' साप चावल्यानंतर तिने जे काही केलं ते पाहून डॉक्टरांचीसुद्धा बोबडी वळली..! – InMarathi

साप चावल्यानंतर तिने जे काही केलं ते पाहून डॉक्टरांचीसुद्धा बोबडी वळली..!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

साप या प्राण्याबद्दल बहुतांश लोकांना भीतीमिश्रित कुतूहल असते. कुणाच्या घरात,अंगणात साप शिरला असेल तर तो किती मोठा आहे हे लांबून बघायला मोठी गर्दी जमते.

फार थोडे लोक असे आहेत ज्यांनी सापाच्या भीतीवर विजय मिळवला आहे आणि ते अगदी सहजतेने विषारी साप सुद्धा पकडू शकतात.

पण बहुतांश लोकांना सापाची भीतीच वाटते आणि चुकून जर का साप चावला तर तो विषारी होता की बिनविषारी ह्याचा विचार न करता माणूस भीतीनेच अर्धमेला होतो.

सध्या पावसाचे दिवस आहेत. रस्त्यांवर झाडेझुडुपांची वाढ झाली आहे. अश्या वातावरणात साप कुठेही झाडाझुडूपात किंवा कडेकपारीत लपून बसलेले असतात. आपण चुकून त्यांच्या जवळ गेलो की स्वसंरक्षणासाठी ते आपल्याला चावतात.

 

Snake byte Inmarathi

 

साप विषारी असेल तर लगेच शरीर विषबाधेची लक्षणे दाखवते पण तो बिनविषारी असला तरी माणसाला भीती ही वाटतेच. अनेक लोकांना विषारी, निमविषारी आणि बिनविषारी सापांमधील फरक पटकन लक्षात येत नाही.

एकदा साप चावला तर तो कसा होता हे बघण्याइतके प्रसंगावधान फार थोड्या लोकांमध्ये असते.

त्यामुळे साप चावल्यावर लक्षणांची वाट न बघत बसता, आपल्याच मनाने इतर कुठलेही गावठी उपचार करण्याच्या भानगडीत न पडता सरळ डॉक्टरकडे जावे. डॉक्टरकडे पोहोचेपर्यंत काही प्राथमिक काळजी घ्यावी.

हे ही वाचा ऐकावं ते नवलंच : या गावात नवरदेवाला हुंडा म्हणून चक्क २१ विषारी साप दिले जातात

काही महिन्यांपूर्वी मुसळधार पाऊस पडल्यामुळे अठरा वर्षीय तेहसीम खानच्या घरात साप शिरला आणि ती टीव्ही बघत असताना तिला तो साप चावला.

तिला आपल्याला काहीतरी चावलेय हे लक्षात येईपर्यंत उशीर झाला होता आणि सापाने आपले काम केले होते. घरात साप बघून तेहसीम घाबरली आणि जोरात किंचाळली.

तिच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून तेहसीमच्या आई सुलताना आपल्या मुलीकडे धावल्या. मुलीवर पटकन उपचार करण्यासाठी साप कुठला होता हे माहिती असायला हवे.

म्हणून सुलताना नेमका तो साप कुठला आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न करू लागल्या आणि त्यांनी तो साप हाताने पकडला. पण असे करताना त्या प्रशिक्षित नसल्यामुळे तो साप त्यांनाही चावला.

 

sultana tehjim inmarathi

 

सुलताना आणि तेहसीम वेळ न दवडता जवळच्याच डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये गेल्या तेव्हा त्यांना सायन हॉस्पिटलला जाण्याचा सल्ला देण्यात आला.

सायन हॉस्पिटलचे डीन डॉक्टर प्रवीण इंगळे ह्यांनी द एशियन एज शी बोलताना सांगितले की, “त्या बाईंनी तो साप आमच्या दवाखान्यात दाखवायला आणला त्यामुळे आम्हाला पटकन हालचाल करता आली.

त्यामुळे आम्हाला लक्षात आले की नेमके कुठले विष त्यांच्या शरीरात गेले आहे, आणि त्यावरून आम्हाला उपचारांची दिशा ठरवण्यास मदत झाली.”

डॉक्टरांनी सांगितले की तो साप म्हणजे सापांच्या अत्यंत विषारी जमातींपैकी एक जमात म्हणजे घोणस हा साप होता. घोणसला इंग्रजीत रसेल्स व्हायपर असे म्हणतात.

महाराष्ट्रात आढळणाऱ्या चार प्रकारच्या विषारी सापांपैकी घोणस हा एक वायपरिडे उपकुळातील साप आहे. ह्या सापाचे फुत्कार कुकरच्या शिट्टीप्रमाणे असतात.

घोणस ओळखण्याची मोठी खूण म्हणजे त्याच्या अंगावर साखळीसारख्या तीन समांतर रेषा असतात. घोणस हलका करडा रंग, हिरवा, पिवळा अश्या रंगांत आढळतात.

 

ghonas Inmarathi

 

ह्या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे हा साप ह्याचे विषाचे दात तोंडात दुमडून घेऊ शकतो. ह्या सापाचे विष अत्यंत जहाल असते आणि ते आपल्या शरीरात गेल्यानंतर आपल्या रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करते.

त्यामुळे रक्तातील गुठळ्या करू शकणाऱ्या प्रथिनांचा नाश होऊ लागतो आणि त्यामुळे हा साप चावल्यानंतर जखमेतून वाहणारे रक्त लवकर थांबत नाही आणि थोड्याच वेळात नाकपुड्या, कान व गुदद्वारातून रक्तस्त्राव होऊ लागतो.

