आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपण पहात आहोत की इटली, स्पेन, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका यासारख्या आर्थिक दृष्ट्या प्रबळ आणि आरोग्यदृष्ट्या प्रगत देशांना देखील कोरोनाचा सामना करणे कठीण होत आहे.
तिथल्याही आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस यावर काम करीत आहेत, मात्र तरीही त्यांच्यासाठी देखील हे आव्हान अवघड वाटत आहे.
भारतात जसा कोरोनाचा धोका वाढत आहे तसा आरोग्य यंत्रणेवर ही ताण येत आहे. भारतात आरोग्यविषयक उपकरणांचीही कमी आहे.
कोरोनाची चाचणी करण्यासाठी लागणाऱ्या किट्स देखील जास्त नाहीत. जसे रुग्ण वाढत जातील तस-तशी या किट्स ची आवश्यकता प्रचंड भासेल. भारताकडे तर अशा किट्स नव्हत्या.
याबाबत आपण दुसऱ्या देशांवर अवलंबून होतो, परदेशातून आयात केलेले किट्स वापरले जायचे. त्यामुळे भारतावर टीका होत होती.
आपल्याकडे साधे किट्स नाहीत, तर उपचार कसे होतील? याच्या चर्चा सगळीकडे होत होत्या. कुठल्या देशातून किती किट्स मागवल्या हे सांगितलं जात होतं.
परंतु आपल्या देशातही त्याबाबत संशोधन सुरू होतं. असे भारतात तयार होतील का ,आणि ते वापरता येतील का, हे पाहिलं जात होतं.
भारतातील अनेक लॅब मधील विषाणूतज्ञ (व्हायरोलॉजिस्ट)यावर संशोधन करत होते. शेवटी भारतातल्या एका लॅबला यामध्ये यश मिळालं.
पुण्यातल्या मायलॅब या फार्मासिटिकल कंपनीला हे किट तयार करण्यात यश आलं.
या यशात महत्त्वाचा भाग होता, तो म्हणजे हे किट ज्यांनी तयार केलं त्या, ‘मीनल भोसले’ या गरोदर होत्या, आणि त्यांचे प्रेग्नन्सीचे दिवस संपत आले होते.
तरीही त्यांनी हे किट तयार करण्याचं चॅलेंज घेतलं होतं, आणि यशस्वीरित्या त्यांनी ते कीट तयार केलं आहे.
या किटचं वैशिष्ट्य म्हणजे हे कीट एकाच वेळेस शंभर चाचण्या करता येतात, आणि तेही फक्त बाराशे रुपयात. बाहेरून जे कीट मागवले आहेत, त्यासाठी येणारा खर्च हा साडेचार हजार रुपये आहे.
त्यामुळे भारतात याची चाचणी आता कमी खर्चात होणार आहे. या विषयी बोलताना मीनल डाखवे भोसले म्हणाल्या की या किटमध्ये चाचणी केल्यानंतर होणारं निदान हे फक्त दोन ते अडीच तासात कळतं!
तर परदेशी किटमध्ये हा वेळ सहा ते सात तास होता.
मीनल भोसले या कोरोना किट प्रोजेक्टच्या हेड होत्या. या किट्सचं डिझाईनिंग त्यांनीच केलं आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार जे कीट तयार करण्यासाठी जवळजवळ सहा-सात महिने लागणार होते, ते त्यांनी आणि त्यांच्या टीमने हे फक्त सहा आठवड्यात तयार केले आहे, जो एक रेकॉर्ड आहे.
मीनल भोसले या प्रेग्नेंट असताना देखील त्यांनी हे किट तयार व्हावे म्हणून खूप प्रयत्न केले.
त्यांच्या म्हणण्यानुसार
“हे एक चॅलेंज होतं. कारण भारतात कोरोनाचे रुग्ण वाढणार, ही शक्यता होती. आणीबाणीची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे, पण मी हे चॅलेंज स्वीकारायचं ठरवलं.
मला माझ्या देशासाठी असं काहीतरी करायला मिळालं याचा मला आनंद आहे. देशासाठी काहीतरी चांगलं करायचं ही माझी इच्छा होती”.
त्यांच्यासह या प्रोजेक्टमध्ये अजून दहा जण सामील होते. या सगळ्यांनी यासाठी कठोर परिश्रम घेतले.
