Site icon InMarathi

“६ डिसेंबर भारताच्या इतिहासातील दुर्दैवी दिवस” : महापरिनिर्वाण आणि बाबरी मस्जिदचा विध्वंस

6 decm inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – राजेंद्र मणेरीकर 

===

भारताच्या इतिहासात ६ डिसेंबर हा दुर्दैवी दिवस आहे. ज्या दिवशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना मृत्यूने गाठले तोच दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद आदीनी बाबरीचा घुमट गाठण्यासाठी निवडावा ही गोष्ट क्लेषकारक आहे. बाबरी पाडणे हे या संघटनांचे उघड ध्येय होते. तो कार्यक्रम अनेक दिवसांपासून आखला जात होता. त्याची इत्यंभूत माहिती केन्द्र व राज्य सरकारकडे होती. त्यापैकी राज्यसरकार हे उघड पाठिंबा देणार यात विशेष काही नव्हते कारण त्याच पक्षाचे राज्य होते.

परंतु, केन्द्रात पी. व्ही. नरसिंहरावांसारखा थोर मनुष्य पंतप्रधानपदी होता. त्यांचे परममित्र शंकरराव चव्हाण, जे करारी, अभ्यासू व अतीव कार्यक्षम म्हणून ओळखले जात, गृहमंत्रीपदी होते. त्या प्रसंगी यांचे वर्तन आपण जणू त्या गावचेच नाही असे झाले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

बरे, या दोघांनाच दोष द्यायचा तर पूर्ण मंत्रीमंडळ आणि काॅंग्रेस पक्ष यांनीही ओठकानडोळे बंद ठेवले होते. याचा सरळसरळ अर्थ असाच झाला की बाबरीच्या पतनाला केन्द्र सरकार व काॅंग्रेस यांची मूक संमती होती. पाहुण्याच्या हातून साप मारून घेण्याचा कुटील डाव काॅंग्रेसने खेळला. संघ, विहिंप, भाजप आणि काॅंग्रेस या सर्वांनी संगनमताने बाबरीवर हातोडे मारले यांत शंका घेण्यासारखे काही नाही. त्या कृत्याची जबाबदारी या सर्वांवर सारखी आहे.

कमी जास्त करायचे तर काॅंग्रेसवर अधिक आहे. तो ही मोठा पक्ष होता, त्यांचे सरकार केन्द्रात होते, प्रसंगी नरसिंहरावांना हटवून ही घटना घडू नये यासाठी त्यांनी आकाशपाताळ एक करायला हवे होते, प्रतिआंदोलन उभारायला हवे होते.

बाकी किडुकमुडूक पक्षांनाही आंदोलन करणे शक्य होते पण त्यांनीही बडबडीपलिकडे आधी आणि नंतरही काही केले नाही.

 

 

हे सारे पाहिले तर म्हणता येईल की सर्व हिंदु बहुसंख्य असलेल्या सर्वच पक्षांचा बाबरीच्या पतनाला पाठिंबा होता. मुसलमानांना कधीतरी अद्दल घडवली पाहिजे ही प्रत्येकाचीच इच्छा होती. हिंदुत्ववादी संघटना वगळल्या तर बाकीच्यांचा फायदा दुहेरी होता. बाबरी परभारे पडणार होती आणि पाडणाऱ्यांना नंतर अखंड बोल लावता येणार होता!

हे सारे क्षणभर समजून घेतले तरी त्यांपैकी एकालाही ६ डिसेंबरचा मुहूर्त नको हे म्हणता आले नाही? बाकीच्यांचे सोडू, ६ डिसेंबरचे महत्त्व अडवाणींना माहीत नव्हते? अस्पृश्यांपासून ब्राह्मणांपर्यंत सर्वांची एका दर्जाची मोट बांधणारी संघटना असा जर आपण आपला लौकीक संघ सांगू इच्छितो तर निदान ही तारीख तरी नको हे कुणालाही कसे कळले नाही? हे लक्षण बुद्धिमांद्याचे आहे, उन्मादाचे आहे की दुष्टाव्याचे आहे?

