नव्या नवरीची कौमार्य चाचणी: ‘ही’ घृणास्पद प्रथा पाहून चीड आल्यावाचून राहत नाही…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
विविध धर्म शास्त्रात स्त्रीला मोठा दर्जा दिलेला आहे. स्त्री म्हणजे आदिशक्ती आहे असे हिंदू धर्म सांगतो. जगभरात ख्रिस्ती समाजात स्त्रियांना बरोबरीचा दर्जा देण्याबाबत उल्लेख आढळतो. इस्लाम, बौद्ध धर्मात देखील स्त्रियांचा आदर करावा असे लिखाण सापडते. पण खरंच हे सगळीकडे पाळले जाते का..?
परदेशात पूर्वी स्त्रियांना मतदानाचाही अधिकार नव्हता. भारतासारख्या देशात तर फार पूर्वी पासून स्त्रियांना कसलेच अधिकार नव्हते. शिक्षण घेण्याचीही मुभा नव्हती.
असेही म्हटले जायचे की जर स्त्री शिकली तर पुरुषांच्या डोक्यावर मिरे वाटेल.
त्यामुळे संसार माहेर, सण वार, साड्या दागिने, चूल मूल अशा बंधनात अडकवून ठेवले जायचे.
अंधार पडल्यावर घराबाहेरही जायची सुद्धा परवानगी नव्हती. स्वतःचे शील जपणे हे तिला आद्य कर्तव्य. हे सगळे कधी आणि कोणी ठरवले हे अजून माहीत नाही.
आजही कित्येक गावपाड्यात पुरुषप्रधान संस्कृतीच्या नावाखाली स्त्रियांना दबून राहावे लागतेय. नाही म्हणायला काही मेट्रो शहरात स्त्रियांनी प्रगती साधलीये. काही स्त्रियांना पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे देखील मोकळीक मिळाली आहे.
पण त्यांची टक्केवारी नगण्य आहे. बाकी स्त्रियांच्या स्वातंत्र्याला अटी लागू आहेतच.
इतकेच काय तर स्त्रीचे शील हा कळीचा मुद्दा अजूनही समाजात फुकाचे महत्व ठेवून आहे. पुरुषांना स्वैराचाराची मुभा नसली तरीही त्यावर कोणाचा अंकुशही नसतो.
===
हे ही वाचा – कौमार्य चाचणी करण्याचे हे वाईट प्रकार आजही चालू आहेत, हे खरंसुद्धा वाटणार नाही…
===
पण स्त्रीने सगळ्या मर्यादा पाळायलाच हव्यात असा भारतासारख्या देशात अलिखित नियमच आहे आणि अशा मर्यादा तोडून पुढे जाऊ पाहणाऱ्या स्त्रीला समाजात कोणतेच स्थान दिले जात नाही हेही सत्य आहे.
उदाहरण दाखल स्त्रीने एकटीने नोकरीकरिता शहरात राहणे देखील फार काही सोप्पे नाही. एक तर तिला राहायला भाड्याने पटकन घरही मिळत नाही आणि मिळालेच तर असंख्य बंधने.
त्यातून तिच्या चालण्या बोलण्यावर लक्ष ठेवून असणारे, तिच्यावर काही ‘चान्स’ मारायला मिळतोय का हे पाहणारे ही कमी नसतात.
मोठमोठ्या शहरांची ही कथा तर तुलनेने छोटी शहरे आणि गावपाड्यांची काय कथा??
अशाच एका गावात एक समाज अजूनही स्त्रियांच्या मागे हात धुवून लागलेला आहे. तिथे स्वतःच्या मुलीचे लग्न अजूनही बापाच्या जीवाला घोर लावणारी गोष्ट आहे. अशा काही प्रथा तिथे अजूनही पाळल्या जातात ज्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत.
असे काय केले जाते स्त्रियांच्या बाबतीत तेही महाराष्ट्र सारख्या ‘पुरोगामी’ राज्यात?
अत्यंत घृणास्पद वाटेल अशी प्रथा इथे चालवली जाते. स्त्रियांवरील पुरुषी वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी चिंचवड तालुक्यात कांजरभाट समाजात अत्यंत निर्लज्जपणे स्त्रियांसाठी एक परीक्षा घेतली जाते.
परीक्षा कसली तर तिचे शील, सत्व हे पवित्र आहे की नाही ते पाहण्याची. म्हणजेच तिचे कौमार्य अबाधित आहे का नाही बघण्याची परीक्षा.
लग्नानंतर जोडप्याच्या पहिल्या रात्रीसाठी पांढरी किंवा फिकट चादर वापरली जाते. नवरी व्हर्जिन म्हणजेच कुमारी आहे की नाही ते पाहण्यासाठी हा उपद्व्याप केला जातो.
