देशाला परकीय जोखडातून मुक्त करणाऱ्या “तिला” जिवंत जाळलं गेलं, देश मुकाट्यानं पाहत राहिला
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
फ्रान्सच्या अस्मितेची प्रतीक जोन ऑफ आर्क. इंग्लंड आणि फ्रान्स मधील १०० वर्षे चालू असलेल्या युद्धाचा शेवट करण्यासाठी प्रत्यक्ष युद्धात उडी घेऊन केवळ १९ व्या वर्षी आपल्या देशासाठी बलिदान देणारी जोन ऑफ आर्क.
ही कहाणी आहे एका वीरांगनेची.. त्यासाठी ६०० वर्ष मागे जाऊन इतिहासाची पाने पुन्हा चाळावी लागतील.
आज फ्रान्स आणि इंग्लंड मधे मैत्री असली तरी कोण्या एकेकाळी दोन्ही राष्ट्र एकमेकांचे कट्टर शत्रू होते.
तेराव्या आणि चौदाव्या शतका दरम्यान दोन्ही राष्ट्रांमध्ये दोन चार वर्षे नाहीत तर तब्बल १०० वर्षें त्यांच्यात युद्ध चालू होते. कितीतरी पिढ्या आणि कितीतरी कुटुंबे या युद्धात नष्ट झाली होती.
१४१२ साली या युद्धातून फ्रान्सला मुक्त करण्यासाठी जणू उत्तर फ्रान्सच्या डोम्रेमी नावाच्या खेड्यात या महान स्त्रीचा जन्म झाला.
हे ही वाचा –
- तब्बल ४५१ वर्षे पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेल्या “गोव्यात” झालेला हा नरसंहार थरकाप उडवतो!
- लेनिनचा पुतळा, पुतळ्याचा लेनिन : रक्तरंजित क्रांतीच्या समर्थकांना पुतळ्याचं कौतुक का?
ती ज्या कुटुंबात जन्माला आली ते अतिशय सामान्य गरीब शेतकरी कुटुंब होते. त्याच वेळी फ्रांस आणि इंग्लंड मधील युद्ध सुरूच होते आणि इंग्रजांच्या अत्याचारामुळे फ्रेंच जनता त्रासली होती.
इंग्लंडचा राजा पाचवा हेन्री याने फ्रेंचांचा अगीनकोर्ट येथे पराभव करून आपल्या मुलास गादीवर बसवले. त्यामुळे फ्रान्सचा राजा चार्ल्स आणि राजपुत्र द्युफॉन हे तिथून लॉरेन नदीच्या पलीकडे पळून गेले.
आपला राजाच तेथे नसल्याने फ्रेंच जनतेच्या त्रासात आणखी भर पडली.
जोन अशा वातावरणात मोठी होत होती. वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत ती साधारण मुलगी होती.पण वयाच्या तेराव्या वर्षी अशी काही घटना घडली की तिचे जीवन बदलू लागले.
तिला भास झाला की कोणीतरी आकाशवाणी करून तिला काही विशिष्ट कार्यासाठी प्रेरणा देत आहे.
तिचे भास वाढत गेले आणि ती सगळ्यांना सांगू लागली की तिला सेंट मार्गारेट, सेंट कॅथरीन आणि सेंट मायकेल यांचे आवाज ऐकू येत आहेत आणि ते तिला सांगत आहेत की तिच्यामुळे इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागणार आहे आणि फ्रान्सची मुक्तता होणार आहे, असे मानले जाते.
जोनच्या या गोष्टीवर कोणाचाच विश्वास नव्हता. पण तिला काहीही करून राजपुत्र द्युफॉन आणि राजा चार्ल्स यांना भेटायचे होते. तिची मागणी धुडकावून लावण्यात आली.
अखेर रॉबर्ट बॉडरिकोर्ट यांनी तिला ६ सैनिक आणि घोडा देऊन द्युफॉन कडे पाठवले. तिथे देखील कोणीच तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि तिची हेटाळणी करण्यात आली.
