Site icon InMarathi

शांतारामबापू म्हणाले, “तिच्यासोबत अभिनय करायचा नसेल तर चित्रपट सोडून निघून जा.”

mumtaj InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

” मला हिच्या बरोबर काम नाही करायचं. एक साईड हिरोईन माझ्यासारख्या हिरोबर लिडिंग रोल करणार? मला नाही काम करायचं हिच्याबरोबर.” प्रोड्युसर व्ही. शांताराम समोर त्यावेळचा जम्पिंग जॅक म्हणून फेमस झालेला हिरो जितेंद्र उभा होता.

चर्चा चालू होती “बुंद जो बन गये मोती” या सिनेमाच्या हिरोईन विषयी.

व्ही.शांताराम यांना हिरॉईन म्हणून मुमताज ही अभिनेत्री हवी होती. तर हिरो असलेल्या जितेंद्रला ती नको होती. एका बी ग्रेड चित्रपटाच्या हिरॉईन बरोबर काम करण्यास त्याला कमीपणा वाटत होता.

 

तसा तर तो शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली “गीत गाया पत्थरोंने” या चित्रपटामुळेच अभिनेता म्हणून समोर आला होता. त्यात त्याची हिरॉईन होती शांताराम यांची कन्या राजश्री. “बुंद जो बन गये मोती” आधी राजश्रीच करणार होती म्हणून जितेंद्र खुष होता.

पण ऐनवेळी राजश्री बाजूला झाली आणि हा रोल व्ही. शांताराम यांनी मुमताजला दिला. जितेंद्रला काही अपवाद वगळता आधीच्या सिनेमांनी तितकासा हात दिला नव्हता पण “गीत गाया”… चित्रपटाने त्याला चांगला अभिनेता हा किताब बहाल केला होता.

त्याला वाटले होते की व्ही.शांताराम त्याचे ऐकतील पण झाले उलटेच.

“तुला मुमताज बरोबर काम करायचे नसेल तर तू हा सिनेमा सोडू शकतोस. मी दुसरा हिरो घेईन.मला तीच हिरॉईन म्हणून हवी आहे.” व्ही. शांताराम यांनी जितेंद्रलाच सुनावले.

जितेंद्र समोर मुमताज बरोबर काम करण्यावाचून दुसरा पर्याय उरलाच नव्हता. पिक्चर हिट झाला. मुमताज हिंदी फिल्मच्या मुख्य प्रवाहात आली आणि लोकांनी तिला ए ग्रेड चित्रपटाची हिरॉईन म्हणून स्वीकारलं.

 

YouTube

खरंतर मुमताज काही नव्यानेच या फिल्म इंडस्ट्रीत आलेली नव्हती. वयाच्या बाराव्या वर्षीच ती बालकलाकार म्हणून इथं आली होती.
डझनभर तरी पिक्चर तिच्या नावावर जमा होते.

आधी बालकलाकार नंतर साईड हिरॉईन व नंतर दारासिंगची हिरॉईन म्हणून ती परिचित होतीच. दिसायला गोरीपान, किंचित अपरं नाक, मोत्यांसारखी सुरेख दंतपंक्ती आणि भुरे डोळे आणि या सर्वांवर मात करणारं गोड खट्याळ हसू सदैव चेहऱ्यावर विलसत असायचं.

पुढं याच जितेंद्रशी तिची छान मैत्री जुळली कारण कोणतीही गोष्ट मनाला लावून घ्यायचा तिचा स्वभाव नव्हता. मुळातच असे अनेक अनुभव पचवतच ती इथवर पोचली होती.

एक जितेंद्रच नाही तर शशी कपूरने सुद्धा स्टंट हिरॉइन म्हणून तिच्याबरोबर काम करायचे नाकारले पण नंतर त्याच शशीकपूरने “चोर मचाए शोर ” साठी निर्मात्याला अट घातली की मुमताज त्याची हिरॉइन असेल तरच तो काम करेल. दोघे एकत्र आले त्या सिनेमात. त्यातील गाणी पण गाजली.

