का ठेवली नवजात बाळांची नावे ‘कोरोना’ आणि ‘कोविद’?- हे फक्त भारतातच होऊ शकतं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
नावात काय आहे असं म्हटलं जातं. सध्या सगळीकडे कोरोना हाच शब्द ऐकायला मिळतोय अशी परिस्थिती आहे. कुठल्याही बातम्या लावा, त्याच्याच बातम्या. वर्तमानपत्र काढा, त्यातही तेच.
सगळे सोशल मीडिया फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम सगळ्या ठिकाणी कोरोनाचं साम्राज्य दिसून येतंय.
कोरोना हा सध्या खरंच परवलीचा शब्द झाला आहे. जिकडे तिकडे त्याच्याच बातम्या आणि दहशत जाणवत आहे. रोज वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा मनात धडकी भरवत आहेत.
दिवसेंदिवस त्याबद्दलची चिंता वाढत आहे. सरकार देखील कोरोनाशी लढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. सगळ्या देशांमधल्या आरोग्य संघटना सतर्क असून रुग्णांवर उपचार करीत आहेत.
सध्या तर अमेरिका कोरोनाचं केंद्र झाली आहे. इटली, स्पेन मध्ये देखील कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. आज जगभरात लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून ७०००० मृत्यू झाले आहेत.
भारतात कोरोनामुळे संपूर्ण देशात २१ दिवसांचा लोकडाऊन सुरू आहे.
भारतातही सध्या ५००० लोकांना कोरोनाची लागण झाली असून देशभरात ११७ मृत्यू झाले आहेत. आता त्या कोरोनाच नावही नको असं सगळ्या घराघरांमध्ये चित्र आहे.
अशी सगळी दहशत असताना आपल्या भारतात मात्र एक घटना अशी झाली आहे की एका नवजात शिशूचं नाव ‘कोरोना’ असं ठेवण्यात आलं आहे.
एखाद्या नवजात मुलीच नाव कोरोना हे ठेवण्याचे कारण काय असेल? कारण कोरोना म्हणजे खरं तर मानवावर आलेले संकट.
पण तरीही हे नाव ठेवावं असं त्या कुटुंबातील लोकांना का वाटल असावं?
उत्तर प्रदेशातील गोरखपुर जिल्ह्यातील सोहगौरा याठिकाणी त्रिपाठी यांच्या कुटुंबात या मुलीचा जन्म झाला आहे.
तिच्या जन्मानंतर तिच्या काकांनी असं सांगितलं की, २२ मार्चला जनता कर्फ्यू च्या आधी काही तास त्या मुलीचा जन्म झाला. त्याबद्दल माहिती देताना तिचे काका नीतीश त्रिपाठी म्हणतात की,
जगभर कोरोनाचा उद्रेक झालेला असताना कोरोना मुळेच लोक एकत्र येत आहेत. कोरोनाच्या विरोधात सामूहिक लढाई लढण्यासाठी सगळी जनता एकवटली आहे, आणि ही कोरोना संकटामधील सकारात्मक गोष्ट आहे.
Covid-19 हा विषाणू नक्कीच धोकादायक आहे त्याच्यामुळे जगभरात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
परंतु कोरोना मुळेच अनेक चांगल्या सवयी आता लोकांना लागत आहेत म्हणजे अस्वच्छ राहू नये, कुठेही थुंकू नये ,आपले हात वारंवार स्वच्छ धुवायला हवेत.
सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले पाहिजे आणि माणसाप्रमाणेच इतर प्राण्यांना देखील जपलं पाहिजे.
नितीश त्रिपाठी म्हणतात की नवजात बाळाचे कोरोना हे नाव तिच्या आई-वडिलांशी सल्लामसलत करूनच ठरवलं आहे.
Covid-19 या विषाणूला लोकांनी घाबरू नये फक्त थोडी काळजी घ्यावी, आणि सरकारने सांगितलेल्या गोष्टींचे पालन करावे.” हे बाळ कोरोनाच्या विषाणूशी लढण्यासाठी लोकांच्या ऐक्याचे प्रतीक असेल.”
तिथल्या सार्वजनिक रुग्णालयातील डॉक्टरांनी, नर्सनी देखील बाळाचं नाव कोरोना ठेवले याबद्दल त्रिपाठी कुटूंबाचे अभिनंदन केले आहे.
