जागतिक महिला दिन ८ मार्चलाच का साजरा होतो? हे आहे कारण
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
८ मार्चला साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन हा कुठल्याही एकाच देशातील महिलांसाठी नसून संपूर्ण जगभरातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा दिवस आहे.
वेगवेगळी संस्कृती, पार्श्वभूमी असलेल्या सगळ्या महिला एकत्र येऊन जगभरात, समान हक्क मिळावेत म्हणून दिलेल्या लढ्याला मिळालेलं यश साजरा करण्याचा दिवस.
महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रगती यासाठी साजरा केला जाणारा दिवस.
पण हा दिवस का साजरा केला जातो, त्याची कारणं काय? आणि याची सुरुवात कधीपासून झाली? हे आपण ८ मार्चच्या महिला दिनाचं औचित्य साधून जाणून घेणार आहोत.
जवळजवळ शंभर पेक्षा जास्त वर्षांपूर्वी या लढ्याची सुरुवात झाली. स्त्रीचे शिक्षण, कामाचे स्वरूप हे सगळं पुरुषांसारखे असून देखील त्यांना वेतन मात्र पुरुषांपेक्षा खूपच कमी मिळायचे.
स्त्रियांना बऱ्याच देशांमध्ये मतदानाचाही हक्क नव्हता. आणि हळूहळू हा फरक स्त्रियांना कळून यायला लागला.
१९०९ मध्ये पहिल्यांदा अमेरिकेत १५००० महिलांनी एकत्र येऊन एक मोर्चा काढला.
ज्यामध्ये, पुरुषांइतकंच काम केलं तर तितकाच पगारही मिळायला पाहिजे आणि मतदानाचा हक्क मिळायला पाहिजे या प्रमुख मागण्या होत्या. त्यानंतर महिलांची ही चळवळ जगभर पसरत गेली आणि आपल्या हक्कांसाठी महिला रस्त्यावर उतरल्या.
१९१० मध्ये कोपेनहेगन येथे, नोकरी करणाऱ्या स्त्रियांची इंटरनॅशनल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती.
त्या परिषदेमध्ये ‘क्लारा झेटकिन’ या महिलेने जगातल्या सगळ्या महिलांसाठी एक ‘आंतरराष्ट्रीय दिवस’ असावा अशी कल्पना मांडली. प्रत्येक देशात प्रत्येक वर्षी एक दिवस महिलांसाठी सेलिब्रेट करण्यात यावा अशी ती कल्पना.
त्या परिषदेसाठी सतरा देशांमधील १०० महिला उपस्थित होत्या.
रशिया मध्येही याबद्दल चळवळ सुरू झाली. त्यावेळेस पहिलं महायुद्ध सुरू होतं, घरातले पुरुष हे लढाईसाठी बाहेर होते आणि घरातल्या महिलांना आपल्या मुलांसहित पोटापाण्याची सोय करणे गरजेचं होतं.
“युद्ध थांबवा आणि शांतता प्रस्थापित करा”, “शांतता आणि भाकरी” अशा त्यांच्या काही मागण्या होत्या पण सरकार स्त्रियांच्या मागण्यांना दाद देत नव्हतं म्हणूनच स्त्रिया त्यावेळेस रस्त्यावर उतरल्या.
तोच हा दिवस. ८ मार्च १९१३ हा दिवस ‘महिला दिवस’ म्हणून रशियामध्ये साजरा करण्यात आला. त्यानंतर १९१४ मध्ये संपूर्ण युरोपभर महिलांच्या चळवळी पसरत राहिल्या.
आणि पुढे ८ मार्च हाच आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून मान्यता पावला. पुढे ८ मार्च १९१७ मध्ये रशिया मध्येच मतदानाचा हक्क मिळावा म्हणून महिला परत रस्त्यावर उतरल्या.
आणि आता आम्हाला बदल हवा आहे, अशी मागणी करू लागल्या. त्यानंतर मतदानाचा हक्क महिलांना मिळाला.
१९७५ मध्ये युनायटेड नेशन्सने ८ मार्चला, ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून मान्यता दिली. १९९६ नंतर दरवर्षीच्या महिला दिवसाला एक थीम ठरवण्यात येते, जी वर्षभर राबवली जाते.
१९९६ मधली पहिली थीम होती, “celebrating the past, planning for the future”.
आणि या वर्षीची २०२० ची थीम आहे, “Each for equal” ज्यामध्ये स्त्रियांविरुद्धच्या रूढींना आव्हान देणे, स्त्री-पुरुष पक्षपात न करणे, स्त्रियांची समाजातील परिस्थिती सुधारणे आदी गोष्टींबाबत आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या (IWD)संकेतस्थळावर माहिती आहे.