मुमताजने रसिकांच्या मनावर इतकी मोहिनी घातली होती की १९६० ते ७० च्या दशकात सर्वत्र तिचेच नाव गाजत होते.

 

Times Now

देवानंद, दिलीपकुमार, धर्मेंद्र, राजेंद्रकुमार, शशी कपूर, जितेंद्र, संजीव कुमार,आणि राजेश खन्ना या सर्व बड्या हिरोंबरोबर तिने पडद्यावर रोमान्स केला पण तिची रिअल लाईफमध्ये जोडी जमली ती एका गुजराती व्यावसायिक मयूर माधवानी याच्याशी.

वयाच्या सव्वीसाव्या वर्षी चित्रसृष्टी सोडून ती कायमची लंडनला निघून गेली.

हिंदी चित्रसृष्टीत सर्वात जास्त मानधन घेणारी मुमताज तिच्या अदाकारीने आणि खट्याळ हास्याने ‘सबके दिल की धडकन’ बनली होती.आधी तिला हिरॉईन म्हणून नाकारणारा

शम्मी कपूर तर तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता व तिला त्याने लग्नासाठी मागणी पण घातली होती मुमताज ला देखील तो आवडत होता पण शम्मीची अट होती की तिने तिची फिल्मी करिअर सोडावी पण मुमताज यासाठी तयार नव्हती.

 

Zee News

मुळातच एका इराणी कुटुंबात जन्मलेली मुमताज घरातील आर्थिक तंगी मुळे आणि चित्रपटात काम मिळवायच्या दृष्टीने या इंडस्ट्रीत आली होती.

तिची आई देखील डान्सर म्हणून फिल्मध्ये काम करत होती. छोट्या मुमताज ला देखील नृत्याची आवड होती आणि ती चांगली नर्तिका होतीच. ती आणि धाकटी बहीण मल्लिका दोघी चित्रपटात काम करण्यासाठी धडपडत होत्या.

अखेर “सोने की चिडीया” चित्रपटातून बालकलाकार म्हणून ती चित्रसृष्टीत आली. अनेक छोटे छोटे रोल करत ती साईड हिरॉईन बनली आणि नंतर दारासिंग बरोबर तिची जोडी जमली आणि त्याच्याबरोबर स्टंटस करून ती स्टंट हिरॉइन म्हणून ओळखली जाऊ लागली.

 

जेव्हा ती मेन स्ट्रीम मध्ये आली तेव्हा केवळ कपूर खानदानाची बहू होण्यासाठी फिल्मी करियर सोडणे मुमताजला निव्वळ अशक्य होते. ज्या स्वप्नांचा पाठलाग करत ती इथे यश मिळवत होती ते सगळं सोडणे तिला शक्यच नव्हते आणि ती प्रेमकहाणी तिथेच संपुष्टात आली.

मुमताज स्टंट हिरॉईन आहे म्हणून तिला नाकारण्यात वाटा होता देवानंदचा देखील. पण याच देवानंद बरोबरचा तिचा “तेरे मेरे सपने” रसिकांना आवडला. डॉक्टर पती आपल्या पत्नीला सोडून एक अभिनेत्रीच्या मागे लागतो तेव्हा पत्नीची होणारी घुसमट मुमताजने अप्रतिम साकारली होती.

तर त्याच्या बरोबरच्या हरेकृष्ण हरेराम मधील “कांचा रे कांचा रे” ..हे गाणे तुफान गाजले होते.

 

ThePrint

ज्या संजीवकुमार ने तिला नाकारले होते त्याच संजीवकुमार बरोबर एल व्ही प्रसाद यांनी तिची निवड “खिलौना” साठी केली आणि त्या सिनेमाने तिला प्रसिद्धी व यश मिळवून दिले आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्म फेअर अवार्ड देखील.ही गोष्ट होती १९७० ची.

