८०,००० कोटींचे नुकसान झाले आहे. बहुतांश हॉटेल्सकडे स्वतःची जागा नसते.
भाड्याच्या जागेत त्यांना हॉटेल्स चालवावे लागते. अशा परिस्थितीमध्ये हॉटेलच्या जागेचे भाडे , मेंटेनन्स चार्जेस , कर्मचाऱ्यांचा पगार या सगळ्याचा खर्च मालकांना असणार आहे.
त्यामुळे हॉटेल असोसिएशनच्या वतीने मॉल्स आणि बहुतांश मालकांना जून महिन्यापर्यंत भाडेमाफी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
लोढा ग्रुप, फोरम, व्हेगास यांनी आतातपर्यंत अशाप्रकारे मॉल्समधील भाडे माफ करण्याची तयारी दाखवली आहे, इतरांनीही यामध्ये सहकार्य करावे अशी हॉटेल मालकांची अपेक्षा आहे.
मॉलमधील हॉटेल्सना मेंटेनन्स चार्जेस म्हणून जवळपास लाखाच्या घरात किंमत मोजावी लागते. त्यांच्या उत्पन्नाच्या ३०% रक्कम यामध्येच अनेकदा जाते.
त्यामुळे सध्या उत्पन्न ठप्प असल्याने यावर विचार करण्याची आवश्यकता असल्याचे हॉटेल मालकांचे म्हणणे आहे.
तज्ञांच्या मते कोरोनानंतरही आर्थिक परिस्थिती सकारात्मक असेल याची खात्री नाही. सहसा हॉटेलिंगचे नियोजन खर्चाचे नियोजन करताना आर्थिक परिस्थिती बघून केले जाते.
त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडलेली असली तर लोक हॉटेलकडे वळतील का ही भिती व्यक्त केली जात आहे.
त्यातच कोरोनाच्या भितीमुळे आरोग्याचा धोका लक्षात घेता लोक हॉटेल्समध्ये जातील याची खात्री देता येत नाही.
चीनमधील परिस्थिती सुधारल्यावर तेथील लॉकडाऊन हटविण्यात आला होता, त्यानंतर चीनमध्ये केवळ ३०% उत्पन्न हॉटेल्सना मिळत असून मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
चीनमध्ये भारताच्या तुलनेत लोक अधिक प्रमाणात हॉटेल्समध्ये जातात त्यामुळे भारताला याचा अधिक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुढील वर्षभर हा ट्रेंड राहण्याची शक्यता आहे असे हॉटेल मालकांचे म्हणणे आहे. यामुळे भाडे आणि इतर खर्चांसाठी नवीन काँट्रॅक्ट पद्धती सक्रिय करण्याचा विचार मालकांचा आहे.
मात्र यासाठी जागा मालक आणि संबंधित व्यक्तींशी असलेले वैयक्तिक संबंधसुद्धा अवलंबून असतील.
सर्वच जण या नवीन अटींना मान्यता देण्याची शक्यता नाही, त्यामुळे हॉटेल व्यवसायामध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.
काही दिवसात व्यवसाय सुरू झालाच तरी त्याला पूर्वीसारखा प्रतिसाद मिळेलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीपुढे प्रश्नचिन्ह आहे.
लहान हॉटेल्सचे सगळे उत्पन्न हे त्यांच्या मासिक व्यवहारांवरच अवलंबून असते. भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार, इतर खर्च सर्वांचे नियोजन यावरच असते.
त्यातच सर्व कर्मचाऱ्यांना पगार देणे आणि त्यांची जबाबदारी घेणे हॉटेल मालकांना बंधनकारक आहे. मात्र हॉटेल्सनाही मर्यादा आहेत.
यामुळे जर परिस्थिती सुधारली नाही तर ५०% हॉटेल्स बंद होण्याचा धोका आहे.काही ५-६ मोठ्या हॉटेल चेन वगळता इतर सर्वांना या महामारीमधून बाहेर पडणे कठीण आहे.
याचा परिणाम त्यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीवर होण्याची शक्यता आहे.
अनेक हॉटेल्सनी आत्तापर्यंत मार्च महिन्याचे पगार सर्वांना दिले आहेत. मात्र एप्रिल आणि मे महिन्याचा पगार हॉटेल्स बंद असताना शक्य होतीलच याची शक्यता नाही.
त्यामुळे अनेकांनी कर्मचारी कपात करण्याससुद्धा सुरुवात केली आहे. त्यामुळे नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण होत आहे!
पगार देण्याची हॉटेल्सची तयारी असली तरीही तेवढे भांडवल आत्ताच्या घडीला उपलब्ध नाही, शिवाय व्यवसायातून तेवढे उत्पन्नही मिळण्याचे चित्र नाही त्यामुळे आता काय करावे असा प्रश्न हॉटेल मालकांना पडलेला आहे.
तज्ञांच्या मते हॉटेल इंडस्ट्रीतील जवळपास ७.५ ते ८ लाख नोकऱ्या धोक्यामध्ये आहेत.
सध्याच्या घडीला सुरू असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम झोमॅटो आणि स्विगीलासुद्धा झाला आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये जरी यांचा समावेश असला तरीही लोकांच्या भीतीमुळे प्रमाण कमी आहे.
त्यातच दिल्लीमध्ये डिलिव्हरी बॉय कोरोनाग्रस्त सापडल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पटकन कोणीही या मार्गाचा वापर करत नाही.
होम डिलिव्हरीचा पर्याय हॉटेलांना दिला असला तरीही सुरक्षेच्या कारणास्तव बहुतांश हॉटेल्स बंद आहेत. त्यामुळे स्विगीचा व्यवसाय १० % वर आला आहे.
त्यातच पोलिसांच्या भीतीने आणि व्हायरसच्या धोक्यामुळे देशात अनेक ठिकाणी डिलिव्हरी बॉईज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्याचाही परिणाम स्विगीवर होत आहे.
त्यामुळे स्विगी आणि झोमॅटोलासुद्धा मोठा फटका सहन करावा लागत आहे.
सध्याच्या घडीला मर्यादित हॉटेल्स सुरू असल्याने त्याचबरोबर उपलब्ध पदार्थ मर्यादित असल्याने ऑनलाइन ऑर्डर्स मोठ्या प्रमाणावर होत नाहीत,
त्यातही स्थानिक पोलिस , यंत्रणांचे अडथळे या सर्वांचा फटका झोमॅटो आणि स्विगीला सहन करावा लागत आहे. आणि दिवसेंदिवस त्यामध्ये वाढच होत आहे.
एकंदरच येणारा काळ हॉटेल इंडस्ट्रीसाठी कठीण काळ मानला जात आहे.
मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान, खर्चाचा वाढता ताण, अनिश्चितता यामुळे हॉटेल उद्योगासमोर मोठे प्रश्नचिन्ह निश्चितच तयार झाले आहे.
या अशा कारणांमुळे हॉटेल मालकांवर वाईट वेळ आली आहे! पण सर्वात जास्त काळजी त्या लोकांची आहे ज्यांच पोट या व्यवसायावर अवलंबून आहे!
वेटर्स, शेफ, मॅनेजर्स, स्टाफ, डिलिव्हरी बॉयज, अशा कित्येक लोकांची घरं या कामामुळे चालतात त्यांच्या नोकरीवरच गदा आली तर मग या बेरोजगारीचा फटका कासाबसेल याचा विचार सुद्धा करवत नाही!
त्यामुळे शक्यतो आपण सगळेच लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करूया आणि घरातच थांबूया, ज्यामुळे ही परिस्थिति आणखीन बिकट होणार नाही!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.