' कोरोना संकट : जागतिक मंदीतही, चीनची चांदी – InMarathi

कोरोना संकट : जागतिक मंदीतही, चीनची चांदी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : स्वप्निल श्रोत्री

===

गेले काही दिवस अंतरराष्ट्रीय राजकारणात प्रचंड मोठे बदल होत आहेत.

एकिकडे जागतिक महासत्ता असलेली अमेरिका नोवल कोरोना विषाणुंच्या वेढ्यात सापडली असताना चीन, दक्षिण कोरिया या राष्ट्रांनी कोरोनावर विजय मिळवण्याचे चित्र आहे.

कोरोना नावाच्या जीवघेण्या आजारांवर नियंत्रण मिळविताना युरोपातील उच्चभ्रू राष्ट्रांची अवस्था गलितगात्र झाली आहे.

 

corona in china inmarathi 1

 

असे असताना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी – जिनपिंग यांनी नुकतीच चीनमधील ‘लॉकडाऊन’ हटवण्याची घोषणा करून सर्व उद्योगधंद्यांना पूर्ववत काम करण्याचे आदेश दिले आहेत.

जागतिक पटलावर अशीच काहीशी परिस्थिती दुसऱ्या महायुद्धाच्या काळात होती. संपूर्ण जग दोन भागात विभागले असतानाच अमेरिका मात्र युद्धापासून लांब होती.

महायुद्धाची प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या कोणत्याही प्रकारचा संबंध नसलेल्या अमेरिकेने या काळात युद्धात सहभागी असलेला राष्ट्रांना युद्धसामग्री, जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय सेवा आणि आणि रोख कर्जाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर मदत केली.

 

second world war inmarathi
The National

 

परिणामी अमेरिकेतील उद्योगधंदे संपन्न झाले, भरभराट आली आणि अमेरिका ही  ‘अमेरिका’ म्हणून नावारूपाला आली.

पुढे जपानने अमेरिकेच्या पर्ल – हर्बर बेटावर हल्ला केल्यानंतर अमेरिका युद्धात उतरली खरी. परंतु, तोपर्यंत युद्धाचा निकाल जवळपास लागल्यात जमा होता.

जागतिक महायुद्धात उशीरा ‘एंट्री’ झाल्यामुळे अमेरिकेच्या प्रत्यक्ष भूमीवर कसल्याही प्रकारचा हल्ला किंवा बॉम्बफेक झाली नव्हती.

जिवीत व वित्तहानी सुद्धा जास्त झाली नाही. परिणामी, दुसऱ्या महायुद्धानंतर आलेल्या जागतिक मंदीत अमेरिका ही महासत्ता म्हणून पुढे आली. 

तर ह्यापूर्वी महासत्ता म्हणून ओळखले जाणारे ब्रिटन, फ्रान्स आणि ऑस्ट्रिया यांसारखी राष्ट्रे स्पर्धेत मागे पडली.

आज जवळपास तशीच परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. कोरोना नावाच्या विषाणूशी लढण्यात सर्व जग गुंतले असताना चीनने जागतिक परिस्थितीचा पुरेपूर फायदा उचलण्याचे धोरण अवलंबिले आहे.

 

corona test kit inmarathi 1
UN news

 

गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तू, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर सुरू असून संपूर्ण युरोपात त्याचा पुरवठा चीन मार्फत सुरू आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँकेने (वल्ड बँक) येत्या आर्थिक वर्षात येणारी महामंदी ही सन २००९ पेक्षा मोठी असल्याची भीती व्यक्त केली आहे.

पण ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय व्यापारात चीनची घोडदौड सुरू आहे त्यावरून येणाऱ्या मंदीचा फटका चीनला बसण्याची शक्यता अजिबात नसल्याचे निदर्शनास येते.

मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा चीनचा प्रयत्न

चीनच्या हुवेई प्रांतातील वुहान मध्ये डिसेंबर २०१९ मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या जगभर प्रसार झाला. सुरुवातीच्या काळात केंद्रबिंदू असलेला हुवेई पासून हे केंद्र आता युरोपात सरकले आहे.

युरोपात अचानक मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रूग्ण वाढल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटर, औषधे व वैद्यकीय उपकरणे यांचा तुटवडा निर्माण झाला.

 

corona test kit inmarathi

 

औषधांच्या कच्या मालाची जागतिक बाजारपेठ चीन असल्यामुळे औषधांसाठी लागणारा कच्चा माल, वैद्यकीय उपकरणे यांचा पुरवठा करताना चीनने अनेक युरोपीयन राष्ट्रांना अटी घातल्याच्या बातम्या अंतरराष्‍ट्रीय माध्‍यमांमध्‍ये प्रसिद्ध झाल्या.

