जिममध्ये व्यायाम करताना लोक ह्या १५ चुका करतात आणि तब्येतीचे नुकसान करून घेतात
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
हल्ली आपल्या तब्येतीची काळजी घेण्याविषयी जनजागृती वाढली आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे की लोक आपल्या आहार आणि व्यायामाविषयी जागरूक झालेत.
तज्ज्ञांकडून मार्गदर्शन न घेता, आपल्याच मनाने, आपल्याला शरीराला अनुरूप नसणारा आहार आणि व्यायाम केल्यास त्याने आपल्या शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते.
आपल्या शरीराची क्षमता नसताना जास्त प्रमाणात आणि चुकीचा व्यायाम केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
म्हणूनच जिममध्ये व्यायाम करताना, तो फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखालीच करावा. शिवाय व्यायाम करताना पुढे दिलेल्या चुका करू नयेत. नाहीतर, शरीराची हाडे व स्नायूंना इजा पोहोचू शकते. तसेच तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतात.
१. संतुलित व्यायाम न करणे
सामान्यपणे आपल्याला आवडतो तो किंवा जमतो तोच व्यायाम करण्याकडे लोकांचे प्राधान्य असते. परंतु शरीराला थोडी तोशीस लागल्याशिवाय आपला फिटनेस आणि स्ट्रेंथ वाढत नाही.
ह्यामुळे होते असे की काही ठराविक स्नायूंवरच ताण पडून त्यांनाच व्यायाम मिळतो आणि संपूर्ण शरीराला व्यायाम मिळत नाही. त्यामुळे काही स्नायू बळकट होतात तर शरीराचा उरलेला भाग तसाच राहतो.
२. वॉर्म अप न करणे
व्यायामाला सुरुवात करण्याआधी वॉर्म अप करणे हे सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात करण्याआधी दात घासण्याइतके महत्वाचे असते. परीक्षेच्या आधी सराव करणे जसे महत्वाचे असते तसेच व्यायामाला सुरुवात करण्याआधी वॉर्म अप करणे महत्वाचे असते.
वॉर्म अप न करता एकदम हेवी वर्क आउट सुरु केले तर स्नायूंना दुखापत होणे अटळ आहे.
वॉर्म अप केल्याने शरीर पुढच्या व्यायामासाठी तयार होते. म्हणूनच व्यायामाच्या आधी व्यवस्थित वॉर्म अप करणे गरजेचे आहे. एकवेळ तुमच्याकडे वेळ कमी असेल त्या दिवशी व्यायाम थोडा कमी करा पण वॉर्म करणे चुकवू नका.
३. शरीरात पटकन फरक दिसावा म्हणून सप्लिमेंट्स घेणे
सामान्यपणे आपला असा समज असतो की प्रोटीन सप्लिमेंट्स घेतल्यानेच स्नायू पिळदार होतात. पण खरे तर नुसते सप्लिमेंट्स घेऊन काहीही होत नाही.
योग्य आहार, योग्य प्रमाणात नियमित व्यायाम आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतलेले सप्लिमेंट्स ह्या सर्वांमुळेच शरीराचा फिटनेस वाढतो आणि तुम्हाला हवे असलेले रिझल्ट्स मिळतात.
४. स्वतःसाठी एक निश्चित ध्येय न ठरवणे
बऱ्याच वेळा आपण डोळ्यापुढे काहीच टार्गेट न ठेवता व्यायाम सुरु करतो. आपल्याला नेमके काय हवे आहे हे आपण ठरवलेले नसते.
आपल्याला शरीरासाठी नेमके काय आवश्यक आहे हे बघूनच आपण कुठल्या प्रकारचा व्यायाम करायला हवा हे ठरवायला हवे. ध्येय ठरवले नाही तर नियमित व्यायाम करण्याची प्रेरणा मिळत नाही. त्यामुळे आपल्याला हवे ते परिणाम पाहायला मिळत नाहीत.
५. सातत्याने व्यायाम टाळणे
अभ्यास असो की व्यायाम, त्यात नियमितपणा असणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर हवे असलेले रिझल्ट्स कसे मिळतील? व्यायाम म्हटले की बहुतांश लोक आळस करतात.