तिथले डॉक्टर म्हणतात, की कोरोना हे नाव जेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं तेव्हा आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला परंतु त्या मागचा उद्देश त्यांनी आम्हाला सांगितल्यावर त्यांचं कौतुकही वाटलं.
कोरोना आणि कोविड हे सध्याचे नको असलेले शब्द आहेत. पण एका पालकांनी आपल्या दोन्ही मुलांची अशी नावं ठेवलेली आहेत आणि ते ही परत आपल्या भारतातच.
छत्तीसगढ मधल्या प्रीती आणि विनय वर्मा या दाम्पत्याला २७ मार्चला जुळ्या मुलांची अपत्यप्राप्ती झाली.
आता २७ मार्च म्हणजे भारतात पंतप्रधानांनी जाहीर केलेला लॉक डाऊनचा काळ.
या काळात आपल्याला जुळे झाले, आणि ते ही एक मुलगा आणि एक मुलगी. म्हणून त्यांनी आपल्या मुलांची नावे ‘कोरोना’ आणि ‘कोविड’ अशी ठेवली आहेत.
हीच नावे का ठेवली? असं जेव्हा त्यांना विचारण्यात आलं त्यावेळेस ते म्हणतात की, त्यांचा जन्म हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या लॉक डाऊनच्या काळात झालेला आहे.
आणि ही लढाई एका प्राणघातक आजाराशी आहे.
लॉक डाऊन असल्यामुळे, डिलिव्हरीसाठी दवाखान्यात जाणे देखील मुश्किल झाले होते. कुठंलीही वाहतूक सेवा त्या काळात सुरू नव्हती.
जेव्हा ते दवाखान्याकडे निघाले त्यावेळेस मध्ये मध्ये पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची चौकशी केली. कारण हे विनाकारण तर फिरत नाहीत ना हे पोलीस पाहत होते.
परंतु गरोदर बाईला बघून त्यांनी आम्हाला सोडलं. आमचे नातेवाईक देखील हॉस्पिटल पर्यंत येऊ शकले नाहीत.
अशा अत्यंत कठीण परिस्थितीत आमच्या बाळांचा जन्म झाला आहे. आम्ही हा दिवस अविस्मरणीय करण्याचं ठरवलं होतं.
आणि ‘कोरोना’ आणि ‘कोविड’ ही नाव ठेवून आम्ही एक संदेशही देऊ इच्छितो, ‘की ही लढाई एका प्राणघातक आजाराशीच नसून आपण आयुष्यभर स्वच्छ आणि सुरक्षित राहावं यासाठी देखील आहे.’
कोरोना आणि कोविड यांच्या जन्मानंतर आणि त्यांना मिळालेल्या नावानंतर हॉस्पिटलमध्ये ही बाळं आकर्षणाचा केंद्रबिंदू होते.
बाळाच्या जन्मानंतर बाळ आणि आईच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी सांगितलं होतं की,सगळ्यांची प्रकृती व्यवस्थित आहे.
महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये मुलगी झाली तर तिचं नाव ‘नकुशी’ असं ठेवलं जायचं. का? तर नको असताना एक मुलगी जन्माला आली.
पण पुढे ती मुलगी मोठी झाल्यावर आपण आपल्या आई-वडिलांना नको असताना जन्माला आलो, हा न्यूनगंड त्या मुलींच्या मनात कायम राहायचा.
म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांच हे लाजिरवाणं नाव बदलून आता नवीन नावं या मुलींना दिली आहेत.
म्हणूनच प्रीती आणि विनय हे कबूल करतात की कदाचित आम्ही पुढे आमच्या बाळांची नावं बदलू.
कारण जेव्हा ही बाळं मोठी होतील, आणि त्यांना कोरोना आणि covid-19 बद्दल समजेल त्यावेळेस नक्कीच त्यांना आपलं हे नाव आवडणार नाही.
पण सध्या तरी कोरोना आणि कोविड आपल्या नकळत्या विश्वात खुश आहेत.
नावांमुळे माणसांची ओळख होत असली तरी कोरोना आणि कोविड ही नावं ठेवण्यामागचा उद्देश लक्षात घेतला असता, तो नक्कीच सकारात्मक आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.