२०१९ ला लागलेला कर्फ्यू आणि आता ‘लॉकडाऊन’ – काय आहे ‘काश्मीरचं’ आजचं चित्र?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
गेल्या महिनाभरापासून संपूर्ण देशात कोरोना मुळे टाळेबंदी लागू आहे आणि बहुतांश जनता घरातच कैद झाली आहे.
आपल्यापैकी बरेच जण घरून काम करत असतील किंवा काहींना सुट्टीच घ्यावी लागली असेल. जीवनावश्यक वस्तू ,भाज्या सुद्धा ठराविक वेळेतच उपलब्ध होत आहेत.
घरी पेपर येणं बंद आहे. टीव्ही आणि इंटरनेट सुरू असल्याचा थोडा फार आधार. आपल्या हिंडण्या- फिरण्यावर आलेल्या बंधनाने सगळ्यांनाच कंटाळा येणं सहाजिक आहेच.
याचं मुख्य कारण म्हणजे आपण आतापर्यंत कधीच अशी परिस्थिती अनुभवली नसेल.
परंतु अशीच परस्थिती वर्षातून बहुतेक महिने अनुभवणाऱ्या काश्मीर खोऱ्यातल्या लोकांची अवस्था कशी होत असेल?
जम्मू काश्मीर खरं तर देशाचं नंदनवन. ‘जगात स्वर्ग जर कुठे असेल तर तो इथेच आहे.. इथेच आहे..’ असं अभिमानाने सांगितलं जातं.
पण ९० च्या दशकापासून धार्मिक वादाने, पाकिस्तान तसेच दहशतवाद्यांच्या कुरापती मुळे संचारबंदी, कर्फ्यु वैगेरे गोष्टी काश्मीर खोऱ्यातल्या लोकांच्या जणू पाचवीलाच पूजल्यासारख्या झाल्यात.
अगोदर जेव्हा खोऱ्यात अतिरेक्यांच प्राबल्य होतं तेव्हा कधी कुठे केव्हा बॉम्बस्फोट, गोळीबार होईल याची शाश्वती नसायची.
या घटनांमुळे वर्षातला बराच काळ राज्यात कुठे ना कुठे संचारबंदी, कर्फ्यु- टाळेबंदी सदृश्य परिस्थिती असायचीच.
मागच्या वर्षी ऑगस्ट मध्ये जेव्हा केंद्र सरकाने ३७० कलम रद्द करून जम्मू-काश्मीर लदाखच केंद्र शासित प्रदेशात रूपांतर केलं त्या नंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात सर्वाधिक काळ संचारबंदी लागू होती!
ही संचारबंदी नुकतीच शिथिल झाली तोच कोरोना मुळे टाळेबंदी – संचारबंदीची स्थिती परत उद्भवली!
खोऱ्यातले व्यापारी म्हणतात या वर्षी ‘ऑगस्ट’ मार्च मधेच आलाय!
पण काश्मिरी जनतेच्या मते ही संचारबंदी अगोदरच्या कर्फ्यु पेक्षा नक्कीच वेगळी आहे! चला तर मग जाणून घेऊयात जम्मू- काश्मीर मध्ये संचार बंदीचं कसं पालन केलं जातं आहे.
काश्मीर खोऱ्यात कोरोना चा पहिला रुग्ण १८ मार्च च्या जवळपास सापडला.
सदर रुग्ण म्हणजे श्रीनगर मधल्या गावठाणातील खयाम भागातील एक महिला जी नुकतीच सौदी- अरेबियाहुन परतली होती.
१९ मार्च पासूनच श्रीनगर च्या जिल्हा प्रमुखांनी संपूर्ण श्रीनगर शहरात संचारबंदीचे निर्बंध लागू केले. मोठ्या रस्त्यांवर तसेच शहराच्या सीमेवर बॅरिकेड लावण्यात आले.
मात्र प्रशासनाने अत्यावश्यक वस्तू आणि सेवा यांचा तुटवडा जाणवणार नाही याची पुरेशी काळजी घेतली.
श्रीनगर च्या जनतेसाठी हे निर्बंध खूपच माफक होते कारण ऑगस्ट २०१९ मध्ये जेव्हा जम्मू – काश्मीर च्या स्वायत्ते विषयी चे कलम ३७० हटवण्यात आलं,
त्या वेळेस अत्यंत कडक संचारबंदी जम्मू- काश्मीर प्रदेशात लागू होती. कोणत्याही व्यक्तीस घरातून बाहेर पडण्याची सुद्धा परवानगी नव्हती.
त्या मानाने आजच्या घडीला एक- दोघे जण बाहेर तरी पडू शकतात. अर्थात रस्त्यावर बॅरिकेड आणि तारा लावल्या आहेत पण त्या वाहनांना रोखण्यासाठी.
अत्यावश्यक वस्तू,सेवांसाठी नागरिक ठराविक वेळेत मास्क बांधून बाहेर जाऊ शकतात. बाकी आवश्यक वस्तू,सेवा वगळता सर्व प्रकारची खासगी वाहतूक बंद आहे.
ऑगस्ट मधे जेव्हा काश्मीर मध्ये निर्बंध लावण्यात आले होते तेव्हा ते फक्त संचारबंदी पुरते मर्यादित नव्हते तर संपर्काची सर्व साधने पूर्णतः बंद करण्यात आली होती.
ज्यात लँडलाईन फोन ,केबल टीव्ही,मोबाईल फोन्स,इंटरनेट चा समावेश होता.
