' “अंधाधून” च्या निमित्ताने पुण्यावर विनोद करणाऱ्यांना खास पुणेरी उत्तरं – InMarathi

“अंधाधून” च्या निमित्ताने पुण्यावर विनोद करणाऱ्यांना खास पुणेरी उत्तरं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखिका: अभिपर्णा भोसले

===

“अंधाधुन” हा “Movie of the Decade” असूनही location पुणे असल्याने काही issues निर्माण झाले आहेत.

१. “पुण्यात असूनही आयुष्मन राधिकाला घेऊन एकदाही Z-bridge ला जात नाही. एकदाही.”

– Z bridge चा एक नियमित visitor. (मुली बदलत जातात; पण हा जातो म्हणजे जातोच. माणसाने दृढनिश्चयी असावे ते असे! Proud of You, dude!)

२. “चित्रपटात कुठेही तांबडा-पांढरा रस्सा (नावाचे अनुक्रमे रंगीत व गढूळ पाणी) विकणारी हाॅटेले (हाॅटेल्स नाहीच म्हणवत) दिसत नाहीत.”

 

hotel-nagpur-inmarathi
tripadvisor.in

– निलम आणि आवरारे खाणावळींचे मालक( यातील निलमच्या एकाच पेठेत अगणित शाखा असल्याने रविवारी केवळ सर्व शाखांच्या बाहेरून फेरफटका मारुन आल्यास हवेतील मांसदरवळानेच पोट भरते आणि मांसाहार करण्याचे पाप लागत नाही.)

३. चित्रपटात एक रिक्षावाला आहे. पण तो कुठेही “घरी चाललो होतो; पण तुम्ही होतात म्हणून सोडलं” असे म्हणून आयुष्मनला कृतज्ञ व्हायला भाग पाडत नाही अथवा मीटरनुसारच पैसे घेण्यास मनाई करुन जादाचे भाडे मागत नाही.

हे सर्व विनाकारण आदर्शवादी असून पुणेरी व्यवहारास धरुन नाही.

– यातील घरी जात असूनही सोडायला वळून येणा-या रिक्षावाल्याचे अनुभव तरुणींना अधिक आहे. कारण समजल्यावर कळवण्यात येईल.

४. “चित्रपटातील कोणताही काका अगर आजोबा खेकसून बोलत नाही वा एखादी आजी उगाच जाताजाता तिरस्कारदर्शक कटाक्षही टाकत नाही.”

– पुण्याबाहेरुन आलेले सदाशिवपेठी वास्तव्यास असलेले लोक.

५. “चित्रपटात कुठेच “वैशाली-रुपाली” दाखवलेले नाही. याउलट कुठलातरी विदेशी कॅफे वारंवार दाखवून टिळकांच्या स्वदेशी चळवळीस आव्हान दिलेले आहे.”

 

vaishali-inmarathi
indianexpress.com

– दर रविवारी वैशालीचा मैसूर मसाला डोसा आणि रुपालीची काॅफी पिणारा देशभक्त

६. “पुण्यात राहूनही चित्रपटातील कोणतेही पात्र गाडी काढून weekend ला सिंहगडावर अथवा तळजाईच्या पठारावर जात नसल्याने हा सिनेमा फाऊल धरण्यात येईल.”

– समस्त पुणेकर

७. “चित्रपटात राधिका ही मध्यमवर्गीय तरुणी एकदाही तुळशीबागेत किंवा FC road ला किंवा गेला बाजार कॅम्पात रोडवरील दुकानदाराशी घासाघीस करुन २५० चा टाॅप २०० ला घेताना दाखवली नाही.”

 

fcroad-inmarathi
youtube.com

– एक कृश/मध्यम बांध्याची सुबक नवतरुणी ( कृश/मध्यम/सुबक अशासाठी की तिथे सर्व यष्ट्या उडालेल्या शरीरयष्टींचे कपडे मिळणे मुश्किल असते.)

८. “चित्रपटात तब्बूची उच्चभ्रूता (हा शब्द असतो ना?) ही फक्त तिचे अपार्टमेंट मगरपट्टा सिटीमध्ये दाखवून सिद्ध होत नाही. एकदातरी तिला W, aurelia मधून 1200 रुपये घालवून 30 cm लांबीचा स्कार्फ घेताना किंवा गाडगीळ-पेठे-रांका यांच्या पाय-या चढताना किंवा वरील गोष्टी परिधान करुन pointless topics वरील व्याख्यानांना जाऊन पहिल्या रांगेत बसलेले का नाही दाखवले?”

 

P.-N.-Gadgil-inmarathi
Weddingplz.com

– समस्त उच्चभ्रू मध्यमवयीन मैलावर्ग( त्यांच्याच शब्दात सांगायचं तर “आम्ही दुपारची एक ते चार ही वेळ सोडून हेच करत असतो उरलेल्या वेळात”.)

९. “परत एक प्रश्न. दानीला चायनीज किंवा दुसरे काही खायचे असेल तर ती Swiggy वरुन order करेल. तिथे तब्बूला पार्सल आणायची काय गरज? ती रस्त्यावरचे तर खात नसेलच. परत श्रीमंतीवर प्रश्नचिन्ह!”

– लेखिकेला पडलेला प्रश्न

१०. “चित्रपटात कुठेही पार्श्वभूमीला शनिवारवाडा, लाल महाल किंवा at least पर्वतीही दाखवलेली नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास दडपण्याचा प्रयत्न समजण्यात यावा का?”

 

shaniwarwada-inmarathi
YouTube.com

– पुणेरी आक्रमक इतिहासप्रेमी मंडळ

११. “राधिका relationship बद्दल serious असूनही सारसबागेतील गणपतीला “लग्न होऊ दे” नवस बोलत नाही.”

