फिर ना कहना मायकल दारू पी के दंगा करता है – या अभिनेत्याला सलाम!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
“इस इलाके में नये आये हो साहाब? वर्ना शेर खान को कौन नाही जानता!”,
“शेर खान आज का काम कल पर नही छोडता”
“हम आया तो था कर्जा लेने … लेकिन तुमने शेर खान को ही खरीद लिया!”
जी चाहता है तुझे गंदे किडे की तरह मसल दू, मगर मैं अपने हाथ गंदे करना नही चाहता”,
“फिर ना कहना मायकल दारू पी के दंगा करता है”
असे एकसे एक डायलॉग मारून पडदा गाजवणाऱ्या प्राण साहेबांच्या अभिनयाचे लाखो लोक चाहते आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत नायक. खलनायक आणि चरित्र भूमिका करून प्रेक्षकांच्या मनात एक आदराचे स्थान निर्माण केले आहे.
आज ते गेल्यानंतर सुद्धा त्यांनी गाजवलेल्या एकसे एक खलनायकाच्या भूमिका आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत.
त्यांची संवादफेक, भारदस्त आवाजात “बरखुरदार” म्हणण्याची पद्धत एकमेवाद्वितीय होती. बॉलिवूडमध्ये मोजकेच असे खलनायक होऊन गेले ज्यांच्या भूमिकांमध्ये आपण दुसऱ्या कुणाचाही विचार करू शकत नाही. त्यापैकीच एक प्राण साहेब होते.
प्राण साहेबांबद्दलची एक खास गोष्ट त्यांच्या बऱ्याच चाहत्यांना माहित नाही. प्राण साहेब जर फाळणीच्या आधी पाकिस्तानमधून भारतात आले नसते, तर आपण एका जबरदस्त अभिनेत्याला मुकलो असतो.
जवळजवळ पाच दशके ३५० पेक्षाही जास्त चित्रपटांतून पडदा गाजवणारे प्राण साहेब आपल्या अभिनयातून इतका जिवंत आणि वास्तविक खलनायक उभा करत असत की प्रेक्षकांना खरंच त्यांची भीती वाटत असे.
प्राण क्रिशन सिकंद (प्राणनाथ किशननाथ सिकंद) ह्यांचे वडील एक सिव्हिल इंजिनियर होते. आणि सरकारी सिव्हिल कंत्राटदार म्हणून काम करत असल्याने त्यांना कामासाठी अनेक गावांत जावे लागत असे. प्राणसाहेबांचा जन्म १२ फेब्रुवारी १९२० साली झाला. आज त्यांचा जन्मदिवस आहे.
कोटगढ, जुन्या दिल्लीत त्यांचा जन्म एका धनिक पंजाबी कुटुंबात झाला. त्यांना तीन भाऊ व तीन बहिणी होत्या. तुम्हाला माहितेय का?!
अभिनयाबरोबरच प्राणसाहेब अभ्यासात सुद्धा खूप हुशार होते. ते गणितात प्रचंड हुशार होते. त्यांच्या वडिलांची बदली होत असल्याने मीरत, कपूरथला ,डेहराडून अश्या अनेक गावांत त्यांचे शिक्षण झाले. रामपूरमधील हमीद स्कुल मधून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.
त्यांना फोटोग्राफीची खूप आवड असल्याने त्यानंतर त्यांनी फोटोग्राफी शिकण्यासाठी व प्रोफेशनल फोटोग्राफर होण्यासाठी दिल्लीत ए दास अँड कंपनी जॉईन केली.
त्यानंतर ते कामासाठी लाहोरला गेले. तिथे ते एका पानाच्या दुकानात मित्रांबरोबर जेवण झाले की नेहेमी जात असत. ह्याच ठिकाणी त्यांची व लेखक वली मोहम्मद वली ह्यांची भेट झाली. आणि त्यांनी प्राणसाहेबांना अभिनयाविषयी विचारले.
वलीसाहेब त्यावेळी प्रसिद्ध निर्माते दलसुख पांचोली ह्यांच्यासाठी काम करीत असत. पांचोली ह्यांचा स्वतःचा स्टुडिओ सुद्धा होता. त्यांना यमला जट नावाचा एक चित्रपट बनवायचा होता. वलीसाहेबांना वाटले की प्राणसाहेब त्यातील मुख्य भूमिकेसाठी अगदी योग्य आहेत आणि म्हणून त्यांनी त्यात भूमिका करावी अशी वलीसाहेबांची इच्छा होती.
म्हणूनच वलीसाहेबांनी आपले कार्ड प्राणसाहेबांना दिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहाला त्यांना भेटायला बोलावले.
तेव्हा प्राणसाहेब फक्त १९ वर्षांचे होते आणि त्यांना अभिनयापेक्षा फोटोग्राफीतच रस होता. म्हणूनच त्यांनी ह्या ऑफरचा फारसा विचार केला नाही आणि ते काही वलीसाहेबांना भेटायला गेले नाहीत.
