आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
चीनमध्ये करोना व्हायरसची लागण झाली तेंव्हा, त्याचा इतका हाहाकार माजेल याची कुणी कल्पनाही केली नव्हती.
एक, दोन देश नव्हे तर जगभरात या रोगाने आपली दहशत पसरवली आहे.
साथीच्या रोगाची लागण होण्याची जितकी भिती आहे, त्यापेक्षाही सोशल मिडीयावर येणा-या मेसेज वाचून जास्त थरकाप उडतो.
साथी बरोबरचं अफवा, दिशाभूल करणाऱ्या बातम्या, दावे, सल्ले यालाही उधाण आले आहे.
हे संकट नेमकं कुठून आलं, कसं आलं याचा शोध सुरु असला, तरी त्यापेक्षाही या संकटामुळे निष्पापांचा जाणारा बळी जास्त गंभीर आहे.
या साथीमुळे सगळेच धास्तावले आहेत. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि तत्सम मान्यवर स्रोतांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मूलभूत वैज्ञानिक माहिती घेणं तितकंच गरजेचं आहे.
त्याची सुरुवात चीनमध्ये जरी प्राण्यांपासून झालेली असली, तरी आता तो चीनमध्ये आणि जगभर पसरला आहे तो करोना या आजाराच्या रुग्णांच्या खोकल्यामार्फत.
त्याला आता COVID- 19 असं म्हटलं जातंय. या आजाराचे घातक वेगळेपण म्हणजे, तो खूपच जास्त वेगाने पसरतो.
त्यामुळे चीनमध्ये थोड्याच दिवसांत नव्वद हजार लोकांना हा आजार झाला.
त्यामानाने कमी म्हणजे सुमारे तीन हजार (सुमारे ३ टक्के) रुग्ण दगावले.
देवी, घटसर्प, गोवर, स्वाइन फ्ल्यू यांच्या साथीमध्ये दगावणाऱ्यांची टक्केवारी यापेक्षा जास्त होती.
याच्या आकडेवारीबाबत अधिक स्पष्टतेने सांगणारे एक संशोधन करण्यात आलं.
जर समजा १०० जणांना या रोगाची लागण झाली तर त्यापैकी २० जणांना काहीही होणार नाही, ८० जणांना खोकला-तापाचा सौम्य आजार होऊन ७ ते १४ दिवसांत आपोआप बरे होतील.
त्यातील १५ जणांना मात्र ‘करोना-न्युमोनिया’ हा गंभीर आजार होईल आणि त्यापैकी तीन जण दगावतील.
रोज हा व्हायरस कोणकोणत्या देशात पसरतोय याचे अपडेटस येत आहेत.
लहान मुले, तरुण, मधुमेह, हृदयविकार, दमा इत्यादी आजार नसलेली माणसे या आजारात सहसा दगावणार नाहीत असं मत शास्त्रज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे.
असा होतो प्रसार
करोनाचे विषाणू सुटे, रुग्णाच्या साध्या श्वासोच्छवासातून आपोआप पसरत नाहीत. रुग्णाच्या खोकल्यामार्गे बाहेर पडणाऱ्या तुषारांमध्ये हे विषाणू असतात.
या तुषारांमार्फत या विषाणूंचा इतरांना संसर्ग होतो. खोकताना रुग्णाच्या तोंडासमोर रुमाल, मास्क नसेल, तर खोकल्याचे तुषार समोरच्या व्यक्तीच्या नाकात जाऊन, त्यामार्फत विषाणू थेट श्वासमार्गात शिरतात.
हे खोकल्याचे तुषार, त्यातील विषाणू जवळपासच्या वस्तूंवर पडतात. तिथून ते इतरांच्या हाताला लागतात. तो हात नाकाला, चेहऱ्याला लागला, तर त्यातून ते श्वासमार्गात शिरतात.
अशी सगळी गंभीर परिस्थिती असताना, शांत राहून करोना होण्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी आपण काय आणि कोणते साधे उपाय करू शकतो हे पाहुया.
तसं पाहिलं तर करोनाची लागण होणारे सगळेच रुग्ण दगावतात अशातला भाग नाही. काहींना थोड्याशा उपचाराने देखील बरं वाटतंय, पण काही दुर्दैवी असे आहेत की त्यांचा करोनामुळे अंत होत आहे.
करोना व्हायरसची लागण ही कोणालाही होऊ शकते, मात्र यामध्ये काय फरक आहे हे डब्ल्यू एच ओ (WHO) सांगितलं आहे.
जर तुम्ही करोना व्हायरस पसरलेल्या देशांमध्ये गेला असाल, आणि एखाद्या करोना COVID 19 झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आला असाल, तर तुम्हाला करोना होऊ शकतो.
मात्र अशा देशांमध्ये न जाता तुमच्या देशांमध्ये बाहेरच्या देशातून एखादा रुग्ण आला आणि तुम्ही त्याच्या संपर्कात आलात तर तुम्हाला होणाऱ्या व्हायरसचा प्रभाव हा कमी असणार आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.