सात महिन्यांनी म्हणजे फेब्रुवारी २०२० पासून निर्बंध कमी कमी करण्यात आले. सुरवातीला फिक्स्ड लाईन ब्रॉडबँड कनेक्शन पूर्ववत करण्यात आले.
मोबाईल इंटरनेट चालू केलं पण त्याची कनेक्टिव्हिटी अत्यंत कमी म्हणजे टू जी पर्यंतच होती!
पण हे ही नसे थोडके कारण ऑगस्ट मधल्या कर्फ्युत तर मोबाईलच चालू नव्हते!
आर्थिक आघाडीवर मात्र सारखीच परिस्थिती आहे कारण अत्यावश्यक सेवा सोडल्या तर बाकी बाजारपेठ ठप्प आहे. इथल्या मुख्य पर्यटन व्ययसायचे तर तीन-तेरा वाजलेत.
देशातली सध्याची परिस्थिती पाहता या व्ययसायला परत ‘अच्छे दिन’ येण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागणार हे नक्की.
ग्रामीण भागात जिथे ब्रॉडबँड इंटरनेट नाही तिथे माहिती साठी केवळ टुजी नेटवर्क उपलब्ध आहे आणि त्याच्या अत्यंत धीम्या वेगाने लोकांच्या निराशेत भर पडत आहे.
केबल आणि बाकी टीव्ही चॅनेल च्या प्रसारवर असलेल्या बंदीने इथल्या लोकांना इंटरनेट द्वारेच कोविद-१९ तसेच इतर माहिती मिळू शकते.
बातम्यांसाठी तर अजून ही संध्याकाळच्या सात पर्यंत वाट पाहावी लागते! म्हणूनच ज्यांच्या कडे ब्रॉडबँड सेवा नाही अश्या लोकांना टूजी चाच आधार आहे.
प्रदेशातील बहुतांश नेते ,अधिकारी फोर जी सेवा परत चालू करण्याविषयी केंद्र सरकारला विनंती करत आहेत.
शाळा – महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीने वर्ग घेण्यासाठी टुजी नेटवर्क उपयोगाचं नाही ब्रॉडबँड सेवा नसलेल्या ठिकाणी फोर जी हेच संपर्काच, माहितीच उत्तम साधन आहे.
जम्मू, काश्मीर आणि लदाख या तिन्ही प्रदेशांचा विचार केला तर २० एप्रिल पर्यंत जम्मू – काश्मीर मध्ये एकूण ३६८ कोरोनाग्रस्त आढळून आले!
त्यातील ७१ जण पूर्णपणे बरे झाले तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
लदाख मधे एकूण १८ कोरोनाग्रस्त आढळून आलेत त्यातील १४ पूर्णपणे बरे झाले आहेत सुदैवाने इथे एक ही मृत्यू कोरोना ने झालेला नाही.
तीनही भागात सर्व दुकाने, आस्थापने, धार्मिक स्थळे पूर्णतः बंद आहेतच. चैत्री नवरात्रीच्या काळात सुद्धा जम्मूतील वैष्णो देवी मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं.
तुलनेने काश्मीर खोऱ्यात कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे म्हणूनच अधिकाधिक लोकांची जलद गतीने तपासणी करण्यासाठी ९६०० टेस्ट किट्स रविवारी देण्यात आले आहेत.
रुग्णांच्या शरीरात कोरोना विषाणू शी लढा देणारे प्रतिजीवाणू तयार झाले आहेत का याचं परीक्षण या टेस्ट किट्स द्वारे करण्यात येईल.
समाधानाची गोष्ट म्हणजे या परिक्षणाचा निष्कर्ष केवळ ३० मिनिटांमध्ये हाती येणार आहे.
या टेस्ट किट्स चा वापराने एकूण लोकसंख्येत किती कोरोनाग्रस्त असू शकतील याचा अंदाज डॉक्टरांना लावता येईल(सॅम्पलिंग पद्धतीनुसार परीक्षण होणे अपेक्षित आहे).
आजच्या घडीला संपूर्ण खोऱ्यात ८३ रेड झोन आहेत, प्रशासनाच्या साह्याने या भागात कोविद-१९ ची चाचणी करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.
ज्या प्रमाणात अजून टेस्टिंग किट्स उपलब्ध होतील त्या नुसार चाचण्यांची संख्या वाढवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.
अनंतनाग मधल्या एका पोलीस अधिकाऱ्याची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. आता पर्यंत एकूण दोन पोलिसांना कोरोना ची लागण झाल्याचं समोर आलंय.
काश्मीर सारख्या अति संवेदनशील प्रदेशात पोलिसांची भूमिका लष्करा एवढीच महत्वाची आहे.
गेल्या ऑगस्ट पासून सुरू झालेल काश्मीर च शुक्लकाष्ठ काही संपण्याचं नाव घेताना दिसत नाहीये.
अगोदर ७ महिन्यांचा ब्लॅकआऊट आणि आता कोरोना मुळे असलेली टाळेबंदी, अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडून पडलेली आहे!
शाळा, कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुद्धा होत आहे. पृथ्वीवरच्या या स्वर्गात स्थिती पूर्ववत होण्यासाठी अजून काही महिने लागतील.
घरी बसून सध्या तरी आपण सर्व सुरळीत होण्याची केवळ प्रार्थनाच करू शकतो.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.