स्वातंत्र्यपूर्व काळात तीन नेत्यांना महत्त्व होते.

गांधी, जिना आणि आंबेडकर.

 

 

यापैकी गांधी हिंदुचे, जिना मुस्लिमांचे आणि आंबेडकर अस्पृश्यांचे नेते होते. बाकी कुणाकडे राष्ट्रीय पातळीवर निर्णय करण्याची ताकद नव्हती, तसे त्यांचे जनमानसात स्थानच नव्हते.

आंबेडकरांनी मनोमन हिंदुत्वाचा त्याग केला होता आणि आपल्या समाजाची वेगळी ओळख निर्माण केली होती. ते गांधीजींना हिंदुंचा नेता समजत व आपल्या समाजाचे नेतृत्व त्यांच्याकडे जाणार नाही हे पाहात. यापैकी हिंदु-अस्पृश्य लढा नवा होता व त्याची उभारणी बाबासाहेबांनीच केली होती. हिंदुमुस्लिम प्रश्न मात्र खूप जुना होता आणि त्याला ऐक्याचीही काही किनार होती.

१८५७मध्ये हिंदुमुस्लिम एकत्र होते. ते ब्रिटीश सरकारला पाहवत नव्हते. त्यांनी हे राष्ट्र राजकीय सीमांनी एक केले आणि दोघांत भांडणे लावली. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात झालेल्या मालेगावच्या हिंदुमुस्लिम दंगलीचा वृत्तांत जाणून घेण्यासाठी लोकमान्य मालेगावात जाऊन राहिले आणि परत येऊन त्यांनी केसरीतून सरकारला धारेवर धरले.

 

 

“या दंगलीला दोन पक्ष जबाबदार नसून तीन पक्ष जबाबदार आहेत व तिसरा पक्ष म्हणजे सरकार” हे त्यांनी अपूर्व धार्ष्ट्याने प्रतिपादिले. ह्या दोन पक्षांमध्ये फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न यशस्वी होऊ द्यायचा नाही ही खूणगाठ त्यांनी तेव्हाच बांधली हे त्यांचे नंतरचे लिखाण व वर्तन पाहिले तर लक्षात येईल.

परिणाम असा झाला की जिना व लोकमान्य दोस्त झाले व त्यांनी १९१६साली हिंदुमुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविणारा लखनौ करार केला! त्यात हिंदु व मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळून दोघांनी एकत्र जगायचा प्रस्ताव मान्य केला गेला होता.

हे ऐक्य व ही कल्पना टिळकपश्चात राजकारणात टिकले नाही आणि हिंदु व मुस्लिम ही दोन राष्ट्रे एकाच भूमीवर नांदतात हा सिद्धांत सर्वमान्य झाला. (असे का झाले ह्याची मीमांसा पुन्हा कधीतरी!) या मान्यतेत फाळणीची बीजे होती. यात अांबेडकरांनी दलितांच्या राष्ट्राचाही प्रश्न आणला व मुस्लिमांप्रमाणे दलितांसाठी स्वतंत्र समांतर मतदारसंघ मागितले.

गांधीजींनी १९३५ साली उपोषण करून मुस्लिम व दलित या दोघांची स्वतंत्र मतदारसंघांची मागणी मान्य होणार नाही हे पाहिले. यात तीनही पक्षांचा आपापल्या परीने फायदा झाला. दलितांना राखीव मतदारसंघ मिळाले व मुस्लिमांना पुढे स्वतंत्र राष्ट्रच.

फाळणीच्या काळातील रक्तपात अत्याचार हा एक दुर्दैवी अध्याय आहे. पण फाळणीमुळेच हिंदु व मुस्लिमांना आपापली भूमी मिळाली हे सत्य आहे. फाळणी झाली तरी भारतात मुस्लीम असणारच होते व ते अल्पसंख्य असायचे होते. इंग्रजांचे सरकार गेले आणि हिंदुंचे आले.