ह्यावर प्रतिविषाचे औषध पटकन न मिळाल्यास माणूस एका दिवसात मरण पावतो.

घोणस चावल्यावर प्रतिविष देणे हा एकमेव उपाय आहे. रुग्णास पाणी पिण्यास देऊ नये आणि मानसिक धीर द्यावा कारण रुग्ण आधीच प्रचंड घाबरलेला असतो आणि घाबरून सुद्धा मृत्यू होऊ शकतो.

सुलताना ह्यांनी वेळीच हालचाल करून स्वतःसकट मुलीला देखील हॉस्पिटलला नेल्यामुळे व विषाचा प्रकार कळल्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर पटकन उपचार केले आणि त्यांचा जीव वाचला.

सुलताना आणि तेहसीम आता बऱ्या आहेत.

 

Sion hospital Inmarathi

 

पण तसा शांतपणे ह्याबाबतीत विचार केला की असे वाटते की साप कुठला आहे हे शोधण्यासाठी आणि उपचार पटकन व्हावेत म्हणून चक्क जिवंत सापालाच पकडून घरातून क्लिनिक आणि मग हॉस्पिटलपर्यंत नेणे कितपत सुरक्षित आहे?

जर तो साप वाटेत मोकळा सुटला असता आणि इतरांना चावला असता तर? किंवा कॅबमधल्या ड्रायव्हरला चावला असता तर किती भयानक परिस्थिती ओढवली असती?

साप चावल्यावर काय करायचे हे प्रत्येकालाच माहिती असेल असे नाही, आणि प्रत्येकाकडे तितके धैर्य आणि प्रसंगावधान असेलच असे नाही. सुलताना आणि तेहसीम नशीबवान आहेत म्हणून त्या वाचल्या आणि साप त्यांच्या तावडीतून मोकळा सुटला नाही.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आकडेवारीकडे बघितल्यास लक्षात येईल की दर वर्षी कमीत कमी पन्नास हजार लोक सर्पदंशाने मरण पावतात. WHO ने सर्पदंश हा “neglected tropical disease” असल्याचे म्हटले आहे.

 

WHO Inmarathi

 

ह्यामुळे डॉक्टरांकडे वेळेत न जाणे, अपुरी उपचारसामग्री किंवा प्रतिविष उपलब्ध नसणे ह्या कारणांमुळे बहुसंख्य लोकांचे मृत्यू होतात.

भारतात दर वर्षी २.८ दशलक्ष सर्पदंशाच्या केसेसची नोंद होते. आणि त्यातील नव्वद टक्के लोकांना नाग, फुरसे, घोणस आणि मण्यार ह्यांचा दंश होतो.

द बेटर इंडियाने ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल इंडियाशी सर्पदंशानंतर काय करावे व काय करू नये ह्याविषयी चर्चा केली तेव्हा HSI चे मॅनेजिंग डायरेक्टर अलोकपर्ण सेनगुप्ता ह्यांनी सांगितले की.,

“आपल्याकडे सर्पदंश ही बाब अत्यंत दुर्लक्षित आहे. त्यामुळे ह्याविषयी जनजागृती झाली तर अनेक प्राण वाचू शकतील.”

सर्पदंश झाल्यानंतर करावयाच्या गोष्टी-

. डोके शांत ठेवा आणि रुग्णाला सुद्धा धीर द्या. कुठलेही अतार्किक निर्णय घेऊ नका.

. शरीरावर बांगडी, घड्याळासारखी कुठलीही घट्ट वस्तू असेल तर ती काढून टाका.

. हात किंवा पायावर दंश झाला असेल तर शरीराचा तो भाग हलवू नका. स्थिर ठेवा. ह्याने सूज कमी होईल आणि दुखणे कमी व्हायला मदत होईल.

. रुग्णाला त्वरित दवाखान्यात न्या.

. रुग्णालयात नेताना रुग्णाचे शरीर कोणती लक्षणे दाखवत आहे त्याकडे लक्ष ठेवा आणि त्याविषयी डॉक्टरांना माहिती द्या.

 

snake bite inmarathi

 

सर्पदंश झाल्यावर ह्या गोष्टी करू नका

१. सर्पदंश झालेला भाग कशानेही आवळून ठेवू नका.

२. रुग्णाला पेनकिलर्स देऊ नका.

३. रुग्णाला चहा, कॉफी किंवा दारूचे सेवन करू देऊ नका.

४. जखम पाण्याने धुवू नका किंवा जखम अधिक कापून उघडी करू नका.

५. सिनेमात दाखवतात तसे तोंडाने विष चोखण्याचा प्रयत्न तर चुकूनही करू नका. त्याने तुम्हाला विषबाधा होईल .

६. सापाला पकडून मारण्याच्या भानगडीत पडू नका.

HSI च्या मते रुग्णालयात रुग्णाची लक्षणे बघून त्यावर योग्य ते उपचार केले जातील. सध्या असे औषध उपलब्ध आहे जे चारही प्रकारच्या सापांच्या विषावर उपयुक्त आहे.

त्यामुळे डॉक्टरांना कुठला साप चावला हे माहिती असण्याची गरज नाही. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि सर्पदंश झाल्यावर शक्यतोवर शांत राहून पटकन डॉक्टरांकडे जा!

===

हे ही वाचा जगातील या आठ अत्यंत धोकादायक तरीदेखील सुंदर सापांच्या जाती….जाणून घ्या

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?