युरोपातील काही राष्ट्रांना चीनने स्वतःची तुलना अमेरिकेशी करण्यास सांगून “आज आपण अमेरिकेपेक्षा कसे सरस आहोत” हे सांगण्याचा प्रयत्न केला.

मुळात, जो आजार चीनमुळे संपूर्ण जगात पसरला आहे. हजारो लोकांचे मृत्यू झाले.

लोक मृत्यूशी रोज झुंजत असताना मदतीच्या नावाखाली करण्यात येणाऱ्या व्यापाराचा आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वतःची ‘इमेज’ बनवण्यासाठी चीनचा प्रयत्न म्हणजे मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार होय.

बोगस उपकरणांचा पुरवठा अधिक

जगात सर्वत्र ‘लॉकडाऊन’ असल्यामुळे वैद्यकीय उपकरणांचा आणि अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा सर्वत्र जाणवित आहे.

त्यातच दिवसागणिक कोरोनारुग्णांची संख्या पटीने वाढत असल्यामुळे पूर्ण क्षमतेने सध्या चालू असणारे उद्योग सुद्धा हतबल झाले आहेत.

 

corona in china inmarathi
the new york times

 

साहजिकच, अशा काळात चीनकडे मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय उपकरणांची व औषधांची मागणी वाढते आहे.

ह्यातच चीनच्या नफेखोरीच्या धोरणाचा परिणाम म्हणून इटली, स्पेन, जर्मनी ह्या राष्ट्रांना चीनकडून मोठ्याप्रमाणा वर बोगस सॅनीटायझर, एन -९५ मास्क, व्हेंटीलेटर आणि कोरोना टेस्ट किटचा पुरवठा झाल्याची बातमी युरोपातील अनेक वृत्तसंस्थांनी नुकतीच दिली होती.

परिणामी, युरोपातील आरोग्याची परिस्थिती अधिक अधिकच गंभीर झाली.

आंतरराष्ट्रीय सूचनांकडे चीनचे दुर्लक्ष

सन २००३ ला सारस नावाच्या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रे, जागतिक आरोग्य संघटना ( डब्लूएचओ ) यांच्यावर अनेक राष्ट्रांनी चीनला वुहानमधील ‘सी – फूड मार्केट’ नियंत्रित करण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या होत्या.

 

wuhan fish market inmarathi
south china morning post

 

परंतु, जागतिक पातळीवरून येणाऱ्या सर्व सूचनांकडे चीनने दुर्लक्ष केल्याचा परिणाम म्हणून त्याच वुहानमधून सारसचे नवीन आणि अधिक शक्तिशाली रूप असलेला कोरोना आज सर्वत्र मृत्यूचे थैमान घालीत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेची हतबलता उघड

संयुक्त राष्ट्रांची अधिकृत संघटना असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेने ( डब्लूएचओ ) जागतिक पातळीवर पसरलेल्या महामारी विरोधात किंवा एखाद्या राष्ट्रात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यावर आक्रमक पाऊले टाकीत जागतिक पातळीवर नेतृत्व केल्याचा इतिहास आहे.

 

who imnarathi
mladiinfo

 

परंतु, कोरोना विषाणुंच्या बाबतीत डब्लूएचओ ने बरीच नरमाईची भूमिका घेतल्याचा आरोप अनेक आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांनी केला असून या आरोपात निश्चित तथ्य असल्याचे दिसून येते.

सदर आरोपांची २ प्रमुख कारणे सांगता येवू शकतात.

१) कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघटनेला दैनंदिन कामकाज चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज असते आणि तो निधी सदस्य राष्ट्रांकडून वर्गणीच्या स्वरूपात मिळत असतो.

गेल्या काही वर्षांपासून चीनकडून डब्ल्यूएचओ ला मोठ्या प्रमाणावर आर्थिक निधीचा पुरवठा होत आहे. त्यामुळे चीन विरोधात जर कठोर पाऊले उचलली तर चीन कडून येणारा निधी बंद होण्याची भीती डब्ल्यूएचओ ला वाटत असावी.

२) सध्या डब्ल्यूएचओ चे डायरेक्टर जनरल असलेले तेदरोस अदहानोम ग्रेबेयसुस हे चीनच्या पाठिंब्यावर डब्ल्यूएचओ च्या सर्वोच्च पदावर निवडून आले आल्यामुळे त्यांनी चीनबाबत नरमाईची भूमिका घेतली असावी.

थोडक्यात, पुढील काही काळात कोरोना नावाच्या विषाणुंवर मानवजात निश्चित नियंत्रण मिळवेल. परंतु, यापुढे प्रत्येक राष्ट्राने कमीत कमी आरोग्याच्या बाबतीत स्वावलंबी असावे हे चित्र अधोरेखित होते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?