आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
सध्या झी मराठीवर मिसेस मुख्यमंत्री ह्या नव्या मालिकेच्या जाहिराती म्हणजेच टीझर्स सारखे दाखवत आहेत. ते काही सेकंदांचे व्हिडीओ बघून मनात विचार येतो की हे सिरीयल लेखक आहेत की सिरीयल किलर्स आहेत?
कारण हे प्रोमो पाहिल्यावर कुठल्याही सामान्य लॉजिकल विचार करू शकणाऱ्या माणसाचं बीपी कमीजास्त न झाल्यास नवल!
मिसेस मुख्यमंत्री गावाकडची आहे, चला मान्य आहे की मिसेस मुख्यमंत्र्यांना म्हशी कश्या हाकलाव्या ह्याची चांगलीच माहिती आहे.
म्हणून मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा रस्त्यात ढिम्मपणे उभ्या असलेल्या म्हशींमुळे अडतो.
मुख्यमंत्र्यांचे सहकारी, सुरक्षारक्षक वगैरे म्हशींपुढे हतबलपणे उभे राहून आता काय करायचे असा विचार करत असतानाच खमक्या असलेल्या मिसेस मुख्यमंत्री गाडीतून उतरतात आणि अगदी ठसक्यात म्हशींना हाकलवून लावतात आणि स्टाईलने डोक्यावर पदर घेऊन परत आपल्या गाडीत जाऊन बसतात.
गावाकडच्या लोकांना प्राण्यांना कसे हाताळायचे ह्याचे चांगले ज्ञान असते कारण ते निसर्गाच्या सानिध्यातच राहतात. म्हणून त्यांचे हे कसब वेळेला उपयोगी पडते.
ठीक आहे. इथपर्यंत आमचं काहीच म्हणणं नाही. हे बघून प्रेक्षकांची उत्सुकता चाळवली गेली.
असं वाटलं की चला! मिसेस मुख्यमंत्री गावाकडच्या आहेत तर खेडोपाड्यात लोकांना काय काय सहन करावे लागते, कुठल्या समस्यांना तोंड द्यावे लागते हे मिसेस मुख्यमंत्री त्यांच्या पतींना सांगून सर्वसामान्यांचे प्रश्न कसे चुटकीसरशी सोडवतात हेच बहुतेक ह्या मालिकेत दाखवणार असतील.
पण ह्या मालिकेचा दुसरा प्रोमो बघितला आणि सपशेल निराशाच झाली.
दुसऱ्या प्रोमोमध्ये अगदी तरुण दिसणाऱ्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीहून अर्जंट आणि अत्यंत महत्वाचा फोन येतो आणि ते आपल्या सहकाऱ्यांसह पटापट सूत्रं हलवून तातडीने कामासाठी बाहेर जायला निघतात.
आणि दारातून अंगणात आल्यावर बघतात तर काय ,मिसेस मुख्यमंत्री सरकारी लाल दिव्याच्या गाडीवर छानपैकी प्लॅस्टिक टाकून त्यावर मस्तपैकी सांडगे घालत आहेत.
आणि सांडग्यांचं मिश्रण असलेलं भांडं हातात घेऊन मुख्यमंत्र्यांचे सारथी/ड्रायव्हर हताशपणे मुख्यमंत्र्यांकडे बघत आहेत.
ह्यावर कडी म्हणून मिसेस मुख्यमंत्री म्हणतात की, “माझे सांडगे झाल्याशिवाय गाड्या मिळायच्या नाहीत. आता नंतर घेऊन जा!” ह्यावर मुख्यमंत्री आपल्या घरच्या लक्ष्मीकडे /अन्नपूर्णेकडे हताशपणे बघत बसतात.
आणि मिसेस मुख्यमंत्री म्हणतात ,”मी मिरवते! सगळ्यांची जिरवते!”
ह्या मालिकेचा तिसरा प्रोमो बघून तर चक्करच यायची बाकी राहिली होती.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक सुरु असते. मुख्यमंत्री त्यांच्या कचेरीत त्यांच्या खुर्चीत बसून मंत्र्यांशी “सिंचन प्रकल्प का रखडलाय, निधी कमी पडतोय का” वगैरे महत्वाची चर्चा करत असताना पडद्यामागून मिसेस मुख्यमंत्री आपल्या नवऱ्याला शुक शुक करत आवाज देत असतात.
