कोरोनाशी लढा देण्यासाठी आपली पिगीबँक तोंडणारे हे २ ‘छोटे दानशूर कर्ण’!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
जगभर आणि आपल्या देशभर कोरोनाची दहशत विळखा घालून बसलेली आहे आणि सर्व स्तरावर अगदी युद्ध पातळीवर कोरोनाशी चार हात केले जात आहेत!
आणि एक सहा तर एक सात वर्षांच्या मुलाने आपल्या पिगी बँकेतील जमवलेली सारी पुंजी या लढ्यासाठी अर्पण करून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
सध्या ट्विटरवरून सगळीकडे या लहानग्यांचं खूप कौतुक होत आहे. त्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. कोरोना व्हायरसच्या या आपत्तीकाळात सर्वच पातळीवर लोक लढत आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातील संशोधक, डॉक्टर्स, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी, पोलिस हे तर पहिल्या फळीतले लढाऊ कार्यकर्ते आहेत या आपत्तीकाळातले.
त्याचबरोबर अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील या काळात अडचणीत आलेल्या लोकांना मदत करताना दिसताहेत. कुणी अन्न-धान्य, फळं, जेवण वाटतंय, तर कुणी पैशांच्या स्वरूपात मदत करतंय.
देशपातळीवर पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी पीएम फंडात, तर राज्य पातळीवर मुख्यमंत्री आपल्या रिलीफ फंडात कोरोना विरुद्ध लढण्यासाठी मदतीचे आव्हान करताहेत.
आणि लोक त्या फंडांत भरभरून मदत करत आहेत.
कौतुकाची गोष्ट अशी आहे, की पंतप्रधानांचे हे आव्हान टिव्हीवर पाहून मिझोरममधील कोलासिब येथील वेंगलाई परिसरात राहणाऱ्या एका सात वर्षीय छोट्या मुलाने आपली पिगी बचत बँक तोडली!
आणि त्यात नाणी तसेच काही नोटांच्या स्वरूपात साठलेले ३३३ रुपये या फंडात देण्यासाठी आग्रह धरला. या मुलाचे नाव आहे रॉमेल लालमुआनसंगा.
त्याचे आईवडील सांगतात, की आपल्या पिगी बँकमध्ये साठलेले सगळे पैसे कोरोनाविरुद्धच्या लढाईत वापरले जावे अशी इच्छा त्या छोट्याने बोलून दाखवली.
त्याच्या आग्रहाचा मान राखून या छोट्याच्या पिगी बँकेतील ३३३ रुपये त्याच्या गावातच ग्रामीण पातळीवर लढल्या जाणाऱ्या कोरोनाविरुद्धच्या (COVID19) संघर्षासाठी दान करण्यात आले.
या बातमीने या छोट्याचे कौतुक सगळीकडे होत आहे. फक्त त्याच्या गावातले लोकच नव्हे, तर मिझोरमचे मुख्यमंत्री श्री. झोरमथंगा यांच्यापर्यंतही या छोट्याची ही बातमी पोचली.
त्यांनी ट्विटरवर ट्विट करून या बातमीसह रॉमेल लालमुआनसंगाचे तोंडभरून कौतुक केले आहे आणि त्याला आशीर्वाद देखील दिले आहेत. ते म्हणतात,
“हा आमचा छोटा हिरो आहे. देव या मुलाचे नेहमीच भले करो.”
मानस नावाच्या एका ट्विटर युजरने रॉमेलची ही कहाणी ट्विट करून सगळ्यांना कळवली.
त्यानंतर अशाच एका दुसऱ्या मुलाची कहाणी देखील जेएनयू येथील चळवळीतला कार्यकर्ता उमर खालीद याने ट्विट केली आहे.
हा छोटु अवघ्या सहा वर्षांचा असून आपल्या पिगी बँकेत साठवलेले सगळे पैसे त्या पिगी बँकेसह घेऊन तो पोलिस स्टेशनला आलेला व्हिडीओ व्हायरल केला आहे.
