Site icon InMarathi

“७० रुपये वारले” याला आज ३३ वर्षे पूर्ण झाली: मराठी चित्रपटसृष्टीतला एक मास्टरपीस!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

इंग्लिशमध्ये गॉडफादर किंवा टायटॅनिक, हिंदी मध्ये शोले या चित्रपटांचे आपले एक वेगळे स्थान आहे. हे चित्रपट न बघितलेले प्रेक्षक अगदी दुर्मिळच.

मराठीच्या बाबतीत सांगायचे तर अशा चित्रपटांच्या यादीत “ अशी ही बनवाबनवी ” या चित्रपटाचे स्थान नक्कीच फार वरचे असेल.

लक्ष्मीकांत बेर्डे , अशोक सराफ, सचिन पिळगावकर अशा मराठीतल्या त्या कालच्या हुकमाच्या एक्यांच्या अभिनयाने नटलेला हा एक मास्टरपीस म्हणावा लागेल.

 

 

आज याच मास्टरपीसला ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत. २३ सप्टेंबेर १९८८ साली हा सिनेमा रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी अक्षरशः हा सिनेमा डोक्यावर घेतला.

आजच्या जनरेशनच्या आवडीच्या चित्रपटांमध्ये याचा समावेश नक्कीच आहे. हा सिनेमा बघितला नाही अशी व्यक्ति सापडणं कठीणच आहे. या सिनेमातला एक अन एक डायलॉग, सीन्स आजही लोकांना तोंडपाठ आहेत.

यातल्या डायलॉगवर आपण आजकाल बरेच मीम, स्टीकर आपण सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहिले आहेत. करोडोची कमाई करणारा मराठीतला हा सर्वात पहिला चित्रपट मानला जातो!

यातली अगदी लहान लहान पात्रे सुद्धा आपली छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडून जातात. मात्र या चित्रपटाच्या निर्मितीमागचं एक सत्य सगळ्यांना हादरवून सोडणारं आणि काहीसं दुर्लक्षित आहे.

ते म्हणजे हा चित्रपट हिंदीतल्या “बीवी और मकान ” ह्या हृषिकेश मुखर्जी यांच्या फ्लॉप हिंदी चित्रपटाचा रिमेक आहे.

 

चार तरुण शहरात येतात आणि घर शोधण्यासाठी धडपड करतात. ह्या धडपडीला यश येत नाही.

शेवटी एका ठिकाणी फक्त विवाहित जोडप्यांना घर देण्याची अट असते जी पूर्ण करण्यासाठी त्यातले दोघे बाई बनून उरलेल्या दोघांची बायको म्हणून वावरतात!

यातून होणारी गम्मत-जम्मत, फसगत ह्या थीमवर हे दोन्ही चित्रपट आधारित आहेत.

हिंदी चित्रपट बिवी और मकान हा फारसे यश मिळवू शकला नाही मात्र ही थीम मराठीत आणताना सचिन यांनी बऱ्याच अशा गोष्टी केल्या ज्यामुळे हा मराठीतील एक मास्टरपीस म्हणून ओळखला जाऊ लागला.

बनवाबनवीच्या यशाकडे बघताना सर्व प्रथम आपल्याला त्यातल्या कलाकारांची फौज बघावी लागेल.

 

लक्ष्मीकांत बेर्डे , अशोक सराफ, सचिन, सुप्रिया पिळगावकर, अश्विनी भावे , प्रिया अरुण, सुधीर जोशी असे एकापेक्षा एक उत्तम दर्जाचे कलाकार असल्यामुळे या चित्रपटात आपल्याला विनोदाचे अफलातून टायमिंग बघायला मिळते.

ह्या सगळ्यात सिद्धार्थ राय मात्र गटात न बसणारे दिसतात.

ह्या चित्रपटात अगदी लहानात लहान रोलसाठी सुद्धा अजिबात तडजोड केली गेली नाही त्यामुळे अगदी पाच मिनिटांच्या रोलसाठी सुद्धा अतिशय चांगले अभिनेते घेण्यात आले होते.

त्यामुळे प्रत्येक पात्राचा काहीना काही ठसा आपल्या मनावर राहतोच. इथे पुन्हा एकदा शोले चित्रपटाची आठवण येतेच.

सुरमा भोपाली, जेलर, सांभा, रामलाल प्रत्येकजण अगदी काही मिनिटांसाठी स्क्रीनवर असला तरी त्याची आठवण आपल्याला कायम येते.

