रजनीकांत-अक्षय कुमार चा “2.0” कसाय माहितीये? वाचा “2.0 ची गंमत”
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
लेखक : सुमेधकुमार इंगळे
===
रजनीचा नवीन सिनेमा 2.0 फस्ट डे, फस्ट शो पाहिला. सिनेमा कसा असणार ह्याची बऱ्यापैकी आधीच कल्पना होती.
फार फापटपसारा न मांडता आवडलेल्या आणि न आवडलेल्या गोष्टी मुद्देशीर सांगतो.
१. 2.0 चे 3D इफेक्ट्स कमाल जमून आलेले आहेत. फिल्मच्या ओपनिंग टायटल सिक्वेन्स मध्ये 3D अप्रतिम दिसत आहे. त्या ओपनिंग सिक्वेन्सला काही अर्थ असो वा नसो, बघायला मजा येते.
एरवी हॉलीवूडपटांत दिसणाऱ्या हलत्या 3D पेक्षा हे 3D स्टेबल आहे.
बहुतेक हॉलीवूड सिनेमे हे 2D शूट होऊन त्यानंतर 3D मध्ये रुपांतरीत केले जातात. त्यामुळे स्क्रीनवर झिरमिळ्या दिसतात. मार्वलचे सिनेमे ह्याचे चांगले उदाहरण आहेत.
चांगला ब्राईटनेस असलेल्या प्रोजेक्टरवाल्या स्क्रीनवर हा सिनेमा बघाल तर मजा येईल.
२. VFX बजेटच्या मानाने साधारण आहेत. काही ठिकाणी हे खूपच उत्कृष्ट आहेत. आणि काही ठिकाणी भंकस आहेत.
स्टेडीयममधल्या सिक्वेन्समध्ये पबजी खेळणाऱ्या लोकांना ओळखीच्या गोष्टी दिसतील.
३. कथेकडून विशेष अपेक्षा ठेवू नये. ट्रेलरमध्ये जे घडतं, तेच सिनेमात आहे. त्यात अक्षयकुमारचे पात्र “पक्षीराजन” कसे तयार झाले, का फोन्सना घेऊन खेळते आणि 2.0 ला पुन्हा का बोलावतात ह्या स्वाभाविक गोष्टी घडतात.
त्याशिवाय विशेष काही घडत नाही. टिपिकल शंकर च्या सिनेमात दिसून येणारे मुख्य पात्र (भोळ्या माणसाच्या आयुष्यात कशी tragedy होते आणि तो पुढे कसा बदला घेतो) हे अक्षयच्या पात्रातून बाहेर येते.

४. कथेत काही जोर नसला तरी, संपूर्ण चित्रपटात धुमाकूळ भरलेला आहे. केवळ action साठी चित्रपटाची पारायणे केली जातील.
ए.आर. रेहमान चे संगीत संपूर्ण चित्रपटाला चार चांद लावते.
सिनेमात घडणाऱ्या सिन्सचे फोटोज आणि रेहमानचे संगीत एवढे जरी अडीच तास दाखवले तरी पैसे वसूल आहेत. दुसऱ्या भागात चिट्टी 2.0 च्या एन्ट्रीपासून प्रेक्षक टाळ्याशिट्या वाजवायला सुरुवात करतात.
स्टेडीयमच्या सीनमध्ये प्रेक्षक खुर्च्यांवर उठून उभे राहतात, हातातले पॉपकॉर्न फेकून देऊन नाचतात.
५. अभिनयाबद्दल प्रश्न विचारायचे नाहीत. रजनीपुढे सगळे फिक्के आहेत. पण, दुसऱ्या भागात अक्षयकुमार त्याला खाऊन टाकतो.
रस्त्यावर घडणाऱ्या फाईट सिक्वेन्समध्ये अक्षय दंगल करतो.
Emy Jackson ला तिला साजेसा असा “रोबॉटिक” रोल मिळालाय. तिने तो खूपच हायपर रियालीस्टीक केलाय. इथे तिची मेथड acting पाहायला मिळते.

On a serios note, आदिल हुसेनने मस्त काम केलंय. एमी फार सुंदर दिसते. तिचं काम तिने चोख बजावलंय.
६. ए आर रेहमानचा background score खूप अप्रतिम आहे. सिनेमात अश्या अनेक जागा येतात जेव्हा अचानक गाणे सुरु होते की काय असे वाटते. पण गाणे येत नाही.
चिट्टी आणि एमीचा रोमान्स होता होता राहतो. एक गाणे दुसऱ्या भागात अक्षयच्या backstoryमध्ये येते. दुसरे गाणे सिनेमा संपल्यावर येते.
७. सिनेमाच्या शेवटी मार्व्हल स्टाईल मिडक्रेडीट सीन पण आहे. 3.0 येण्याचे चान्सेस आहेत. Ant-man चे fans खुश होतील.
८. इंटरमिशनमध्ये अक्षयकुमारची sanitary pad वाली ad येते. ती आज मी पहिल्यांदाच 3D मध्ये पाहिली.
९. चिट्टीबाबू 2.0 सर्वात जास्त लक्षात राहणारे पात्र आहे. रजनीकान्त चिट्टी 2.0 बनून आल्यावर कमाल मजा येते. तो सिनेमातला हाय पॉइंट आहे.
“पक्षीराजन”च्या रोलमध्ये अक्षयदेखील लक्षात राहतो. रात्री चेन्नईच्या रस्त्यावर अक्षय birdman बनून जो गोंधळ घालतो, तो अतिशय अप्रतिम सीन आहे.

१०. हा सिनेमा बघताना लॉजिकमध्ये जायचं नाही. सायफाय जरी असला तरी कमालीच्या अतार्किक आणि भोंदू गोष्टी घडतात.
पॉझीटीव्ह किरणे निगेटिव किरणांना न्युट्रल बनवतात; सेलफोन्सच्या गिधाडामध्ये रजनीला अक्षयचा चेहरा दिसतो आणि तो अनुमान लावतो.
“इसके पीछे किसी इंसान का हाथ है”; लॉजिक लावलं तर डोकं दुखेल. नाही लावलं तर तूफ़ान मजा येईल.
११. सन्नी देओल आवडनार्या लोकांनी हा सिनेमा ताबडतोब थेटरात जाऊन बघितला पाहिजे. नक्की आवडेल. डॉट.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.