हिंदुंचे असले तरी शेवटी ते राजकीय सरकारच! त्याला समाजात दुही कशी पेरावी, वाढवावी याचे बाळकडू इंग्रजाकडून व्यवस्थित मिळालेले. त्यामुळे हिंदुमुस्लिमांचे मनोमीलन व्हावे असा प्रयत्न सरकारकडून न होता, दर्शनी मुस्लिम न दलितांचा अनुनय करावा आणि प्रत्यक्षात ते मागास राहतील असे पाहावे ही काॅंग्रेसची नीती राहिली.

संघाने स्वतःची उभारणीच हिंदुत्वरक्षणासाठी केलेली. त्यांना सारखे भय की मुस्लिम हिंदुंना छळतील! मुस्लिमांपासून हिंदुत्वाचा बचाव करायचा असेल तर हिंदुत्वाची जाणीव वाढली पाहिजे. जाणीव वाढल्याशिवाय ठोशास ठोसा देता येणार नाही आणि मुस्लिमांच्या क्रौर्याला आळा घालता येणार नाही! संघाची स्थापना १९२५ला झाली.

 

“६ स्वयंसेवक”: डॉ हेडगेवार आणि इतर ५

 

जिना-गांधी यांच्यात वितुष्ट येऊन स्वतंत्र राष्ट्राची मागणी निर्माण झाली ती नंतर. हिंदुंचे राष्ट्र येणार हे स्पष्ट होऊ लागले पण त्याचे नेतृत्व गेले गांधीजींकडे. ब्रिटीश बोलत गांधींशी, जीनांशी आणि पुढे आंबेडकर आले. यात संघ कुठे नव्हता. संघाला फाळणी नको होती आणि मुस्लिमांबरोबर जगायचे होते! तसे जगायचे तर ते प्रेमाच्या जोरावरच शक्य होते. पण संघासाठी मुस्लिमजग शत्रुपक्ष. त्याचे कारण मुस्लिमांनी पूर्वी हिंदुंवर केलेला अन्याय, क्रौर्य इत्यादी.

आक्रमक म्हणूनच मुस्लिम येथे आले व आक्रमक म्हणूनच त्यांनी राज्य केले. देवळे पाडली, धर्मांतरे केली, बलात्कार केले…सारे खरे. पण त्याचे कारण मुस्लिम क्रूर हे नसून आपला बुळेपणा हे होते. आपल्या बुळेपणाकडे पाहिले तर लाजेने मान खाली जावी अशी परिस्थिती. शिवरायांसारखा अवतारी पुरुष न जन्मता तर आपली उरलीसुरली विचारशक्तीही नष्ट झाली असती.

मुस्लिमांच्या गैरवर्तनाला उत्तर देण्यासाठी ते वागले तसेच वागून दाखविण्याचा खेळ मग संघाने मांडला. त्यांनी आमची देवळे पाडली ना? आता आम्हीही दाखवून देऊ की आम्ही त्यांची मशीद पाडून शकतो! तिथे आमचे राममंदिर होते. ते त्यांनी पाचशे वर्षांपूर्वी पाडले. तेव्हा आम्ही बावळट होतो, आता (अचानक) समर्थ झालो आहोत. इतके की साक्षात मुसलमानांना आव्हान देऊ शकतो!

मग आम्ही सारी जमवाजमव केली. सर्वपक्षीय हिंदुंचा मूक पाठिंबा घेतला आणि आपल्या बहुसंख्येच्या जोरावर एक वास्तू पाडून दाखविली!

मुसलमान शासक मंदिरे फोडत, संपत्ती लुटत आणि तिथे तात्काळ मशीद बांधत. आम्हाला पाडायला जमले. त्यासाठी कुणा न्यायालयाची परवानगी लागली नाही. लष्कर येईल आणि गोळ्या घालील ही भीती वाटली नाही, मंदिर उभारायचे तर आता अनंत अडचणी!