पण मुख्यमंत्री दुर्लक्ष करत आहेत आणि अजिबात दाद देत नाहीत म्हटल्यावर त्या सरळ कचेरीत डोक्यावर पदर बिदर घेऊन ठसक्यात एंट्री करतात आणि बिनधास्तपणे नवऱ्याला ऑर्डर सोडतात,
“घरात कुणी गडीमाणसं नाहीत. तेवढं दळण आणून द्या!” मुख्यमंत्री परत निशब्द! आणि मिसेस मुख्यमंत्री आपला ठरलेला डायलॉग मारतात ,”मी मिरवते, सगळ्यांची जिरवते!”
आता ह्या सगळ्या प्रोमोमधून माणूस काय अंदाज लावतो? खरं तर ह्या मालिकेवर इतका विचार करून वेळ वाया घालवावा असे प्रोमो बघून अजिबातच वाटत नाही. पण कुठेतरी ग्रॉसली चुकत नाहीये का?
मुख्यमंत्र्यांची पत्नी इतकी बिनडोक असते का की जी सरकारी गाड्यांवर सांडगे घालते, आणि मुख्यमंत्र्यांना महत्वाच्या कामासाठी गाडी हवी असताना सांडगे झाल्यावरच गाड्या मिळतील असे सांगते?
मुख्यमंत्र्यांसारख्या मोठ्या पदावर आपला पती असो नसो. पण कुठलीच बाई इतकी मूर्ख नक्कीच नसते.
इतके वेडगळ आणि अशक्य प्रकार दाखवायला चॅनेलला लाज कशी वाटत नाही? कोणती बाई नवऱ्याला भर मिटिंग मध्ये जाऊन दळण आणायला सांगते?
बायकांचे हे असे चित्रण करून सिरीयलचे लेखक नेमकं काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत? हे थांबायला नको का?
बायका मग ती मिसेस मुख्यमंत्री का असेना, त्या मूर्खच असतात. त्यांना कामाबद्दल काही कळत नाही, त्या आपल्या घर आणि घरातली कामं ह्यातच अडकून पडलेल्या असतात, त्यांना कामाचे गांभीर्य नसते. असे दाखवण्याचा प्रयत्न चाललाय का?
ह्यात जर प्रेक्षकांना काही चूक वाटत नसेल आणि असे करणाऱ्या मिसेस मुख्यमंत्री जर प्रेक्षक स्त्री पुरुषांना क्युट वाटत असतील तर देव आपले भले करो. अरे जग कुठे चाललंय आणि मराठी चॅनेल्स प्रेक्षकांना कुठे नेत आहेत?
आज जिथे जग गेम ऑफ थ्रोन्स, सॅक्रेड गेम्स, मिर्झापूर, नार्कोज, बिग बँग थियरी बघतंय तिथे मराठी चॅनेल्सवर हा वेडगळपणा सुरु आहे.
ज्यात नायिका ३०० कोटींची मालकीण असून सुद्धा मूर्खपणा करते आणि लोक बिचारी भोळी बाई म्हणून तिची सिरीयल भक्तिभावाने रोज बघतात.
एका सिरीयलमध्ये नवरा अगदी बैल असला तरी त्याला सुधारण्यापेक्षा रडत बसून नायिका सगळं सहन करते. दुसऱ्या एका सिरीयलमध्ये सासरचे, माहेरचे, प्रियकराच्या आईचे विचित्र वागणे नायिका अगदी शांतपणे सहन करते. आपण ह्यातून कधी बाहेर पडणार आहोत की नाही?
या अश्या वर्षानुवर्षे चाललेल्या पाणी घालून वाढवलेल्या मालिका बघून असा संशय येतो, नव्हे माझी तर खात्रीच पटत चालली आहे की आपल्याकडे क्रिएटिव्हिटीचा अगदी गंभीर दुष्काळ निर्माण झाला आहे.
आणि क्रिएटिव्ह फ्रिडम म्हणजे किती घ्यावे? त्याला काही मर्यादा आहे की नाही?
ह्यांच्या मालिका, काहीच अर्थ न उरलेली ,भरकटलेली ती कथानके बघितली तर RIP लॉजिक असेच म्हणावे लागते.
आता ह्या नव्या मालिकेचेच बघा ना. आपल्या भारतीय संविधानाच्या कायद्याप्रमाणे मुख्यमंत्री होण्यासाठी उमेदवार कमीत कमी २५ वर्ष पूर्ण झालेला असावा लागतो.
