“लॉकडाउन” न करता या देशाने दिलाय कोरोनाशी सामना करण्याचा नवीन-यशस्वी फॉर्म्युला
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सध्या तरी जगात फक्त कोरोनाचाचं बोलबाला झालेला आहे. बातम्या, सोशल मीडिया वर मिम्स किंवा तत्सम मटेरीयल, मित्रांमध्येही तीच चर्चा.
भारतात तर लॉक डाऊन तर झालंच आहे. लॉक डाऊन न केल्याचे तसेच सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याचे परिणाम आधी इटली आणि आता अमेरिका भोगत आहेतच.
जगात असा देखील एक देश आहे, ज्याने लॉक डाऊन न करता कोरोनाच्या संसर्गाला आळा घातला आहे. आपण बोलत आहोत, ‘दक्षिण कोरिया’ बद्दल!
आपल्या मुत्सद्दी निर्णयाने देश बंद न करता दक्षिण कोरियाने हे संकट बऱ्यापैकी कंट्रोल मध्ये आणलं आहे. म्हणजे, इन्फेक्शनचा जो चढता आलेख होता तो त्यांनी फ्लॅट म्हणजेच कॉन्स्टंट ठेवण्यात यश मिळवलं आहे.
आधी हा आलेख फ्लॅट ठेवला म्हणजे नेमकं काय ते बघूया.
जस आपण भारतात बघितलं की, फेब्रुवारी मध्ये जेव्हा एक केस दाखल झाली तसं दिवसेंदिवस कोरोनाच्या केसेस वाढत गेल्या आणि बघता बघता ५० दिवसात आज १००० च्या घरात ही संख्या आली.
म्हणजेच या ५० दिवसांचा जर आपण आलेख बघितला तर तो चढता आहे. १ पासून सुरवात झाली आणि ५० व्या दिवशी थेट १०००. आजही ही संख्या वाढतंच आहे.
कदाचित हा लेख तुम्ही वाचताना आकड्यांमध्ये अजून बदल झालेला असेल. मात्र, दक्षिण कोरिया मध्ये हेच केसेस दाखल होण्याचे प्रमाण कॉन्स्टंट आहे.
पहिल्या दिवशी संक्रमणाच्या १० केसेस दाखल झाल्या, तोच दहाव्या दिवशी पण केसेसचा रेट हा १०चं होता. विसाव्या दिवशी सुद्धा दहाच. इन्फेक्शन न वाढत होतं ना कमी होत होतं.
याचाच अर्थ असा की, दक्षिण कोरिया मध्ये इन्फेक्शन आणि दिवस यांचा आलेख हा जिओमेट्रिकल भाषेत फ्लॅट म्हणजेच सरळ रेषेत आहेत.
पण हे कसं शक्य झालं?
भरपूर स्ट्रॅटेजी बनवली गेली. त्यानुसार आखणी करून भरपूर काम केली गेली. आणि हे आंशिक यश त्यांनी प्राप्त केलं.आंशिक का? ते नंतर सांगू.
पण या आंशिक यशाला सुद्धा इतर जगाच्या मानाने मोठी सफलता म्हणण्यात येत आहे.
तर हे शक्य कसं झालं ते पाहूया.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाच्या केसेस दाखल व्हायला लागल्या.
जशी पहिली केस दाखल झाली तशी दक्षिण कोरियाची सरकारी यंत्रणा जागी झाली आणि जवळपास सगळ्या कोरियन फार्मा कंपनीशी त्यांनी मीटिंग चालू केल्या.
कोरोनाच्या लसी वर तर त्यांनी काम करावंचं पण त्याचवेळी त्यांनी भारी प्रमाणात टेस्टिंग किट च्या प्रोडक्शन ला सुरवात करावी अशी सूचना त्यांना देण्यात आली.
लाखोंच्या घरात टेस्टिंग किट तयार करून संपूर्ण दक्षिण कोरियाच्या विविध भागात ते पाठवण्यात आले. जनतेला टेस्ट कॅम्पलसरी करण्यात आली. लहानातला लहान असो वो वृध्दातला वृद्ध सगळ्यांनाच.
दायगु. दक्षिण कोरिया मधलं शहर जिथे पहिली कोरोनाची केस सापडलेली. लोकल चर्चच्या माध्यमातून इथे संसर्ग झालेला. हे चर्च बंद करण्यात आलं.
सगळी स्थानिक काम बंद करण्यात आली आणि प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी टेस्टिंग सुरू झाली. ही तपासणी थक्क करणारी आहे.
ही लोकल ट्रान्समिशनची फेज होती. त्यामुळे जेवढ्या जास्त टेस्ट करता येतील तेवढ्या करण्यात येत होत्या.
न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, दक्षिण कोरियाने ट्रान्समिशन फेज मध्ये सर्वाधिक टेस्ट केल्या. जवळपास तीन लाखाच्या घरात त्यांनी जनतेच्या टेस्ट केल्या.
दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री यांनी मुलाखती मध्ये सांगितलं,
“तपासणीला आम्ही केंद्रस्थानी ठेवलेलं. त्यामुळे संक्रमित रुग्णांची माहिती लवकर मिळू शकली. जे रुग्ण सापडले त्यांना तत्काळ आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आलं.
आणि त्वरित त्यांच्यावर उपचार सुरू झाले. यामुळे संक्रमणचा रेट कंट्रोलमध्ये ठेवण्यात आम्हाला यश आलं.” पण प्रश्न होतो गर्दीचा.
हॉस्पिटल आणि टेस्टिंग लॅब ला यापासून लांब ठेवायचं होत. यावर पण त्यांनी उपाय काढले. चालते फिरते ६०० लॅब त्यांनी सुरू केले. रस्त्यावर गाडी अडवून लोकांच्या टेस्ट केल्या जाऊ लागल्या.
ताप आहे का, सर्दी, खोकला अशी काही लक्षण दिसली की त्वरित त्यांचे सॅम्पल घेऊन ते तात्काळ फोन बुथ सारख्या चौकाचौकात तयार केलेल्या लॅब मध्ये पाठवले जाऊ लागले.
आणि तासाभरात त्याचे रिपोर्ट्स हातात मिळू लागले.
हॉटेल, ऑफिस, रेल्वे/बस स्थानक येथे थर्मल कॅमेरे बसवले गेले. ज्याचं तापमान जास्त दिसेल त्याला त्वरित तिथून उचलून हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं.
माहिती प्रसारित करण्यासाठी अँप बनवलं गेलं. लोकांनी काय करावं काय करू नये याची सूचना वेळोवेळी दिली गेली. ‘जागृत जनता’ हे कोरियन जनतेने इथे सिद्ध केलं.
दक्षिण कोरिया मध्ये टेस्टिंगच्या हिशोबाने मेडिकल प्रोफेशनल कमी आहेत. जनतेला खबरदारी घ्यायला सांगितले गेले. मास्क,सॅनिटायझर सारख्या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्या गेल्या.
सार्वजनिक ठिकाणी फिरताना काळजी घ्या सांगण्यात आलं. जवळपास सर्व सार्वजनिक ठिकाणी कोरोना संबंधित घ्यावयाची काळजी प्रसारित करण्यात येत होती.
आणि हे सगळं फळाला आलं. जनतेने योग्य खबरदारी घेऊन सुरक्षेची कमान आपल्या हातात घेतली. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात संक्रमणाला चाप बसला.
पण जेव्हा एखादा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती सापडायचा, नंतर काय?
अशी एखादी व्यक्ती सापडली की त्याची पूर्ण हिस्ट्री काढली जायची. फोन, ट्रॅव्हल, क्रेडिट/डेबिट व्यवहार सगळं सगळं. लोकांची प्रायव्हसी धोक्यात येईल अशी चिन्ह होती.
प्रवास केला असेल तर तिथल्या सगळ्या लोकांना आयसोलेट केलं जाऊ लागलं. ज्या मार्केट मध्ये खरेदी केली तिथल्या लोकांना टेस्ट साठी संपर्क करण्यात येऊ लागला.
ज्या भागात ती व्यक्ती राहायची, तिथे सगळ्यांना गाईडलाईन्स फॉलो करायला भर लावला.
जनतेने पण प्रायव्हसीच्या आधी आपल्या आरोग्याकडे जास्त फोकस केला. प्रायव्हसीपेक्षा जीव महत्वाचा जाणून त्यांनी या सरकारी कामात आडकाठी नाही घातली.
याचा परिणाम असा झाला की, लोकांना घरच्या घरी ट्रीटमेंट मिळायला लागली आणि जर जास्तच गंभीर केस असेल तर त्यासाठी हॉस्पिटलमध्ये जागा मिळू लागली.
हॉस्पिटल फक्त गंभीर रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आली आणि कोरोनापासून रेकॉर्डब्रेक मृत्यूदर दक्षिण कोरियाने आटोक्यात आणला.
जिथे पाचशे-हजाराच्या घरात कोरोनामुळे लोकांचे जीव जात होते, तिथे दक्षिण कोरियाने कोरोनामुळे सर्वाधिक कमी मृत्यूदराचा रेकॉर्ड केला.
या सगळ्याचा फायदा असा की दक्षिण कोरियाचे रेडिमेड किट १७ देशांमध्ये पोहोचले. वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तर तोंडभरून दक्षिण कोरियाचे कौतुक केले.
तर आंशिक यासाठी की, दक्षिण कोरियाची जनता अजून आजारी पडत आहे. पण याचा रेट पूर्वीपेक्षा भरपूर कमी आहे.
पूर्ण सफलता कधी म्हणता येईल? जेव्हा तोच सरळ आलेख जेव्हा खाली पडेल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.