म्हणून करोना होऊ नये याकरता काळजी कशा प्रकारे घेता येईल तर सगळ्यात मुख्य म्हणजे स्वच्छ राहणे आणि त्यातही आपले हात स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे.
१. खोकला कशामुळेही असो, खोकताना तोंडासमोर रुमाल धरण्याची सवय करावी.
कधी रुमाल हाताशी नसलाच, तर आपली बाही तरी नाकासमोर धरावी.
वारंवार, विशेषत: बाहेरून घरी आल्यावर हात साबणाने निदान वीस सेकंद धुणं गरजेचं आहे. यामध्ये चेहरा धुवायचा अशीही सवय लावून घ्यावी.
ऑफिसेस, दुकाने इ. ठिकाणचे पृष्ठभाग रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ पुसून घ्यावे
जर तुम्ही अल्कोहल बेस्ड हॅण्डवॉश किंवा साबण वापरत असाल तर त्याचा फायदा होईल. कारण जर असे विषाणू तुमच्या हातावर बसले असतील तर ते मरून जातील.
हात कधी धुवावेत तर,आपल्याला खोकला आल्यावर आपण हात तोंडाजवळ नेतो तेंव्हा, आजारी लोकांची काळजी घेतल्यावर, जेवण बनवायच्या आधी आणि जेवण बनवून झाल्यावर हात धुणं गरजेचं आहे.
त्यासह जेवायच्या आधी, हात जर अस्वच्छ दिसत असतील तर, प्राण्यांचे मांस हाताळाल्यावर, टॉयलेटचा वापर केल्यावर हात स्वच्छ साबणाने धुवावेत.
२) हात चेहऱ्याला लागणार नाही याची काळजी घ्यायची सवय जाणीवपूर्वक आजपासूनच लावून घ्यावी.
हस्तांदोलन करण्याऐवजी हात जोडून नमस्कार करावा
जर कुणी खोकत आणि शिंकत असेल तर त्या व्यक्तिशी बोलताना किमान 1 मीटर (3 फूट) अंतर ठेवा.
कारण त्या व्यक्तीला जर COVID 19 असेल तर ती व्यक्ती खोकताना तिच्या तोंडातून जे शिंतोडे उडतील त्यातून आणि जर तुम्ही जवळ असाल तर तुमच्या शरीरात ते विषाणू श्वसनाद्वारे जाऊ शकतात.
आपले हात अनेक ठिकाणी स्पर्श करत असतात. टेबल-खुर्ची, लिफ्ट या सगळ्या ठिकाणी हाताचा स्पर्श झाला तरी तोच हात आपला चेहरा, डोळे, नाक यांच्याजवळ करायचा नाही. कारण त्याद्वारे देखील व्हायरसची लागण होऊ शकते.
तुम्ही आणि तुमच्या आसपासच्या लोकांनी हायजीन म्हणजे स्वच्छतेची सवय लावून घ्यायला हवी.
३) गरम पाण्याचे घोट घ्यावे, गुळण्या कराव्या. घशात विषाणू शिरले असतील, तर त्याने ते धुतले जातील.
यामुळे घशात असलेले सर्व प्रकारचे विषाणु मरतील, इतकचं नव्हे तर हवामानातील बदलामुळे होणारा खोकला, सर्दी या आजारांनाही प्रतिबंध केला जाईल.
४) स्वच्छतेची काळजी घ्या
खोकताना वापरलेला रुमाल अथवा टिश्युपेपर यांचीही काळजी घ्या.
दुस-याने वापरलेला रुमाल न धुता पुन्हा वापरु नका.
जेणेकरून आपल्याला किंवा दुस-याला व्हायरसची बाधा झाली असेल तर त्याचे जंतू हवेत उडू नयेत याची काळजी घ्यायची. आणि तो टिशू पेपर बंद डस्टबीन मध्ये फेकून द्यायचा.
शिंकल्यावर किंवा खोकल्यावर जर आपला हात तोंडावर धरला असेल तर तो हात लगेच हॅण्डवॉश, किंवा साबणाने धुवायचा. असं केल्याने आपण आपल्या आसपासच्या लोकांनाही सर्दी,ताप, फ्लू ,COVID 19 पासून सुरक्षित ठेवतो.
५) कोरडा खोकला व जोरदार ताप असा त्रास झाल्यास घरी न बसता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ज्यांनी करोना तापाची साथ असलेल्या देशातून, भागातून प्रवास केला असेल किंवा जे करोना ताप आलेल्या रुग्णाच्या सोबत राहत असतील किंवा रुग्णाशी घनिष्ट संपर्क आला असेल (१५ मिनिटांपेक्षा जास्त संपर्क) त्यांची करोना विषाणूबाबत तपासणी करायला हवी.
अशा वेळेस गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं आणि बाहेर गेलात, तरी रस्त्यावर थुंकणं टाळावं.
