आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
अमिताभ बच्चन हे भारतीय चित्रपट सृष्टीचे शहेनशाह समजले जातात अमिताभ बच्चन यांना ओळखणार नाही असा एकही भारतीय सापडणं कठीणच. त्यांनी केलेल्या अनेक भूमिका आणि भारतीय जनमानसावर त्याचा झालेला परिणाम, या खरंच अनोख्या गोष्टी आहेत.
त्यांच्याही जीवनात अनेक चढ-उतार आले, एक काळ तर असा आला की, त्यांची स्वतःची कंपनी दिवाळखोरीत गेली. चित्रपटसृष्टीत ही काम मिळत नव्हते. “अमिताभ संपला” असं लोक म्हणू लागले.
पण येणाऱ्या काळाची चाहूल ओळखून बदल स्वीकारत त्यांनी परत एकदा फिनिक्स भरारी घेतली आणि आपलं वर्चस्व सिद्ध केलं. आज वयाच्या ७८ व्या वर्षीही आजाराचा सामना करत ते अजूनही चित्रपटसृष्टीत उत्साहाने कार्यरत आहेत.
स्वतःच्या जिवंतपणीच एक आख्यायिका बनून त्यांनी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. म्हणूनच त्यांना या शतकातील महानायक असंही म्हटलं जातं. त्यांचं कामाप्रती असलेलं dedication, शिस्त यांची उदाहरणे दिली जातात.
यांचा आदर्श घेऊन त्यांच्यासारखा सुपरस्टार व्हावं असं स्वप्न बाळगणारे कितीतरी लोक चित्रपटसृष्टीत रोज नव्याने येत असतात.
पण अमिताभ बच्चन यांचं स्वप्न काय असेल? आणि ते पूर्ण झाल्यावर त्यांना किती आनंद झाला असेल माहिती आहे का?
२००५ साली संजय लीला भन्साळी यांचा ‘ब्लॅक’ हा सिनेमा रिलीज झाला. ज्यामध्ये अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यात राणी मुखर्जी ही बहिरी, बोलू न शकणारी आणि आंधळी मुलगी असते.
तिच्या शिक्षकाचं काम अमिताभ बच्चन यांनी केल होतं. जे तिला शिकवतात आणि नंतर त्यांना स्वतःलाच अल्झायमर होतो आणि मग राणी त्यांची काळजी घेते, अशी साधारणपणे या सिनेमाची स्टोरी लाइन होती.
खरंतर संजय लीला भन्साळी यांचं ही एक स्वप्न होतं. एक तरी सिनेमा हा असा थोडासा ऑफबीट बनवायचा. त्यांनी हेलन केलर वरचं पुस्तक वाचलं होतं त्यापासून त्यांना प्रेरणा मिळाली होती. त्या अनुषंगाने एखादा सिनेमा करावा अशी त्यांची इच्छा होती.
कारण त्यांचे तोपर्यंतचे सिनेमे हे पूर्णपणे कमर्शियल स्वरूपाचे होते, ज्यामध्ये ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ असे भव्यदिव्य स्वरूपाचे सिनेमे होते. त्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता.
संजय लीला भन्साळींना आता अमिताभ बच्चन यांना घेऊन एक सिनेमा करायचा होता, ते त्यांचं स्वप्न होतं. आणि स्वतः अमिताभ बच्चन यांनाही भन्साळींबरोबर काम करायचं होतं.
सिनेमाची स्क्रिप्ट भन्साळी यांनी अमिताभ यांना ‘खाकी’ या सिनेमाच्या सेटवर वाचायला दिली.
अमिताभ यांना ती स्क्रिप्ट इतकी आवडली की त्यांनी त्या सिनेमाचं मानधन घेणार नाही असं सांगितलं आणि सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली.
सिनेमा पूर्ण होईपर्यंत त्यामध्ये अनंत अडचणी आल्या. एकदा तर सेटला आग लागली आणि कॉस्च्युम आणि प्रोडक्शनचं सामान त्यात जळून गेलं. आता परत हे काम होईल का? अशी शंका संजय लीला भन्साळी यांना आली.
परंतु अमिताभ आणि राणी मुखर्जी यांनी मात्र आम्ही झालेलं काम परत करू असं सांगून त्यांना धीर दिला आणि सिनेमाचं शूटिंग परत सुरू झालं. सिनेमाचं बजेट १३ कोटी वरून बजेट २१ कोटीपर्यंत वाढलं.
