Site icon InMarathi

टाच-दुखीच्या असह्य वेदना तुम्हालाही होतात? वाचा त्यामागची कारणे आणि उपाय..!

feet pain inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रोजच्या क्षुल्लक तक्रारींकडे आपण वेळीच लक्ष नाही दिले तर, पुढे जाऊन या तक्रारी तीव्र समस्येत परावर्तीत होतात. ‘जाऊदे, काय होतंय? फक्त सुजच तर आहे, होईल कमी…’ या अशा प्रतिक्रिया आपण इतरांकडून ऐकतो किंवा इतरांनाही आपण ऐकवत असतो.

पण, या क्षुल्लक तक्रारी कधी वाढत जातील सांगता येत नाही. म्हणून कोणतेही दुखणे असो त्याची तीव्रता वाढण्याआधीच त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

आता, लक्ष देणे म्हणजे काय? तर उठसुठ गोळ्या-औषधं खाणे म्हणजे आरोग्याची काळजी घेणे नव्हे! तर, ज्या-त्या तक्रारीतून नेमके आपल्या शरीराला काय सांगायचे आहे ते समजून घेणे आणि त्यानुसार आपल्या आहारात आणि दिनचर्येत बदल करणे.

आपल्या शरीराला छोट्या -छोट्या तक्रारीतून नेमके काय सांगायचे आहे ते समजून घेतले पाहीजे आणि त्यानुसार आपल्या दिनचर्येत आणि आहारात बदल करायला हवे.

तर अशीच नेहमी किरकोळ म्हणत दुर्लक्ष केली जाणारी व्याधी म्हणजे टाचदुखी. पण ही किरकोळ वाटणारी गोष्ट पुढे जाऊन अतीव त्रासाचे आणि समस्येचे कारण ठरू शकते. म्हणून थोड्याशा प्रमाणात असलेल्या या टाचदुखीकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

 

याला इंग्रजीत  “प्लांटर फॅसिटायटिस” म्हणतात. प्लाटंर फॅसिटायटिस म्हणजे आपल्या टाचेला आणि पायातील बोटांना जोडणारा एक दुवा जो उतींच्या समूहांनी बनलेला असतो. कधी कधी अचानक जास्त चालल्याने किंवा उभे राहिल्याने या उतीमध्ये सूज येते आणि त्यामुळे टाचेत वेदना सुरु होतात.

यामुळे चालताना, उभे राहताना त्रास होतो. सूज कमी झाली की वेदना कमी होतात. पण, जर आपले काम हे सतत उभे राहून करण्याचे असेल तर हा त्रास वारंवार उद्भवतो आणि त्या उतींमध्ये देखील काठीण्य येते.

विशेषतः गृहिणी, वॉचमन अशा लोकांना याचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते कारण, त्यांचे काम सतत उभे राहण्याचे असते. तसेच रनर, एथलेट्स या लोकांना देखील याचा त्रास उद्भवू शकतो कारण पळताना त्यांच्या तळव्यावर ताण येतो. वयाच्या चाळीशी ते साठीच्या दरम्यान देखील हा त्रास जाणवू शकतो.

ज्यांचे तळवे सपाट असतात आणि तळव्याचा आर्च (कमान) कमी असतो, अश्या लोकांना टाच दुखीचा त्रास त्रास होऊ शकतो.  लठ्ठपणा असणाऱ्या व्यक्तीनादेखील हा त्रास जाणवतो.

सतत हायहिल्स सँडेल वापरल्यानेही त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी जास्त वेळ उभे राहणे, पळणे, ट्रेकिंग करणे यामुळेही टाचदुखी उद्भवू शकते. गर्भधारणेच्या काळात स्त्रियांचे अचानक वजन वाढते, त्यामुळे त्यांना देखील हा त्रास जाणवतो.

 

 

या आजाराचे निदान करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला एक्सरे किंवा एमआरआय करण्याचा सल्ला देऊ शकतात. तसेच रुग्णाच्या वैद्यकीय इतिहासाचा अभ्यास करून टाच दुखी नेमकी कशाने होते याचे निदान शोधले जाते.

टाचेत फ्रॅक्चर झाल्याने जर टाचदुखी जाणवत असेल तर, त्यानुसार उपचार करावे लागतील. पण, सगळे टेस्ट करूनही जर रिझल्ट निगेटिव्ह असेल तर डॉक्टर तुम्हाला “प्लांटर फॅसिटायटिस”चे उपचार देऊ शकतात. मासपेशींची ताकद वाढवण्यासाठी डॉक्टर तुम्हाला प्व्हिटॅमिन देऊ शकतात.

बहुतांश वेळा योग्य उपचार आणि योग्य व्यायाम केल्याने हा आजार आटोक्यात येऊ शकतो. वेदना किंवा सूज असते तेंव्हा आराम करणे, वेदनेच्या ठिकाणी बर्फ लावणे असे उपाय केल्याने तात्पुरत्या काळासाठी ही वेदना कमी होते.

आयबोप्रोफेन सारख्या वेदनाशामक औषधांचाही त्वरित परिणाम दिसून येतो पण, जास्त काळ अशा औषधांवर अवलंबून राहणे ठीक नाही.

