नेव्हीचं प्लेन हायजॅक करणारा असाही हवाई जॅक स्पॅरो, तोही भारतीय!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
पायरेट्स ऑफ द कॅरिबियन मधील जॅक स्पॅरो कोणाला माहित नाही? समुद्रातील जहाजे हायजॅक करणे हा त्याचा छंद असतो. पंचावन्न वर्षांपूर्वी असाच एक हवाई जॅक स्पॅरो होऊन गेला. तो ही भारतीय.

ह्याने चक्क नेव्हीचे एक फायटर जेट हायजॅक केले आणि ते चेन्नई जवळच्या समुद्रात लँड केले. ऍडमिरल अजूनही त्याच्या शोधात आहेत.
१९६४ साली अजित सिंग गिल नावाच्या एका खलाशाने फक्त विमानात बसून फिरण्यासाठी एक विमान हायजॅक केले. खरं तर त्याला ते विमान सुरक्षितपणे परत सुद्धा आणायचे होते.
पण परत येताना त्याच्या लक्षात आले की त्याला विमानाचे एयरब्रेक्स आणि फ्लॅप कसे वापरायचे हेच माहिती नव्हतं!
मागच्या वर्षी सुद्धा एक अशीच घटना घडली होती. सिएटल सी टॅक एअरपोर्टवर रिचर्ड रसेल नावाच्या एकोणतीस वर्षीय बॅगेज हँड्लरने एक ७६ सीटर बम्बार्डियर Q४०० पॅसेंजर विमान हायजॅक केले आणि हवेत चित्तथराक सर्कस करत त्याने ते विमान जवळच्या एका बेटावर क्रॅश केले.
आपल्याकडे अजित गिलने रविवार १२ ऑगस्ट १९६४ रोजी इंडियन नेव्ही हॉकर सी हॉक फायटर जेट हे चेन्नईच्या मीनांबक्कम एयरपोर्ट डिस्पर्सल सी एरिया म्हणजेच थोडक्यात पार्किंग बे वरून चालवत नेले. त्याने ते विमान रनवेवर नेले आणि बंगालच्या उपसागराच्या दिशेने उडवले.

ते विमान बघून चेन्नईच्या लोकांना फार काही आश्चर्य वाटले नाही.कारण तेव्हा भारताची युद्धनौका आयएनएस विक्रांत नुकतीच मुंबई पोर्ट वरून चेन्नईला फ्लायिंग ट्रेनिंगसाठी आणण्यात आली होती.
नेव्हीतील लोकांचे प्रशिक्षण सुरु झाले होते. तेव्हा आयएनएस विक्रांतवर असलेले ३०० व्हाईट टायगर्स स्क्वाड्रनच्या ताफ्यातील सिंगल सीट सिंगल इंजिन सी हॉक फायटर जेट्स उडवण्याचा सराव आणि प्रशिक्षण सुरु होते आणि त्यामुळे चेन्नईकरांच्या आकाशात सततच हे फायटर जेट्स बघण्याची त्यांना सवय झाली होती.
पण इकडे बेसवर मात्र गोंधळ उडाला होता.
रविवार असल्याने त्या दिवशी त्या वेळेला कुठलेच फ्लाईट निर्धारित केले गेले नव्हते. तरीही सी हॉक नंबर IN १६३ हे बंदराकडे झेपावले जिथे आयएनएस विक्रांत समुद्रकिनारी उभी होती.
कुठलेही विमान निर्धारित नसताना फायटर जेट आकाशात झेपावले हे बघून एयर ट्राफिक कण्ट्रोलमध्ये पूर्ण गोंधळ उडाला. त्यांनी घाबरून रेडियोवर बेपत्ता विमानाची माहिती दिली.

नेव्हीच्या लोकांना आढळले की नेव्हल एयरक्राफ्ट ऑर्डनन्स मेकॅनिक अजित सिंग गिलची त्या दिवशी ड्युटी होती आणि तो बेपत्ता होता.
हा पंचवीस वर्षीय खलाशी ३०० स्क्वाड्रनच्या अग्नी व सुरक्षा दलाचा प्रमुख होता.
नेव्हीच्या लोकांना लक्षात आले की गिलने हे विमान चालवत नेले आणि उडवले. त्याने बोन डोम सुद्दा घातले नव्हते. बोन डोम म्हणजे रेडिओ सेट असलेले फ्लाईट हेल्मेट असते. त्याने ते हेल्मेट सुद्धा घातलेले नसल्याने एयर ट्राफिक कंट्रोल सुद्धा त्याच्याशी संपर्क करू शकत नव्हते.
अमेरिकेत अशी खळबळ उडवून देणाऱ्या रिचर्ड रसेलला व्हिडीओ गेममधील विमानं उडवण्यापलीकडे खरे विमान उडवण्याबद्दल काहीही ठाऊक नव्हते. त्याला कसलाही अनुभव नव्हता. ह्याउलट गिल हा एक प्रशिक्षित वैमानिक होता.
त्याच्याकडे प्रायव्हेट पायलट लायसन्स सुद्धा होते पण त्याची मुदत संपलेली होती. त्याला फक्त गंमत म्हणून विमानात फिरून यायचे होते. बाकी त्याचा काहीही उद्देश नव्हता. विमानात बसून एक चक्कर मारून विमान परत घेऊन यायचे इतकीच त्याची योजना होती.
पण जेव्हा अजित मीनांबक्कम एयरपोर्टवर परत आला, तेव्हा त्याच्या लक्षात आले की त्याला विमानाचे एयर ब्रेक आणि फ्लॅप कश्या वापरायच्या हेच माहिती नव्हते.