आज नाही उद्या, असे म्हणता म्हणता व्यायाम कधी बंद पडतो हे कळत सुद्धा नाही. जे ठरवले आहे ते पूर्ण करण्यासाठी , शरीराचा फिटनेस कायम ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.
६. जिममध्ये जातानाही फोन बरोबर नेणे
स्मार्टफोन आल्यापासून बहुतांश लोकांना त्याचे जणू व्यसनच लागले आहे. लोक बाथरूम आणि टॉयलेटमध्येही जाताना फोन बरोबर नेतात इतका त्यांना आपल्या फोनचा विरह सहन होत नाही. मग एक तास जिम मध्ये फोनविना कसे राहतील?
जिममध्येही फोन बरोबर नेल्यास माणूस त्यातच गुंतून राहतो. कुणाचा मेसेज आला हे बघणे, युट्युबवर व्हिडीओ बघणे, असे करत बसलो तर जिममध्ये व्यायाम कोण करणार?
म्हणून जो थोडा वेळ जिममध्ये व्यायामासाठी जातो तिथे जाऊन फोनमध्येच लक्ष घालण्यापेक्षा व्यायामाकडे लक्ष द्यावे. जिम मध्ये जाताना फोन बरोबर नेऊ नये.
७. नियमित व्यायाम करणे पण संतुलित आहार न घेणे
शरीर चांगले ठेवायचे असेल तर नियमित व्यायामाबरोबरच संतुलित आहार घेणे सुद्धा अतिशय आवश्यक आहे. नुसता व्यायाम करून शरीराची झीज होईल आणि अत्यावश्यक असलेले पोषण मिळणार नाही.
म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने आपला आहार ठरवून घ्या.व त्याप्रमाणे आपला आहार घेणे सुरु करा.
८. व्यायाम करताना पोस्चर्सची काळजी न घेणे
कुठल्याही प्रकारचा व्यायाम करताना आपल्या शरीराचे पोस्चर योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे. लोक आपल्याला सहज जमेल अशा पद्धतीने व्यायाम करायला बघतात.
पण चुकीच्या पद्धतीत व्यायाम केल्यास ते शरीरासाठी चांगले नाही. त्याने स्नायूंना इजा होऊ शकते. म्हणूनच व्यायाम करताना पोस्चरची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
९. आपला व्यायाम पटापट संपवण्यासाठी घाईघाईत व्यायाम करणे
व्यायाम ही अशी गोष्ट आहे जी व्यवस्थितच करायला हवी. ती घाईघाईत करून संपवून टाकण्याची गोष्ट नाही. घाईघाईत व्यायाम करून टाकणे हे व्यायाम न करण्याइतकेच चुकीचे आहे.
तुमची व्यायामाची क्वालिटी महत्वाची आहे. तुम्ही किती सेट मारता ह्यापेक्षा तुम्ही ते सेट कसे मारता हे जास्त महत्वाचे आहे. पटापट व्यायाम केल्याने तुम्हाला हवे असलेलं रिझल्ट्स सुद्धा पटापट मिळतील असे नाही.
१०. खूप जास्त व्यायाम करून शरीराची दमछाक करून घेणे
आपल्याला वाटते की जास्त व्यायाम केला म्हणजे जास्त चांगले रिझल्ट्स मिळतील तर असे नाही. आवश्यकतेपेक्षा जास्त व्यायाम करणे शरीरासाठी चांगले नाही.
ह्याने फक्त शरीराची झीज होईल. अनावश्यक दमणूक होईल. सतत दमवणारा वर्कआउट केल्याने शरीराला झीज भरून काढायला वेळच मिळत नाही. त्यामुळे शरीराचा फायदा न होता नुकसानच होते.
११. व्यायाम करताना योग्य उपकरणे न वापरणे
आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम करण्यासाठी जिममध्ये वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे असतात. पण व्यायाम करण्यासाठी त्या उपकरणांचा वापर योग्य रीतीने करणे आवश्यक आहे.
