आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
संपूर्ण जगाला एका मोठ्या समस्येने घेरलं आहे आणि ती म्हणजे कोरोना! कोविद-१९ विषाणू ची साथ आता सर्वव्यापी झाली आहे. या संसर्गिक विषाणू पासून आपल्या घराचा बचाव करण्याच्या उपायांकडे सर्वांचं लक्ष आहे.
ह्या विषाणूची इतकी भीती आहे की सरकारने सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर, जमावर बंदी घातली आहेत. बरेचसे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
सार्वजनिक जागा जसे सिनेमागृहे, नाट्यगृहे, कार्यालये इतकेच नव्हे तर शाळा-कॉलेजेस् पण बंद ठेवण्यात आले आहेत. फक्त अत्यावश्यक सेवा-सुविधा सुरू आहेत.
करोना विषाणू सर्व जगभर पसरलेला आहे. भारतात करोनाग्रस्त आणि संशयितांचा आकडा हा ४०० च्या घरात पोहचला असून त्यांची योग्य ती ट्रीटमेंट चालू आहे!
काय त्या एवढ्याशा विषाणूने आपल्या सर्वांनाच घरात कैद होण्यास भाग पाडले आहे.
घरी असतांना आपण एरवी करत असलेल्या, आपल्या दैनंदिनी चा भाग असलेल्या गोष्टी आता या काळात करण्यावर मर्यादा आलेल्या आहेत.
व्यायामशाळा,पोहण्याचे तलाव फिरण्यासाठीच्या बागा आठवड्याभरापासूनच बंद आहेत.सामान्य व्यक्तीच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
जर तुम्ही मधुमेही व्यक्ती असाल तर तुम्ही नक्कीच अधिकची काळजी घेतली पाहिजे कारण, हालचालींवर बंधनं आल्याने एका जागी बसण्याचे प्रमाण वाढून रक्तातील शर्करा वाढू शकते.
सहसा, मधुमेही रुग्णांमध्ये जेव्हा साखर अनियंत्रित पद्धत्तीने वाढते तेव्हा ती बाकी अवयवांप्रमाणे त्यांच्या प्रतिकार शक्ती वर सुद्धा परिणाम घडवून आणते.
करोना ग्रस्त व्यक्तीची प्रतिकारक्षमता जर मजबूत असली तर त्या विषाणूंना शरीर आपोआप मारून टाकते मात्र त्या काळात असा व्यक्ती संसर्ग पसरवू शकतो.
पण ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांची प्रतिकारशक्ती अगोदरच खालावलेली असते आणि जर ही लोकं करोनाग्रस्त व्यक्तीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात आली तर ह्यांना करोना चा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.
आता पर्यंत जगभरात एकूण रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर ही गोष्ट डॉक्टरांच्या निदर्शनास आलीये.
मधुमेहींनी घाबरून जाण्याचं कारण नाही परंतु अधिक सावध राहून स्वतःची किंवा आपल्या आजूबाजूला जे मधुमेही आहेत त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.
खाली दिलेल्या काही सध्या सूचना जर अमलात आणल्या तर मधुमेहींना कोरोना पासून स्वतःचा बचाव करणं अधिक सोपं जाईल.
१. रक्तातील शर्करा वरचेवर तपासा
सध्याच्या तणावाच्या काळात, तसेच घरी कैद झाल्याने शारीरिक हालचाल मंदावल्यावर रक्तातील साखर वाढु शकते. त्यामुळे शक्य असल्यास वरचेवर तपासणी करा.
जर घरी रक्तदाब पाहण्याचं यंत्र असल्यास वरचेवर तपासणी करा.
२. पुरेश्या औषधांचा साठा
जर तुम्ही एकटे राहत असाल तर स्वतः शर्करा नियंत्रित करणाऱ्या पुरेश्या औषधी चा मुबलक साठा जवळ ठेवा. किंवा तुमच्या घरातील कोणाला तरी संबंधित औषधे घेऊन यायला सांगा
३. डॉक्टरांशी संपर्कात राहा
सगळीकडेच एक चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, पण तरीही मधुमेही लोकांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरच्या संपर्कात राहावे!