यासाठी हे काही घरगुती उपाय किंवा खास प्रकारचे व्यायाम तुम्हाला हमखास आराम मिळवून देतील- 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

१. पोटऱ्यांना ताण देणे

भिंतीला हात टेकून उभे राहा. ज्या पायाची टाच दुखते तो पाय मागे न्या आणि दुसरा पाय गुडघ्यात वाकवून पुढे घ्या. दोन्ही पायांचे तळवे जमिनीला टेकलेले असले पाहिजेत.

ताणलेल्या पायाच्या टाचेवर आणि पोटरीवर ताण जाणवला पाहिजे. दहा सेकंदासाठी याच अवस्थेत उभे राहा.

दोन ते तीन वेळा रिपीट करा.

 

 

२. रोलिंग स्ट्रेच

खुर्चीवरती बसून रहा.

तळव्याखाली छोटा बॉल घेऊन तो रोल करत राहा. किमान दोन मिनिटे रोलिंग करा.

 

 

३. मार्बल पिकअप

खुर्चीवरती बसा

गुढघे वाकलेले आणि तळवे पूर्ण जमिनीला टेकलेले हवे.

छोटे छोटे २० मार्बल्स खाली ठेवा आणि शेजारी एक वाटी ठेवा. आता हे मार्बल्स पायांच्या बोटांनी ते उचलून त्या वाटीमध्ये टाका. यावेळी गुडघ्यांची हालचाल करायची नाही फक्त तळव्यांची हालचाल अपेक्षित आहे.

 

 

हे काही व्यायाम प्रकार तुम्हाला या त्रासापासून थोडीशी मुक्ती देतील.

४. फूट स्ट्रेचिंग

तळव्याची बोटे उलट्या दिशेने थोडीशी ताणल्यावर टाचेच्या उतींमधील रक्तप्रवाह सुरळीत होईन वेदना कमी होऊ शकते. यासाठी तुम्हाला एक स्ट्रेच बँडची गरज लागेल जी स्पोर्ट्स स्टोअर किंवा ऑनलाईन देखील मागवता येईल.

जमिनीवर पाय सरळ रेषेत पसरून बसा.

स्ट्रेच बँड तुमच्या तळाव्याभोवती गुंडाळा आणि त्याचे दोन्ही टोक आपल्या दोन्ही हातात धरा.

हळुवारपणे पायाची बोटे तुमच्या शरीराच्या विरुद्ध दिशेने ताणवा.

हळूहळू पुन्हा मूळ ठिकाणी आणा.

१० वेळा हेच रिपीट करा.

 

 

वर दिलेले व्यायाम प्रकार आणि स्ट्रेचेस केल्याने हळूहळू टाचदुखी पूर्ण बरी होऊ शकते.

टाचेत वेदना असताना मात्र काही गोष्टींची विशेष काळजी घेतलेली उत्तम. जेंव्हा अशा पद्धतीने असह्य टाचदुखी जाणवेल तेंव्हा आराम करा. जास्त चालू नका किंवा जास्तवेळ उभेही राहू नका. किमान वीस मिनिटांसाठी बर्फाने पाय शेका. सूज कमी येण्यासाठी काही वेळ टाच मऊ कपड्याने गुंडाळून धरा. अशाप्रकारे गुंडाळल्यावर थोडा ताण जाणवायला हवा.

झोपताना पायाखाली उशा घ्या आणि पाय थोड्या उंचीवर ठेवून झोपा. तीव्र टाचदुखीच्या वेळेस लागलीच वेदनाशामक औषधे घेण्यापेक्षा असे प्रयोग उचित ठरतात.

ज्या लोकांना दिवसभर उभे राहून काम करण्याशिवाय गत्यंतरच नाही त्यांनी आपल्या शूज मध्ये आर्च सपोर्ट वापरण्यास हरकत नाही, यामुळे लीगामेंटवरील ताण थोडा कमी होईल.

कधी कधी पायाच्या तळव्यांना मसाज केल्याने देखील आराम मिळतो. यावेळी पोडियाट्रिस्टची मदत घेतली तरी चालेल.

सुरुवातीच्या काळात जेंव्हा ही टाच दुखी फक्त तळव्यांवर ताण आल्यानेच होते असे असेल तरच हे घरगुती उपाय आणि व्यायाम उपयोगी ठरतात. पण, डॉक्टरांनी तपासणी केल्यावर जर टाचेतील हाड वाढलेले आढळले तर मात्र या उपायांचा फारसा उपयोग होणार नाही. अशावेळी डॉक्टर तुम्हाला वेदनाशामक इंजेक्शन देऊ शकतात. यानेही टाचदुखी थांबली नाही तर मात्र ऑपरेशन हाच एकमेव पर्याय उरतो.

म्हणूनच वेदनांची तीव्रता कमी असताना वेळीच लक्ष देऊन त्याचे मुळ समजून घेतले  आणि त्यावर योग्य त्या पद्धतीने उपचार घेतल्यास पुढची बरीचशी जोखीम टळू शकते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version