त्या उपकरणांवर चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यास शरीराचा कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही. उलट चुकीच्या पद्धतीने उपकरणांचा वापर केल्यास शारीरिक इजा होण्याची शक्यता आहे.
दुखापत होणे, पाय, हात, पाठ, मान, कम्बर दुखणे किंवा शरीरावर सूज येण्याचीही प्रकार घडू शकतात. म्हणूनच जिम मध्ये ट्रेनर्सच्या मार्गदर्शनाखालीच उपकरणांवर व्यायाम करावा.
१२. फक्त उपकरणांचाच वापर करून व्यायाम करणे
जिममध्ये व्यायाम करताना फक्त मशिन्सवरच व्यायाम करून उपयोगाचे नाही. त्याबरोबरच इतर प्रकारचा व्यायाम करणे सुद्धा आवश्यक आहे.
नुसते ट्रेडमिलवर पळून घाम गाळणे उपयोगाचे नाही तर त्याबरोबरच फ्लोअर एक्सरसाइज , स्ट्रेंथ ट्रेनिंग, पुश अप्स, लन्जेस ,फ्री लिफ्ट्स अश्या प्रकारचा व्यायाम करणेसुद्धा आवश्यक आहे.
१३. एकाच प्रकारचा व्यायाम करणे
रोज रोज एकाच प्रकारचा व्यायाम केला तर शरीराला त्याची सवय होते म्हणूनच व्यायामात वैविध्य असणे आवश्यक आहे. रोज एकाच प्रकारचा व्यायाम केल्याने शरीराला हवा तेवढा फायदा होत नाही.
रोज त्याच प्रकारचा व्यायाम करणे म्हणजे रोज एकच पदार्थ खाण्यासारखे आहे.
त्या एकाच पदार्थाने तुमची भूक तर भागते पण तुमच्या शरीराला आवश्यक असलेली सर्व प्रकारची पोषणमूल्ये मिळत नाही. व्यायामाचेही तसेच आहे. म्हणूनच व्यायामात वैविध्य ठेवले तर त्याचा शरीराला जास्त फायदा होतो.
१४.शरीरासाठी आवश्यक असलेले कार्डियो न करणे
शरीराला कुठल्या प्रकारचा व्यायाम आवश्यक आहे हे त्यातील तज्ज्ञच चांगल्याप्रकारे सांगू शकतात. तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंगची जास्त गरज आहे की कार्डियोची हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच व्यायाम सुरु करा.
तुम्ही आपल्याच मनाने व्यायाम करत गेलात तर शरीराचे नुकसान होईल. तुमच्या शरीराला जास्त कार्डियोची गरज असेल आणि तुम्ही मात्र वेट ट्रेनिंग करण्यावर अधिक भर दिला तर त्याने तुमच्या शरीराला फायदा होणार नाही.
१५. खूप जास्त वजन उचलणे किंवा खूप कमी वजन उचलणे
प्रत्येकाने आपल्या शरीराचे परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. त्यावरच ठरते की तुम्ही किती वजन उचलून व्यायाम करायचा आहे.
तुमच्या आवश्यकतेनुसारच वजन घेऊन लिफ्ट्स करायच्या असतात. पेलवणार नाही इतके जास्त वजन घेऊन व्यायाम केल्यास काहीतरी गंभीर अपघात किंवा शरीराला इजा होऊ शकते.
तसेच घाबरून जाऊन कमी वजन घेऊन व्यायाम केल्यास त्याचा शरीराला फायदा होत नाही. म्हणून ह्या प्रकारचे व्यायाम हे ट्रेनरच्या मार्गदर्शनाखालीच करायचे असतात.
ट्रेनर्स ह्या बाबतीतले तज्ज्ञ असतात. कुणाला किती वजन देऊन व्यायाम करवून घ्यायचा ह्याची त्यांना माहिती असल्यामुळे त्यांच्याच सल्ल्याने हा व्यायाम करावा.
अशा प्रकारे संपूर्ण काळजी घेऊन नियमित व्यायाम केल्यास, आहार संतुलित ठेवल्यास तुमचे आरोग्य चांगले राहील तसेच तुमचे शरीर सुद्धा काटक आणि धडधाकट बनेल ह्यात शंका नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.