सचिनच्या काकांचे काम केलेले कलाकार सुहास भालेकर ह्यांचा पूर्ण चित्रपटात फक्त एकच सीन आहे तरीही आपल्याला त्याच्या आवाजातले “तुला जग मोकळ आहे ” हा डायलॉग विसरता येत नाही.

 

कमळीचे बाबा झालेले जयराम कुलकर्णी सुद्धा अगदी कमी वेळासाठी यात आहेत मात्र त्यांची भूमिका सुद्धा आपल्या लक्षात राहते.

अत्यंत कजाग मालकीणबाईच्या रुपात अश्विनी भावे सुद्धा फार भाव खून जातात.

त्यांचा हळूहळू बदलत जाणारा स्वभाव बघताना फार मजा येते. सतत ओरडण्यापासून ते अशोक सराफ यांच्या प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत सुंदर आहे.

सगळ्यात जास्त मजा आणतात ते मिस्टर सरपोतदार ही भूमिका करणारे सुधीर जोशी, अत्यंत खडूस पुणेरी घरमालक त्यांनी अगदी अचूक रंगवला आहे.

अगदी सुरवातीला शंतनुला “ ती पाटी आम्ही फाटकाची शोभा वाढवण्यासाठी लावलेली नाही ” म्हणणे असो किंवा आनंदी आनंद गडे म्हणत केलेला विचित्र नाच असो,

सुधीर जोशी अगदी प्रत्येक प्रसंगात तंतोतंत खडूस घरमालक दिसतात.

त्यांची आणि अशोक सराफ यांची जुगलबंदी हा ह्या चित्रपटाचा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे.

“ तुमचे सत्तर रुपये वारले ” म्हणणारा अशोक सराफ असो किंवा “ मला रोज सकाळी दोन कप चहा लागतो ” म्हणणारा असो, समोरून सुधीर जोशी त्यावर असे काही हावभाव देतात की तो प्रसंग आपण कधी विसरूच शकत नाही.

फक्त पंधरा ते वीस मिनिट चित्रपटात असून सुद्धा इतक लक्षात राहणार काम करणे फार कठीण असते.

 

Lokmat.com

 

ह्या चित्रपटातील अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेची स्त्री भूमिका.

सचिन पिळगावकर स्त्री भूमिकेत शोभून दिसतात मात्र रांगडे दिसणारे लक्ष्मीकांत बेर्डे कुठल्याच क्षणी स्त्री रुपात शोभून दिसत नाहीत आणि तरी त्यातून ते चित्रपटात गम्मत आणतात.

त्यामुळे जेव्हा शोक सराफ “ हा माझा बायको पार्वती ” किंवा “ मला ह्या रान रेड्याशी संसार करावा लागतोय ” असे डायलॉग म्हणतात तेव्हा आपल्याला हसू अडवण कठीण होऊन जात.

लक्ष्मीकांत बेर्डे ह्याचं टायमिंग तर आपल्याला चित्रपटभर नुसत हसवत सुटत. “परत परत त्याच झाडावर काय ” “ठाक ठाक, धनंजय माने इथेच रहातात काय?”

हे संवाद नुसते आठवले तरी आपल्याला नकळत हसू येतं.

अप्रतिम संवाद ही या चित्रपटाची एक अजून महत्वाची बाजू आहे. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीस वर्ष झाली तरीही अजून सुद्धा यातले खुसखुशीत संवाद आपल्याला हसवतात.

“जाऊबाई – नका बाई जाऊ एवढ्यात, आमचे खण नारळ आणि तांदूळ वर आलेले नाहीत, लिंबाचं मटण, आणि या मिसेस बालगंधर्व ”

असे कितीतरी संवाद नुसते आठवले तरी आपण हसायला लागतो. असा हा एक अप्रतिम असा मराठी चित्रपट आहे.

ह्या उदाहरणातून आपल्याला एवढाच लक्षात येत की चित्रपट हा अनेक वेगवेगळ्या रसायनांचा मिळून बनत असतो. नुसती कथाच नाही तर अभिनय, संवाद, गाणी, दिग्दर्शन या सगळ्यांचे तेवढेच महत्व असते.

 

जसं भेंडीची भाजी एखादी बाई अत्यंत वाईट, तोंडात न घालण्यासारखी करते त्याच भेंडीची भाजी दुसरी सुगरण बाई अशी करते की आपण बोट चाटत बसतो.

तर असे हे एकाच कथेवर आधारित असलेले दोन चित्रपट ज्यातला एक फ्लॉप झाला आणि दुसरा मराठी मधला एक मास्टरपीस म्हणून ओळखला जाऊ लागला.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version