पटेल नसते तर आज भारताच्या हृदयात पाकिस्तान तयार झाला असता!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक : अनुप कुलकर्णी
===
१७ सप्टेंबर १९४८! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस! या दिवसाचे महत्व मराठवाड्यातील जनतेला चांगलेच ठाऊक असले तरी उर्वरित महाराष्ट्राला त्याची जास्त कल्पना नाही. असे म्हणता येईल की, हा मराठवाड्याचा स्वतंत्रता दिवस आहे.
या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या पोटात आणखी एक पाकिस्तान बनता बनता राहिला.
हे किती जणांना माहीत आहे याची कल्पना नाही, पण हा मुक्तीसंग्राम लढला गेला नसता तर आज भारताचे भौगोलिक चित्र वेगळे असते हे मात्र निश्चित!
या संग्रामात सरदार वल्लभभाई पटेल यांचा मोलाचा वाटा आहे; म्हणूनच आमच्यासाठी ‘सरदार’ हे इतर नेत्यांपेक्षा मोठे आहेत.
जसे १५ ऑगस्टचे महत्व आहे, तसेच मराठवाड्यासाठी १७ सप्टेंबरचे महत्व आहे. भारताला जरी स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळाले असले तरी मराठवाड्यामध्ये स्वातंत्र्याची पहाट उगवायला तब्बल एक वर्ष वाट पाहावी लागली.
निझाम आणि त्याची रझाकार सेना यांचे अनन्वित अत्याचार सहन केलेला हा महाराष्ट्राचा भूभाग संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या आकाशी विहार करत असताना मात्र पारतंत्र्याच्या अंधारात खितपत पडला होता.
काय आहे हा मुक्तीसंग्राम? कसा लढला गेला? या मध्ये लोहपुरुष सरदार पटेल यांचे काय योगदान आहे? जाणून घेऊया या लेखामधून…
आधुनिक भारताचे शिल्पकार अशी यादी तयार करायची झाली तर ‘लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल’ यांचे नाव त्या यादीत खरेतर सर्वात वरच्या स्थानी असायला हवे.
परंतु दुर्दैव असे की, त्यांच्या स्वतःच्या काँग्रेस पक्षाने घराणेशाही पुढे पटेलांची किंमत कधीच केली नाही.
ब्रिटिश सत्तेपासून स्वतःच्या सत्तेकडे भारत परावर्तित होत असतानाची पटेलांची भूमिका ही अत्यंत मौलिक आहे. पण एवढे असूनही द्वेशबुद्धी राजकारणामुळे त्यांना त्यांचे श्रेय मिळू दिले गेले नाही.
अभ्यासक्रमातसुद्धा त्यांच्याविषयी कमीत कमी माहिती दिली गेली, जेणेकरून लहान मुलांना फक्त गांधी आणि नेहरू लक्षात राहावे आणि पटेल विस्मृतीत जावे.
सरदार पटेल यांचे कार्य इतके मोठे होते की त्यांनी देशाचे अंतर्गत तुकडे पडण्यापासून या देशाला वाचवले आहे.
पटेल नसते तर भारताच्या अंतर्भागात आणखी एक पाकिस्तान निर्माण असता आणि त्याचा परिणाम भारताच्या सुरक्षेवर किती झाला असता याची तुम्ही कल्पना करू शकता.
चाळीसच्या दशकामध्ये एकीकडे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या हालचाली सुरू होत्या आणि दुसरीकडे भारतातील संस्थानिक राजे अस्वस्थ होते. जर भारत एकसंघ देश झाला तर आपले सगळे अधिकार संपुष्टात येतील अशी भीती त्यांना वाटत होती.
त्या संस्थानिकामधील एक होता हैद्राबादचा निझाम! मुक्तीसंग्रामाची माहिती घेण्यापूर्वी या निझामाची थोडक्यात माहिती घेणे इथे जरुरी आहे.
भारतात परकीय इस्लामी शक्तींचे आक्रमण होऊन बराच काळ लोटला होता. त्यांनी ठिकठिकाणी आपली राज्ये स्थापन केली होती. त्यातला एक होता असफ जाह.