तरीही द्युफॉन यांनी तिची परीक्षा घेण्यासाठी एक तलवार चर्च मधे लपवली ती तिने शोधून काढली.मग धर्मगुरूंच्या समूहाने तिला बरेच प्रश्न विचारले आणि तिने त्यांची उत्तरे बरोबर दिली. यामुळे त्यांचा तिच्यावर विश्वास बसला.
तीच्यावर विश्वास ठेवून ओर्लिन शहर जिंकण्यासाठी ४००० सैनिक तिच्या बरोबर देण्यात आले. पुरुषी वेष धारण करून ती रणभूमीत उतरली.
अत्यंत बिकट परिस्थितीत तिने सैन्याचे मनोबल वाढवले आणि इंग्लडच्या सैन्यावर जोरदार आक्रमण करून त्यांना पळायला भाग पाडले, एवढेच नाहीतर फ्रांन्सच्या हद्दीतील इंग्रजांच्या सैन्यावर हल्ले करून त्यांना फ्रान्सच्या भूमीतून हाकलून लावले.
या विजयानंतर रिम्स येथील कॅथेड्रल मध्ये चार्ल्सचा राज्याभिषेक करण्यात आला. त्यानंतर ती सतत ३ महिने युद्धात गुंतलेली राहिली.
तिची आक्रमकता आणि वाढती लोकप्रियता आणि फ्रेंचांचा सतत होणारा विजय यामुळेच इंग्रज ती कधी आपल्या तावडीत सापडते याची संधी शोधू लागले.
काही फ्रेंच सरंजामदार जोनचे शत्रू झाले होते आणि त्यांना चार्ल्स राजा म्हणून नको होते. त्यापैकी बरंगंडीच्या सैनिकांनी २३ मे १४३० ला तिला पकडून इंग्रजांच्या स्वाधीन केले. यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे देण्यात आले होते.
हे ही वाचा –
जोन वर मुद्दाम धार्मिक खटला चालवण्यात आला, तो ही अशासाठी की इंग्रज हा खटला जिंकले तर फ्रेंच लोकांना देखील ती चर्चच्या विरोधात वागली असे वाटेल आणि ते तिचा द्वेष करतील.
तिच्यावर अनेक खोटेनाटे आरोप ठेवण्यात आले. पण तिची देवावर श्रद्धा असल्याने तिने त्या आरोपांना उत्तर दिले. तिचा अनन्वित छळ करण्यात आला.
शेवटी इंग्रजांनी ती बाई असूनही तिने पुरुष वेष धारण केला जो चर्चला मान्य नाही असा आरोप ठेवला.
तसेच तिने कोणत्याही संतांची वाणी ऐकली नाही उलट सैतानाची वाणी ऐकली, ती सैतानाची दूत अर्थात चेटकीण आहे, असा नवीन आरोप केला व तिला जाळून टाकायची शिक्षा ठोठावण्यात आली.
खरंतर हा अतिशय निर्घृण असा निर्णय होता.पण ती जिवंत राहिली तर ती फ्रेंच सैन्याला प्रेरणा देईल व आपला पराभव होईल अशी इंग्रजांना भीती वाटत होती. कसेही करून तिला जिवंत ठेवायचेच नाही हे त्यांनी पक्के ठरवले होते.
अखेर पकडल्यापासून आठवड्याभरातच ३० मे १४३१ ला तिला एक खांबाला बांधून रुऑ इथे जाळून टाकण्यात आले.
तिने अशा परिस्थितीत देखील मागणी केली तिला जाळत असताना येशूचा क्रॉस तिच्यासमोर उंच धरण्यात यावा, ज्याच्याकडे बघत येशू मसीहाचा जयजयकार करत तिला मृत्यू यावा.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तिला जाळून टाकत असताना ज्या फ्रेंच जनतेसाठी तिने केवळ १९ व्या वर्षी बलिदान पत्करले ती जनता फक्त बघत राहिली. कारण ते बरगंडीवासीय इंग्रजांच्या हाती विकले गेले होते.
