कोरोनासमोर जे जगाला जमलं नाही ते इवल्याश्या ‘तैवान’ ने करून दाखवलंय…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक : कौस्तुभ पेंढारकर
===
चीननंतर कोरोनाचा प्रादुर्भाव होणाऱ्या देशांमध्ये तैवान एक देश होता. तैवानमध्ये कोरोना अवतरला २१ जानेवारीला, पण चीनच्या थापांना जसे बाकीचे भुलले तसा तैवान भुलला नाही.
३१ डिसेंबरला तैवाननं वुहानमधून येणाऱ्या सगळ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली. त्यात सहा वर्षांच्या एका मुलाला ताप भरला होता, त्याला विशेष देखरेखीखाली ठेवला होता.
५ जानेवारीपासून जे जे वुहानला अलीकडे जाऊन आले होते अशा सगळ्यांकडेच लक्ष दिले जाऊ लागले. म्हणजे कोरोना वायरसचा पहिला रूग्ण देशात आढळायच्या आधीपासूनच तैवाननं नीट काळजी घेतली होती.
पहिला रुग्ण आढळल्यावर तीन दिवसांत मास्कच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. १० रुग्ण आढळल्यावर त्यांनी शाळा बंद केल्या.
फेब्रुवारीतच त्यांनी चीनकडे जाणाऱ्या फेऱ्या एप्रिलपर्यंत बंद केल्यात. वैद्यकीय व्यावसायिकांनी ३० जूनपर्यंत धोक्याच्या देशांत जायचं नाही.
जुलैपर्यंत शिक्षकांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी देशाबाहेर जायचं नाही. १९ मार्चपासून परदेशी लोकांना तैवानमध्ये येण्यावर बंदी घातलीये.
चीनच्या मते तैवान हा चीनचा एक प्रांत आहे. पण प्रत्यक्षात तैवान हा स्वतंत्र देश आहे. चीनने WHO वर आणि ICAO वर दबाव आणून तैवानला कोणतीही मदत मिळू दिलेली नाही.
तैवानला या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून रोगाविषयी कोणतीही माहिती मिळत नाहीये. जानेवारीत चीनने दक्षिण तैवानात कोरोनाची साथ हाताबाहेर गेल्याची कंडीही पिकवली होती.
ती शुद्ध थाप असल्याचं नंतर लक्षात आलं.
आज तैवाननं कोरोनाच्या साथीवर उत्तम नियंत्रण ठेवलंय. तैवानची लोकसंख्या २ कोटी चाळीस लाख आहे. तिथे दिवसाला ९२ लाख मास्क तयार होतायत.
कोरोनाची प्रकरणं अद्याप ३२९ च आहेत. त्यातले ४५ बरे झालेत, आणि ५ जण दगावलेत.
कॅनडा, डेनमार्क, जर्मनी, इस्राइल, न्यू झीलंड, दक्षिण कोरिया (ज्याचं अवघं जग कौतुक करतंय), आणि अमेरिका या देशांनी तैवानने वेळच्या वेळी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं कौतुक केलंय.
तैवान आणि ऑस्ट्रेलिया यांनी एकमेकांना या संकटकाळात साहाय्य करायचं ठरवलं आहे. तैवान ऑस्ट्रेलियाला मास्क घडवण्यासाठी लागणारं ३ मेट्रिक टन कापड पुरवणार आहे.
आणि निर्जंतुकीकरणासाठी ऑस्ट्रेलिया तैवानला १० लाख लीटर अल्कोहोल पुरवणार आहे.
याचा वापर ७५ टक्के अल्कोहोल असणाऱ्या, ३०० मिली डिसइन्फेक्टंटच्या ४२ लाख बाटल्या तयार करण्यासाठी होणार आहे. तैवानमधलं ९०% अल्कोहोल ऑस्ट्रेलियातून येतं.
तैवान अमेरिकेलासुद्धा १ लाख मास्क दान करणार आहे. आणि अमेरिका तैवानला ३००,००० हॅझमॅट सूट्स (संरक्षक वस्त्रं) देणार आहे.
तैवानचं अधिकृत नाव ‘रीपब्लिक ऑफ चायना’ आहे. चीनच्या मुख्य भूमीवर आपला खरा हक्क आहे, ही तैवानची भूमिका आहे (जी योग्य आहे. अधिक माहितीसाठी माओचा रक्तरंजित इतिहास वाचा).
आपल्या या भूमिकेमुळे, आणि चीनचा तैवानवर उलट दावा असल्यामुळे, तैवान आज संयुक्त राष्ट्रातील सदस्य राष्ट्र नाही. तैवान जागतिक आरोग्य संस्थेचाही सदस्य नाही.
जे देश तैवानचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करतात, त्यांच्याशी नाती जोपासण्यास कोरोना वायरसचा, सार्स वायरसचा, स्पॅनिश फ्लुचा जनक असणारा कम्युनिस्ट चीन नकार देतो.
आणि चीनच्या वाकड्यात शिरण्यास कोणी धजावत नाही. भारतही तैवानला अधिकृत मान्यता देत नाही. पण तरी भारताचे तैवानशी व्यापारी संबंध आहेत.
आणि ते वाढत राहण्यात दोघांचाही फायदा आहे, कारण दोघांनाही चीनला निष्प्रभ करायचं आहे.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.