– या नवसाचे षटक पूर्ण झाल्यावर “मी फक्त तुझीच” असे सारसबागेतील वळचणीच्या कोप-यात आश्वासन देणारी आणि सरतेशेवटी arranged marriage करणारी विवाहेच्छुक तरुणी

१२. “कुठेही स्पर्धापरीक्षेच्या विद्यार्थ्यांचा ग्रुप उभारुन पोहे खात खात हडप्पा ते कटप्पा अशा कुठल्याही विषयावर चर्चा करताना दाखवलेला नाही. चर्चा ऐकवली नसती तरी चालले असते(ते उत्तमच ठरले असते!) पण दोन सेकंदाचा cameo दाखवून चित्रपटाला वास्तवतेची चंदेरी किनार देण्याची सुवर्णसंधी सिनेमॅटोग्राफरने सोडली!”

– सरकार मागण्यांकडे लक्ष देत नाही, घरचे पाठिंबा देत नाहीत, आयुष्यातील असलेली प्रिय माणसे सोडून जातात, तसे कुणी नसेल तर आजन्म सिंगलतेचा शाप लाभलेले निरुपद्रवी जीव.

१३. “निरनिराळ्या प्रकारच्या मिसळींची (म्हणजे निरनिराळ्या प्रकारे बेचव ) कुठलीही जाहिरात, बोर्ड काहीच दाखवलेले नाही.”

 

bedekar-misal-pune-inmarathi
HungryForever.com

– काटा काढायला निघालेला कीर

१४. “चुलीचा साधा उल्लेखही नाही.”

– चित्रपटातील पहिल्याच काही मिनिटांत पडलेल्या पावसाने वाहून गेलेली चूल.

१५. “तंदूर चहा, बासुंदी चहा, अमृततुल्य चहा यातले काहीही कुणीही पिताना दाखवलेले नाही.”

– प्राज्ञ परीक्षेचा अभ्यास करताना जगात इतरही उत्तेजक पेये असल्याची माहिती मिळालेला गटणे.

१६. “चित्रपटात कुठल्याही टाळक्यावर पुणेरी पगडी किंवा फुलेंची पगडी(नवीन प्रघातानुसार) दिसत नाही. चित्रपट बनवताना चालू राजकीय घडामोडी डोळ्यांखालून घातल्यास एक वेगळाच reality touch येतो आणि सामान्य लोकांना चित्रपट लोकनेत्याइतकाच जवळचा वाटतो.”

– अभिनेता/दिग्दर्शक-turned राजकीय नेता

१७. “एकही पुणेरी पाटी नाही दाखवलेली अख्ख्या सिनेमात. याला काय म्हणावे.”

 

pune-signboards-inmarathi
indianexpress.com

– पाट्या गिरवणारे काका आणि त्यांचा पाट्या टाकणारा पुतण्या(“काका, मला वाचवा” तले काका-पुतण्या नव्हे.)

१८. “पुण्यात असूनही संपूर्ण चित्रपटात मस्तानीचा संदर्भ नाही, हे पाहून माझ्या ह्रदयस्थ आत्म्याचा(आणि पोटाचा) दाह झाला.”

– सदाशिव पेठेच्या चौकात मस्तानीच्या दुकानात जाऊन सीताफळ रबडी ऑर्डर करुन प्रेमभंगाचे दुःख विसरू पाहणारा आणि मस्तानीवर बाजीरावापेक्षा जास्त प्रेम करणारा अभागी तरुण.

१९. “चित्रपटात एका ठिकाणी आयुष्मनने दोन कप काॅफी बनवली आहे, त्यासाठी आमच्याच ब्रॅण्डचेच दूध वापरले असावे,त्याचे credits मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या सोबत बशीत चार बाकरवड्या दाखवल्या असत्या तर प्रसंग अधिक खुलला असता. पहिलीच वेळ आहे म्हणून ठीक. नाहीतर आमच्याकडे चुकीला माफी नाही.”

– तिचळे भगिनी(आमची शाखा कुठेही नाही.)

२०. “आयुष्मनच्या प्रवासाचा भार राधिका वाहते, हे पुणेरी परंपरेला धरुनच आहे. पण चित्रपटातील इतर कुणीही PMT ने प्रवास करताना आढळून येत नाहीत. याशिवायही PMT कुठल्याही sceneच्या background मध्येही दाखवली नाही. याचा मी निषेध करतो.”

 

pune-bus-inmarathi
indianexpress.com

– PMTने (तिकीट काढून) प्रवास करणारा आणि प्रवासखर्च वाचवण्यासाठी आपल्या आयुष्यातही एक स्कूटीधारी राधिका हवी अशी सुप्त इच्छा उरी बाळगून असलेला एक कृष्ण.

२१. “चित्रपटाच्या नावातच घोळ(राधिकाचा नव्हे, तो “घूल” आहे आणि त्यात आयुष्मन नाही) आहे. ‘अंधाधुन’ हे नाव व्याकरणदृष्टया चुकीचे आहे. ‘अंधी धुन'(दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत) असं असलं पाहिजे. हे भाषाभ्यासकांनी हेरले असेलच.”

– सदाशिव पेठेतील राष्ट्रभाषा हिंदी अध्ययन संघ (शेवटी ते “जय हिंद” ऐवजी “जय हिंदी” असे म्हणाले. ही सूक्ष्म बाब कंसात टाकल्याने भाषिक वाद टाळण्यासाठी लेखिकेने अवलंबलेली समयसूचकता आणि प्रसंगावधान याठिकाणी दिसून येते, अध्यक्ष महोदय.)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?