जोन ऑफ आर्क दुनियेतून निघून गेली होती, तिची रक्षा देखील सिन नदीत विसर्जित करण्यात आली.
पण जो भाग तिने इंग्रजांच्या तावडीतून सोडवला होता तेथील जनतेच्या मनात तिचे स्थान देवीसारखे होते कारण इंग्रजांच्या अनन्वित छळातून त्यांची तिने सुटका केली होती.
फ्रेंचांना इंग्रजांचा तिला जाळून टाकायचा निर्णय अजिबातच पटलेला नव्हता.
१४५६ मध्ये परत एकदा राजा चार्ल्स ७ याने या प्रकरणाची चौकशी करायचे आदेश दिले आणि तिच्यावर चुकीच्या पद्धतीने खटला चालवला गेला होता हे सिद्ध झाले. त्या नंतर पोप कॅलिक्टस यांनी तिला निर्दोष जाहीर करून ती शहीद असल्याचे जाहीर केले.
त्यानंतर १८ एप्रिल १९०९ मध्ये पॅरिसच्या नोत्र दाम चर्चकडून पोप पायस यांनी तिला “धन्य” म्हणून घोषित केले. १६ मे १९२० रोजी सेंट पीटर्स बॅझिलीका रोम यांच्याकडून संतपद बहाल करण्यात आले.
जोन ऑफ आर्क हिच्या मृत्यूस ६०० वर्ष उलटून गेल्यावर देखील फ्रेंच जनतेच्या मनात तिच्याविषयी आदर आणि प्रेम ओसंडून वहात असते.
थोर व्यक्तींच्या बाबतीत नेहमीच काही गोष्टी प्रचलित केल्या जातात जसे १३५४ मध्ये येशूच्या मृत्यूनंतर त्याला ज्या कपड्यात गुंडाळण्यात आले होते ते वस्त्र सापडले असा दावा करण्यात आला होता.
श्राऊड ऑफ तुरीन नावाने ते १३८९ ला प्रदर्शित करण्यात आले पण लवकरच तो दावा खोटा ठरवण्यात आला. असाच दावा हिटलरची खोपडी सापडली आहे हा खोटा ठरला.
इजिप्तच्या राजाच्या बाबतीत रामसेस दोन याचे कफन मिळाले हा दावा खोटा ठरला.
जोन ऑफ आर्कच्या बाबतीत देखील काही वर्षांपूर्वी असाच एक दावा करण्यात आला होता. १८६७ मध्ये एक अशी थेअरी मांडण्यात आली की जोन च्या चितेच्या खालच्या भागातील राख मिळाली , जी सीन नदीत विसर्जित केल्याचे सांगितले जात होते.
चिनॉन येथे ती राख ठेवण्यात आली आहे. १९०६ मध्ये एक संशोधकाने दावा केला की जोन ऑफ आर्क पहिल्यावेळेस पूर्ण जळली नव्हती पण धूर छातीत साठल्याने गुदमरून मेली होती.
म्हणून विंचेस्टर्सच्या कार्डीनल यांनी तिला दुसऱ्यांदा जाळायचा आदेश दिला. तरीही काही अवयव जळले नाहीत म्हणून तिसऱ्यांदा जाळण्यात आले.
तिच्या राखेत एक कपड्याचा तुकडा मिळालाय तो तिच्या गाउनचा असावा असा दावा करण्यात आलाय. लवकरच हे संशोधन पूर्ण होईल असे म्हटले जाते.
हे काहीही सिद्ध झाले तरी ती उत्कृष्ट योद्धा होती आणि देशासाठी लढत असताना अवघ्या १९ व्या वर्षी हुतात्मा झाली हे सत्य अबधित आहे आणि पुढे देखील अबधितच राहील. तिचे संतपद देखील अढळ राहील. पुढील कित्येक शतके ती संत म्हणूनच सर्वांसाठी प्रेरणादायी राहील.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.