तसेच साधारणपणे त्या व्यक्तीला राजकारणाचा काहीतरी अनुभव असल्याशिवाय पक्ष त्या व्यक्तीला उमेदवारी देत नाही. इथे तर मुख्यमंत्री अगदीच तरुण म्हणजे एकवीस -बावीस वर्षांचे वाटतात.
चला कितीही संतूरबॉय म्हटले तरी ते पंचविशीच्या पुढचे वाटत नाहीयेत.
मालिका बनवताना कमीत कमी आपले नागरिकशास्त्र तरी विसरू नये. आपण जे कास्टिंग करतोय ते अभिनेते आपल्या पात्रासाठी शोभून दिसतील का हा तर विचार अजिबातच केलेला दिसत नाहीये.
मुख्यमंत्री किमान पंचवीस वर्षांचा असावा, आणि इतक्या वर्षांचा ट्रेंड बघता राजकारण आणि काहीतरी ठोस काम केल्याशिवाय पक्ष तुमचा मुख्यमंत्र्याच्या पदासाठी विचार करत नाहीत म्हणजे मुख्यमंत्री किमान अठ्ठावीस ते तीस वर्षांचे तरी असतातच.
मग त्यासाठी अगदीच वीस-बावीस वर्षांचा दिसणारा अभिनेता, मग तो कितीही उत्तम अभिनय का करत असेना, त्याला घेऊन चालेल का?
तेच लाल दिव्याच्या गाडीबाबतीत झालंय. आता सरकारी गाड्यांना लाल दिवे नसतात. ते लाल दिवे काढून सामान्य माणसाच्या भाषेत “जमाना झाला”. तरी मालिकेत लाल दिव्याची गाडी दिसतेय.
बरं आधीच्या काळातील मालीका असेल असा विचार केला तरी मुख्यमंत्री मोबाईलफोनवर बोलत आहेत म्हणजे मालिका सध्याच्या काळातलीच आहे ह्याचा अंदाज आपण लावू शकतो.
मग हे सगळे बघता मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत मालिका बनवताना लेखकाने, निर्मात्याने आणि दिग्दर्शकाने नागरिकशास्त्र, कायदे ह्यांचा अजिबातच अभ्यास केलेला नाही असेच दिसतेय.
प्रेक्षकांना किती गृहीत धरावं ह्याला काही मर्यादा आहेत की नाही? की प्रेक्षक निमूट तुम्ही दाखवताय ते बघतात म्हणजे तुम्ही वाटेल ते दाखवाल?
ह्या मालिकांतून बायकांची प्रतिमा अतिशय विचित्र पद्धतीने दाखवतात. ह्याबद्दल कुणालाच कसा आक्षेप नाही ह्याचे आश्चर्य वाटते. लोक म्हणतात, तुम्हाला बघायचे नाही तर रिमोटचा उपयोग करा आणि चॅनेल बदला. पण मुद्दा तो नाहीच्चे!
मुद्दा हा आहे की क्रिएटिव्ह फ्रिडमच्या नावाखाली जे वाटेल ते दाखवले जाते त्याचे काय करायचे? लोक म्हणतात चॅनेलवाले दाखवतात म्हणून आम्ही बघतो आणि चॅनेलवाले म्हणतात लोक बघतात म्हणून आम्ही दाखवतो. हे दुष्टचक्र भेदायला हवंय.
आज वेब सिरीजच्या मंचावर अनेक विविध विषय हाताळले जात असताना त्यापेक्षा मोठा मंच असलेल्या ह्या लहान पडद्यावर त्यातल्या त्यात आपल्या मराठी मंचावर चांगल्या विषयांची आणि सादरीकरणाची वानवा का झालीये?
ह्या वेडगळ आणि ईललॉजिकल कथानक आणि सादरीकरणावर कुणाचेच नियंत्रण का नाही?
वर्षानुवर्षे त्यातच अडकलेल्या प्रेक्षकवर्गाला चांगले काही दाखवून त्यांचे मनोरंजन आणि प्रबोधन करणे ही प्रसारमाध्यमांची जबाबदारी आहे.
पण टीआरपीच्या नावाखाली वाटेल ते दाखवणे सुरु आहे. ह्या सगळ्यांना ओरडून एकच सांगावे वाटते… “दर्जा राखा रे.. दर्जा राखा..”
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.