कोरोना संकट : इटलीत अडकलेल्या २६३ भारतीयांना परत आणणारी ‘सुपरवुमन’ कॅप्टन!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
इटलीतील वाढलेल्या करोना रूग्णग्रस्तांची संख्या आणि होणारे मृत्यू यांचे आकडे पाहता तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांबद्दल भारत सरकारला चिंता वाटायला लागली.
विशेषतः इटलीमध्ये शिकायला गेलेल्या विद्यार्थ्यांना याची लागण होऊ शकेल म्हणून इथले पालक चिंतेत होते. त्यासाठी भारत सरकारने अशा नागरिकांना, विद्यार्थ्यांना तिथून परत आणण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी सरकारने एअर इंडियाच्या एका विशेष विमानाची सोय केली. त्यातून अशा भारतीय विद्यार्थ्यांना, नागरिकांना परत आणायचं ठरलं आणि पहिल्यांदाच ही जबाबदारी एका महिला पायलट कडे आली.
त्या महिला पायलट म्हणजे कॅप्टन स्वाती रावळ.
ठरल्यानुसार एअर इंडिया बोईंग ७७७ हे विमान घेऊन स्वाती रावळ इटलीला गेल्या, आणि २२ मार्चला २६३ लोकांना घेऊन परत आल्या.
इटलीतील विमानसेवा सध्या बंद आहे अशा वेळेस इतक्या लोकांना एअरलिफ्ट करणं हे तसं कठीण होतं. परंतु स्वाती रावळ यांनी आपले को-पायलट राजा चौहान यांच्या साथीने इतक्या लोकांना परत आणलं.
इतकं मोठं रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या त्या पहिल्याच महिला पायलट ठरल्या म्हणूनच त्यांचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील स्वाती रावळ यांचं कौतुक केले आहे. त्याबद्दलच ट्विट करताना मोदी म्हणतात की,
“कठीण प्रसंगात देखील धीर दाखवून संकटाचा सामना करतात तेच खरे योद्धे असतात. स्वाती रावळ या अशाच आहेत ज्यांनी २६३ भारतीयांना इटली मधून आणलं. भारताला अशा व्यक्तींचा अभिमान आहे.”
एअर इंडियाच्या टीमचं कौतुक देखील नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी माणुसकी दाखवून हे काम पार पाडलं, म्हणून त्यांचे अभिनंदन केले आहे.
स्वाती रावळ या एअर इंडियात पायलट म्हणून काम करतात. पण त्या मूळच्या गुजरात मधल्या भावनगर येथील आहेत.
त्या सध्या दिल्लीत राहत असून त्यांना दोन मुले आहेत!
तरीही अशा संकटाच्या काळात आणि कोरोना सारख्या आजाराचं सावट असताना देखील त्यांनी इटलीसारख्या कोरोनाग्रस्त झालेल्या देशात जाऊन आपलं कर्तव्य पार पाडलं.
वैमानिक व्हायचं त्यांचं स्वप्न होतं. रायबरेली येथून कमर्शियल पायलट व्हायचं ट्रेनिंग त्यांनी घेतलं, आणि त्या वैमानिक झाल्या.
एअर इंडिया मधून जेव्हा त्यांना वीस तारखेला फोन गेला आणि विचारलं की इटलीमधील मध्ये अडकलेल्या काही नागरिकांना भारतात परत आणायचं आहे तर तुम्ही ते करू शकाल का?
त्यांनी कोणताही विचार न करता लगेच होकार दिला. कारण इटलीमधील परिस्थिती खरोखरच बिकट झालेली आहे, तिथे किती जणांना करोना आहे हेही आता कळत नाहीये.
तरी अशा परिस्थितीत जाऊन त्यांनी २६३ भारतीयांना परत आणलं.
त्यांची ही कामगिरी त्यांचे पती अजित कुमार भारद्वाज यांनी पहिल्यांदा ट्विट करून देशाला सांगितली. त्यात ते म्हणतात ते म्हणतात की,
“भारताला गरज असताना माझ्या पत्नीने ही कामगिरी केली याबद्दल मला तिचा अभिमान आहे”.
त्यानंतरच भारतातल्या बऱ्याच जणांनी ही पोस्ट व्हायरल केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वाती रावळ यांचं कौतुक केलं, हेदेखील स्वाती रावळ यांना माहित नव्हतं.