६ मास्कचा वापर
करोना’च्या संशयित तसेच खात्री झालेल्या रुग्णांनी साधा मास्क लावला पाहिजे; म्हणजे त्यांच्या खोकल्यातून बाहेर पडणारे तुषार जास्त पसरणार नाहीत. इतरांनी कोणताही मास्क लावायची सध्या गरज नाही.
कोणत्याही मास्कने करोना व्हायरस गाळले जात नाहीत; पण त्याचा प्रसार खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या तुषारांमार्फत होत असल्याने, त्याला कमी-जास्त प्रमाणात मास्कने अटकाव होतो.
डॉक्टरादी लोकांसाठी हे मास्क राखीव ठेवावे
एन-९५ नावाच्या महागड्या मास्कनेही करोना व्हायरस गाळला जात नाही. तुषारांना मात्र जास्त प्रमाणात अटकाव होतो.
साध्या मास्कचा उपयोग एवढाच आहे, की कोणी तुमच्या समोर खोकल्यास त्याचे तुषार थेटपणे तुमच्या नाकात जाणार नाहीत.
मास्क, रुमाल स्वच्छ धुतलेला हवा, धुतलेल्या हाताने मास्क लावावा. नंतर मास्कला, रुमालाला हात लावू नये. नाहीतर उलटा परिणाम होईल.
रस्त्यातून चालताना, वाहन चालवताना मास्क घालून उपयोग नाही, कारण करोना बाधित रुग्णाचा दोन मीटरपेक्षा कमी अंतरावरून आणि १५ मिनिटांपेक्षा जास्त संपर्क आला असेल, तरच विषाणू लागण होते.
काही कंपन्यांनी लस बनवली आहे; पण तिच्या चाचण्या होऊन ती बाजारात यायला अनेक महिने लागतील. लोकजागृती, वर दिलेली पावले हीच लस!
या आजारावर अद्याप औषध नाही, अनेकांचे त्याबाबतचे प्रयत्न सुरु असले तरी त्याच्या चाचण्या होऊन बाजारात यायला काही महिने तरी लागतील.
तोपर्यंत विश्रांती, तापावर साध्या पॅरेसिटोमॉलच्या गोळ्या, खोकल्याची ढास कमी करणाऱ्या गोळ्या, गरज लागल्यास कृत्रिम श्वासाची व्यवस्था, असे उपाय आहेत.
कोणी आयुर्वेदिक, होमिओपॅथीक औषधांचा किंवा इतर कोणत्याही उपचाराचा पुरस्कार करत असेल, तर त्याला कोणताही शास्त्रीय पाया नाही. हा पूर्णपणे नवीन आजार आहे, त्याचे विषाणू मारायला कोणाकडेही औषधे नाहीत हे नक्की.
७. व्हाट्सअप, फेसबुक वर येणार्या माहितीवर फारसा विश्वास ठेवू नका. ह्या व्हायरसपासून कसं वाचायचं काय करायचं याबद्दलचं मार्गदर्शन हे फक्त वैद्यकीय अधिकारीच करू शकतात.
मुख्य म्हणजे ह्या व्हायरसच्या बातम्यांनी पॅनिक न होता शांतपणे परिस्थिती हाताळायची आपलं डायट हेल्दी ठेवायचं ,झोप व्यवस्थित घ्यायची, व्यायाम करायचा आणि आपल्याला आनंद वाटेल अशा गोष्टी करा.
ज्या बातम्यांची पूर्णतः खात्री नाही अशा कोणत्याही बातम्या सोशल मीडियावर पसरवायच्या नाहीत.
८. आजारी असताना प्रवास टाळला पाहिजे कारण आजारपणात कुठलाही संसर्ग आणखीन लवकर होतो. तसंच आपल्यामुळे ही इतरांना त्रास होऊ शकतो.
प्रवास करत असाल तर खोकणाऱ्या लोकांपासून थोडंस लांबच राहा. वारंवार हात धुवा. नाक ,डोळे ,तोंड यांना स्पर्श करू नका. जर मास्क घालून प्रवास करणार असाल तर एकदा मास्क घातल्यावर वारंवार हात चेहऱ्याजवळ नेऊ नका.
भारतातही करोनाचा प्रसार फक्त परदेशातून येणाऱ्या मंडळींपुरता मर्यादित राहणार नाही. तेव्हा तर सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेवर फारच मोठी जबाबदारी, कामाचा बोजा पडेल.
या व्यवस्थेचे महत्त्व या निमित्ताने पुन्हा अधोरेखित होते आहे. एकंदरित आरोग्य व्यवस्था, माध्यमे आणि नागरिक यांना एकमेकांच्या सहकार्याने करोना साथीविरुद्ध लढावे लागेल.
९. प्रवासात आजारी पडला तर कुठल्या देशातून, प्रदेशातून आलो आहोत हे तिथल्या आरोग्य अधिकाऱ्याला सांगा. औषध उपचार करून घ्या. आपलं डायट नीट ठेवा,पूर्ण शिजवलेलं अन्न खा. स्वतःची काळजी घ्या.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.