तरीही मुमताज ने संजीवकुमार ला याची जाणीव करून दिली नाही हा तिचा मोठा गुण.

फिरोजखान बरोबर तिने १९७१ मध्ये “मेला” १९७२ मध्ये “अपराध” आणि नंतर मल्टी स्टारर “नागीन” हे तीन सिनेमे केले.
“अपराध” मध्ये मुमताज बिकिनी मध्ये दिसली.

तिच्या आरस्पानी सौंदर्याने रसिक तर घायाळ झालेच पण खुद्द फिरोज खान देखील घायाळ झाला होता पण त्याच दरम्यान त्याचा भाऊ संजयखान बरोबर तिचे नाव काही काळ जोडले गेले होते पण मुमताज ने अशा विषयात गप्प राहणेच पसंत केले होते.

पण दैवगती अशी की याच फिरोजखानच्या मुलाबरोबर म्हणजे फरदिनखान बरोबर मुमताज च्या मोठ्या मुलीचे लग्न झाले आणि फिरोजची ती विहिण झाली.

 

Bollywood Papa

तिला नाकारणाऱ्यांच्या लिस्ट मधील अजून एक नाव म्हणजे राजेंद्रकुमार. त्याच्या बरोबर ती “टांगेवाला” मध्ये चमकली. लिस्ट अजून संपली नाहीय.धर्मेंद्र देखील याच नन्नाचा पाढा वाचणाऱ्या लिस्टमध्ये होता.

त्याच्या सोबत चक्क दोन पिक्चर तिने केले. एक “लोफर” आणि दुसरा “झिल के उस पार”. दोन्ही चांगले गाजले तिच्या अभिनयासाठी.

दिलीपकुमारला ती फारशी पसंत नव्हती हिरॉईन म्हणून पण “राम और श्याम” मध्ये ती त्याची हिरॉईन म्हणून आली आणि मग तिच्या चुलबुल्या रोल मुळे तो ही तिच्यावर काही काळ फिदा झाला होता.

एकंदरीत ज्या हिरोंनी तिला बी ग्रेड ची किंवा स्टंट हिरॉईन म्हणून नाकारले त्यांना तिच्या बरोबर काम करावेच लागले. कधी मजबुरी म्हणून तर कधी त्यांनी आपणहून तिच्या बरोबर काम करायची संधी मिळावी म्हणून निर्मात्याला विनंती केली.

मुमताज ने मात्र कधीच कोणत्याही मुलाखतीत या विषयी कडवटपणा व्यक्त केला नाही किंवा ते कसे नमले झुकले असे बेताल वक्तव्य देखील केले नाही, ती फक्त स्वतःला सिद्ध करत राहिली.

या करिअरच्या १० वर्षांच्या काळात तिने चित्रपटांचे शतक ओलांडले आणि तिची पडद्यावरील सर्वाधिक चांगली जोडी जमली ती राजेश खन्ना सोबत.

या जोडीचे एक दोन नाही तब्बल दहा सिनेमे गाजले.आजवरची सर्वात यशस्वी जोडी हीच आहे ज्यांचे सर्वच पिक्चर हिट झाले. “रोटी” “बंधन” “आप की कसम” “सच्चा झुठा” “अपना देश” “दो रास्ते” “दुश्मन” “प्रेम कहानी” “आईना” “राजा रानी”, हे ते दहा सिनेमे.

 

Shemaroo

“आपकी की कसम” मधील भांगेच्या नशेतील गाणे “जयजय शिवशंकर”. तिच्या खट्याळ अदाकारीने प्रचंड गाजले. रसिकांच्या ओठांवर हे गाणे दीर्घकाळ रेंगाळत होते.

“आईना” आला १९७७ ला त्याच दरम्यान तिचे लग्न झाले गुजराती व्यावसायिक “मयूर मधवानी” सोबत आणि यशाच्या शिखरावर असताना ती चित्रपट सृष्टी सोडून लंडनला स्थायिक झाली.