पण ह्या दोन्हीही गोष्टी लँडिंगच्या आधी विमानाचा वेग कमी करण्यासाठी आवश्यक होत्या. त्याने वेगात लँडिंग करण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्याला लँडिंग करता आले नाही.
तो समुद्राच्या दिशेने गेला. त्याने ते विमान व्यवस्थितपणे समुद्रात लँड केले. तिरुवनमीयुर बीचपासून १० किलोमीटर अंतरावर समुद्रात त्याने टेक ऑफ नंतर एका तासाने विमान उतरवले.
असे करून तो सी हॉक समुद्रात उतरवणारा पहिला आणि शेवटचा वैमानिक ठरला.
जसे विमान समुद्रात उतरले तसे अजितने त्याचा सीटबेल्ट काढला आणि तो वर आला. समुद्रात मासेमारी करणाऱ्यांना तो बेशुद्धावस्थेत सापडला.
त्याची पगडी निघालेली होती आणि त्याच्या पाण्यावर तरंगणाऱ्या केसांमुळे तो मासेमारी करणाऱ्यांना सापडला. गिलची ही करामत व्हाईस ऍडमिरल विनोद पसरीचा ह्यांच्या २०१० साली प्रकाशित झालेल्या “Downwind Four Green” ह्या पुस्तकात नमूद केली आहे.

अर्थात त्याच्या ह्या कृतीमुळे त्याला सहज सोडण्यात येणार नव्हतेच. तेव्हा नेव्ही ऍक्ट अनुसार अनधिकृतरित्या विमान उडवल्यास काय कारवाई करायची हे नमूद केले नसल्याने त्याला ड्युटीवरून बेपत्ता झाल्याच्या कारणावरून त्याच्यावर नेव्ही ऍक्टच्या सेक्शन ७४ नुसार कारवाई झाली.
त्याचे कोर्ट मार्शल झाले. त्याला दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली. त्याने त्याची शिक्षा भोगली आणि नंतर तो बेपत्ताच झाला. त्याने त्याच्या सहकारी मित्रांशी देखील काहीही संपर्क ठेवला नाही.
व्हाईस ऍडमिरल पसरीचा ह्यांनी त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काहीही मागमूस लागला नाही.पण गिलच्या सहकारी मित्रांशी बोलून त्यांनी त्याने असे का केले असावे हे शोधून काढले.
गिल हा एक प्रशिक्षित पायलट होता आणि त्याच्याकडे दिल्ली फ्लायिंग क्लबचे प्रायव्हेट पायलट्स लायसन्स होते. तो त्याच्याकडे असलेला फावला वेळ एरो मॉडेलर्स क्लबमध्ये घालवत असे किंवा विमान चालवण्याचा विचार करत असे.
तीन भावंडांमध्ये तो सर्वात धाकटा होता आणि त्याचे वडील डिफेन्स अकाउंट्समध्ये कामाला होते. त्याचे दोन्ही भाऊ आर्मी मध्ये होते. अजित १९५४ साली नेव्हीमध्ये आला आणि थोड्याच वेळात नेव्हल एयरक्राफ्ट ऑर्डनन्स मेकॅनिक ह्या पदापर्यंत त्याने प्रगती केली.

एप्रिल १९६० मध्ये त्याला आयएनएस विक्रांतला परत आणण्यासाठी टीम बरोबर युकेला पाठवण्यात आले होते. त्याने वायुसेनेत इमर्जन्सी कमिशन्ड ऑफिसरपदासाठी अर्ज केला होता पण त्याची एक वर्षाची नेव्हीची सर्व्हिस शिल्लक असल्याने त्याला नेव्हीने जाण्याची परवानगी दिली नाही.
त्याच्यावर ३०० स्क्वाड्रन्समध्ये मोठी जबाबदारी असल्याने त्याच्यावर कामाचा खुप ताण होता. त्यामुळे त्याचा वैमानिक परवाना सुद्धा संपला. तो पायलट लोकांना स्ट्रॅप अप करण्यासाठी मदत करत असे आणि कॉकपीट मधील स्विचेस बद्दल खूप प्रश्न विचारत असे.
१९६४ साली सुद्धा गिलने एयरफोर्स मध्ये जाण्यासाठी परवानगी मागितली पण नेव्हीने ती परत नाकारली. त्यामुळे तो वैतागला असेल आणि त्याने हे विमान हायजॅक केले असेल असे ऍडमिरल पसरीचा ह्यांना वाटते.
अजित गिलचे वायुसेनेत फायटर पायलट होण्याचे स्वप्न होते.तो एक उत्कृष्ट फायटर पायलट होऊ शकला असता असे ऍडमिरल पसरीचा म्हणतात.
बिचाऱ्याने वैतागून एक चूक केली आणि त्या एका चुकीमुळे त्याने सगळे गमावले.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.