हे किट तयार झाल्यानंतर ते पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ( NIV ) येथे १८ मार्चला देण्यात आलं.
डिलिव्हरीसाठी ऍडमिट होण्यापूर्वी त्यांनी त्या किटचं प्रपोजल FDA आणि ड्रग्स कंट्रोल ऑथोरिटी (CDSCO) येथे त्याच्या कमर्शियल वापरासाठी परमिशन मिळावी म्हणून सबमिट केलं.
नंतर त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्या आणि तिकडे त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला.
याबद्दल बोलताना मायलॅबचे डॉक्टर वानखेडे म्हणतात,
“की आमची अक्षरशः वेळशी स्पर्धा सुरू होती आमची प्रतिष्ठा पणाला लागली होती, सगळ्या गोष्टी नीट व्हाव्यात याकडे आमचं पहिल्यांदा लक्ष होतं.
आणि मीनल प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून होत्या, टीममधला प्रत्येक जण आपलं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करत होता.”
ते पुढे म्हणतात, “हे किट सबमिट करण्यापूर्वी त्याच्या प्रत्येक टेस्ट करणे गरजेचं होतं. आम्ही प्रत्येक पायरीची चेकिंग रिचेकिंग खूप वेळा केलं, हे करण्यासाठी खूप काळजी घेतली.
चाचणी नंतर होणार निदान हे अगदी अचूक आणि नेमके येण्याकरिता ज्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, प्रमाणानुसार सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत याची आम्ही अगदी व्यवस्थित काळजी घेतली होती.
जर तुम्ही १० टेस्ट या एका सॅम्पल साठी घेतल्या तर येणारे दहा रिझल्ट देखील सारखेच असावे लागतात. त्यामुळेच होणाऱ्या निदानाची अचूकता वाढते.
आणि जेव्हा हे आम्हाला करणं शक्य झालं तेव्हा मी आम्ही हे किट तयार आहे हे जाहीर केलं”.
२६ मार्चला त्यांचं पहिलं किट बाजारामध्ये आलं त्यामुळे फ्लूची लक्षणे दिसणार्या पेशंटचे देखील टेस्टिंग या किटमध्ये करता येणे शक्य होणार आहे. आणि तो पेशंट कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही हे कळणार आहे.
पुण्यातल्या माय लॅब मध्ये विकसित केलेलं हे किट असून यामध्ये एकाच वेळेस १०० तपासण्या करता येतात. हे किट तयार करण्याची पूर्ण परवानगी सरकार कडून मायलॅबला देण्यात आली आहे.
आत्तापर्यंत पुणे, मुंबई, दिल्ली, गोवा, बेंगलोर याठिकाणी पहिल्यांदा बनलेले १५० किटचे वाटप करण्यात आले आहे. आता सोमवारी दुसरे बनवलेले किट्स पाठवण्यात येतील.
सरकारमान्य ICMR च्या अंतर्गत असलेली NIV ने मायलॅब या फर्मला हे किट्स बनवायची आता परवानगी दिली आहे. भारतात आधी दहालाख लोकांच्या मागे फक्त 6.8 असेच किट्स होते.
त्यामुळेच भारतावर टीका होत होती, भारतात ह्या टेस्ट लगेचच होत नव्हत्या त्याच्यावर काही अटी घालण्यात आल्या होत्या जशा की,
कोरोना हायरिस्क देशांमधून जे प्रवासी भारतात येतील ते जर कोरोना पॉझिटिव निघाले तर त्यांच्या संपर्कातील कुणी आजारी असेल तर फक्त त्याच लोकांच्या चाचण्या केल्या जायच्या.
जसे रुग्ण वाढायला लागले तशी किट्सची गरजही वाढली.
आता सरकारने खाजगी लॅबना देखील अशा चाचण्या करण्याची परवानगी दिली आहे. आता मोठ्या प्रमाणात चाचण्या करणे शक्य होणार आहे असे डॉक्टर वानखेडे म्हणतात.
म्हणूनच मायलॅबला मिळालेले यश मोठं आहे. मीनल भोसले यांनी हे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेललं.
हिरकणीने आपल्या बाळासाठी अवघड कडा उतरला तर मीनल भोसले यांनी आपल्या बाळाला सुरक्षित आयुष्य, भविष्य लाभू दे म्हणून प्रयत्न केले.
अशा प्रयत्नांतूनच आपण कोरोनावर मात करू हे नक्की.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.