हा असफ जाह मुघलांकडून दक्षिण भागातील कारभार बघण्यासाठी ‘निजाम-ए-मुल्क’ असा किताब देऊन नेमला होता.
अठराव्या शतकात मोगलाई खिळखिळी झाली तेव्हा या असफ जाहने स्वतःला हैद्राबाद संस्थानाचा राजा घोषित केले. ही निजामशाही तेथपासून शेवटचा निजाम उस्मान अली खान पर्यंत चालली.
उस्मान अली खानची सत्ता असताना हैद्राबाद हे नावारूपाला आलेले श्रीमंत संस्थान होते. उस्मान अली खान हा जगातील अत्यंत श्रीमंत लोकांपैकी एक समजला जात असे.
टाइम्स मॅगझीनमध्ये त्याचे फोटो मुखपृष्ठावर छापून येत असत. हैद्राबाद जरी ब्रिटिश अधिपत्याखाली होते तरी त्याची स्वतःची स्वतंत्र ओळख होती. हैद्राबाद राज्याचे स्वतःचे चलन, सैन्य, रेल्वे, रेडिओ आणि पोस्ट सुद्धा होते.
जेव्हा १९४७ मध्ये लॉर्ड माउंटबॅटनने भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली, तेव्हा भारतात ५६५ संस्थाने राज्य करत होती. त्यांना भारत किंवा पाकिस्तान कुठल्याही एका देशात सामील व्हायचा निर्णय घ्यायचा होता.
इतरांनी जरी जास्त खळखळ न करता निर्णय घेतला तरी हा निजाम मात्र वेळकाढू धोरण अवलंबवत होता. त्याचे कुटील विचार वेगळेच होते.
त्याला ना भारतात राहायचे होते ना पाकिस्तानात जायचे होते. त्याला स्वतःचा स्वतंत्र देश असावा असे वाटत होते आणि अर्थातच भारताच्या दृष्टीने हा फार घातक प्रकार होता.
कल्पना करा, चारी बाजूने भारताच्या सीमा आणि मध्यभागी वसलेला परका देश… भारताची संपूर्ण सुरक्षाच धोक्यात आली असती. या प्रकाराला इतरांची मूक संमती असली तरी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा तीव्र आक्षेप होता.
एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की चारी बाजूंनी भारताने वेढल्यावर निजाम राज्य कसा करू शकणार होता?
कारण त्याच्याकडे एकही समुद्री मार्ग नव्हता आणि बंदर सुद्धा नव्हते. मग व्यापार कसा चालणार? याचा पटेलांनी तपास केला असता असे दिसून आले की निजामाने पाकिस्तानच्या जिना सोबत गुप्तपणे हातमिळवणी केली असून त्यांचे कराची बंदर वापरण्याचा त्याचा डाव आहे.
त्याबदल्यात अर्थातच हैद्राबादची जमीन पाकिस्तानी कारवाया करण्यासाठी मोकळी असणार होती.
यापेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे निजाम हा पाकिस्तानला वीस कोटींची आर्थिक मदत करणार होता आणि त्या बदल्यात पाकिस्तान कडून शस्त्र मिळवणार होता. त्याचा वापर भारताविरुद्ध करणार होता.
आपण भारतीयांनी पटेलांचे आभार मानावे तितके कमीच आहेत कारण त्यांनी हा कुटील डाव वेळीच हाणून पाडला.
परंतु तरीही हैद्राबाद हे स्वतंत्र संस्थान होतेच आणि भारतात सामील होण्यास त्यांचा नकार कायम होता. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे असलेली सशस्त्र सेना… रझाकार!
हे रझाकार कट्टर आणि धर्मांध असून कुठल्याही परिस्थितीत मुस्लिम राज्य आणण्यासाठी प्रयत्नशील होते. कोण हे रझाकार? तर त्यासाठी परत इतिहासात जावे लागेल.
उस्मान अली खानच्या सल्ल्यावरून १९२० मध्ये एका राजकीय पार्टीची स्थापना झाली होती. त्याच पार्टीचे नाव सध्याच्या काळातही बरेच गाजत आहे.