नंतर ‘ब्लॅक’ या सिनेमाने २००५ मध्ये इतिहास केला. त्यावर्षीचे सगळ्यात जास्त पुरस्कार ‘ब्लॅक’ला मिळाले. फिल्मफेअर मध्ये ‘ब्लॅक’ला अकरा बक्षीस मिळाली. तर अमिताभ बच्चन यांना बेस्ट अॅक्टरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
२००५ मधला तो हिट चित्रपटही ठरला.आणि संजय लीला भन्साळी यांना एका यशस्वी दिग्दर्शकांच्या यादीत स्थान मिळालं.
‘ब्लॅक’ या सिनेमाचा प्रीमिअर जेव्हा फिल्म इंडस्ट्रीतल्या काही खास लोकांसाठी ठेवला होता, त्यावेळेस अनेक सेलिब्रिटींनी हा सिनेमा पाहिला. ज्यामध्ये जुन्या काळातील सुपरस्टार दिलीप कुमार यांचाही समावेश होता.
दिलीप कुमार हे भारतीय फिल्म इंडस्ट्रीतले पहिले सुपरस्टार म्हणून गणले जातात.
अमिताभ बच्चन यांनी पण असे म्हटलंय की, भारतीय चित्रपट सृष्टीचा कालखंड जर ठरवायचा झाला तर दिलीप कुमारच्या आधीची आणि दिलीप कुमार यांच्या नंतरची असा करावा लागेल.
ज्यांचा आदर्श घेऊनच खरंतर अमिताभ बच्चन फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले. अमिताभ बच्चन यांचं स्वप्न होतं की, दिलीप साहेबांनी अमिताभ यांचा एक तरी सिनेमा थिएटर मध्ये बसून पहावा.
खरंतर अमिताभ आणि दिलीप कुमार यांनी शक्ती या सिनेमात एकत्र काम केलं होतं, ज्यात दिलीप कुमार यांनी अमिताभ यांच्या वडिलांचं काम केलं होतं, पण अमिताभ यांचा एक तरी सिनेमा दिलीप साहेबांनी थिएटरमध्ये पाहिला का नाही, हे मात्र अमिताभ यांना माहिती नव्हतं.
आणि म्हणून त्यांची इच्छा होती की, दिलीप कुमार यांनी त्यांचा एक तरी सिनेमा थिएटर मध्ये पहावा आणि दिलीप कुमार त्या प्रीमियरला आले.
प्रीमियर झाला आणि संपूर्ण ऑडिटोरियम सिनेमा पाहून भारावून गेलं. तिथला प्रत्येक जण अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी आणि भन्साळी यांचं अभिनंदन करत होते.
अमिताभ यांना भेटण्यासाठी दिलीप कुमार त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी अमिताभ यांचा हात स्वतःच्या हातात घेतला आणि ते त्यांच्याकडे पाहू लागले.
या प्रसंगाचे वर्णन अमिताभ बच्चन यांनी असं केलं की ,”काश इस लम्हे को मै उम्रभर के लिए रोक पाता”.
खरंच एखादं स्वप्न पूर्ण झाल्यावर माणसाला कसं वाटतं ना? जरी तो सुपरस्टार असला तरी.
२०१८ साली अमिताभ यांनी ब्लॅक च्या तेरा वर्षानंतर त्या सिनेमा सिनेमा बद्दलच्या आठवणी ट्विटरवर जागवल्या. तसंच दिलीप कुमार साहेबांचं एक पत्रही शेअर केलं,
आणि म्हटलं की, ‘हे पत्र माझ्यासाठी खूप खास आहे’. यात दिलीप साहेबांनी, अमिताभ बच्चन आणि त्यांनी एकत्र काम केलेल्या शक्ती सिनेमातील आठवणी सांगितल्या होत्या.
तसंच ‘तुम्ही केलेल्या बऱ्याच चित्रपटातील काम अतुलनीय आहे’, असं देखील म्हटलं होतं.
ब्लॅक सिनेमाबद्दल लिहितांना दिलीप साहेब म्हणाले होते की, “जेव्हा मी ब्लॅक पाहिला त्यावेळेला मी आणि सायरा अक्षरशः निशब्द झालो. तुमचं काम बघून आम्ही भारावून गेलो.
ब्लॅकला ऑस्कर साठी नॉमिनेट केलं गेलं नाही याचा खेद आहे, परंतु माझ्या वैयक्तिक मतानुसार, जगातला कुठलाही मोठा पुरस्कार जर एखाद्या भारतीय अभिनेत्याला मिळणार असेल तर तो अभिनेता तूच…. ”
आपला आदर्श असलेल्या अभिनेत्याकडून मिळालेलं हे प्रशस्तिपत्र अमिताभ बच्चन यांच्यासाठी खूप मोलाचं आहे. हे पत्र अमिताभ यांनी त्यांच्या घरात एखाद्या पुरस्कारासारखं जपून ठेवलं आहे.
स्वप्नपूर्ती याच्या पेक्षा वेगळी काय असेल!!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.