केवळ “व्हायरस”च नाही तर तुमच्या आजूबाजूच्या “या” गोष्टीही ठरतील घशासाठी घातक
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सध्या कोरोना व्हायरसमुळे कोणालाही सर्दी- खोकला झाला की प्रत्येकाला भीतीच वाटते. त्यामुळे सगळेच सर्दी-खोकल्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत.
ऋतू बदलला की, लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो. लहान मुले व वयोवृद्ध मंडळींची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने त्यांना हे आजार पटकन होतात.
ऋतू बदलताना, पावसात भिजल्याने किंवा जरा थंडी पडली की आधी सर्दी होते. मग घसा खवखवतो, गिळताना घसा दुखतो, आवाज बदलतो, घशाचा दाह होतो, खोकला होतो.
डॉक्टर आपल्याला सांगतात घसा सुजलाय,आतून लाल झालाय म्हणजेच थोडक्यात तुम्हाला थ्रोट इन्फेक्शन झाले आहे. मग इन्फेक्शन जसे असेल त्याप्रमाणे औषधे किंवा प्रतिजैविके घ्यावी लागतात.
त्याबरोबर घशाची सूज उतरण्यासाठी आपल्याला गरम पाणी पिण्याचे व हळद -मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायचा सल्ला घरातील मोठी अनुभवी मंडळी देतात.
कधीकधी सुंठ, गवती चहा, ज्येष्ठमध, मध, हळद, लिंबू, पुदिना ही आजीबाईच्या बटव्यातील औषधे सुद्धा कामाला येतात.
हे थ्रोट इन्फेक्शन नेमके होते कशामुळे?
घशाचा दाह किंवा घशात खवखवणे ह्या आजाराला शास्त्रीय भाषेत फॅरेनजायटिस असे म्हणतात. हे सर्दी किंवा फ्लू प्रमाणेच घशाला होणारे एक व्हायरल इन्फेक्शन आहे. हे इन्फेक्शन काही दिवसांत आपोआप कमी होते.
परंतु स्ट्रेप थ्रोट म्हणजेच स्ट्रेप्टोकॉकल इन्फेक्शन हे बॅक्टेरिया मुळे होते. हे इन्फेक्शन कमी होण्यासाठी व त्यातून अधिक गुंतागुंत उद्भवू नये म्हणून प्रतिजैविके म्हणजेच अँटिबायोटिक्स घ्यावी लागतात.
घसा दुखणे किंवा खवखवणे, बोलताना किंवा गिळताना घसा दुखणे, गिळायला त्रास होणे, टॉन्सिल्सला सूज येऊन ते लाल होणे, टॉन्सिल्सवर पांढरे चट्टे उठणे किंवा त्यावर पस तयार होणे ही फॅरिन्जायटिसची कॉमन लक्षणे आहेत.
घशाला हा त्रास होत असताना शरीर सुद्धा ह्या इन्फेक्शनची ताप, खोकला, नाक सतत वाहणे, अंगदुखी, डोकेदुखी, शिंका, मळमळ किंवा उलटी होणे ही लक्षणे दाखवत असते.
–
हे ही वाचा – अनेक गंभीर आजारांवरील एकच रामबाण, पण दुर्लक्षित उपाय!
–
मोठी माणसे हे सगळे काही प्रमाणात सहन करू शकतात. पण लहान मुलांना हा त्रास होत असल्यास त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाणे गरजेचे असते.
बरेचदा लहान मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच गिळताना त्रास होतो आणि त्यामुळे सतत तोंडातून लाळ गळत असते. असे झाल्यास त्यांना त्वरित डॉक्टरांकडे नेणे आवश्यक आहे.
हा त्रास लहान मुलांसाठी सहनशक्तीच्या बाहेरचा असतो. तसेच श्वास घेता न आल्याने अतिशय गुंतागुंतीची परिस्थिती उद्भवू शकते म्हणूनच वेळीच उपचार होणे गरजेचे आहे.
मोठ्या माणसांनाही पुढीलपैकी काही त्रास होत असेल तर त्यांनीही डॉक्टरांकडून उपचार करून घेणे आवश्यक आहे.