‘मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन’ अर्थात MIM.
या पार्टीची स्थापना मुस्लिम राज्य स्थापन करण्यासाठीच झाली होती. यांचा मुख्य भर शस्त्रांचा वापर करणे, तसेच लहान मुलांचे आणि युवकांचे ‘ब्रेनवॉश’ करून त्यांना जिहादसाठी तयार करणे हेच होते.
या पार्टीच्या सैनिकांना रझाकार म्हणत असत आणि यांच्याच जोरावर निजाम स्वतंत्र देशाच्या वल्गना करत होता.
या रझाकारांचा नेता होता कासीम रिझवी. या महत्वकांक्षी कासीम रिझवीला हैद्राबाद हा स्वतंत्र देश करून त्याचे नाव ‘ओस्मानिस्तान’ असे ठेवायचे होते.
–
–
निजामाच्या वेळकाढू धोरणामुळे बाकी भारताला स्वातंत्र्य मिळूनही अद्याप हैद्राबाद संस्थान भारतात सामील झालेच नव्हते.
१९४८ मध्ये आपली ताकद भारत सरकारला दाखवून देण्यासाठी कासीम रिझवीने आपली दोन लाखांची रझाकार फौज जमा केली आणि हिंदुबहुल राज्यातील प्रजेवर छळ आणि अत्याचार सुरू केले. त्यात मराठवाडा सुद्धा होता.
याद्वारे भारत सरकारला इशारा दिला की लवकरात लवकर आम्हाला स्वतंत्र देशाची मान्यता देण्यात यावी. अर्थातच यामागे महंमद अली जिना यांची फूस होती.
या प्रकाराने संतापलेल्या सरदार पटेलांनी एक शेवटचा उपाय म्हणून कासीम रिझवीला चर्चेसाठी बोलावले.
पण रिझवी अतिशय उध्दटपणे वागला आणि त्याने सरळ धमकी दिली की,
“जर हैद्राबाद स्वतंत्र देश नाही झाला तर त्याची रझाकार सेना राज्यातील प्रत्येक हिंदूला कापून काढेल”.
स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणे शक्यच नव्हते! तेव्हा मात्र रझाकारांच्या अत्याचाराने परिसीमा गाठली. इंग्रजांनी जेवढे क्रौर्य दाखवले नाही तेवढे क्रौर्य हिंदू जनतेने रझाकरांकडून बघितले. लूटमार, मारहाण, खून, बलात्कार, तोडफोड आणि धर्मांतराला उत आला…
ठिकठिकाणी हिंदू जनता आणि मुस्लिम रझाकार फौजेत चकमकी झडू लागल्या. सप्टेंबर १९४८ मध्ये तर कहर झाला! राज्याच्या ८५% लोकसंख्येत असलेल्या हिंदुनी सरदार पटेल यांच्याकडे साकडे घातले आणि सुरू झाला मुक्तीसंग्राम!
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पटेलांनी भारतीय सैन्यदलासोबत चर्चा केली आणि पोलीस कारवाई करण्याचे आदेश दिले.
असे म्हणतात की याला नेहरूंचा विरोध होता. परंतु पटेलांनी नेहरूंचा विरोध डावलून कारवाई सुरू केली. या कारवाईचे नाव ‘ऑपरेशन पोलो’ असे ठेवले गेले.
१३ सप्टेंबरला सुरू झालेली ही कारवाई १७ सप्टेंबर रोजी पूर्ण झाली आणि ऑपरेशन पोलो यशस्वी ठरले.
निजाम शरण आला आणि भारताने हैद्राबाद संस्थानाला भारतीय संघराज्यात सामील करून घेतले. अश्या प्रकारे भारतात एक पाकिस्तान तयार होणे सरदार पटेलांच्या मजबूत धोरणामुळे टाळले गेले.
हा इतिहास प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवण्यासारखा आहे.
–
- कम्युनिस्ट चीनने उचललंय इस्लामविरुध्द हत्यार, कारण भारतीयांसाठी धक्कादायक आहे!
- लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेलांबद्दल ह्या ८ महत्वपूर्ण गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.