शक्य असल्यास तुमच्या फॅमिली डॉक्टर सोबत फोन वरून संपर्कात राहा. त्यांचा सल्ला वेळोवेळी घेत चला.
४. कर्बोदके विसरू नका
जर तुम्हाला लो शुगर असेल तर साध्या कार्बोदकांचा आहारात समावेश असू द्या. आपल्या भारतीय अन्नामधून कर्बोदके मुबलक प्रमाणांत मिळतात.
५. खाण्यात कल्पकता आणा
घरात कोंडल्याने तेच तेच खाऊन तुम्ही कंटाळाल..आणि तेव्हा नवीन काहीतरी खाण्याच्या नादात तुमचं पथ्यं मोडून बसाल!
त्या ऐवजी तुमच्या नेहमीच्या खाण्यात कल्पकता आणा म्हणजे जर तुम्ही मोड आलेले मूग खात असाल तर कधी ते नुसतेच खा, कधी त्याची भेळ करून खा अथवा मुगाचे डोसे करून खाल्ले तरी उत्तम!
याने तुम्हाला तेच तेच खाल्ल्याच फिलिंग येणार नाही आणि पथ्य सुद्धा पाळलं जाईल.
६. दररोज व्यायाम करा
बाहेर न जाण्याचा बहाणा दाखवून घरी रिकामे बसू नका. निष्क्रिय राहिल्याने रक्तातील साखर वाढू शकते. घरातल्या घरात फिरा, जर गच्ची असेल तर उत्तमच!
तुम्हाला मोकळ्या हवेत फिरता येईल. जमेल तेवढी आसनं, स्ट्रेचिंग किंवा तुम्ही नेहमी जो व्यायाम करत असाल तो करा. लक्षात ठेवा मनावरचा तणाव व्यायामाने चटकन घालवता येतो.
इंटरनेट वर बऱ्याच साईट वर तुमच्या वयाला जमेल असे व्यायाम प्रकार त्यांचे व्हिडिओ पाहून ते करण्याचा सुद्धा प्रयत्न करता येईल.
७. पुरेशी झोप घ्या
नेहीमच पुरेशी झोप घ्या. जागरणाने शर्करेची पातळी कमी/जास्त होऊ शकते. तुमच्या तंदुरुस्त राहण्यासाठी पुरेशी झोप हा खूप महत्त्वाचा घटक आहे.
झोपेचं वेळापत्रक आखून घ्या आणि ठरलेल्या वेळेला अंथरूणात पडलात तर काही वेळात नक्की झोप लागेल.
८. संपर्कात राहा
घरी बंद जरी असलो तरी टीव्ही, इंटरनेट च्या माध्यमातून कोरोना विषयी, बाहेरच्या परिस्थिती विषयी माहिती घेत रहा. फोन वरून आपले मित्र मंडळी, आप्त- इष्ट यांच्याशी संपर्कात रहा.
मधुमेही रुग्णांनी अधिक काळजी घेण्याची गरज यासाठी आहे कारण, सध्या आरोग्य सेवेवर कोरोना चा ताण आलेला आहे त्यामुळे बहुतेक हॉस्पिटलने OPD कमी केली आहे.
निष्काळजीपणामुळे रक्तातली साखर जर कमी-जास्त झाली तर त्याचा परिणाम प्रतिकारशक्तीवर तर होईलच पण चुकून बाधित रुग्णाच्या संपर्कात आलो तर तो संसर्ग होण्याची शक्यता इतरांपेक्षा अधिक राहते.
जर तुम्ही अगोदरच विलगिकरणात(Qurantine) असाल तर घाबरून न जाता वरील सूचना अमलात आणून तुम्ही शुगर आणि कोरोना फ्री राहू शकाल!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.