' ट्रोलर्सपुढे शिवलीलाच्या ‘लीला’ पडल्या फिक्या, आजारपणामुळे एक्झिट की…? – InMarathi

ट्रोलर्सपुढे शिवलीलाच्या ‘लीला’ पडल्या फिक्या, आजारपणामुळे एक्झिट की…?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

‘ती आली, लढली नाहीच आणि निघून गेली’. बिग बॉस मराठी सिझन ३ ची सदस्य किर्तनकार शिवलीला पाटील हिचं वर्णन करण्यासाठी या ओळी पुरेशा आहेत.

महाराष्ट्रातील युवा महिला कीर्तनकार असं बिरुद मिरवणारी शिवलीला जेेव्हा बिग बॉसच्या प्रिमियर सोहळ्यात दाखल झाली तेंव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. फेटा, पारंपरिक पोषाख, कपाळावरील टिळा अशी दमदार एन्ट्री केलेल्या शिवलीलाची काहींना पाठ थोपटली असली तरी तिला विरोध करणा-यांचं पारडं अधिक जड होतं.

 

shivleela inmarathi

 

नाजूक आवाजाने घरात चांगुलपणा पेरण्याच्या उद्देशाने आलेल्या शिवलीलाचा आवाज केवळ पहिल्या एपिसोडपुरता ऐकू आला मात्र त्यानंतर तिने ‘म्यूट’ मोडवर राहणं पसंत केलं.

एकीकडे वयाने मोठ्या सहकलाकारांचा मान राखण्याच्या नादात शिवलीलाला आपली मतं मांडण्याचा विसरच पडला. सिझनच्या दुसऱ्याच दिवशी भेडसावणारा एकटेपणा, कुटुंबियांच्या आठवणीने येणारे रडू यांमुळे शिवलीला या गेमसाठी बनलीच नाहीये अशा चर्चांना सोशल मिडीयावर सुरुवात झाली.

 

shivleela crying inmarathi

 

मात्र तिच्यावर मुख्य टीका झाली ती तिच्या क्षेत्रामुळे! महाराष्ट्रात आतापर्यंत ५००० किर्तनांचा टप्पा पार करणा-या शिवलीलाने आपल्या किर्तनात आजपर्यंत जे जे मुद्दे मांडले त्यापैकी बहुतांश मुद्द्यांना बिग बॉसच्या घरात येताच हरताळ फासला.

 

shivleela 1 inmarathi

 

उदाहरण द्यायचे तर, आपल्या किर्तनातून खांद्यावर पदर न घेणा-या बायकांवर तोंडसुख घेणारी शिवलीला घरात मात्र पंजाबी ड्रेस, नाईट ड्रेस अशा मॉर्डन लूकमध्ये वावरताना दिसली आणि टिकाकारांना नवा मुद्दा मिळाला. केस मोकळे सोडून फॅशन करणाऱ्या महिलांच्या चुका दाखवणाऱ्या शिवलीलाने घरात एकदाही आंबाडा बांधला नाही असं छातीठोकपणे सांगणाऱ्या ट्रोलर्सनी तिचे जुने व्हिडिओ शोधून पुरावेही सादर केले.

 

 

आपलं क्षेत्र सोडून त्याविरुद्ध वागणाऱ्या शिवलीलाला यापुढे किर्तनकार म्हणून काम करण्याचा अधिकार नाही अशीही जहरी टिका ट्रोलर्सनी केली. तर काहींनी रिअॅलिटी शोमध्ये येण्याचा तिचा निर्णय कसा चुकला, प्रसिद्धीच्या मागे धावणाऱ्या शिवलिलाने किर्तनकार म्हणूनही आपलं स्थान गमावलं अशा वेगवेगळ्या प्रकारे तिच्यावर सडकून टिका होत होती.

एकंदरित सोशल मिडीयावर उठणारी टिकेची झोड आणि घरात इतर आक्रमक सदस्यांपुढे बावरलेली शिवलीला आपल्या लीला दाखवण्यातही यशस्वी ठरत नव्हती. याचेच प्रतिक म्हणजे सिझनच्या पहिल्यावहिल्या विकेंड का वार अर्थात आठवड्याच्या चावडीवर महेश मांजरेकर यांनीही शिवलिलाची गोड शब्दात शाळा घेतली.

शिवलीला ही शोमध्ये कुठेही दिसत नसल्याचे सांगत त्यांनी तिला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर दुस-याच दिवशी झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये पहिल्यांदाच ती आपली बाजू मांडताना दिसली, मात्र तो शुभारंभाचा शेवटचा प्रयोग ठरला.

परवाच्या भागात शिवलीलाची प्रकृती बरी नसल्याचं स्पष्टीकरण बिग बॉसकडून देण्यात आलं, मात्र त्याच भागात आपल्या सहकलाकारांना टास्कदरम्यान मदत करण्यासाठी धावपळ करणारी शिवलीला पाहिल्यानंतर ती बरी असावी असा प्रेक्षकांचा समज झाला.

 

shivleela ill inmarathi

कट्टर फॅन्सना देखील उल्लू बनवणारी ‘बिग बॉस’ची ही ८ सिक्रेट्स…

बिग बॉसमधील युवा किर्तनकाराच्या नावामागचं गुपित माहित आहे का?

मात्र कालच्या एपिसोडमध्ये वैद्यकीय कारणांमुळे काही दिवसांसाठी तिला घराबाहेर पाठवण्यात येणार असल्याचे सांगत सहकलाकारांनाही न भेटता अवघ्या काही मिनिटात शिवलीला नाहीशी झाल्याने पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

शिवलीलाची प्रकृती बरी नव्हती, तर टास्कदरम्यान ती सहकलाकारांना मदत करत होती, मग यावेळी बिगबॉसने तिला का अडवलं नाही? तिला नेमकं काय झालं आहे? उपचार घेतल्यानंतर ती पुन्हा घरी परतणार आहे का? अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांकडे नाहीत. त्यामुळे ट्रोलर्सना घाबरून तिने शो सोडला की खरोखर प्रकृती अस्वस्थामुळे ती घरी परतली? ती पुन्हा शोमध्ये येणार की बाहेर पडल्यानंतर ट्रोलर्सच्या टिका वाचून आपला निर्णय बदलणार? अशा नव्या मुद्द्यांसह काल रात्रीपासून सोशल मिडीयाच्या चाावडीवर खमंग चर्चांना सुरुवात झाली आहे.

 

big boss inmarathi

 

अर्थात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल. शिवलीलावर सध्या उपचार सुरु असून तिची प्रकृती लवकर सुधारावी, आणि ट्रोलर्सना न घाबरता आपल्या निर्णयावर ती ठाम रहावी अशी आशा आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?