कारण स्वाती रावळ यांचं ट्विटर अकाउंट तोपर्यंत नव्हतं. जेव्हा त्यांच्या पतीने त्यांना सांगितलं की पंतप्रधानांनी तुझं कौतुक केलं आहे, तेव्हा त्यांना ही गोष्ट माहीत झाली.
त्यानंतर २४ मार्चला स्वाती रावळ पहिल्यांदा ट्विटरवर आल्या आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. आणि मी फक्त माझं कर्तव्य केलं आहे असं म्हटलं.
माझ्या कामात एअर इंडियाच्या टीमने मला खूप मदत केली. ग्राउंड लेव्हलवर त्या टीमने काम केल्यामुळेच हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी होऊ शकलं.
त्या टीमची देखील मी खूप आभारी आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.
परंतु सध्या देशात असा एक ट्रेंड सुरू झाला आहे की जे लोक करोना व्हायरस च्या पेशंटला मदत करतायेत, त्यांच्यापासून देखील आपल्याला धोका आहे असा एक समज पसरलेला दिसून येतोय.
त्यामुळे करोना पेशंट, संशयित लोकांना मदत करणाऱ्या लोकांना दुसऱ्याच गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे.
अगदी डॉक्टर्स, नर्सेस आणि हवाई क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या वैमानिक हवाई सुंदऱ्या या सगळ्यांनाच लोक विरोध करत आहेत.
किंवा तुमच्यामुळे आम्हाला कोरोना व्हायरसची भीती आहे, तुम्ही आमच्या सोसायटीत राहू नका असा त्यांच्यावर दबाव आणत आहेत.
या लोकांमुळे व्हायरस पसरण्याचा धोका आहे अशा अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे या लोकांच्या कुटुंबियांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
खरंतर हे लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून, केवळ माणुसकीच्या नात्याने मदत करत आहेत. परंतु त्यांना खूप खूप विचित्र अनुभव समाजातून मिळताहेत.
सध्या तर असंही चित्र पाहायला मिळत आहे की पुण्या-मुंबईत राहणारी लोकं जर गावात गेली तर त्यांना गाववाले प्रवेश देत नाहीत.
करोनामुळे सोशल डिस्टन्सिंग वाढवा असं सांगितलं जात असल्यामुळे या लोकांना दुजाभवाचा सामना करावा लागत आहे.
अशीच एक घटना इंडिगो मध्ये कॅबिन क्रू असणाऱ्या एका महिलेच्या बाबतीत घडलेली आहे.
तिच्या म्हणण्यानुसार ती आणि तिची आई हे दोघेच राहतात!
पण ती विमानातील कॅबिन क्रू असल्यामुळे तिच्या सोसायटीतील लोक तिच्या आईला त्रास देत आहेत की तुमची मुलगी हवाई प्रवास करते, त्यामुळे तुम्हालाही करोना होईल.
तसंच तुम्हा दोघींमुळे सोसायटीला देखील करोनाचा सामना करायला लागेल. त्यापेक्षा तुम्हीच ही सोसायटी सोडून निघून जा, तुम्ही लिफ्ट वापरू नका.
अशाप्रकारे त्या दोघींचं मानसिक खच्चीकरण सोसायटीकडून केलं जात आहे.
अशा घटना बऱ्याच हवाई क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना येत आहेत. ज्यामध्ये पायलट, कॅबिन क्रू मध्ये काम करणारे लोक यांना त्रास होत आहे.
त्यांचे घर मालक किंवा सोसायटी त्यांना घर सोडून निघून जाण्यासाठी दबाव आणत आहेत.
म्हणून एअर इंडियाने एक पत्रक काढून पायलट आणि कॅबिन क्रू मध्ये असणाऱ्या लोकांशी असं वागू नका अशी विनंती केली आहे.
त्यांचा प्रवास कसा सेफ राहील याची पुरेपूर काळजी हवाई कंपन्या घेत आहेत. असंही त्या पत्रकात म्हटलं आहे. कारण त्या लोकांमुळेच हवाई वाहतूक सुरक्षित आहे आणि त्यांना सुरक्षित ठेवणे ही आमची जबाबदारी आहे.
या अशा घटनांमुळे समाजामध्ये दुफळी माजल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु अशाच लोकांमुळे खरंतर आपल्या सगळ्यांचं जीवित सुरक्षित आहे.
त्यामुळे या लोकांना अशा दुजाभावाची वागणूक न देता त्यांना शक्य होईल तितकी मदत आपण सर्वांनीच केली पाहिजे.
केवळ या लोकांबद्दल गॅलरीत उभे राहून टाळ्या वाजवल्या म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.