आमचे शौर्य त्या सहा डिसेंबरपुरतेच जागृत झाले होते की काय? लोकांना वाटले, आता मुस्लिम दबून राहतील. २००२ साली त्यांनी रेल्वेचा आख्खा डबा जाळून दाखविला! मग मात्र आम्ही वाट पाहिली नाही, एका ठोशास अनेक ठोसे दिले!

ज्याला शत्रूशी लढायचे आहे त्याने शत्रूचा कधीही द्वेष करता कामा नये. तसा केला तर आपण शत्रूसारखे होतो. आपले बळ आपण शांतपणे वाढवावे, इतके की शत्रूला आपल्या वाट्याला जायची हिंमत सहजी होऊ नये. भारतासारख्या खंडप्राय, मागास देशात हे काम अतिशय नजाकतीने केले पाहिजे. धांगडधिंगा हे त्यावरील उत्तर नव्हे.

मुस्लिम गैरवर्तन करत असतील तर त्यांना शासन व्हायला हवे व त्याकरिता आपला शासनावर दबाब हवा. शांत संयमी व्यक्तीचा दबाब धाक असतो. आक्रस्ताळ्यांची दहशत असते. आपली प्रतिमा आपल्याला दहशतवादी अशी व्हायला हवी आहे काय?

बाबरी पाडल्यावर पंचवीस वर्षांत मंदिर बांधता येत नसेल तर आमच्या रक्तातला बुळेपणा तितकाच शिल्लक आहे हेच सिद्ध होते. त्याची लाज वाटत नसेल तर कोडगेपणाचा गुणही नव्याने चिकटला की काय अशी शंका येते. आपली बहुसंख्या हे आपले बळ मानू नये. आपले मन, बुद्धी आणि शरीर एक होऊन एकूणच परिस्थितीचा सामना करण्याकरिता सक्षम आहे काय हा प्रश्न विचारला पाहिजे. तो विचारण्यासाठी ६ डिसेंबर ही दुर्दैवी तारीख उत्तम आहे.

६ तारीख सोडून अन्य दिवशी बाबरी पाडू हा विचार ज्यांच्या मनाला शिवला नाही त्यांची बुद्धी काम करत नव्हती. मशीद पाडल्यावर मंदिर बांधल्याशिवाय येथून हलणार नाही असे ज्यांना म्हणता आले नाही त्यांचे मन कमकुवत होते. आणि भारतीयांची शरीरे दुर्बल आहेत हे सांगण्यासाठी कुण्या संस्थेचे प्रमाणपत्र आणण्याची गरज नाही. भारतात क्रिकेटचे सामने खेळायला बाहेरचे खेळाडू येतात. त्यांचे शरीरसौष्ठव पाहिले तरी पुरे.

प्रत्येक ६ डिसेंबरला प्रत्येक हिंदुने म्हणावे की मुस्लिम पूर्वी जसे वागले तसा मी वागणार नाही. त्यांचे माझे शत्रुत्व १५ आॅगस्ट १९४७ ला संपले. हळूहळू आम्ही एकदिलाने जगू. त्याची सुरुवात मी माझ्यापासून करीन. मी हे न केले तर मीच अशांततेला आमंत्रण दिले असे होईल. आम्ही बहुसंख्य आहो, आम्ही थोरल्या भावासारखे वागू.

प्रत्येक ६ डिसेंबरला प्रत्येक हिंदुने म्हणावे, आमच्या बुळेपणाने मुस्लिमइंग्रजांनी आम्हाला रडवले. तसेच आम्हीही आमच्यातल्या दुर्बलांना युगानुयुगे रडवले होते. आता ते आमच्याही पुढे जावोत. त्यासाठी माझ्या ताटातला एक घास मी आनंदाने त्यांना देईन व दिल्याची भावना मनात ठेवणार नाही.

सर्वांच्या सारख्या उत्कर्षातच माझा आणि माझ्या देशाचा उत्कर्ष सामावलेला आहे हे मी मला समजवीन व तसा वागीन. ६ डिसेंबरचा धडा असा असो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version