तरुणाई भारावली निवडणुकीने
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
खरं तर निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. या उत्सवाच्या निमित्ताने जनता आपल्या मनात असलेल्या मागण्या आणि गरजा बघून मतदान करते आणि पुढे सरकार त्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी घेते. अर्थात हे झालं ‘गुडिगुडी’.
प्रत्यक्षात निवडणुकीत चिटपटीची रस्सीखेच चालू असते. असे असले तरीही तरुणाईला मात्र या निवडणुकीचे कमालीचे आकर्षण असते.
या विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान करून लातूरकर आपला आमदार निश्चित करणार आहेत. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे लातूरमध्ये सध्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. पोस्टर,बॅनर, पत्रके, प्रचार फेऱ्या, रॅली, झेंडे सगळीकडे दिसू लागले आहेत.
फेसबुक आणि व्हाट्सअप सारख्या माध्यमातूनही उमेदवारांनी आपला जोरदार प्रचार सुरु केला आहे.
पूर्वीच्या काळचा प्रचार हा आजच्या इतका रंजक नव्हता. तेव्हाच्या प्रचारात फक्त सभा आणि गाठीभेटी यांचा जास्त भर असायचा. वेगवेगळ्या घोषणा देत प्रचार होत असे आणि ही कामे मुख्यत्वे करून पक्षाचे कार्यकर्तेच करीत असत.
विद्यार्थी जसे परीक्षा आली अभ्यासाला लागतात तसे पूर्वी निवडणूक आली की प्रचाराची ठराविक कामे सुरु होत असत.
त्या काळात प्रचाराच्या प्रक्रियेत तरुणाईपेक्षा जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे महत्व अधिक होते.
आजच्या काळात मात्र प्रचार यंत्रणा पूर्णपणे बदलली आहे. कारण आजच्या काळात अनेक वेगवेगळी माध्यमेही तयार झाली आहेत. या प्रत्येक माध्यमावर आपलाच प्रभाव कसा राहील यासाठी उमेदवार आणि राजकीय पक्षांना सातत्याने कष्ट घ्यावे लागत आहेत. त्यामुळे आजच्या काळातला प्रचार हा जास्त रंजक होऊ लागला आहे.
आजच्या प्रचारात तरुणाईला भावणाऱ्या गोष्टींचा जास्त समावेश आहे. त्यामुळे साहजिकच निवडणूक आली कि आजची तरुणाई देखील त्यात भारावून जात आहे.
लातूर शहर विधानसभेचा विचार केला तर तसा हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र गेल्या काही वर्षात भारतीय जनता पक्ष लातूरमध्ये जास्त प्रभावी ठरतो आहे.
२ वर्षांपूर्वी झालेल्या लातूर महानगरपालिकेत भाजपने विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपचेच खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे कै. विलासराव देशमुख यांच्या पूर्व पुण्याईवर भिस्त असलेल्या आमदार अमित देशमुख यांची आणि पर्यायाने काँग्रेसचीही प्रतिष्ठा लातूरमध्ये पणाला लागणार आहे.
या उलट भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्याविषयी लातुरात विशेषतः तरुणाईमध्ये विशेष क्रेझ असल्याचे पाहायला मिळत आहे. फेसबुक, व्हाटसअप यावर येणारे मेसेज, कमेंट्स पाहिले तर हि गोष्ट सहज लक्षात येते.
एकूणच सध्या लातूरमधली तमाम तरुणाई या निवडणुकीत भारावून गेली आहे, हे मात्र खरे!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.