‘समूहातील प्रत्येकाचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे पण सगळ्यांचं एकत्रितपणे एक समान विश्व निर्माण होईल’ म्हणूनच Each for equal ही थीम.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे रंगही ठरलेले आहेत. जांभळा, हिरवा आणि पांढरा असे हे तीन रंग आहेत. यातील जांभळा रंग म्हणजे ‘न्याय आणि सन्मानाचे’ प्रतीक.
हिरवा रंग म्हणजे ‘आशा (Hope)’ तर पांढरा रंग म्हणजे ‘शुद्धता’.
पण शुद्धता या संकल्पनेवर पुन्हा वादंग उठले आणि म्हणून तो आता शुद्धता म्हणून वापरला जात नाही.
आंतरराष्ट्रीय महिला दिन आज जगभरात विविध प्रकारे साजरा केला जातो. अफगाणिस्तान, लाओस, रशिया व्हिएतनाम, क्युबा यासारख्या देशांमध्ये महिला दिनाची सुट्टी असते.
नेपाळ आणि चीन मध्ये या दिवशी फक्त महिलांनाच सुट्टी असते.
तसेच बऱ्याच देशांमधले पुरुष हे आपल्या आई, बायको, बहिण, मुलगी, मैत्रीण आणि ऑफिसमधील स्त्री सहकारी यांना फुलं आणि एखादं छोटसं गिफ्ट देतात.
अमेरिकेत महिला दिनाची जाहीर अधिकृत सुट्टी नसली तरी त्यादिवशी महिलांसाठी राजकीय मोर्चे, व्यावसायिक परिषद,आणि अनेक कार्पोरेट कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
हा दिवस म्हणजे महिलांसाठी एखाद्या उत्सवा सारखाचं साजरा केला जातो. २०११ ला अमेरिकीचे तेव्हाचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी,
“महिला चळवळीला शंभर वर्ष पूर्ण झाले महिला चळवळीमुळेच महिलांना राजकारणात यायची संधी मिळाली. महिलांनी घेतलेल्या सहभागामुळेच अमेरिका आज एका उच्च स्थानावर जाऊन पोहोचली आहे”, असे म्हटले होते.
आंतरराष्ट्रीय महिला दिनात आपण कसं सहभागी व्हायचं असा प्रश्न पडला असेल तर त्यासाठी विविध माध्यमं, व्यासपीठ उपलब्ध आहेत.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे कार्यक्रम आपल्या आसपास जर कुठे होत असते तर अशा कार्यक्रमांत सहभागी होता येईल. जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करणे.
Each for equal ची पोज घेऊन फोटो काढणे आणि तो शेअर करणे.
आपला एखादा संदेश सोशल मीडियावर #IWD 2020 च्या नावे देणे. अशा गोष्टी करता येतील.
भारतातील महिला दिवस जर म्हणायचा झाला तर तो १३ फेब्रुवारीला असतो. भरताच्या स्वातंत्र्यलढ्यातील स्त्री स्वातंत्र्यसेनानी, ‘सरोजनी नायडू ‘ यांचा जन्मदिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
१९४२ च्या महात्मा गांधी यांच्या चलेजाव चळवळीत सरोजिनी नायडू यांनी सहभाग घेतला होता. परंतु आता मात्र ८ मार्च दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
तसं पाहायला गेलं तर भारतात महिलांना मतदानाचा अधिकार लवकर मिळाला. मात्र स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही फारसा बदलला आहे असं चित्र दिसत नाही.
आता विविध क्षेत्रात महिला पुढे येत आहेत. आपलं कर्तृत्व गाजवत आहेत तरीही, त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार थांबताना दिसत नाहीत. निर्भया ची दुर्दैवी घटना घडून आज ८ वर्ष झाली तरी तिच्या दोषींना शिक्षा होत नाहीय.
मुलींवर होणारे हल्ले आणि जाळपोळीच्या घटना यामुळे देश हादरून जातोय. एक प्रकारची दहशतच स्त्रियांवर अजूनही आहे हे जाणवते. आता मुलींना बंधने घालण्यापेक्षा मुलांनाच सगळ्यांचा आदर कसा करायचा हे शिकवण्याची वेळ आली आहे.
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ‘स्वातंत्र्य देवतेची विनवणी’ या कवितेतील ओळी यासाठी किती चपखल बसतात पहा.
समान मानव माना स्त्रीला, तिची अस्मिता खुडू नका। दासी म्हणुनी छळू नका वा देवी म्हणुनी भजू नका।।
तसं पाहिलं तर अजूनही स्त्री पुरुष समानता आलेली नाही. अजूनही अनेक देशात स्त्रियांना शिक्षण मिळत नाही बऱ्याच स्त्रियांना त्यांच्या हक्काची जाणीव सुद्धा नाही.
तरीही आज स्त्री अंतराळत झेप घेण्यापासून, देशाच्या पंत्रधानपदी स्त्री विराजमान होताना दिसते आहे.
खेळांमध्ये प्राविण्य दाखवीत आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहे. या स्त्री चळवळीच्या जमेच्या गोष्टी आहेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.