“साहो” फ्रेंच चित्रपटाची कॉपी? मूळ दिग्दर्शक म्हणतो, “किमान ‘चांगली’ कॉपी करायची होती”
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
“नक्कल करण्यासाठी देखील अक्कल लागते” – अशा अर्थाची एक म्हण आहे आणि यापूर्वी देखील आपण सर्वांनी ती बऱ्याचदा ऐकलेली आहे. आता ही म्हण आठवण्याचे कारण म्हणजे प्रभास आणि आपली लाडकी श्रद्धा कपूर यांच्यावर चित्रित करण्यात आलेला तेलगु चित्रपट ‘साहो’!
अगदी प्रदर्शनापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे आणि त्याच्यावरील हे वादाचे ढग अजूनच दाट होत चालले आहेत असे दिसते. लार्गो विंच या फ्रेंच चित्रपटाच्या दिग्दर्शकाने आत्ता असा आरोप केला आहे की साहोची कथा त्याच्या चित्रपटातून घेतलेली आहे.
खरे तर साहो मध्ये त्याच्या लार्गो विंच या चित्रपटाची सरळ सरळ नक्कल करण्यात आली आहे, पण ती नक्कल देखील फार चांगली झालेली नाही असे तो म्हणतो. कॉपीच करायची होती तर ती किमान चांगली तरी करावी असे त्याचे म्हणणे आहे.
फ्रेंच डायरेक्टर जिरोम सॅले, याने यापूर्वी देखील त्याच्या एका चित्रपटाच्या चोरीचा आरोप तेलगु डायरेक्टर्स वर केला होता. साहो हा त्याच्या लार्गो विंच या चित्रपटाच्या कथेवर बेतलेला आहे जो, २००८ साली प्रदर्शित झाला होता.
बिग बजेट सिनेमा असणाऱ्या साहो कडून सर्वाना खूप अपेक्षा आहेत, या चित्रपटाच्या निर्मितीवर तब्बल ३५० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. प्रेक्षकांवर गरुड करणाऱ्या बाहुबलीच्या दोन्ही भागानंतर प्रदर्शित झालेला प्रभासचा हा पहिलाच चित्रपट आहे.
परंतु, या चित्रपटावर समीक्षकांसह प्रेक्षकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
साहोवर असे चाहोबाजूंनी उठलेले वादळ अपुरे होते म्हणून की काय, याच्यावर आता आणखी नवा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाबाबत सॅलेने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
“मला वाटत भारतात मला उज्वल भविष्य आहे,” असे ट्विट देखील त्याने केले आहे. सॅलेचे म्हणणे आहे की, “तुम्ही माझी कलाकृती चोरानारच असाल, तर निदान ते काम तरी व्यवस्थित करा.”
सॅलेच्या या ट्विटवर त्याच्या चाहत्यांनी साहो आणि लार्गो विंचमध्ये कसे साम्य आहे हे दाखवणारे अनेक ट्विट केले आहेत. त्याच्या एका चाहत्यांनी कमेंट केली आहे, “दोस्ता तुझ्या लार्गो विंचचा भारतात आणखी एक फ्री रिमेक.
“सॅले पुढे म्हणतो, माझ्याच कलाकृतीवरून फ्री मध्ये बनवण्यात आलेला भारतातील हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी देखील त्याने भारतीय दिग्दर्शकांवर त्याच्या कलाकृतीची कॉपी केल्याचा आरोप केला होता.
म्हणून त्याने आपल्या ट्विटमधून तेलगु दिग्दर्शकांना विनंती केली आहे की, तुम्ही जर माझ्या कलाकृतीची कॉपीच करणार असाल तर ती नीट होईल याची तर दक्षता घ्या.
माझे भारतातील करिअर बद्दलचे ट्विट हा एक उपरोधिक टोमणा होता, याबद्दल मी काहीही करू शकत नाही,” असे स्पष्टीकरण देखील त्याने दिले आहे.
सॅलेने भारतीय दिग्दर्शकांवर अशा प्रकारे आरोप करण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील एका तेलगु चित्रपट निर्मात्यावर त्याने त्याच्या चित्रपटाची नक्कल केल्याचा आरोप केला होता. पूर्वी त्रिविक्रम श्रीनिवास याचा ‘अज्ञाथवासी’ या चित्रपटावर त्याने हरकत घेतली होती.
लार्गो विंचचे थोडक्यात कथा सूत्र असे आहे, : “एका मोठ्या अब्जाधीश व्यक्तीचा खून झाल्यानंतर, त्याने दत्तक घेतलेल्या मुलाला त्याचा त्याच्या संपत्तीवरील हक्क सिद्ध करून दाखवावा लागतो. नंतर तो त्याच्या वडलांच्या खुन्यांना शोधून काढतो आणि आपली सारी संपत्ती त्यांच्या तावडीतून सोडवून घेतो.”
अर्थात साहोवर हा काही पहिल्यांदाच प्लॅगॅरीजमचा आरोप होतोय असेही नाही, यापूर्वी चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरवर देखील असाच आरोप करण्यात आला होता.
या चित्रपटाचे पहिले पोस्टर रेयान गोस्लीन्ग्ज याच्या ब्लेड रनर २०४९ या व्हिडीओ गेम मधील दृश्यावर अबलंबून असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतरचे पोस्टर टॉम क्लान्सीच्या रेनबो सिक्स सीज या व्हिडीओ गेमवर आधारित असल्याचे म्हंटले होते.
सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यातील गाणे ‘बेबी वोंट यु टेल मी,’ हे शिलो शिव सुलेमनच्या बर्निंग मॅन इन्स्टालेशन मधून कॉपी केलेले असल्याचे नुकतेच आढळून आले.
याबद्दल नुकतेच अभिनेत्री लिसा रे हिने हरकत घेतली होती. साहोच्या निर्मात्यांनी शिलो शिव सुलेमानच्या गाण्यातील आर्टवर्क चोरून ते साहोच्या पोस्टर वर वापरण्यात आल्याचे तिने म्हंटले होते.
समीक्षकांनी देखील साहोबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून देखील फारशी स्तुती मिळालेली नाही. तरीही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून दोन दिवसात २०५ कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा आकडा ३०० कोटीच्या घरात पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
बाहुबली सारख्या सुपर-डुपर हिट सिनेमानंतर प्रभास पहिल्यांदाच पडद्यावर आलेला आहे. बाहुबलीतील त्याचा अभिनय कथा आणि एकूणच चीत्रापतीची मांडणी पाहता इथून पुढे त्याच्या कडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत.
प्रभासच्या करिअरच्या या गाडीची दिशा ठरवण्यात साहो कोणती भूमिका बजावेल हे काही दिवसात कळेलच पण, साहोवरून बाहुबलीचे दिग्दर्शक असलेले राजमौली यांनी देखील प्रभासची चांगलीच कानउघडणी केली आहे.
प्रभासच्या आजवरच्या प्रवासात राजमौली यांचे स्थान काय आहे, हे बहुतेक सर्वाना माहिती आहे. फक्त दिग्दर्शक आणि कलाकार इतक्यापुरतेच हे नाते मर्यादित नाही.
प्रभासला एक चांगला आणि यशस्वी अभिनेता बनवण्यामागे राजमौली यांची भूमिका फार मोठी आहे. त्यांनीही साहोच्या बाबतीत प्रभासच्या कोणत्या चुका झाल्या आहेत याची जाणीव करून दिली होती. परंतु, ती त्याने फारशी मनावर घेतलेली दिसत नाही.
साहोच्या भोवतालचे हे विवादास्पद वादळ सध्या तरी लवकर संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.