१. एका आठवड्यात घसा दुखणे थांबले नाही तर
२. गिळताना त्रास होणे
३. श्वास घ्यायला त्रास
४. तोंड उघडताना त्रास
५. लाळेत रक्त
६. सतत घसा दुखणे किंवा दोन आठवड्यांपेक्षाही जास्त काळ घसा बसणे
७. १०१ फॅरेनहाईट पेक्षा जास्त ताप
किंवा सांधेदुखी, कान दुखणे, अंगावर रॅशेज अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार करणे आवश्यक आहे.
हे सगळे व्हायरल इन्फेक्शनमुळे होते. व्हायरल इन्फेक्शनने सर्दी खोकला ह्यांसह इन्फल्युएंझा, मोनोन्युक्लीऑसिस, गोवर, कांजिण्या हे आजार होतात.
बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायरलसारखे आपोआप बरे होत नाही. त्यासाठी प्रतिजैविके घ्यावीच लागतात.
नाहीतर इन्फेक्शन पुढे रक्तात पसरू शकते. सेप्सीस ह्या बॅक्टेरियल इंफेक्शनमुळे तर अतिशय गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.
म्हणूनच दुखणे फार काळ अंगावर काढणे चुकीचे आहे. घरगुती उपचारांनी दोन तीन दिवसांत बरे वाटत नसेल तर डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे.
इन्फेक्शन शिवाय विविध प्रकारच्या ऍलर्जीमुळे सुद्धा घशाला त्रास होऊ शकतो. घरातील पाळीव प्राण्यांचे केस, धूळ, बुरशी, पोलन ग्रेन्स ह्याची अनेकांना ऍलर्जी असते. त्याने घशाला त्रास होऊ शकतो.
तसेच घराच्या आजूबाजूला फार कबुतरे असतील तर त्यांच्या पंखांतील घाणीमुळे अनेक लहान मुलांना बालदम्यासारखा त्रास उद्भवू शकतो.
कोरडी हवा सुद्धा घशाचा त्रास होण्यास कारणीभूत आहे. उन्हाळयात जेव्हा हवा अत्यंत कोरडी असते तेव्हा हा त्रास होऊ शकतो. घसा खवखवतो आहे अशी जाणीव होते. हा त्रास सकाळी उठल्यानंतर जास्त जाणवतो.
सर्दीमुळे नाक बंद असेल आणि तोंडाने श्वास घ्यावा लागत असेल तरीही घशाला इरिटेशन होते. तसेच घरच्या किंवा बाहेरच्या हवेतील प्रदूषणामुळेही घशाला त्रास होतो.
बाहेरच्या हवेतील धुळीमुळे किंवा धुरामुळे घशाल त्रास होतो.
विशिष्ट प्रकारच्या केमिकल्स मुळे, तंबाखू तसेच सिगारेटच्या धुरानेही घशाला त्रास होऊ शकतो. तंबाखू खाणे, दारू किंवा अतितिखट व मसालेदार पदार्थ सुद्धा घशाच्या आरोग्यासाठी वाईट आहेत.
कधीकधी घशातील मांसपेशींवर ताण आल्याने सुद्धा घशाला त्रास होऊ शकतो. अति मोठ्या आवाजात बोलल्याने किंवा सतत कुठलाही ब्रेक न घेता बोलल्याने, ओरडल्याने घश्यातील मासपेशींवर ताण येऊन घसा दुखतो.
काही लोकांना गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्सचा त्रास असतो. म्हणजेच पोटातील ऍसिड खाली आतड्यांकडे न जाता परत वर अन्ननलिकेत येते. असे अन्ननलिका व जठराला जोडलेल्या भागातील व्हॉल्वला प्रॉब्लेम झाल्याने होते.
ह्याने छातीत जळजळ होते, आवाज घोगरा होतो व घशात काहीतरी अडकले असल्याची भावना होते. म्हणजेच घशाला इरिटेशन होते.
–
हे ही वाचा – अॅण्टीबायोटिक्स घेत असताना मद्यपान करू नये! खरं की खोटं… जाणून घ्या!