त्यात साठवलेले सगळे पैसे कोरोनाच्या उपायांवर खर्च केले जावेत अशी त्याची इच्छा आहे. या दोन्ही ट्विटमुळे सध्या या दोन्ही मुलांचे सगळीकडे खूप कौतुक होत आहे.
ही दोन्ही मुले सध्या हिरो झालेली आहेत. जे मोठ्या माणसांना पण सहजासहजी जमत नाही ते या दोन मुलांनी करून दाखवलेले आहे.
संकटसमयी आपल्या घासातला घास काढून देण्याची भारतीय संस्कृती या दोन लहानग्यांच्या रक्तात जन्मापासूनच आलेली आहे असे म्हणायला हरकत नाही.
या दोन लहानग्यांच्या घरातूनही अर्थात त्यांच्यावर असे संस्कार झाले असणार यात शंका नाही. लहान मुलं मोठ्यांचे अनुकरण करत असतात. मोठे वागतील तसेच ते वागण्याचा प्रयत्न करत असतात.
या दोन्ही मुलांच्या घरच्यांचे तसे संस्कार त्यांच्यावर झाले असणार. आपली वस्तू काढून देताना, आपल्याजवळच्या पैशांतून मदत करताना जिथे मोठी माणसे देखील हात आखडताना दिसतात!
तिथे हे दोन्ही छोटे हिरो मात्र आपल्या बँकेत साठलेली सगळीच्या सगळी रक्कम दान करण्यास आग्रही दिसतात. तिनशे रुपयांची बचत त्यांच्यासाठी फार मोठीच म्हणायला हवी.
पण त्यातले थोडे द्यावे असे न म्हणता ते सगळेच पैसे ही बच्चा कंपनी द्यायला तयार झालीय. तेव्हा छोटा पॅकेज बडा धमाका किंवा छोटी उम्र में बडी सोच असंच म्हणावंसं वाटतं.
त्यांचं वय लहान असलं तरी त्यांची कृती मोठ्यांनाही वर्तनाचा धडा देणारी आहे यात शंका नाही.
या दोन छोट्यांची ही बातमी वाचताना सन २०१९ मध्ये अशाच एका छोट्या मुलाची बातमी आलेली आठवतेय.
हा मुलगा देखील नॉर्थ इस्ट इंडिया भागातील ऐझवाळ येथील होता. त्याचे नाव होते डेरेक सी. लालछनहीमा. हा मुलगा आपली सायकल चालवत असताना त्याच्या सायकली खाली एक कोंबडी येऊन मेली होती.
त्या अपघाताने दुःख होऊन हा छोटु त्या मेलेल्या कोंबडीला घेऊन गावातल्या हॉस्पिटलमध्ये आला होता. त्याच्या एका हातात कोंबडी आणि एका हातात दहा रुपयाची नोट होती.
हॉस्पिटलमध्ये येऊन त्याने तिथल्या कर्मचाऱ्यांना या कोंबडीवर डॉक्टरांनी उपचार करावे अशी विनंती केली होती. आणि त्यासाठी आपल्याजवळ असलेले दहा रुपये देऊ केले होते.
तेव्हा त्या हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी त्या छोट्याच्या या वर्तनाने सद्गदीत झाले होते. सर्वांना त्याचं खूप कौतुक वाटले होते आणि तेव्हाही या छोट्याची बातमी सर्वत्र व्हायरल झाली होती. लोक त्याचं कौतुक करत होते.
कधी कधी मोठ्यां माणसांजवळ नसलेली सहृदयता आणि समज लहान मुलांमध्ये आढळते आणि आपण ती पाहून आश्चर्यचकीत होतो.
ज्या समाजात असे अधिकाधिक छोटे हिरो असतील तो समाज पुढे जाऊन सहृदय, मानवतावादी होणार यात शंका नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.