त्यानंतरच्या शनिवारी प्राणसाहेब प्लाझा सिनेमाला मॅटिनी शो बघायला गेले असताना त्यांची परत वलीसाहेबांशी भेट झाली.
त्यांना विश्वास होता की प्राणसाहेब नक्की अभिनयासाठी होकार देतील, त्यामुळे त्यांनी निर्मात्यांना दुसऱ्या कुणालाही साइन करू नका असे सांगितले होते. त्यामुळे प्राण साहेबांना थोडी लाज वाटली व त्यांनी सांगितले की मी उद्या नक्की येईन.
पण ह्यावेळी वलीसाहेबांना खात्री नव्हती म्हणून त्यांनी प्राणसाहेबांचा पत्ता लिहून घेतला आणि ते दुसऱ्या दिवशी त्यांना घ्यायला गेले.
फोटो सेशन आणि इंटरव्ह्यूनंतर प्राणसाहेबांना ह्या भूमिकेसाठी साइन करण्यात आले. ही भूमिका मुख्य खलनायकाची होती. १०४० साचा हा यमला जट चित्रपट खूप यशस्वी ठरला.
त्यांचा तिसरा चित्रपट १९४२ सालचा खानदान हा चित्रपट त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता आणि नायक म्हणून पहिलाच चित्रपट होता.
याच चित्रपटातून नूरजहाँ ह्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. ह्यावेळी नूरजहाँ फक्त १३-१४ वर्षांच्या होत्या. क्लोजअप मध्ये प्राणसाहेबांच्या उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना विटांवर उभे राहावे लागत असे.
ह्याच काळात भारताची स्वातंत्र्यासाठीची लढाई सुरु होती. आणि ह्याच काळात भारतात जातीय आणि धार्मिक दंगे सुरु झाले. लाहोरमध्येही दंगल सुरु झाल्यानंतर प्राणसाहेबांनी त्यांच्या पत्नी, मेव्हणी व लहान बाळास त्यांच्या सुरक्षिततेसाठी इंदोरला पाठवले. ते त्यांच्या कामासाठी लाहोरमध्येच थांबले.
त्यांच्या मुलाचा ११ ऑगस्ट १९४७ रोजी पहिला वाढदिवस होता. त्यांच्या पत्नीने त्यांना त्या वाढदिवसासाठी येण्याचा खूप आग्रह केला.
बाळाच्या पहिल्या वाढदिवसाला वडीलच उपस्थित नाहीत असे होऊ नये म्हणून त्यांच्या पत्नीने त्यांना इंदोरला येण्याची विनंती केली. खरे तर त्यांना लाहोर मध्येच थांबायचे होते पण ते त्यांच्या पत्नीची विनंती नाकारू शकले नाहीत. त्यामुळे ते १० ऑगस्ट १९४७ रोजी ते इंदोरला आले.
ह्याच वेळी लाहोरमध्ये भयानक दंगल आणि कत्तल सुरु झाली ही बातमी प्राणसाहेबांना कळली आणि ते काही परत लाहोरला जाऊ शकले नाहीत.
एव्हाना त्यांनी चित्रपटसृष्टीत आपला जम बसवला होता त्यामुळे फाळणीनंतर चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी त्यांनी मुंबईला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. १४ ऑगस्ट रोजी ते मुंबईला पोहोचले आणि ताज हॉटेल मध्ये त्यांनी मुक्काम केला.
पण त्यांना काही महिन्यातच कळले की ह्या क्षेत्रात काम मिळवणे सोपे नाही. त्यांना सहा महिने काहीच काम मिळाले नाही. शेवटी त्यांना स्ट्रगल करताना आपल्या पत्नीचे दागिने सुद्धा विकावे लागले.
पण नंतर त्यांना संधी मिळत गेली आणि नंतर चित्रपटसृष्टीला एक देखणा, स्टायलिश खलनायक मिळाला.
पूर्वी लोक आपल्या आवडत्या नायकांची नावे आपल्या मुलांना ठेवत असत. प्राण ह्यांचे नाव घराघरांत पोहोचले होते आणि पण त्यांच्या भूमिका खलनायकाच्या असल्याने कुणीही आपल्या मुलाचे नाव “प्राण” ठेवत नसत. इतका त्यांचा अभिनय लोकांना भावत असे.
त्या दिवशी जर त्यांच्या पत्नीने त्यांना इंदोरला येण्याचा आग्रह नसता केला तर प्राणसाहेब हिंदी चित्रपटसृष्टीत आले असते का देव जाणे!
त्यांनी आपले तिथले यशस्वी करियर बघता लाहोरलाच थांबण्याचा निर्णय घेतला असता तर आज हिंदी चित्रपटसृष्टी इतक्या महान अभिनेत्याला मुकली असती हे मात्र खरे! प्राणसाहेबांना आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.