कौमार्य म्हणजे योनीतील पडदा न फाटणे. अर्थात तो कोणत्याही प्रकारच्या क्रीडा प्रकाराने सुद्धा फाटू शकतो. पण शरीरसंबंधाने फाटणे म्हणजे कौमार्य हरवणे अशी आपल्याकडे समजूत आहे.
===
हे ही वाचा – ‘व्हर्जिन’ शब्दाचा जन्म नक्की कसा झाला? वाचा
===
ज्या नवरीच्या चादरीवर सकाळी लाल डाग दिसतात तिचे शील शुद्ध, पवित्र आहे. ती वधू इतरांच्या आदरास पात्र होते.
पण जिचे डाग नसतील तिचे काय? अशा वधूला अपवित्र, शीलहीन स्त्री म्हणून वाळीत टाकले जाते. तिने लग्नाआधीच तोंड काळे केले आहे असे समजले जाते आणि तिला हाकलले जाते.
आई वडिलांनी आयुष्याची पुंजी लावून थाटामाटात लावलेले लग्नही ग्राह्य धरले जात नाही. इथे नवऱ्याच्या घरच्यांच्या सोबत त्या समाजाचे सगळे स्त्री-पुरुष आणि स्वतः नवराही ह्या प्रथेला समर्थन देताना दिसतो.
मुळात अशी कौमार्याची परीक्षा घेणाऱ्यांना हा हक्क कोणी दिला? आणि स्त्रीने लग्नाआधी काय करावे आणि काय नाही ह्याचा निर्णय बाकीच्यांनी का घ्यावा?
अत्यंत हीन दर्जाच्या ह्या वागणुकीच्या विरोधात ऐश्वर्या तमाईचीकरने आवाज उठवला होता.
तिने लग्नाच्या रात्रीच्या दुसऱ्या दिवशी आपली चादर दाखवून आपली कौमार्य परीक्षा घेण्यास मनाई केली. तिने चादरच दाखवण्यास आक्षेप घेतला.
त्यामुळे तिला निगरगट्ट समाजाने वाळीत टाकले. तिला पूजा-अर्चा, नवरात्री समारंभ अशा कोणत्याही कार्यक्रमात येण्या जाण्यास बंदी घातली. नशिबाचा भाग असा की तिच्या नवऱ्याचा तिला पूर्ण पाठिंबा मिळाला.
ऐश्वर्याच्याही आधी २०१७ मध्ये एका स्त्रीने ह्या घटने विरोधात ‘स्टॉप द व्हि-रिच्युअल’ अशी कॅम्पेन चालू केली होती. पण त्याला फार प्रसिद्धी मिळाली नाही.
मात्र ऐश्वर्यामुळे आणि तिच्या नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे ह्या प्रकरणाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले. अर्थात तिला खूप अन्यायही सहन करावा लागतोय.
समाजाच्या विरोधात गेल्याने तिच्यावर हल्ले होतायत, दांडिया, गरबा मधून तिची बेदरकारपणे हकालपट्टी केली जाते. तिचा जागोजागी अपमान केला जातो.
आश्चर्याची गोष्ट अशी की कर्मठ जात पंचायती बरोबर त्या समाज्याच्या स्त्रियाही ऐश्वर्या सारख्या व्यक्तीला कोसतात. तिला पाठिंबा देत नाहीत. ही वेळ त्यांच्यावरही येऊन गेलेली आहे पण त्याचे त्या स्त्रियांना काहीच वाटत नाही.
उलट जात पंचायतीला पाठिंबा देऊन या अश्लाघ्य सोपस्काराला आपली संमती दर्शवतात.
पण ऐश्वर्या शांत बसली नाहीये. तिने ह्या कांजरभाट समाजाच्या चुकीच्या चालीरीती विरोधात पोलिसात FIR दाखल केला आहे.
ऐश्वर्या सारख्या स्त्रिया असल्यामुळे एका गोष्टीची खात्री मात्र नक्कीच होते. सीतेची अग्निपरिक्षा सत्ययुगात घेतली गेली तशी आता शक्य नाही. स्त्री म्हणजे काही खेळणे नाही. तिलाही भावना असतात.
तिच्या आयुष्याची मालकी आता तिने दुसऱ्या कोणाला देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे असल्या सत्त्वपरीक्षा देण्यास स्त्रियांना आता भरीस पाडणे हा कायद्याच्या मंदिरात गुन्हाच ठरू शकतो..!
===
हे ही वाचा – विविध समाजांमध्ये ‘पौरुषत्व’ सिद्ध करण्याच्या या ११ प्रथा तुमची झोप उडवतील
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.