१९९० भारतात आली असताना तिने “आंधीयां” चित्रपट केला खरा पण प्रेक्षकांना ती आईच्या रोलमध्ये नाही आवडली. त्यांना तीच जुनी सेन्सेटिव्ह,चुलबुली,खट्याळ मधाळ अशी मुमताज हवी होती.

 

YouTube

त्यानंतर मग पुन्हा कधीच मुमताज बॉलिवूड कडे फिरकली नाही.

मध्यंतरी तिचे दोन तीन इंटरव्ह्यू सोशल मीडियावर झळकले होते पण कोणत्याही मुलाखतीत तिने कोणालाही दोष दिला नाही.
जितेंद्र बद्दल खोदून विचारल्यावर तिचं म्हणणं होतं “आम्ही नंतर बरेच पिक्चर एकत्र केले.

पण राजेश खन्ना बरोबर स्क्रीनवर जोडी जमली तितकीशी जितू बरोबर नाही जुळली. It’s fate and destiny. प्रेक्षकचं एखाद्या नटाला किंवा नटीला डोक्यावर उचलून घेतात किंवा आपटतात.”

“सीता और गीता” ची तीला ऑफर मिळाली होती. या विषयी विचारल्यावर ती म्हणाली “त्याचे खूपच कमी पैसे ते देणार होते म्हणून मी नाकारली”.

पण हेमामालिनीला त्याच सिनेमाचे अवॉर्ड मिळाले या विषयावर छेडल्यावर ती म्हणाली, “पण मला त्यापूर्वीच फिल्मफेअर मिळाले होतेच की.” ना खेद ना हळहळ..फिल्म इंडस्ट्री मधील गैर प्रकारांबद्दल हेच मत..

“कुठे गैरप्रकार होत नाहीत? तुमच्यात गुण असतील आणि तुम्ही खंबीर असाल तर तुमच्या गुणांची कदर होईलच. एकट्या फिल्म इंडस्ट्रीला का बदनाम करायचे?”

आता ४० वर्षं उलटून गेलीत मुंबई सोडून.. दोन्ही मुलींची लग्न झाली नवरा बिझनेसमुळे सतत प्रवासात असतो त्यामुळे ती थोडीशी एकटी पडलीय पण तिला पार्टीत जाणे आवडत नाही पटकन कोणाशी मैत्री करायला जमत नाही.

पण लंडन मध्ये तिथल्या ३० वर्षें जुन्या असलेल्या मैत्रीणीं सोबत संध्याकाळी भटकत राहायला आवडते.

एकदा कॅन्सरच्या तडाख्यातून ती वाचलीय.

अलीकडे थायरॉईड च्या प्रॉब्लेममुळे थोडी त्रस्त झालीय. काही महिन्यांपूर्वी तिच्या मृत्यू ची वार्ता मुंबईत थडकली होती पण तिच्या मुलीने ती आपल्या सोबत रोम मध्ये एन्जॉय करतेय असे जाहीर करून ही वार्ता खोटी असल्याचे व मुमताज चे तिच्या बरोबरचा व जावया सोबतचा फोटो असे दोन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.

मुमताजची आयुष्या बद्दल किंवा जुन्या सहकाऱ्यांबद्दल तक्रारी नाहीत. कोणाबद्दल खंत नाही. जे मागे सोडून आली त्या बद्दलही खेद नाही.

 

Mid-Day

नाहीतर अशा हिरॉइन्स ढिगाने सापडतील की ज्या लग्न करून फिल्मी दुनियेपासून दूर गेल्या पण परत आल्या. काहींनी संसार मोडून परत फिल्म लाईनमध्ये धाव घेतली.

पण मुमताज एकटी असावी जी लग्नानंतर एकाच फिल्मचा अपवाद वगळता पूर्णपणे फिल्मी करिअर मागे सोडून आपल्या संसारात रममाण झाली. उर्वरित सुखी आयुष्यासाठी मुमताज तुम्हाला खुप खुप सदिच्छा…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version