–
जर कोणाला एचआयव्हीचे इन्फेक्शन झाले असेल तर त्याला सुरुवातीच्या काळात घशाचा त्रास जाणवतो किंवा फ्लूची लक्षणे जाणवतात. जी व्यक्ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असेल त्या व्यक्तीला वारंवार घशाला त्रास होतो.
याचे कारण त्यांना ओरल थ्रश नावाचे फंगल इन्फेक्शन झालेले असते किंवा cytomegalovirus (CMV) चे इन्फेक्शन झालेले असते. हे इन्फेक्शन तसे कॉमन आहे.
पण ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते त्यांना हे इन्फेक्शन वारंवार होते. त्यांच्यासाठी हे घातक ठरू शकते.
तसेच काही दुर्मिळ केसेसमध्ये जर स्वरयंत्र किंवा जीभ किंवा घशात ट्युमर झाला असेल (कॅन्सरस किंवा नॉन कॅन्सरस) तरीही घशाला त्रास जाणवतो.
ह्या केस मध्ये घशाला इरिटेशन होणे ह्याशिवाय आवाज घोगरा होणे, गिळायला त्रास होणे, श्वास घेताना मोठा आवाज होणे, मानेत लम्प तयार होणे, लाळेत रक्त येणे ही सुद्धा लक्षणे दिसतात. तसेच घशात पस तयार झाला तरीही घसा खराब होतो.
एखाद्या दुर्मिळ केस मध्ये आपल्या श्वसनलिकेला जे छोटे कार्टिलेज कव्हर करते ते सुजल्यास घशाला त्रास होतो. ह्याने श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो.
ह्या केसमध्ये रुग्णाला त्वरित उपचार न मिळाल्यास त्याच्या जीवावर सुद्धा बेतू शकते.
घशाचा त्रास लहान मुलांना सर्वाधिक होतो. तसेच सिगारेटच्या धुरामुळे होणारा त्रास सिगारेट पिणाऱ्याला व त्याच्या आजूबाजूच्या सर्वांना होतो. ऍलर्जी असणाऱ्यांना हा त्रास होतो.
केमिकलच्या सानिध्यात फार काळ असणाऱ्यांनाही घशाला त्रास जाणवतो. तसेच अनेकदा तीव्र स्वरूपाचे सायनसचे इन्फेक्शन होणाऱ्यांनाही घशाच्या त्रासाला सामोरे जावे लागते.
मधुमेह, एचआयव्ही, किमोथेरपी मुळे प्रतिकार शक्ती कमी झाल्यास, स्टिरॉइडयुक्त औषधे घेतल्यास, ताण, थकवा असल्यास किंवा तुमचा आहार चांगला नसल्यास सुद्धा तुम्हाला घशाचा त्रास किंवा इन्फेक्शन होऊ शकते.
हा त्रास टाळण्यासाठी स्वच्छता पाळणे आवश्यक आहे. शिंकल्यावर, खोकला आल्यावर, स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर, जेवणाआधी हात स्वच्छ धुणे अतिशय आवश्यक आहे.
तसेच दुसऱ्याला इन्फेक्शन असल्यास किंवा आपली प्रतिकारशक्ती कमजोर असल्यास दुसऱ्याने वापरलेली भांडी वापरू नये. दुसऱ्याचे उष्टे खाऊ नये. खोकताना किंवा शिंकताना रुमाल घ्यावा व तो नंतर धुवावा.
खोकताना किंवा शिंकताना रुमाल नसेल तर कशानेही आपले नाक व तोंड झाकून घ्यावे व नंतर हात धुवावे.
हात धुणे शक्य नसेल तर अल्कोलोह बेस्ड हॅन्ड सॅनिटायझर वापरावे. घरातील फोन, टीव्ही रिमोट, कम्प्युटर कीबोर्डची वारंवार स्वच्छता करावी. तसेच आजारी माणसाच्या फार जवळ जाऊ नये.
या गोष्टी तुम्ही पाळल्या तर तुम्ही सहज थ्रोट इन्फेक्शन होणे टाळू शकता.
–
हे ही वाचा – सिगरेट न पिणाऱ्यांना फुफुसांचा कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढत चाललंय आणि त्यामागे ही कारणं आहेत
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.